पहाटे ५ वाजताच मोरांच्या केकारवाने जाग आली.‌ येथे माणिकनगरसारखेच वातावरण आहे. मणिचूल पर्वतरांगासारखीच बालाघाटाच्या डोंगरांची रांग, गुरुगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमासारखाच मांजरा आणि मन्याड नद्यांचा संगम, वृक्ष, लता, वेलींची विपुलता, मोर आणि माकडांचा मुक्त संचार. नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्याही सगरोळी माणिकनगरशी एकरुप झालेले दिसते.‌  सकाळीच उपासना आटपून आठच्या सुमारास आम्ही उतरलेल्या, संस्कृती संवर्धन मंडळाच्या, सोयीसुविधांनी अतिशय सुसज्ज अशा, अतिथीगृहात तयार होऊन बसलो. गरमागरम चहा नाश्ता झाल्यावर श्री. विलास जकातेसरांबरोबर संस्थेचा परिसर फिरावयास निघालो. ह्याच परिसरात एकेकाळी श्री मार्तंड माणिक प्रभुंचा संचार असायचा.‌ त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विद्यानगरच्या या भूमीत फिरताना अंगी रोमांच दाटत होते. सुरुवातीला राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाला भेट दिली.  येथून पुढे सगरोळीच्या शिवाजी हायस्कूलमध्ये आलो. “कर्मयोग” नावाची संस्थेचे कार्यालय असलेली इमारत लक्ष वेधून घेत होती. थोडा वेळ शाळेमध्ये व्यतीत केला. या शाळेच्या इमारतीची पायाभरणी श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या हस्ते १९७५ साली झाली आहे. शाळेच्या मुख्य फलकावर श्री ज्ञानराज प्रभुंचे रंगीत खडूंनी चित्र काढून त्यांना स्वागतपर मानवंदनाच दिली होती. शाळेच्या विविध इमारतींच्या उद्घाटनशीला व इमारतींची नावे व संस्थेचे उद्दिष्ट पाहता, संस्कृती संवर्धन संस्थेची श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पिठाचार्यांप्रती असलेला कृतज्ञभाव आणि त्यांची माणिकनगरशी घट्ट जुळलेली नाळ प्रकर्षाने जाणवते.

अतिथिगृहावर परतताना नागकेशराची, प्राजक्ताची फुले गोळा करून आणली. एव्हाना श्रीजी आपल्या नित्य पूजेला बसले होते. त्यांच्या पूजेला फुले अर्पण करून श्रीजींच्या पूजेचा आनंद घेत बसलो. साडेदहाच्या सुमारास श्रीजींची पूजा आटोपल्यावर सकाळी अकरा वाजता देशमुखांच्या गढीवर निघायला सज्ज झालो. आजच्या दिवसाच्या पाद्यपूजांची सुरुवात येथूनच होणार होती.

साधारण सव्वा अकराच्या सुमारास आम्ही “केशव दुर्ग” ह्या सगरोळीच्या देशमुखांच्या (देसायांच्या) गढीवर (वाड्यावर) आलो. वाड्याच्या भोवती पाच भव्य बुरुज आहेत. अत्यंत प्रशस्त असलेला हा वाडा आपल्या गतवैभव अजूनही सांभाळून आहे. मुख्य बुरुजावर देवीचे पांढरे निशाणही, श्रीजींच्या आगमनाने होणाऱ्या आनंदामुळे डौलाने फडफडत होते. वाड्यामध्ये ठिकठिकाणी रंगबिरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. श्रीजी येण्याच्या मार्गावर गुलाबदलांच्या पायघड्या घातल्या होत्या. श्रीजींच्या आगमन होताच देशमुख कुटुंबातील सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. भक्तकार्याच्या जयघोषामध्ये श्रीजींची स्वारी देशमुखांच्या वाड्यामध्ये आली. श्रीजींनी प्रथम देवीचे दर्शन घेतले. नंतर देशमुख कुटुंबीयांनी श्रीजींची पाद्यपूजा केली. आसपासचे अनेक लोक वाड्यामध्ये पाद्यपूजेसाठी आले होते. अधिक महिना सुरू असल्यामुळे अधिक महिन्याचे वाण देणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. सुमारे तासभर हा सोहळा सुरू होता. घरातल्या सुवासिनींनी वहिनीसाहेबांची ओटी वगैरे भरली. त्यावेळेस वहिनी साहेबांनी श्री सिद्धराज प्रभुंचा ह्या खोलीमध्ये मुक्काम असायचा, असे सांगत गत आठवणींना उजाळा दिला. श्रीजींच्या आपल्या गृही येण्यामुळे झालेला आनंद देशमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. इथे श्रीजींची पाद्यपूजा सुरू असताना, श्री. देवीदास दादांनी आम्हाला देवीचे निशाण असलेल्या बुरुजावर नेले. दरवर्षी नवरात्रीमध्ये हे निशाण बदलले जाते. या बुरुजावरून सगरोळी गावाचा परिसर, बालाघाटाची डोंगररांग, मांजरा नदीचे नयनरम्य दर्शन होते. सगरोळीचा परिसर शक्य होईल तितका डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न केला.

देशमुखांच्या वाड्यावरून आम्ही श्री मार्तंड माणिकप्रभु कृपांकितआणखी एक प्रभुभक्त श्री. खंडेराव देशमुख यांच्या घरी पोहोचलो. येथेही अनेक प्रभुभक्तांची मांदियाळी जमली होती.‌ श्री. खंडेरावांच्या आजीबाईं (कै.‌ तान्यामा) ह्या श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या अत्यंत जवळच्या शिष्यांपैकी होत्या. त्याकाळी श्री मार्तंड माणिकप्रभुंनी तान्यामांना प्रसादस्वरूप दिलेली नथ,  हनुमानाचा टाक, सोन्याची अंगठी, मण्यांची माळ आजही देशमुख कुटुंबीयांनी आत्मियतेने जपून ठेवली आहे. तसेच पुढील पिढ्यांचे संरक्षण होण्यासाठी चांदीच्या महादेवाची पिंडीही आत काहीतरी वस्तू ठेवून, ती कधीही न उघडण्याची आज्ञा करून भेट दिली.  महाराजश्रींच्या दौऱ्याच्या वेळी उपयोगात येणारी मोठी भांडी, हंडे आजही ह्या भाग्यवान कुटुंबाने श्रद्धेने राखले आहेत. आज ह्या सर्व वस्तू श्री. देशमुख कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत. आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली, पण श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या कृपाप्रसादाने आम्ही सर्वांतून सुखरूपपणे तरुन गेलो, अशी कृतज्ञतेची भावनाही श्री. खंडेराव दादांनी व्यक्त केली. श्री मार्तंड माणिक प्रभुंनी सुरू केलेल्या दौऱ्याचे प्रयोजन आणि त्यांची वास्तविक कृती यातील सुयोग्य सांगड आपल्याला ह्या कृपांकित भक्तांनी उलगडलेल्या आठवणींच्या पेटार्‍यातून घालता येते. श्री. खंडेराव देशमुखांकडून आम्ही श्री. चंद्रकांत जोशी, श्री. अनुप जाधव यांच्या घरी पाद्यपूजेसाठी गेलो. सर्वत्र उत्साह व प्रभुभक्तीतला आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येक जण श्रीजींना आपल्या जीवनातील घडामोडी, प्रभुकृपेमुळे झालेली प्रगती श्रीजींना उत्साहाने सांगत होता. प्रत्येकाच्या कथा, व्यथा ऐकून श्रीजी त्यांना खारकांचा प्रसाद व यथायोग्य उपासना देत होते.

पाद्यपूजेच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही श्री. शंकरराव जोशी यांच्या घरी आलो. श्री. शंकररावांच्या प्रशस्त घरात मनोभावे पाद्यपूजन झाले. श्री. शंकररावांनीही श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.श्री शंकररावांकडील पाद्यपूजेनंतर आम्ही त्यांचे बंधू श्री. संतोष नारायणराव जोशी आणि श्री. राजेश्वर जोशी यांच्या घरी आलो. श्री. जोशी बंधुद्वयांच्या आदरातीथ्यानंतर आम्ही आजच्या दिवसाच्या पाद्यपूजेचे शेवटचे ठिकाण असलेल्या श्री. सगरोळीकरांच्या निवासस्थानी आलो. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या काळापासून श्रीप्रभु परिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आजही माणिकनगर येथील उत्सवकाळात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सगरोळीकर कुटुंबाकडे असतात आणि ते तितक्याच निस्पृह भावनेने त्याचे यशस्वी निर्वहन करतात. जेव्हा पहिल्यांदा श्री मार्तंड माणिकप्रभु सगरोळीला देशमुखांच्या वाड्यावर आले होते, तेव्हा बापूसाहेब सगरोळीकर अवघ्या दहा वर्षांचे होते. त्यावेळेस त्यांनी श्री मार्तंड माणिकप्रभुंची परोपरीने सेवा केली होती. बापूरावांचे आई-वडील लहानपणीच निवर्तल्यामुळे, श्री मार्तंड माणिकप्रभु बापूरावांच्या कुटुंबीयांना म्हणाले की, याला मी माणिकनगरला घेऊन जातो. अशाप्रकारे बापूराव माणिकनगरी आले. माणिकनगरात वास्तव्याला असतानाच बापूरावांचे गीताबाईंशी लग्न झाले. गीताबाईंच्या वडिलांच्या स्वप्नात श्री मार्तंड माणिक प्रभुंनी जावून, तुझी मुलगी सगरोळीच्या बापूरावांस दे, असे म्हणाले. सुरुवातीला या स्वप्नाकडे दुर्लक्ष केल्यावर, पुन्हा तसेच स्वप्न पडले. आणि मग सगरोळीच्या बापूरावांचा शोध घेता घेता गीताबाईंचे वडील सगरोळीहून माणिकनगरात आले. बापूसाहेबांनी जवळपास ४० वर्षे श्री माणिकनगर संस्थानाच्या कारभारात व व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार दरबाराची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. दरम्यानच्या काळात बापूरावांना सहा-सात मुले झाली. आपल्या वाढत्या परिवारासाठी माणिकनगर येथे घर बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्यांनी श्री मार्तंड माणिकप्रभुना विनंती केली. पण महाराजश्रींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. वारंवार विचारणा केल्यावर महाराजश्री म्हणाले, तिकडे सगरोळीचे जे आहे, ते कोण बघणार? पुढे तुलाच तिकडे जायचे आहे. श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु गादीवर बसले. श्री शंकर माणिकप्रभुंनी आपल्या महासमाधीच्या काही दिवस आधी बापूसाहेबांना खारकांचा प्रसाद देऊन म्हणाले की, मी तुला आता मुक्त करतो. तू आता सगरोळीस परत जा. आपल्या चुलत्यांचे निधन झाल्यानंतर, ते निपुत्रिक असल्यामुळे बापूरावांना संपत्ती व जमीन राखण्यासाठी सगरोळीला परतणे गरजेचे झाले. श्री शंकर माणिकप्रभुंच्या आज्ञेवरून बापूसाहेब पुन्हा सगरोळीला परतले. त्यानंतर बापूसाहेब माणिकनगरला येऊन जाऊन सेवेत राहिले. बापूसाहेबांनंतर त्यांचे चिरंजीवांनी प्रभुसेवेची ही धुरा समर्थपणे सांभाळली. श्री. शामराव सगरोळीकर सुमारे १९६५ पासून २०१९ पर्यंत सुमारे ५५ वर्ष प्रभुसेवेत राहिले. माणिक नगरच्या प्रत्येक महोत्सवात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. माणिकनगरला जाऊन आलो की तिथली ऊर्जा मला वर्षभर पुरते, असे ते नेहमी म्हणायचे. कधी कोणता फोड वैगरे आला की ते त्याला श्रीप्रभुच्या खारकेच्या प्रसादाची बी उगाळून लावत. अशा या प्रभुनिष्ठ परिवाराच्या घरी सर्वांसाठी दुपारच्या महाप्रसादाचीही सिद्धता केली होती. अत्यंत भावनेने सगरोळीकर कुटुंबाने श्रीजींची पाद्यपूजा केली. सध्याच्या पिढीतले श्री. राजीवकाका, श्री. शैलेशकाका आणि श्री. संजीवदादा अगदी अगत्याने सर्वांची व्यवस्था पाहत होते. सगरोळीकरांकडे श्रीजींच्या दर्शनासाठी नांदेडहून अनेक अनेक प्रभुभक्त आले होते. नांदेडच्या भक्तांच्या श्रीजींच्या दर्शनाची व्यवस्था आमचे स्नेही श्री. श्रीनिवास पाटील अगदी तत्परतेने पाहत होते. दुसरीकडे सुवासिनींचे वहिनीसाहेबांची ओटी भरण्याचे‌ व एकमेकींना हळदीकुंकू देण्याचे मंगलकार्य चालू होते. एकंदरीतच वातावरण भारलेले होते. सर्वांची दर्शने पार पडल्यावर, सर्वांनी एकत्र बसून श्रीजींसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. सगरोळीकर कुटुंबाच्या न मोडवणाऱ्या आग्रहामुळे सर्वांचेच आकंठ भोजन झाले. सगरोळीकरांच्या घरातील सदस्यांबरोबरच आम्हीही श्रीजींच्या उच्छिष्टाच्या प्रसाद सेवनाने धन्य धन्य झालो.

दुपारी तीनच्या सुमारास आम्ही सर्व पुन्हा शारदानगर येथील अतिथीगृहात आलो.‌ सततच्या पडणाऱ्या पावसामुळे श्रीजींना थोडीशी सर्दीची बाधा झाली होती. पाद्यपूजेच्या वेळेस मात्र सगरोळी गावामध्ये फिरताना पावसाने विश्रांती घेतली होती. एखाद-दुसऱ्या ठिकाणी मंद मंद सरी बरसल्या, पण त्याने कोणताही प्रभुभक्त भिजला नाही. अतिथीगृहावर देशमुखदादा श्रीजींना म्हणाले, महाराज संध्याकाळी शोभायात्रा आहे. तेव्हा श्रीजी म्हणाले, अहो इतका पाऊस पडतो आहे कशाला शोभायात्रा काढता? आपण प्रभुमंदिरात थेट प्रवचनाला जाऊया! यावर उपस्थितांपैकी कुणीतरी म्हटलं, महाराज शोभायात्रेची सर्व तयारी झाली आहे. लहान मुले ढोल, लेझीम पथकांसह तयार आहेत. तेव्हा एक क्षण थांबून श्रीजींनी म्हटलं, असं म्हणता, ठीक आहे!!! काढूया शोभायात्रा… असे म्हटल्याबरोबर समस्त सगरोळीकरांना आनंदाचे भरते आले. सहा वाजता शोभायात्रा निघणार होती.  मधल्या काळात थोडासा विश्राम करण्याकरता आम्हीही आपापल्या खोलीकडे निघालो. आम्ही विश्रांतीला जात असताना, पावसाने मात्र आता जोर धरला होता…

क्रमशः….

[social_warfare]