आज सकाळी श्रीजींची संस्थेला भेट आणि कर्मचारी आणि सभासदांसाठी मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले होते.  दुपारच्या महाप्रसादानंतर आम्ही माणिकनगरच्या परतीच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवणार होतो.

सकाळी साधारण साडेअकरा वाजता आम्ही सर्व संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी “कृषिवेद” इमारतीत आलो. श्रीजी संस्कृती संवर्धन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. NDA, NEET, JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना शहरी भागामध्ये लाखो रुपये आकारले जातात. पण ग्रामीण भागातील मुलांनाही ह्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करता यावे आणि त्यासाठी त्यांना सुयोग्य मार्गदर्शनाची गरज आहे, हे ओळखून संस्कृती संवर्धन मंडळाने, ग्रामीण भागातील मुलांची त्या दृष्टीने तयारी करून घेण्यासाठी KOTA (NDA, NEET, JEE coaching classes) क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून KOTA क्लासेसच्या पहिल्या बॅचचा शुभारंभ श्रीजींच्या हस्ते आज सकाळी पावणे बारा वाजता टाळ्यांच्या गजरामध्ये पार पडला.  यावेळी श्री. प्रमोददादांच्या सुनबाईंनी सौ. श्रद्धा देशमुख ह्यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल प्रास्ताविक केले. त्यानंतर श्रीजींनी आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांना स्पर्धात्मक परीक्षांना समर्थपणे सामोरे जाण्याची मानसिकता विशद केली. त्याचबरोबर संस्थेने नव्याने सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.

त्यानंतर श्रीजींचे संस्थेच्याच इमारतीत नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि  सदस्यांसाठी मार्गदर्शनपर उद्बोधन आयोजित केले होते. ह्या सभागृहात पहिला कार्यक्रम श्रीजींच्याच उपस्थितीत होत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला होता. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ह्या हॉलमध्ये पाच-सातशे लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. व्यासपीठासमोर चढत्या उंचीने पायऱ्यांप्रमाणे प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रेक्षक क्षमता तर वाढतेच, पण प्रत्येकाला कुठल्याही कोपऱ्यातून समोरचा वक्ता अगदी सुस्पष्टपणे दिसतो. सभागृहात आवाजाचीही व्यवस्था उत्तम आहे.

सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट श्रीजींचे आगमन झाल्यावर, श्री प्रमोद दादांनी श्रीजींना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. श्रीजींना कार्यक्रमाच्या अध्यक्षपदांचा मान देऊन, त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली.

संस्थेच्या गेल्या वर्षभराचा संक्षिप्त आढावा सुरुवातीला घेतला गेला. त्यानंतर श्रीजींना आशीर्वादपर उद्बोधन करण्याची विनंती करताच, श्रीजींनी केवळ मी बोलण्यापेक्षा आपण सगळे संवाद करूया, असे म्हटले.

आपल्या संबोधनाच्या सुरुवातीला संस्कृती संवर्धन मंडळातील “संस्कृती” या शब्दावर श्रीजींनी भाष्य केले. माझ्याकडे एक भाकरी आहे, त्यातून अर्धी भाकरी शेजाऱ्याला देऊन, उरलेली अर्धी भाकरी खाणे ही संस्कृती होय. आपल्या अशा उदात्त संस्कृतीचा अर्थ लक्षात घेऊन, तो सत्यात उतरविण्याचे, त्याचे संवर्धन करण्याचे काम, संस्कृती संवर्धन मंडळातर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून केले जाते, असे श्रीजींनी सांगतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सभागृहात झाला. संस्थेचे मुख्य कार्यालय ज्याचे नावच ‘कर्मयोग’ आहे, त्या कर्मयोगाचा खरा मतीतार्थ, त्या अनुषंगाने संस्थेने केलेली आतापर्यंतची वाटचाल, मानवी मूल्यांची केलेली जोपासना आणि ह्या सर्वांसाठी पूरक अशी श्रीप्रभुकृपा, याचा थोडक्यात उहापोह श्रीजींनी करून, उपस्थितांना संवाद करण्यासाठी प्रश्न विचारण्यास सांगितले.

कर्मयोगालाच धरून श्रीमद्भगवद्गीतेच्या कर्मयोगाच्या तिसऱ्या अध्यायापासून सुरू झालेला हा संवाद, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, अशा विविध विषयांवर, उपस्थितांच्या मनातील अनेक शंकांचे शास्त्रसंमत, व्यवहारातील अनेक उदाहरणांनी, शंकाचे निरसन व संपूर्ण समाधान होण्यात झाला. उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधान करताना श्रीजींनी भगवद्गीता, उपनिषदे ह्यातील अनेक श्लोक म्हटले. त्यांचे यथायोग्य विवरण, व्यवहारातील सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या उदाहरणांची सांगड घालून, सामान्यांच्या गळी त्यांना रूचेल, पचेल आणि पटेल अशा रीतीने समग्रपणे उतरवणे, हे श्रीजींच्या उद्बोधनाचे परम विशेष आहे. समोरच्याचे तात्काळ सम्यक समाधान करणे हे श्रीजींच्या विचक्षण प्रज्ञेचेच द्योतक आहे. समोरच्या व्यक्तीला एका सेकंदात नजरेखालून घालून (स्कॅन करून), त्याची समस्या ओळखून, त्या समस्येनुरुप परमात्म्याशी संवाद साधून, त्या वैश्विक शक्तीकडून येणारे संदेश आपल्या सिद्धवाणीमध्ये परावर्तीत करून, प्रसादासहित गरजेनुसार यथायोग्य उपासना तत्क्षण सांगणे, हे केवळ सद्गुरुच करू जाणे. अतिशय स्थितप्रज्ञ वृत्तीने, सर्वांचं सर्व काही ऐकून, सर्वांना मंगलमय आशीर्वाद देणारी, श्रीजींची सुहास्यवदन मूर्ती एका कोपऱ्यात उभे राहून पाहणे, हाही एक वेगळाच सुखसोहळा आहे. ह्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.

अर्धा पाऊण तास झालेल्या ह्या सुखसंवादानंतर,  श्री. प्रमोददादांनी आभारपर भाषण केले. त्यानंतर संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संपूर्ण सगरोळी दौऱ्यामध्ये अहोरात्र झटणाऱ्या श्री. धरमसिंग यांचा सत्कार विशेष होता. आपली संपूर्ण हयात प्रभुसेवेमध्ये आनंदाने व्यतीत केलेल्या श्री. धरमसिंगांचा, उत्साह वयाच्या ऐंशीकडे झुकले असतानाही तरुणांनाही लाजवील असाच होता. संपूर्ण दौऱ्यात जेथे जेथे धरमसिंग उपस्थित होते, तेथे ते त्यांना मी चालण्याऐवजी धावतानाच पाहिले. सेवा आणि कर्मयोगाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे, श्री. धरमसिंग!.

दुपारी दीडच्या सुमारास कार्यक्रम आटोपून आम्ही शारदानगरच्या परिसरात असलेल्या श्री. सरस्वतीदेवी मंदिर आणि श्री प्रभुगादीपाशी आलो. श्री मार्तंड माणिक प्रभू आपल्या सगरोळी दौऱ्यामध्ये ह्याच परिसरात वास्तव्य करून असायचे. आजही संध्याकाळी प्रभुगातीसमोर सप्ताह भजन म्हटले जाते. श्री प्रभुंचा प्रसाद असलेला सटका आजही आपल्याला येथे पाहायला मिळतो. सर्वांनी दर्शन घेतले, त्यानंतर आरती झाली. समोरच असलेल्या पिंपळ वृक्षाला पाहून, श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या काळात एका व्यक्तीला पिशाच्चबाधेपासून मुक्ती दिल्याच्या प्रसंगी ह्याच झाडाला बांधून ठेवले होते, त्या घटनेची आठवण, ह्यावेळी कुणीतरी सांगितली. भोजनानंतर सर्वांना आशीर्वाद देऊन दुपारी तीनच्या सुमारास आम्ही माणिकनगरला परतण्यासाठी निघालो.

सगरोळीकरांचा अविस्मरणीय पाहुणचार, नव्याने जुळलेले हृदयसंबंध स्मृतीपटलावर कोरत असतानाच आम्ही अटकळीच्या दिशेने रवाना होत होतो. संपूर्ण रस्ता हिरवागार होता. अटकाळीला श्री. देशमुख यांचे मधले बंधू श्री. विनोदराव वास्तव्यास असतात. श्री. गंगाधर सावकार, श्री. नागनाथ पेन्सिलवारदादा आणि संपूर्ण सगरोळी दौऱ्यामध्ये दौऱ्याचे नियोजन, व्यवस्था आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणारे, आमच्यापैकी कुणाला काही हवं नको पाहणारे, श्री. सुनीलजी देशमुखही आमच्याबरोबर सगरोळीपासून होते. श्री विनोददादांनी सहकुटुंब श्रीजींची पाद्यपूजा केली. सर्वांना चहा आणि नाश्ता दिला. श्री. विनोददादांचे घर शेतामध्येच आहे. त्यामुळे चहूबाजूंनी निसर्ग सोबतीला होताच. बाजूच्या झाडावर असलेले पेरू आम्हाला खायला मिळाले. घराच्या बाजूलाच संस्थेने व्यवस्थित जपलेले वाचनालय आहे. अटकळीला मुख्यत्वे संस्थेचा तेलबियाणे आणि सुगंधी वनस्पती प्रक्रिया ह्यावर भर आहे. आम्ही साधारणतः तासभर या ठिकाणी व्यतीत केला. शेतीपासून आधीच्या पिठाचार्यांच्या अनेक आठवणी श्री. विनोददादांनी ह्यावेळी जागवल्या. पुन्हा एकदा चहा घेऊन सव्वा पाचच्या सुमारास आम्ही देगलूरसाठी निघालो.

सव्वा सहाच्या सुमारास आम्ही देगलूरला श्री. मेढेवार सावकार यांच्या घरी पोहोचलो. येथेही अतिशय उत्साहात श्रीजींचे स्वागत व तद्नंतर श्रद्धेने पाद्यपूजा झाली. सावकारांच्या घरानंतर श्री. राजकुंटवारे यांच्याही घरी श्रीजींची पाद्यपूजा झाली. देगलूर मधील ह्या दोन पाद्यपूजा आटोपून आम्ही करडखेडला रवाना झालो. वातावरण ढगाळ असले तरी पावसाने अत्यंत आवश्यक असलेली विश्रांती घेतली होती. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही करडखेडला पोहोचलो. गावाच्या वेशीवरच हाती दिवट्या घेऊन, संबळ वाजवीत गावकरी श्रीजींच्या स्वागतासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

 

क्रमशः….

[social_warfare]