श्री माणिक चरितामृत बोध

श्रीप्रभुंना प्राप्त करण्याचा सरळ मार्ग
श्रीमाणिक चरितामृत सहज दाखविते

भक्ती करा मनोहर बयांमामातेसारखी
जी प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांनाही प्रकटवते
सहृद बना त्या गोविंदा गवळ्यासारखे
जे मरणाच्या दारातूनही परत आणते

निस्पृह भूतदया करा भीमाबाईसारखी,
करुणाकर प्रभुस सदासर्वदा तोषविते,
कोमल भक्ती करा काळंभटजीसारखी
जी प्रत्यक्ष सांबालाही समोर प्रकटवते

सत्वपरिक्षेत खरे उतरा दीक्षितांसारखे
जे मलविष्ठेचेही सोने करून दाखविते
अचंचल श्रद्धा ठेवा व्यंकंमादेवीसारखी
जी सामान्यासही देवीपदी पोहोचविते

अनिवार ओढ भेटीची ठेवा प्रभुंसारखी
जी मूर्तीतून सगुण विठ्ठलास प्रकटवते
आत्मज्ञान प्राप्त व्हावे तुकारामासारखे
जी अविलंब समाधीसुख मिळवून देते

धूंद कलासक्त व्हा नाना नाच्यासारखे
जे नृत्यकलेतून हरिभक्तीस फुलविते
हाकेत आर्तता ठेवा व्यापाऱ्यांसारखी
साक्षात बुडणारे गलबतही तरवून नेते

पूर्ण शरणागत व्हावे विठ्ठलरावासारखे
रंकाचाही रावसाहेब करवून दाखविते
निरागस मने प्रेम करा माणक्यासारखे
जे खोल विहरीच्या तळाशीही वाचविते

विश्वास ठेवा गुरुवरी डोंबाऱ्यासारखा
जो पहिलवानासही आस्मान दाखविते
प्रेमभाव हो टेहेळदास माऊलीसारखा
विक्राळ आगीतूनही सलामत वाचविते

चित्तशुद्धीचे सुरेख निधान हाती लागले
जे श्रद्धा ज्ञान आणि भक्तीस वाढविते
श्रीप्रभुंना प्राप्त करण्याचा सरळ मार्ग
श्रीमाणिक चरितामृत सहज दाखविते

[social_warfare]