माणिकनगर येथे आपली गौरवशाली संस्कृती आणि अनेक परंपरा अत्यंत आत्मियतेने जपल्या जातात. “नित्य माधुकरी सेवा” हीसुद्धा मला अतिशय भावलेली, अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा.

वेदांमध्ये पाच प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केले आहे. ब्रह्म यज्ञ, देव यज्ञ, पितृ यज्ञ, भूत यज्ञ आणि मनुष्य यज्ञ. ह्यापैकी मनुष्य यज्ञामध्ये, आपल्या घरी आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य करून त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावे, असे सांगितले आहे. आपणही आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना फराळ किंवा भोजन देऊन संतुष्ट करतो किंवा प्रवासात आपण काही खाताना सहप्रवाशांनाही देतो, हाही मनुष्ययज्ञाचाच भाग. पूर्वीच्या काळी भोजनाच्या वेळी आपल्या घराच्या आसपास कुणी भुकेला तर‌ नाही ना, ह्याची खात्री केली जायची. तसे कुणी आढळल्यास त्याला भिक्षा अथवा भोजन देऊन मगच, आपण भोजन करायची पद्धत होती. कालौघात ही परंपरा हल्ली लुप्त होत चालली आहे.

ह्या मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊनच श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे दोन्ही वेळचा प्रभुप्रसाद येणाऱ्या सर्व भक्तांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे. गेले कित्येक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. माणिकनगरी झोळीची परंपरा अजूनही सुरू आहे. ह्या झोळीचा, माधुकरीचा प्रसाद आजही भंडारखान्यातील अन्नामध्ये मिळवून भक्तांना वाटला जातो. ह्या माधुकरी सेवेत आपल्याला दररोज सहभागी होता येईलच, असे नाही. माणिकनगरापासून दूर राहणाऱ्या भक्तांच्या मनात माधुकरी सेवेत आपल्याला सहभागी होता येत नसल्याची सल अनेक प्रभुभक्तांच्या मनात होती. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीप्रभु भक्तांच्या अंतरीची तळमळ जाणून‌ द्रवला नाही, तर‌ नवलच! आणि म्हणूनच की काय परगावी असणाऱ्या भक्तांसाठी नित्य माधुकरी सेवेचा सुंदर पायंडा श्री सिद्धराज माणिकप्रभुंच्या गौरवशाली कार्यकाळात पडला.

ह्या सेवेंतर्गत भक्ताला एक डबा आणि ओळख क्रमांक दिला जातो. प्रत्येकाने आपला डबा आपापल्या घरी घेऊन जायचा. दररोज तसेच, काही विशिष्ट प्रसंगी (पारायण, सण, मंगलकार्य) यथाशक्ती रक्कम अन्नदानसाठी ह्या डब्यात जमा करायची. दर दिवशी अगदी पाच-दहा रुपयांपासून आपण कितीही यथाशक्ती रक्कम ह्यात जमा करु शकता. मी साधारणपणे भोजनाला बसायच्या आधी प्रभुंच्या झोळीचे स्मरण करून, तसेच जगातील कोणी भुकेले असतील त्यांना आठवून, त्यांच्या वाट्याचा भाग म्हणून अन्नदानासाठी काही रक्कम नियमित ह्या डब्यात जमा करतो. ह्या निःस्वार्थी सेवेमुळे अन्नाची गोडी आणि खाल्ल्याचे समाधान अजूनच वाढते. साधारणपणे श्रीदत्त जयंतीला भक्त नित्य माधुकरी सेवेसाठी आपली नाव नोंदणी श्री प्रभु संस्थानात करुन, आपापला डबा घेतात आणि पुढच्या श्रीदत्त जयंतीला तो डबा श्रीप्रभु संस्थानात जमा करतात. नित्य माधुकरी सेवेतून जमा झालेल्या निधीचा विनियोग प्रभुंच्या नैवेद्यासाठी आणि भंडारखान्यात सुरु असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या अन्नदानासाठी वापरला जातो. अन्नदानासाठी आपण यथाशक्ती केलेल्या दानाचा विनीयोग, श्री प्रभुपादस्पर्शाने पुनित झालेल्या श्री दत्तक्षेत्री भक्तांच्या क्षुधा शांतीसाठी होतो, ह्यात समाधान तर अपार आहेच, पण नित्य माधुकरी सेवेने आपले प्रारब्ध क्षीण होऊन आपल्या पदरी अन्नदानाचे पुण्यही सहज जमा होते. श्रीप्रभु संस्थानातर्फे नित्य माधुकरी सेवेसाठीचे हे डबे विनामुल्य उपलब्ध आहेत. मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे पुण्यफळ सहज पदरी पाडून देणाऱ्या ह्या सत्पात्री दानाचा लाभ जास्तीत जास्त सद्भक्तांना मिळो, आणि त्यांना प्रभुंचे कृपाशीर्वाद प्राप्त होवोत, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…

[social_warfare]