
या सच्चिद्गगनासारिखा मी नाही पाहिला
या सच्चिद्गगनासारिखा मी नाही देखिला ॥ध्रृ॥
मी बहुत धुंडियेले,
मी बहुत देखियेले,
मी बहुत अनुभवियेले, ऐसा नाही पाहिला ॥१॥
कधी गुफांमध्ये वसे,
कधी दरबारांत बैसे,
परी ऐसा निर्विकारी जगी, नाही पाहिला ॥२॥
वेडाभाऊ तो अज्ञानी,
परी ज्ञानियांचा ज्ञानी,
सकल वेदांत जो जाणी, ऐसा नाही पाहिला ॥३॥
काही नसे त्याचे पदरी,
परी लक्ष्मी लोळे द्वारी,
तो मनोवांछित सारे पुरवी, ऐसा नाही पाहिला ॥४॥
मनी ठेवि अकर्ता भाव,
सर्व दत्ताची ही माव,
भक्तांसाठी घेई धाव, ऐसा नाही पाहिला ॥५॥
हिंदू ख्रिस्ती मुसलमान,
भेद सांडूनिया जाण,
केले सकलमत स्थापन, ऐसा नाही पाहिला ॥६॥
भक्तकार्य कल्पद्रुम,
तो हा गुरु सार्वभौम,
जो माझा आत्माराम, ऐसा नाही पाहिला ॥७॥
जो जाई माणिकनगरी,
प्रभु त्यांचे हात धरी,
भवसागरी जो तारी, ऐसा नाही पाहिला ॥८॥
Recent Comments