मातेसारखे कनवाळू, पित्यासारखे सांभाळ करणारे, श्री माणिकप्रभु अत्यंत कृपाळू आहेत. ते कुणाचीही आबाळ, उपेक्षा होऊ देत नाहीत. ‘आम्हाला धरता येतं पण सोडता येत नाही,’ हे श्रीप्रभुंचे अक्षय्य आश्वासन आहे. श्रीप्रभूंच्या अवतारकाळात अगणित लीला झाल्या. त्यातील काही छोट्या परंतु त्यातून मोठा बोध मिळणाऱ्या काही निवडक लीला आपल्या मनावर खोल परिणाम करून जातात.

हुमणाबादेत एक अभाविक गृहस्थ राहत होता. आजवरच्या अनेक लीलांनी श्रीप्रभूंची इतकी ख्याती सर्व दूर पसरूनही, तो स्वतः मात्र कधी श्रीप्रभूंच्या दर्शनाला जात नसे. उलट श्रीप्रभूंच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची निंदा करून, त्यांना फुकटचे हिणवीत असे, त्यांची चेष्टा करून, त्यांना नावे ठेवीत असे. असे असताना एक दिवस पायातील चप्पल हरवली म्हणून तो अस्वस्थ झाला. त्याने अनेक ठिकाणी शोधले, परंतु त्याला चप्पल काही मिळाली नाही. या अभाविक माणसाचा हरवलेला जोडा हा अत्यंत आवडीने घेतलेला अगदी नवीन कोरा करकरीत होता. त्यामुळे त्याला चप्पल हरवल्याचे अतिव दुःख होऊन, त्याच्या मनास त्याची चुटपुट लागून राहिली. अज्ञानी, लोभी आणि कंजूष अशा आपल्या स्वभावाला अनुसरून त्याने “जर मला माझी चप्पल मिळाली तर श्रीप्रभूस साखर वाटीन”, असा मनोमन नवस केला. त्यावर आणखी “जर माझी पादत्राणे आजच विनासायस मिळाली, तर श्रीप्रभूकडे स्वतः जाऊन साखर वाटीन,” असेही नवसाचे बोल तो बोलून गेला. पण असा नवस बोलताना आपल्या कंजूष स्वभावानुसार केवळ “दमडीची साखर” वाटेन, असे उद्गार त्याने श्रीप्रभूंच्याप्रती असलेल्या तिरस्कारपोटी काढले. अशा अज्ञानी जीवाला श्रीप्रभूंचे चरित्र, त्याची खोली कशी कळणार?

परंतु त्याच दिवशी त्या अभाविक माणसाला आपली चप्पल अनायसेच मिळाली आणि तो चपापला. आता मात्र त्याच्या मनात श्रीप्रभूंविषयी विचार येऊ लागले. आपण मनात विचार करत होतो, त्याप्रमाणे आजच्या आज चप्पल मिळाली. आपण सहजच दमडीची साखर वाटू असा नवस बोलून गेलो, परंतु आपल्याच अत्यल्प नवसाची त्याला लाज वाटू लागली आणि या विचाराने त्याला रात्री झोपही येईना. शेवटी दुसऱ्या दिवशी चार आण्याची साखर घेऊन तो प्रभूदरबारात श्रीप्रभूंच्या समोर उभा राहिला. चार आण्याच्या साखरेची पुडी त्याने श्रीप्रभूंसमोर उघडून ठेवली. ते पाहिल्याबरोबर श्रीप्रभूंनी त्याच्या मनातील नवसाप्रमाणे तात्काळ आज्ञा केली की, “ह्या साखरेतून दमडीच्या नवसाचा भाग तेवढा काढून घ्यावा,” असे म्हणून श्रीप्रभूंनी आपल्या एका शिष्याला बोलावून तराजू आणविला आणि त्या साखरेच्या पुडीतील दमडीच्या किंमतीची साखर तोलून घेतली. श्रीप्रभूंच्या या मनकवड्या कृतीने तो अभाविक माणूस गर्भगळीत झाला. ज्याच्या जैसा भाव, तशी श्रीप्रभूंची प्रसन्नता! त्या अभाविक माणसाच्या चपलेचा जोड तात्काळ सापडवून देऊन त्याचा नक्शा श्रीप्रभूंनी तात्काळ उतरविला होता. त्याच्या उपहास करण्याच्या वृत्तीस सर्व लोकांच्या समोर परस्पर श्रीप्रभूंनी अशी वेगळ्याच प्रकारे शिक्षा दिली होती. श्रीप्रभूंचा मनकवडेपणा आणि त्यांच्या सामर्थ्यांची, अधिकाराची साक्ष पटून पश्चातापाने तो श्रीप्रभूंना शरण गेला आणि आपण मला क्षमा करावी, असे म्हणून, तो वारंवार नमस्कार करू लागला. त्यावेळेस श्रीप्रभूंनी त्याला, “तुझ्या पादरक्षेसाठी माझ्या प्रभूला कष्ट पडले. त्याची कल्पना कदाचित तुला नसेल. आपल्या शुल्लक महत्त्वकांक्षेपोटी आपण प्रभुची परीक्षा घेतो, त्याला वेठीस धरतो. परंतु असे करणे योग्य नाही!” असे म्हटले. श्रीप्रभूंच्या ह्या सौम्य बोलामध्येही खास मेख दडली आहे. जरी श्रीप्रभूंचे वरील बोल वरवर खोचक असले, तरी त्यात उपदेशामृत ठासून भरलेले आहे. श्रीप्रभुंचे हे अमृतमय बोल कानी पडताच ऐकणाऱ्याच्या वृत्ती तात्काळ निवळतात. या छोट्याशा कथा भागातूनही समस्त मानव जातीला एक सुंदर बोध मिळत आहे. आपण देवाकडे काय मागतो, एखाद्या शुल्लक गोष्टींसाठी भगवंताला कशाप्रकारे नवस बोलतो, त्याची पूर्तता कशाप्रकारे करतो, त्याबाबतीत आपण किती प्रामाणिक असतो, याचा सुंदर आरसा ही प्रभुलीला आपल्याला दाखविते. त्याचप्रमाणे श्रीप्रभु हा भक्तवचनांप्रती किती दक्ष असतो असतो, तो भक्ताशी कशाप्रकारे जोडलेला असतो, मुख्य म्हणजे भक्ताचा भाव काय आणि कसा आहे, हे तो नित्य कशाप्रकारे तपासून पाहतो, हेही आपल्याला यातून घेण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे “तुझ्या पादरक्षा शोधण्यासाठी माझ्या प्रभुला कष्ट पडले,” असे जेव्हा श्रीप्रभु म्हणतात, तेव्हा ते या गोष्टींचे श्रेय स्वतः न घेता आपल्या दत्तप्रभुंना देतात. यावरून श्रीप्रभुंच्या ठाई असलेला “अकर्ता” भावही ठळकपणे निर्देशीत होतो. सहज सुंदर जीवन जगण्याचे बाळकडू श्री माणिक चरितामृत आपल्याला नित्य पाजत राहते.

तो अभाविक माणूस आता पश्चातापदग्ध झाला होता. श्रीप्रभूंचे बोल ऐकून तो अगदी सद्गदीत झाला होता. त्याच्या मुखातून शब्दही फुटेना. कसातरी धीर धरून त्याने आपला अपराध श्रीप्रभूंसमोर कबूल केला. “मी आधीच अल्पमती आहे, त्यात मद आणि अहंकारामुळे कारण नसताना आपली निंदा करीत होतो. परंतु आता मी सावध झालो आहे. आपली योग्यता, आपली महत्ता, आपला अधिकार मला कळून चुकला आहे. यापुढे मी अत्यंत काळजीपूर्वक वागेन. आपल्या चरणांचा दास होऊन प्रभुदरबारी पडेल ती सेवा करीन,” असे म्हणून तो मनुष्य श्रीप्रभूंच्या चरणी लागला. अशाप्रकारे तो निंदक श्रीप्रभूंचा भक्त बनला. एखादा पापी मनुष्यसुद्धा श्रीगुरुंच्या सान्निध्यात येताच उद्धरून जातो. “समस्त मानव जातीचे कल्याण,” हेच श्रीगुरुंच्या अवताराचे परमविशेष आहे. या अभाविक माणसासारखे कित्येक दुराभिमानी श्रीप्रभूंनी आजवर उद्धरिले आहेत.

वास्तविक पाहता श्रीप्रभूंची ही लीला अत्यंत छोटीशीच आहे. परंतु त्यातून फार मोठा धडा आपणा सर्वांनाच घेण्यासारखा आहे. त्या अभाविक माणसाने ‘आज जर मला चप्पल मिळाली, तर दमडीची साखर वाटीन,’ असे मनातल्या मनातच बोलला होता. इतर कोणासही ती गोष्ट ठाऊक नव्हती. परंतु चप्पल मिळाल्यावर केवळ दमडीची साखर आपल्या लौकिकास साजेशी होणार नाही, म्हणून तो चार आण्याची साखर घेऊन गेला. सर्वज्ञ श्रीप्रभूंनी त्यातील केवळ दमडीची साखर तोलून घेतली. आपणही बरेचदा संकटकाळांत किंवा एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी भगवंतासमोर अनेक नवस बोलतो, किंवा आपल्याला कोणी पाहिले नाही, कुणाला काही कळणार नाही, या भ्रमात अनेक गोष्टी करून जातो. श्रीप्रभुंना मात्र आपल्या केवळ कृतीच नाही, तर मनातले समस्त विचारतरंगही कळत असतात. त्यामुळे आपण भगवंतासमोर भावनेच्या भरात काय बोलून जातो, आपल्या मनांत काय काय विचारतरंग उमटत असतात आणि याबाबतीत आपण किती दक्ष, सजग असावे, याचा सुंदर परिपाठच ही छोटीशी प्रभुलीला आपल्याला घालून देते.

[social_warfare]