सत्यदर्शन घडवीसि गुरुराया

 

वेलघेवडा हेच उपजिविकेचे साधन
अज्ञानवश ब्राह्मण खरोखर मानून
घेवड्याच्या मुळाशीच होते निधान
उपटून दाविले श्रीगुरुंनी ।।१।।

अथवा नाना नाच्याचे वर्तन
स्त्रीपात्र वेशभूषेत करी नर्तन
प्रभु करी हरी-लीलांत परीवर्तन
स्वरूपदर्शन तया करवोनि ।।२।।

बहिरंग प्रचार वेष्टण आवरण
बाह्यांगाचा मोह मोठा विलक्षण
सत्यधर्मासी हेच खरे व्यवधान
सावधान अखंड याकारणे ।।३।।

करिसी समस्त जगताचे पोषण
अन् सृष्टीतील घडामोडींचे नियंत्रण
माणिका तुजवांचूनि जगत्रयी कोण
सर्वशक्तिमान ऐसा त्रिभूवनी ।।४।।

सत्याच्या स्वरुपास सोन्याचे आच्छादन
मजलाही सदोदित तयाचेच आकर्षण
हिरण्यमयी आच्छादन दूर सारून
सत्यदर्शन घडवीसि गुरुराया ।।५।।

बाळ माणिका

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

देव साधु गण शोधती ज्यासी
सवंगड्या सह खेळेे वनासी
भाव धरीता सहजची पावे

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

कुणास वाटे अंतरी धरीला
कुणी म्हणे मी नयनी देखिला
प्रगट होवुनी गुप्तची राहे

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

शक्ती भक्तीची

दह्यामध्येच असे लोणी,
समजले नाही कुणी,
जाता रवीने घुसळोनि,
कळोनि येत ।।१।।

जरी प्रभु अंतरात,
वसत असे दिनरात,
भक्ती विना भेटगाठ,
पडत कैसी ।।२।।

दास मारुतीच्या अंतरात,
प्रकटले स्वये सीताकांत,
भक्तीच्या प्रेम बंधनात,
भगवंत बंधे ।।३।।

व्यंकेची निर्व्याज भक्ती,
सदोदित स्मरावी चित्ती,
तिस देवीपदाची प्राप्ती,
शक्ती भक्तीची ।।४।।

भक्त रामण्णापंत दुबळगुंडी,
तैसेचि संतरामदादा गवंडी,
अभिमानी प्रभुभक्तांची दिंडी,
अखंडीत चाले ।।५।।

किती एक वर्णिती,
भक्तीची दिव्य महती,
नच होय तृप्ती,
किती जन्मांतरी ।।६।।

प्रभुचे नाम रामबाण,
साधी अचूक संधान,
येई भक्तीस उधाण,
मन उन्मन ।।७।।

भक्ती सरीतेचा उगम,
श्रीप्रभु नामात सुगम,
स्वरूप दर्शन विहंगम,
संगम अपूर्व ।।८।।

आनंद सोहळा

श्रीजी आणि परिवाराच्या आगमनाने
आनंदाला उधाण आले
मुंबईतल्या असह्य उन्हाळ्यात
सारे भक्तिरसात न्हाऊन गेले

महाराजांच्या पदस्पर्शाने
अनेक घरे पुनीत झाली
पादुकांच्या पुजनाने
पाद्यपुजा संपन्न झाली

पालघर येथील श्री प्रेमळ विठ्ठल मंदिराला
श्री मार्तंड माणिकप्रभूंचा सहवास लाभला
१०५ वर्षानंतर श्री ज्ञानराजप्रभु महाराजांनी
भेट देऊन पुन्हा इतिहास जागवला

तीन दिवसांचा माणिकयज्ञ
भक्तांसाठी होती मोठी पर्वणी
श्रीजींचे गीतेवरील प्रवचन
सांगे मनुष्याची कहाणी

काम क्रोध लोभ हे शत्रु
असती मुळ दुःखाचे
सोप्या शब्दांत समजुन सांगती
बोल श्री ज्ञानराजप्रभु महाराजांचे

श्री आनंदराजप्रभुंचे सुमधुर गायन
वाढवी आनंद भजनाचा
श्री चैत्यनराजप्रभुंचे सुरेख निरूपण
गर्भित अर्थ उलगडती पदांचा

प्रज्ञानराजप्रभु स्वरचित भजनातून
दाखवती चुणूक भक्तीसामर्थ्याची
सभागृह गेले भारावून
दाद देती कौतुकाची

माणिकयज्ञातील तिसरा दिवस
गाननृत्यरुपी सेवा अर्पण करी
उधळण होई तांबुस पिवळ्या रंगाची
महाराजांसह दुर्मिळ क्षण कॅमेरा कैद करी

तिन्ही दिवस भोजनरुपी प्रसादाने
सारे भक्तजन तृप्त झाले
सोमवारच्या पारंपरिक भजनाचे
साऱ्या भक्ताना निमंत्रण मिळाले

अखेर उजाडला तो दिन
माणिकनगरी परतण्याचा
जड अंत:करणाने निरोप देताना
आशीर्वाद घेती महाराजांचा

श्रीमाणिकप्रभूंचा हा आनंदसोहळा
स्मृती जपे समाधानाची
नेहमीच असे प्रतीक्षा आम्हास
श्रीजींच्या पुन्हा आगमनाची

प्रभु माझा हा लेकुरवाळा

प्रभु माझा हा लेकुरवाळा दीनबंधु उपकारी।
नित्य मुक्त असुनी झाला भक्तांसाठी संसारी।।१।।

प्रभु तो भावातीत असुनि पीड़ा आमुची जाणतो।
निर्मळ भक्ती पाहुनी आमुची आंनदे डोलतो।।२।।

दत्तप्रभू आले माणिक रूपाने या भूवरी।
होण्या साक्षात्कार पाहिजे भक्तिभाव अंतरी।।३।।

अहंकार ममता आसक्ती सोडविली भक्तांची।
प्रभुनी आम्हा शीघ्र करविली ओळख भगवंताची।।४।।

प्रभु म्हणती वर देण्या आलो रे मी तुज सम्मुख।
भक्त मागतो द्रव्य, विषय, धन संसाराचे सुखं।।६।।

प्रभुना होते दुःख पाहता भक्तांचे अज्ञान।
अहोरात्र झिजती प्रभु देण्या भक्ता सत्यज्ञान।।७।।

नित्यमुक्त प्रभुमाणिक माझा त्रैलोकीचा राजा।
स्वये देह धारण करुनी श्रमतो भक्तांच्या काजा।।८।।

एकमुखी दत्तगुरु

मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती. ब्रह्मा विष्णु महेश या तिन्ही देवतांचा अनोखा संगम असलेल्या त्रिमुर्ती देवतेचा जन्मोत्सव.”मासानां मार्गशीर्षोऽहम्”. “सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे” असे साक्षात भगवान श्रीकृष्ण सांगतात; त्या मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा म्हणजे भगवान श्री दत्तात्रेयांच्या जन्माचा आनंदोत्सव.

ब्रह्मा विष्णु महेश एकाठायी एकवटलेल्या भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती त्रिमुखी असणे स्वाभाविकच आहे. तुम्ही कधी एकमुखी भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहिली आहे का? नाही ना. मी पाहिली आहे. आजही पहातो… ती ही सगुण साकार रुपात. माझे सद्गुरू, भगवान श्री दत्तात्रेयांचे चतुर्थ अवतार, श्रीभक्तकार्यकल्पद्रुम सकलमताचार्य श्री माणिक प्रभू महाराज. एकमुखी दत्तगुरु.

प्रत्येक संतपीठाची एखादी तरी वेगळी छटा असते. ती तुम्हाला दुसऱ्या संतपीठाच्या ठिकाणी आढळणार नाही. कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील हुमणाबाद नजिक माणिकनगर येथे पीठासनाधिस्थ श्री माणिक प्रभू महाराज यांची गुरु परंपरा हे येथील एक अलौकिक वैशिष्ट्य आहे. गेली २०० वर्षे ही गुरु परंपरा अक्षुण्णपणे जोपासलेली आहे. “माझ्या गादीवर मीच बसणार” या पहिल्या श्री माणिक प्रभू महाराजांच्या वचनाप्रमाणे तेच प्रभू महाराज, आजच्या सहाव्या पीठासनाधिस्थ सद्गुरू श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या रूपाने, आपल्या भक्तांच्या लौकिक व पारलौकिक समुत्कर्षाचा कैवार घेत आहेत. २०० वर्षे अव्याहत. क्वचितच हे अलौकिक वैशिष्ट्य आपल्याला अन्य संतपीठाच्या ठिकाणी पाहायला मिळेल.

या संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे. प्रभू दरबार. सर्वच दत्तपीठांत दत्तजयंतीचा महोत्सव दणक्यात साजरा केला जातो. माणिक नगरला तर हा महोत्सव १० दिवस चालतो. पण “प्रभू दरबार” म्हणजे “जरा हटके” सोहळा. दत्तजयंतीचा महोत्सव आटोपला की दुसऱ्या दिवशी रात्री श्री माणिक प्रभू महाराजांचा दरबार भरतो. राजवस्त्रे ल्यालेले, नानालंकारमंडीत, छत्र चामरे भूषित, डोक्यावर माणिक प्रभूंची खास ओळख असलेली कलाकुसरीची भरजरी टोपी परिधान केलेले राजयोगी संतवर्य प्रभू महाराज; रात्री दरबारातील प्रभू गादीवर विराजमान झाले की प्रभू दरबार सुरू होतो. विशेष म्हणजे दरबारात आलेल्या प्रत्येक भक्ताला प्रभू महाराज स्वहस्ते प्रसाद देतात. शेवटच्या भक्ताला प्रसाद दिला की प्रभू महाराज गादीवरून उठतात. दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारा प्रभू दरबार हे माणिक प्रभू महाराजांच्या सकलमत संप्रदायाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

जर कोणाला एकमुखी दत्तात्रेयांचे दर्शन घेण्याची जिज्ञासा झाली तर त्यांनी प्रभू दरबाराला जरूर यावे आणि सगुण साकार रुपातील राजयोगी एकमुखी भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन धन्य व्हावे.