काल ९ फेब्रुवारी, श्री प्रभुगादीचे पाचवे पीठाधीश श्री सिद्धराज माणिकप्रभु यांची ८६वी जयंती. अस्तित्वाचीही काही विशेष योजना होती की काल नेमका एकांत मिळाला. रोजची उपासना आटोपून, श्रीप्रभुंच्या फोटोपाशी हात जोडले आणि झोपेची तयारी केली. अगदी त्याच वेळी श्रीप्रभु संस्थानाने उपलब्ध करून दिलेल्या “गुरुवाणी” ह्या प्रभुपदांच्या गीतांच्या, श्री सिद्धराज प्रभुंच्या सुरेल आणि दैवी स्वरांचा साज चढलेल्या अमुल्य ठेव्याची नेमकी आठवण झाली. ह्या पदांच्या ध्वनिमुद्रणाचा योग कसा जुळून आला, त्याची अत्यंत सुरस कथा श्रीजींनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सविस्तर कथन केली आहेच. छान पैकी स्नान करून, श्रीप्रभुंसमोर सुवासिक अगरबत्ती लावून, दिव्याच्या मंद परंतु, सोनेरी प्रकाशामध्ये ध्यान लावून सहजासनात बसलो. श्री सिद्धराजप्रभुंच्या हयातीत त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला कधी झाले नाही, परंतुज्ञ ह्या गुरुवाणीसाठी निवडलेल्या त्यांच्या लोभस चित्रामध्ये दिसत असलेल्या, तंबोऱ्यावर फिरणाऱ्या उजव्या हाताच्या बोटांची जादूच जणू एखाद्या मखमली स्पर्श प्रमाणे माझ्या मनबुद्धीवर झाली आणि मन क्षणार्धात श्रीप्रभु मंदिरातील आनंद मंटपात जाऊन पोहोचले.
त्यावेळी सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री सिद्धराज प्रभु म्हणाले होते, की तुमच्या इच्छेनुसार मी श्रीप्रभुंची पदे म्हणेन, पण ती कोणत्याही इतर ठिकाणी न म्हणता श्रीप्रभु मंदिरातच म्हणेन. आणि ध्वनिमुद्रणाच्या तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून, त्यांची उपेक्षा करून आपल्या आवडत्या वादकांना घेऊन श्री सिद्धराज प्रभूंनी आपल्या दैवी स्वरामध्ये ही पदे अत्यंत भावविभोर होऊन गायली होती. काय मंतरलेली रात्र असेल ती. माणिक नगर म्हणजे संगीताचे माहेरघरचं आणि त्यातही श्री सिद्धराज प्रभुंसारखे सुरांचे आणि संगीताचे मर्म जाणणारे, आपल्या गायनाचे सर्व कसब पणाला लावून, श्रीप्रभुंच्या संजीवन समाधी समोर एकतानता साधत होते. तबल्यावरची ती मोहक थाप, टाळांची मंदमंद किणकिण, सारंगीची सुमधुर धुन, झांजांचा मोहक नाद, शास्त्रीय संगीताची जाण असलेल्या शिष्यांची तोलामोलाची साथ आणि श्री प्रभुभक्तीच्या रंगात पूर्णतः रंगून जाऊन टीपेला पोहोचलेला श्री सिद्धराज प्रभुंचा धीर गंभीर आणि तितकाच मंजुळ स्वर. आवाजातील चढ-उतार, तालसुरांची सुरेख लयबद्धता, प्रत्येक पदागणिक द्विगुणित होणारा आनंद, सगळा आसमंत प्रभुभक्तीने भरलेला, ही वेळ, ही रात्र संपूच नये, असे उपस्थित सर्वांनाच वाटत असणार. त्यावेळी उपस्थित प्रभुभक्तांचे भाग्य किती थोर की, ह्या सुरेल भजनाचा आनंद त्यांना मनमुराद लुटता आला.
क्षणभर ती बैठक डोळ्यासमोर तरळून गेली. श्री सिद्धराज प्रभुंची तंबोऱ्याच्या तारांवरून सहजतेने आणि तितक्याच नजाकतीने फिरणारी ती सुकोमल बोटे, तंबोऱ्याची साथ सोडून मध्येच हातामध्ये धरलेला झांज, मनाच्या त्या प्रफुल्लीत अवस्थेत उंचावलेले हात आणि हातवारे, चेहऱ्यावरचे प्रफुल्लित स्मित, वादकांसोबतची डोळ्यांची नजरानजर, परस्परांना दिलेली दिलखुलास दाद, सर्व काही डोळ्यासमोर साकारत होतं. श्री सिद्धराज प्रभुंच्या ह्या गायनसेवेने अतिशय संतुष्ट झालेल्या श्रीप्रभुंच्या संजीवन समाधीतून फांकलेली चैतन्याची आभा श्री सिद्धराज प्रभुंचा चेहरा जणू उजळवून टाकत होती. त्या मैफिलचा मीही आता एक भाग झालो होतो. ती भावविभोरता, ती एकरूपता ह्या पदांच्या माध्यमातून अनुभवता येत होती. साधारण दीड तासांनी ही अवीट गोडीची संगीत सभा जेव्हा संपली, तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. ध्यानावस्थेतून बाहेर आल्यावर निरभ्र आकाशामध्ये मध्यावर आलेल्या चंद्राचा शितल प्रकाश माझ्या डाव्या खांद्यावर पडला होता. रात्रीच्या गडद अंधारामध्ये आकाशातील चांदणे अजूनच मोहक वाटत होते. श्रीप्रभुंच्या तसविरीसमोर ठेवत असलेल्या दिव्याचा प्रकाशात श्रीप्रभु अजूनच लोभस वाटत होता. ध्वनिमुद्रणाच्या रात्रीच्या वेळेसच्या त्या भरलेल्या वातावरणाचा तोच आनंद, तीच अनुभूती मला अनुभवायला दिल्याबद्दल, श्रीप्रभुचे अत्यंत कृतज्ञतेने आभार मानले. रात्रीच्या त्या गडद अंधारामध्ये, त्या एकांतामध्ये भीतीचा लवलेशही मला जाणवला नाही. कानामध्ये मात्र श्री सिद्धराज प्रभुंचे “भजनी जो दंग, तोचि निर्भय” असे आश्वासक शब्द भरुन राहिले होते.
अपेक्षा नाही कसलीही, उपेक्षा कधीही करू नको,
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।धृ।।
चुकलेल्या पाडससम, मंगलमय तव स्थाना पावलो
बहु जन्माच्या सुकृते झाले तव दर्शन, धन्य जाहलो
कृपादृष्टी पाहिले, पदरी धरिले, दूर आता लोटू नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।१।।
विषय वासना, दंभ, अहंकृती, जगण्याची हीच रीत
भजनांतून अनुभविली प्रभु, तुझी वात्सल्यघन प्रीत
स्वार्थी प्रपंचाचा हा कोलाहल, आणखी कानी नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।२।।
ठाऊक असे तुला माणिका, विचार मनीचे उच्छृंखल
दिसून न येत वदनी, परी उठे अंतरात घोर वडवानल
प्रलोभनांचे गाजर बहुगोड जरी, स्वाद चाखणे नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।३।।
घेतल्या कितीतरी आणाभाका, दिधली अनेक वचने
सर्वही तोडीली मोडीली, मोहाच्या घनघोर आक्रमणे
चुकलो जरी, भक्तकार्यकल्पद्रुम ब्रीद तुझे सोडू नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।४।।
नाही पूजली तुळस, नाही ध्यायिला मंदिराचा कळस
तव भजनीही केला प्रभुराया, मी नानाविध आळस,
राजाधिराज योगिराज तू, कृपण मजप्रती होऊ नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।५।।
स्वच्छंदे व्यवहारे राहसि, सतत गुरुगंगा विरजा तीरी
करी कृपा मजवरी सत्वरी, माणिक मुक्तिनाथा हरी
स्थितप्रज्ञ अससी जरी, माया कर्दमी आता ठेवू नको
अभयवचन दिधले तू प्रभु, धरला हात सोडू नको ।।६।।
वेदांताच्या असीम ज्ञानराशीतील प्रमेयांचे एक एक दालन उघडत असताना, श्रीजींचा परावलीचा, धीरगंभीर आवाजातील वंदे श्री प्रभु सद्गुरुं गुणनिधीं हा श्लोक कानावर आला की, एरवी इतस्ततः अखंड भूणभूण करत असलेला मनाच्या विचारांचा भुंगा, सद्गुरु चरणावर अलगद जाऊन विसावतो. भ्रमर जसा कमळाच्या मकरंदाने देहभान विसरून, कमळामध्ये रात्रभर बंदिस्त होऊन जातो, अगदी तसेच काहीसे श्रीजींचे प्रवचन ऐकताना होते. श्रीजी आपल्याला समजावून देत असलेल्या, स्वतःच्या विद्वत्ताप्रचूर संभाषणातून आपल्यासमोर ठेवत असलेल्या अद्वैत मकरंदाची गोडी ही अशीच अविट आहे.
ह्यावेळी ठाणे दौऱ्यातील प्रवचनांमध्ये पुन्हा एकदा श्रीजींनी श्रीमद्भगवद्गीतेचे सार उपस्थितांसमोर उलगडले. ह्या आधीच्या प्रवचनांमध्ये श्रीजींनी जरी हे विषय घेतले असले तरी, साधकाला अत्यावश्यक असणारी उजळणी ह्या प्रवचनाच्या निमित्ताने झाली. सद्गुरुंच्या मुखकमलांतून होणाऱ्या ह्या दिव्य वाणीच्या अमृतवर्षावात न्हाऊन निघताना होणाऱ्या उजळणीमुळे, तो तो विषय, जीवन जगण्यासाठी गरजेचे असलेले तत्वज्ञान, आपल्या मनावर चांगले ठसते. आणि जनसामान्यांच्या नित्याच्या व्यवहारातील उदाहरणांचा धागा पकडून, ते त्यांच्यासमोर सुलभतेने मांडण्याच्या श्रीजींच्या ठाई असलेल्या हातोटीमुळे, परिणामकही होते.
जीवनात ईश्वराची आवश्यकता का आहे? ईश्वराचे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक स्वरूप, तो आपल्यातच आहे व तो कसा ओळखावा? जगावे आणि त्याचबरोबर मरावे कसे? कोणता आहार आणि कसा घ्यावा, इत्यादी प्रश्नांची उत्तरे शास्त्र आणि पुराणातील अनेक अनेक संदर्भ देऊन, श्रीजीं ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून जनमानसांवर सुसंस्कारच केले. मानवी जीवनाला समृद्ध करणारी, पण जनसामान्यांना माहीत नसलेली जीवन जगण्याची कलाच, जणू ह्या प्रवचन मालिकेच्या निमित्ताने श्रीजींनी समजावून सांगितली.
ही प्रवचने इतकी सरळ आणि सहज होती की, अगदी पाच-सहा वर्षाच्या मुलांनीही त्यात प्रत्येक दिवशी समरसून सहभाग घेतला आणि प्रवचनाच्या अनुषंगाने शेवटच्या दिवशी श्रीजींना प्रश्न विचारले. आणि अर्थातच श्रीजींनीही प्रसंगी बालक होऊन, त्यांचे सम्यक समाधान केले. यातच श्रीजींची प्रवचन समजावून सांगण्याची सहजता उद्धृत होते.
प्रकृती अस्वास्थ जरी असले तरी, समोर विराट जनसमुदाय असला की, श्रीजींना स्फुरण येते आणि चैतन्याचा हा अविष्कार आपल्याला त्यांच्या देहबोलीतून आणि अखंड पाझरणाऱ्या वाणीतून अनुभवता येतो. प्रवचनादरम्यान श्रीजींचे, त्या परमात्म्याशी असलेले तादात्म्य अनुभवता येते. प्रवचनानंतरही येणाऱ्या सर्व भाविकांना अत्यंत प्रसन्नतेने सामोरे जाणे, त्यांना हवा तसा अत्यंत आवश्यक असलेला, संपूर्ण आधार देणे आणि त्यातच आनंद मानणे हे सद्गुरूंच्या ठाई असलेले सद्गुणही ह्या प्रवचन मालिकेदरम्यान अनुभवता आले. अनेक सदभक्तांनी दिलेल्या दुर्मिळ प्रेमळ भेटवस्तूही सकलमत संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसांमध्ये रुजत असल्याचेच द्योतक होते.
संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!
सच्चिदानंद सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांची श्रीमद्भगवद्गीतेवरील चार प्रवचने ऐकण्याचे परम भाग्य मला लाभले. त्या श्रवणाच्या चिंतनातून ज्या विशेष विचारांची पकड माझ्या मनाने घेतली, त्यातील काही गोष्टी येथे उद्धृत करते. श्रीजींनी प्रथमतः हिंदूंचा धर्म हा सनातन आहे की ज्याला आदि नाही आणि अंत नाही, हे पटवून दिले. त्यामुळे माझा हिंदू धर्म कितीही आपत्ती आल्या, तरी नष्ट होणार नाही, असा ठाम विश्वास मनामध्ये ठसला.
श्रीजींची समजावून देण्याची पद्धती अप्रतिम आहे. श्रीमद्भगवद्गीतेचे आपल्या जीवनात महत्त्व काय, हे समजावून देताना, श्रीजींनी वॉशिंग मशीनचे उदाहरण देऊन सांगितले की, ते मशीन घेताना त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येते. त्यात त्या मशीनची माहिती व ते व्यवस्थित रितीने कसे चालेल, याची माहिती दिलेली असते. तसेच या शरीररुपी यंत्राचे मॅन्युअल श्रीमद्भगवद्गीता आहे. शरीर ही भगवंताची करणी आहे, आणि गीता भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे.
जीवनात तरी ईश्वराची आवश्यकता का आहे? यावर भाष्य करताना पूज्य श्रीजींनी ईश्वराचे स्वरूप सच्चिदानंद सच्चिदानंद कसे आहे व त्याचे माणसांमध्ये कसे तादात्म्य असते, ते अगदी सोप्या भाषेत समजावले.
१. सत् – मी सदा सर्वदा असावे, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. हीच सत् (to be)ची इच्छा आणि सत् (अस्तित्व) हे ईश्वराचे स्वरूप आहे.
२. चित् – प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा (स्फुरण) आहे. ही जाणीव (संवित्) हे ईश्वराचे स्वरूप आहे.
३. सदा सर्वदा सुखी असावं, ही माणसाची इच्छा! ईश्वर हा सुखस्वरूप आहे.
इथे एक आश्वासन महाराजांनी दिले की, ज्यावेळी आपल्याला सुख होते, त्यावेळी तो ईश्वराचा साक्षात्कार समजावा. हे माणसाचे धैर्य, बल आणि उत्साह वाढवणारे महावाक्य आहे, असे मला वाटते.
तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.
१. वर सांगितल्याप्रमाणे सत् चित् आनंद हे त्याचे आध्यात्मिक स्वरूप आहे.
२. त्याचे आधिदैविक रूप विशद करताना, परमपूज्य श्रीजींनी गीतेच्या सातव्या अध्यायातील रसोऽहम् अप्सुकौंतेय या श्लोकावर भाष्य केले. पाण्याचे द्रवत्व, चंद्र सूर्यातील प्रभा, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व आणि स्त्री मधील स्त्रीत्व, ही सर्व माझीच रूपे आहेत. अग्निमधील उष्णता मी आहे आणि ती जर नसली तर अन्न कसे शिजेल? बुद्धिमतांची बुद्धी मी आहे. असे असल्याने, पुन्हा एकदा ईश्वर आपल्यातच आहे, हेच परमपूज्य श्रीजींनी सांगितले.
३. ईश्वराचे आधिभौतिक रुप – जसे जीवनात आधारासाठी सशक्त आणि सदैव मिळेल असा खांदा लागतो, जसे गंगेमधील साखळ्यांना धरून वाटेल तेवढ्या बुड्यात मारता येतात, साखळी सुटली तर वाहून जाण्याची भीती असते. तसेच जगामध्ये ईश्वराने सुव्यवस्था केली आहे. जसे वेळेवर सूर्योदय होणे, वेळेवर पाऊस येणे, आंब्याच्या झाडाला आंबाच लागणे, या सुव्यवस्थेचा नियंता ईश्वर आहे व सर्व जगत् ईश्वरांमध्येच ओवलेले आहे. जसे ‘सूत्रे मणिगणाइव’. इथे पुन्हा परमपूज्य श्रीजींनी, ईश्वर आपल्यातच आहे हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच ईश्वराची नितांत गरज आहे, त्यासाठी सर्व संतांनी जे आवर्जून प्रतिपादिले तेच पूज्य श्रीजींनी सांगितले, भावाने नामस्मरण करावे.
परमपूज्य श्रीजींचे प्रवचन म्हणजे संतवचनांच्या श्रवणाची पर्वणीच होती. त्यातही परमपूज्य श्रीजींच्या विनोदबुद्धीमुळे तत्वज्ञानामधील कठीण प्रमेये हसत खेळत सामान्यांच्या गळी उतरविणे, ही किमया श्रीजीच करू जाणे. श्रीजींचे प्रवचन जागरूकतेने आणि प्रसन्नतेने सर्व श्रोत्यांनी अथपासून इती पर्यंत ऐकले परमपूज्य श्रीजींच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम
Recent Comments