‘‘भक्तकार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम…’’ हे शब्द कानी पडताच, किंवा ते मनातल्या मनात अथवा मुखाने म्हणू लागताच, एक अनामिक समाधान अनुभवास येते. प्रभुची मूर्ती डोळ्यासमोर उभी रहाते, आणि मनोमन हात जोडले जाऊन प्रभु पुढे आपण नतमस्तक होतो.

जेव्हां पासून समजायला लागले, तेव्हां पासून ‘‘देव बाप्पाला जयजय कर’’ असे कोणी सांगितले, की हात जोडून मुखाने भक्तकार्यच सुरु व्हायचे. मग तो कोणताही देव बाप्पा असो! हे संस्कार अर्थातच आई-बाबा व आजी-आजोबांचे. आज सुद्धा कोणत्याही विग्रहासमोर उभी राहिले, तरी सहज जो मंत्र म्हटला जातो, तो एकच – श्री प्रभूंचा महामंत्र!

घरातून बाहेर पडण्याआधी प्रभूंचे तीर्थ घेऊन भक्तकार्य म्हणावयाचे हा तर संपूर्ण घरासाठी आजोबांनी नियमच केला होता. आणि परीक्षेसाठी निघताना तर झोळीची भाकरी सुद्धा मिळत असे, व त्याच बरोबर कटाक्षाने आजोबा सूचना करीत की पेपर बघण्याआधी भक्तकार्य म्हण, आणि मगच पेपर सुरु कर. ती सवय सुद्धा आजतागायत तशीच आहे – कुठल्याही छोट्या-मोठ्या कसोटीच्या आधी कळत-नकळत भक्तकार्य सुरु होतेच.

कोणी आजारी असेल, कोणाला कुठे दुखत खुपत असेल, तरी भक्तकार्य महणजे रामबाण उपाय अशी घरी अगदी पक्की धारणा होती. ‘‘आमच्या प्रभूंचा महामंत्र हा रामबाण उपाय आहे’’ असे म्हणून आजोबांनी संप्रदायाबाहेरील सुद्धा किती तरी  लोकांना भक्तकार्याचा परिचय करून दिला होता.

सात वर्षांच्या नातवंडांना सुद्धा झोप लागत नसेल तर त्यांची आजी (माझी आई) सांगते की डोळे मिटून पडून रहा, आणि भक्तकार्य म्हणत रहा, शांत झोप लागेल. संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की ‘‘शुभंकरोति’’ च्या ही आधी भक्तकार्यच ओठांवर येते. गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव, नित्य आरतीच्या सुरुवातीला भक्तकार्य. मुले जेवायला बसली की आधी भक्तकार्य म्हणतात, आणि मग ‘‘वदनी कवळ घेता’’.

एकुण सार काय, तर भक्तकार्य हे मनास शांती, समाधान तर देतेच, पण त्यासोबत एक विलक्षण ऊर्जा, एक विलक्षण चेतना सुद्धा देते. किती ही आणीबाणीचा प्रसंग असो, त्याला सामोरे जाण्याचे बळ देते. प्रभुशी असलेल्या आपल्या नित्य संबंधाची आठवण करून देते. प्रभुकृपेच्या सतत होत असलेल्या वर्षावाची जाणीव करून देते, आणि त्या वर्षावात चिंब भिजून जाण्याची पात्रता सुद्धा देते.

महाराज प्रवचनात एकदा म्हणाले होते, की त्रयोदश अक्षरी जे मंत्र आहेत, ते तारक मंत्र असतात, उदा. ‘‘श्री राम जय राम जय जय राम’’. आणि आपल्या भक्तकार्या मधे तर परमपूज्य नृसिंहतात्या महाराजांनी तेरा विशेषणांनी प्रभूंचा गौरव केला आहे. म्हणूनच हा त्रयोदश शब्दांचा महामंत्र भक्तांसाठी तारकमंत्र आहे. महाराज असे ही म्हणाले होते की नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ह्यातील प्रत्येक विशेषणाचा निर्देश हा एकाच तत्त्वाकडे आहे, आणि ते तत्त्व म्हणजे – ती एक अखंड परमात्म सत्ता. ते प्रवचन ऐकल्या पासून भक्तकार्याच्या उच्चारणाला एक वेगळा, व्यापक दृष्टिकोण मिळाला आहे. आता प्रत्येक विशेषण उच्चारताना त्या परमात्म्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न होतो, हे फक्त आणि फक्त सद्गुरु श्री ज्ञानराज प्रभु महाराजांच्या अखंड कृपेचे फळ आहे.

शेवटी ‘‘सकलमत स्थापित श्री सद्गुरु माणिकप्रभु महाराज की जय’’ हा पुकारा करताना तर खूप मिश्र भाव मनात येतात. आपल्या सारख्या भक्तांवरील नितांत प्रेमापोटी त्या भक्तवत्सल प्रभुने सकलमत संप्रदाय स्थापन केला, आणि ह्या भवसागरातून तरुन जाण्याची गुरुकिल्लीच आपल्याला भेट केली हे आपले किती मोठे भाग्य – असा कृतज्ञतापूर्ण भाव तर असतोच असतो, पण त्याच बरोबर सकलमताचा हा संस्थापक, संपूर्ण प्राणिमात्राचा हा त्राता – आपल्या अत्यंत निकटतम आहे, आपला सद्गुरू आहे, आपला आहे असा एक प्रेमपूर्ण अभिमान सुद्धा मनात डोकावतो, तसेच प्रभूंच्या जयजयकाराचा हा निनाद सगळ्या विश्वात दुमदुमत राहो अशी प्रामाणिक कळकळ होऊन मन प्रभुलाच प्रार्थना करते की ‘‘जी भक्त प्रतिज्ञा तीच श्री गुरु आज्ञा’’ ह्या श्री मार्तंड प्रभूंच्या उक्ति प्रमाणे आम्हा भक्तांची ही इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न होवो, व प्रभूंच्याच असीम कृपेने त्या प्रयत्नांना सुयश लाभो.

अशा ह्या श्री प्रभूंच्या परम पवित्र, परम मंगल, परमपददायक महामंत्राची महती यथायोग्य वर्णन करण्याची तर माझी योग्यताच नाही. पण त्याविषयी असलेले प्रेम, आस्था, आदर व अभिमान एका छोट्याशा काव्यात गुंफण्याचा एक अतिशय छोटासा प्रयत्न केला आहे. हे एका बालकाचे बोबडे बोल आहेत, असे म्हणून प्रभु हासत हासत, अगदी प्रेमळपणे, हे काव्य स्वीकारील, ह्या विश्वासासह ही रचना त्यांच्या चरणकमली अर्पण करते.

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा महामंत्र ।
तेच आमुचे ध्यान-जप, तेच आमुचे श्लोक, स्तोत्र ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचे हे ब्रीदवाक्य ।
श्रुति-स्मृति ते आम्हासि, तेचि आम्हासि महावाक्य ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुची ही ब्रीदावली ।
प्रातःप्रार्थना तीच आमुची ‘‘शुभंकरोति’’ सांजवेळी ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा जयजयघोष ।
त्याने लाभतसे मानसी स्थैर्य-धैर्य शांती-संतोष ।।

भक्तकार्य कल्पद्रुम श्रीप्रभुचा हा जयजयकार ।
शब्द त्रयोदश मंत्रोच्चार, भवडोही आम्हा तारणहार ।।

[social_warfare]