अविस्मरणीय अनुभव



गुरूराया प्रभु माणिका । तुम्ही आर्त हांक ही ऐका ॥धृ॥
प्रभु दिसता भान हे हरले । माणिका तुझे रूप दिसले ।
भावविवश मन शमले । तारकसिद्ध पदीं नटले ।
प्रभु माझा श्रीगुरूदत्त ।
कूट चैतन्य साक्षीभूत ।
मी मीपणाचा प्रयत्न ।
झळकें हे माणिकरत्न ।
प्रभु माणिक सद्गुरू सखा । ज्ञानरूप मार्ताण्ड अनोखा ॥१॥
श्रीजी पाहा किती सजले । आपणचि आपणां सजले ।
चैतन्यरूप हे विरले । चैतन्यमयी ते झळकले ।
प्रभु श्री गुरू अवधूत ।
मधुमतीश्यामला दत्त ।
तत्पदी लागें मम् चित्त ।
नेत्र झाले पहा आरक्त ।
ज्ञान मजला नको काही । माणिका संगे मज नेई ॥२॥
गुरूराया प्रभु माणिका । तुम्ही आर्त हांक ही ऐका ॥धृ॥
ब्रह्म ब्रह्म म्हणता गेली । पुत्रा विशोक करूनि गेली ।
प्रभु नाही माझा नाही ।
प्रभु तुमचा नाही नाही ।
ब्रह्मस्थितीचा भेद नाही ।
सकलमतरहित तो नाही ।
चण्डिदासा नाकळे परिस्थिती । माणिका तुझी अंतर्स्थिती ॥३॥
रीध्दीसिद्धी दाता श्री एकदंता
आरंभ करीतो तव नाम घेता।
नमु तुला भगवती श्री भवानी
नमस्कार माझा तुझ्याच चरणी ।।१।।
हृदयी स्मरोनी प्रभु माणिकाला
आरंभ करीतो शुभ लेखनाला।
कर्ताकरवीता प्रभु माणिकेश
तुझीच भक्ती करीतो विषेश।।२।।
मनोहर बया दोघेही धन्य झाले
प्रत्यक्ष श्रीदत्त स्वप्नात आले।
तया रामनवमीस दृष्टांत झाला
सदा वंदितो माणिकाच्या पदाला।।३।।
मुखाने सदा श्रीप्रभुनाम घ्यावे
सदा संकटी श्रीप्रभु नित्य धावे।
अहंभाव सारा सोडुन द्यावा
जवळी करावी प्रभुनाम सेवा।।४।।
सदैव प्रभुरुप मनी स्मरावे
प्रभु पदासी सदा लीन व्हावे।
प्रभुभक्त तू काय चिंता वहासी
प्रभु घेई जवळी निजबालकासी।।५।।
सदा कर्म करिता प्रभु नाम घ्यावे
सेवेत प्रभुच्या सदा सिद्ध व्हावे।
मिळेना पुन्हा जन्म हा मानवाचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।६।।
उध्दार करण्या जगी मानवाचे
प्रभु पातले ग्राम कल्याण साचे।
संतोष वाटे अवघ्या जनाला
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।७।।
प्रभूस माझ्या माझीच चिंता
प्रभूवीनण वाली नसे कोणी आता।
चरणी प्रभूंच्या चला ठेवु माथा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।८।।
सदाशिव होवोनि काळंभटासी
प्रभु दाखवी रुप निजबालकासी।
मनी ध्यास राहो प्रभूंच्या पदाचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।९।।
नसे भिन्न ती शर्करा आणि गोडी
तसे श्रीप्रभु आणि भक्ताची जोडी।
जयाच्या शिरी वरदहस्त प्रभुचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।१०।।
अरे नासका नासका देह सारा
नको वाढवू हा फुकाचा पसारा।
सदा ध्यास राहो प्रभुच्या पदाचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।११।।
करी श्रीहरी बोध त्या अर्जुनाला
चुकेना कधी कर्म ते मानवाला।
प्रभुनाम प्रेमे हृदयी धरावे
सदा सर्वदा त्या प्रभुला स्मरावे।।१२।।
गोविंद नामे सखा जो प्रभुचा
सजीव झाला तया साद देता।
अचंभित होवोनि ग्रामस्थ पाहे
सदा सर्वदा त्या प्रभूला स्मरावे।।१३।।
जगी जन्मला मृत्यू त्यासी टळेना
तुझा मी पणा हा तरीही सुटेना।
प्रभु कीर्तनी दंग होवुन जावे
सदा सर्वदा त्या प्रभुला स्मरावे।।१४।।
हृदयीं जयाच्या प्रभु राम आहे
सन्मुख प्रभुच्या उभा नित्य राहे।
चिरंजीव होवोनि भक्तास पावे
सदा सर्वदा त्या प्रभुला स्मरावे।।१५।।
असे शोभला मेखला श्री प्रभुला
मना वाटले भेटलो त्या हरीला।
लिला प्रभुच्या मज वर्णवेना
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१६।।
पहा श्रेष्ठ तो भक्त श्री पुंडलिक
तया कारणे श्रीप्रभु धाव घेत।
उभा चंद्रभागेतटी देवराणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१७।।
भक्तांस करीती प्रभु बोध एक
सकलमताचा पंथ सुरेख।
आत्मा तो सर्वांतरी एक जाणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१८।।
बहु गोड रे नाम श्री माणिकाचे
मुखी बोलता सुख होईल साचे।
नामाविना व्यर्थ हा देह जाणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१९।।
प्रभूवीण नाही मिळे आत्मज्ञान
तुकाराम धनगर असे भाग्यवान।
घोंगडी श्रीप्रभुची मज वर्णवेणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।२०।।
गंगा शिरी घेतली त्या शिवाने
उचलुन गोवर्धन धरीला हरीने।
हरीहराचे प्रभु रुप माना
प्रभूवीण मजला कोणी असेना।।२१।।
किती धन्य तो भक्त दयालदास
प्रभु भेटले राम होवोनि त्यास।
भक्ताविना मन प्रभुचे रमेना
प्रभूवीण मजला कोणी असेना।।२२।।
भीमाबाईचा भाव जाणोनी मनीचा
प्रभु योजिती त्यास उपाय साचा।
देशील कवड्या मजला तु आठ
होईल पुत्र तुजला तितुकीच नीट।।२३।।
माता बयंबा होई चकीत
श्रीदत्त रुप प्रभु दाखवीत।
दिसे षड्भुजा भस्म धारी शरीरी
रुद्राक्ष माळा कंठी विहारी।।२४।।
अति कष्टी होता हा संग्रामराव
उदर पीडिचा त्या सुचेना उपाव।
येवुनी स्वप्नी महादेव बोले
प्रभुचरण तिर्थ तु घ्यावेसी भले।।२५।।
आबाचार्य होते प्रभुभक्त थोर
प्रभुचीच सेवा असे ध्यास फार।
तया भेटण्या श्रीप्रभु प्रगट झाला
नमस्कार माझा प्रभुच्या पदाला।।२६।।
चंदनापरी देह अवघा झिजावा
सेवेत प्रभुच्या उभा जन्म जावा।
प्रभुपाठी असता भिती कशाला
नमस्कार माझा प्रभुच्या पदाला।।२७।।
अरण्यात नांदे बलभीम मुर्ती
जाज्वल्य उग्र असे ज्याची कीर्ती।
प्रभु कारणे अंजनीपुत्र धावे
अचंबित होवूनी ग्रामस्थ पाहे।।२८।।
अवतार शिवाचा असे खंडेराव
मैलार क्षेत्री जयाचाच ठाव।
प्रभु जन्मीचा होई दृष्टांत जेथे
सदा वंदितो भक्त भूमीस तेथे।।२९।।
प्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्ती
कदापी नसोडी तयाचीच भक्ती।
मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई
नमस्कार तुजला गुरु माणिकाई।।३०।।
प्रभु मंदिरी चंदनाचा सुगंध
येथे राहतो भक्त भजनात दंग।
भक्तासी अपल्या प्रभु पार नेई
नमस्कार तुजला प्रभु माणिकाई।।३१।।
धन्य मी जाहले गुरु गवसला
सार्थकी आला सकळ जन्म
धन्य मी जाहले गुरु पाहियेला
देखोनी ह्या डोळा लाधले सुख
धन्य मी जाहले गुरु ऐकियेला
मनी उपजला मुमुक्ष भाव
धन्य मी जाहले गुरु जाणियेला
मार्ग सापडला चराचरा पार
धन्य मी जाहले गुरु तो नमिला
जळोनिया गेला अहंकार
आषाढी एकादशीनिमित्त पालघरच्या श्री प्रेमळ विठ्ठल मंदिरात घुमला श्री माणिकप्रभुंच्या पदांचा गजर
आषाढी एकादशी निमित्त पालघरच्या श्री प्रेमळ विठ्ठल मंदिरामध्ये श्री माणिकप्रभुंच्या पदांचा गजर घुमला. या पुण्यप्रद प्रसंगी श्री चिज्ज्वल प्रभु यांची उपस्थिती विठ्ठल भक्तांसाठी भारावून टाकणारी होती. सुरुवातीला श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, पालघरचे मुख्य अर्चक श्री. मोरमुळे गुरुजी आणि अध्यक्ष श्री. जोशीकाका यांनी श्री चिज्ज्वलप्रभुंचे स्वागत करून, त्यांच्या शुभहस्ते विठ्ठल रखुमाईची पूजा करविली.
त्यानंतर श्री. मोरमुळे गुरुजींनी प्रेमळ विठ्ठल मंदिराचे मुख्य प्रेरणास्त्रोत असलेल्या माईसाहेब दांडेकर आणि श्री माणिकप्रभु संस्थानाचे तृतीय पीठाधिश, श्री मार्तंड माणिकप्रभु यांच्या परस्पर स्नेहाचा, गुरु शिष्य नात्याचा, माईंवर झालेल्या श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या कृपेचा हृदय संबंध उलगडला. त्यानंतर मुंबईच्या श्री माणिकप्रभु सांप्रदायिक भजनी मंडळाने श्री माणिकप्रभु आणि माणिकनगरची माहिती उपस्थित पालघरवासीयांना दिली. त्यानंतर श्री चिज्ज्वल प्रभु यांच्या सुरेल आवाजात, श्रीमाणिकप्रभु सांप्रदायिक भजनी मंडळाच्या साथीने, झांज, संवादिनी, तबला, मृदंगाच्या कल्लोळात श्रीमाणिकप्रभुंची अनेक विठ्ठल भक्तीपर पदे आणि त्यानंतरच्या पीठाधिशांच्या अनेक वेदांतपर रचना सादर करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळेस पालघरच्या श्री. हेमंत लोखंडे यांना स्फूर्ती आवरेनाशी झाली आणि त्यांनीही भजनसंध्येमध्ये तबल्यावर साथ दिली. भजनसंध्येच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या अवतार काळात श्री माणिकप्रभु आणि श्री विठ्ठल यांच्या पंढरपूर येथील हृदयभेटीच्या प्रसंग श्री चिज्ज्वलप्रभु यांनी स्वतःच रचलेल्या ‘जय माणिक जय पुंडलिक वरदाता’ हे काव्य स्वतःच्याच आवाजात सादर केले. त्यावेळेस संपूर्ण सभागृहच जणू भक्तीच्या चंद्रभागेमध्येच डुंबत होते.
सुमारे दोन तास चाललेल्या ह्या भजनसंध्येमध्ये अनेकांना अद्वैतानंदाची अनुभूती झाली. भजनसंध्येच्या शेवटी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, पालघर यांच्यावतीने श्री चिज्ज्वल प्रभु यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री चिज्ज्वल प्रभु यांनी उपस्थित सर्वांनाच माणिकनगरला येऊन, श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन, कृतार्थ होण्यासाठी प्रेमळ निमंत्रण श्री माणिकप्रभु संस्थानाच्या वतीने दिले. जय गुरु माणिक!
घेरे घेरे मुखी श्री गुरू माणिक नाम.
जय गुरू माणिक नाम
प्याला गुरू मंत्राचा श्री गुरू माणिक नाम
जय गुरू माणिक नाम
पुत्र विरहात रडे माय गोविंदाची
पाहवेना ते अश्रु श्री माणिकांसी
हाक देऊनी.
हाक देऊनी उठला गोविंदा
दिले जीवदान त्यासी
पुत्र प्राप्तीची ईच्छा भीमा बाईची
भक्तीने भीमा देई कवड्या माणिकांसी
प्रभु कृपेने
प्रभु कृपेने अष्टपुत्र जाहले
नाम घेता व्येंकमाँ आई ने रे हे
मोक्ष मिळऊनि दैवत्व लाभले रे
ऐैसें नाम
ऐैसें नाम मुखी घेरे या जीवनी
दत्ता न्हावी नाम घेई माणिकाचे
केले गर्व हरण शास्त्री पंडितांचे
नाम महिमा
नाम महिमा हि गुरू नामाची
श्री गुरू माणिक जय गुरू माणिक
कान्हा सांगे आहे हा मोक्षाचा मंत्र
प्रभु नामाचा
प्रभु नामाचा छंद लागो जीवना
Recent Comments