ही गोष्ट आहे हरवलेल्या एका झांजेची… माणिकनगर ते नांदेड आणि पुन्हा माणिकनगर असा प्रवास करुन शेवटी माणिकनगर मध्येच सापडलेल्या एका झांजेची…

तर झाले असे की 2021 सालच्या दत्तजयंती उत्सवात प्रभु कृपेने आम्हा ठाणेकर भक्तांना एका नृत्यनाटिकेद्वारे प्रभुंची नाट्य सेवा करण्याचे सौभाग्य लाभले. नाटिकेकरिता इतर वाद्यांसोबत एक पखवाज आम्हास हवे होते. नांदेडचे काही प्रभु भक्त आले होते, त्यांच्या जवळ पखवाज होते, आणि त्यांनी आनंदाने आम्हास पखवाज दिले. स्टेज वर आमचे पखवाज वादक आणि झांज वादक बाजुबाजुला बसले होते. नाटिका झाल्यावर सर्व कलाकारांना आशीर्वाद घेण्यास महाराजांच्या निवास स्थानी बोलविण्यात आले. त्या लगबगीत सर्व वाद्ये स्टेज वर तशीच ठेवून आम्ही तेथून निघालो. आमच्या मागे इतर ठाणेकर प्रभु भक्तांनी स्टेज वरील सामानांची आवराआवर केली. श्री विजय कुलकर्णी ह्यांनी पखवाज नांदेडकरांनी दिलेल्या पिशवीत भरले. झांज कोणाची ते ठाऊक नसल्यामुळे, आणि ती पखवाजा बाजुलाच असल्यामुळे त्यांनी त्याच पिशवीत झांज सुद्धा भरली. नांदेडकर भक्त आपली पिशवी घेऊन गेले. खूप वेळा नंतर सामान गोळा करताना आमच्या लक्षात आले की झांज सापडत नाही आहे! झांज नांडेडकरांच्या पिशवीत आहे, हे कळल्यावर त्यांच्या कडे चौकशी केली, मात्र त्यांना पखवाजाच्या पिशवीत झांज काही सापडेना!! ती झांज होती ठाणेकर प्रभुभक्त श्री सुभाष चित्रे (माझे वडिल) ह्यांची. झांज हरवली हे ऐकून बाबा अगदीच हताश झाले!!

एक छोटीशी झांजच ती! तिचे एवढे काय कौतुक??कौतुक एवढ्यासाठी की शंभर वर्षाहून अधिक काळ ही झांज आमच्या कुटुंबात असावी. कारण ही झांज आमच्या पणजोबांच्या बालपणापासून तरी नक्कीच आमच्याकडे आहे असे माझे आजोबा सांगायचे आणि पणजोबांचा जन्म १९०० सालचा होता. दुसरे असे की असा नाद व आवाजाचा गोडवा असलेली झांज आजपर्यंत शोधुनही कुठे मिळाली नाही. गणेशोत्सवात व नवरात्रोत्सवात बऱ्याच ठिकाणी आम्ही ही उपयोगात आणतो. ज्या आप्तांकडे आरती अथवा भजनाला आम्ही जातो त्यांचा आग्रहच असतो की येताना ही झांज आठवणीने घेऊन यावी.

तर अशी ही चित्रे कुटुंबाची ठेवणीतील झांज माणिकनगर मध्ये हरवली! माझे बाबा, माझे काका – ह्यांना तर अनेक दिवस स्वस्थ झोप लागेना. जवळचे आप्त, मित्र ही हळहळले!

पुढे वेदांत सप्ताहासाठी आम्ही पुन्हा माणिकनगरला आलो. एके दिवशी एक सद्गृहस्थ माझ्या पाशी आले व जयंती उत्सवात नृत्यनाटिका आम्हीच केली होती का म्हणून चौकशी केली. मी हो म्हटल्यावर ते म्हणाले “तुमची एक झांज हरवली होती ना त्या वेळी? ती आमच्या पाशी आहे”. ” काय? आपल्या कडे? कसे काय? आपण कोण? कुठून आलात?” – मी विचारले. ते म्हणाले – “माझे नाव उत्तरवार. मी नांदेडहून आलोय. नांदेडला परतल्यावर ती झांज आमच्या एका पिशवीत सापडली. पखवाजाच्या पिशवीत नाही, दुसऱ्याच एका पिशवीत”.

आम्हाला कोण आनंद झाला!!! प्रभु कृपेनेच झांज मिळाली असे उद्गार सर्वांनी काढले. माझे वडिलच नाही, तर तेव्हा हळहळलेल्या सर्वांच्या डोळ्यात आता आनंदाश्रु आले! माझ्या आईला ही गोष्ट समजली, तेव्हा ती हसली, म्हणाली “मला आनंद तर झाला आहे, पण आश्चर्य नाही वाटत, कारण मला खात्री होती की वेदांत सप्ताहात आपल्याला झांज सापडणार!!” खात्री होती?? कशी काय? तर म्हणाली “मी प्रभुंकडे नवस बोलले होते, सप्ताहात झांज परत मिळावी म्हणून, आणि मला 100 टक्के खात्री होती की तसेच होणार”!! नंतर माझ्या काकांकडून कळले, की ते सुद्धा नवस बोलले होते!

श्री प्रभु!! त्यांच्या नावातच प्रभुत्व!! पण भक्तांच्या छोट्या छोट्या मनोकामना पूर्ण करण्यास सदैव तत्पर असतात आपले प्रभु! आणि अपेक्षा कसली, तर फक्त भाबड्या भक्तिची आणि अढळ श्रद्धेची!!

नवस तरी वेगळा काय असतो? हो, काही लोक म्हणतात की नवस म्हणजे देवाबरोबर केलेला सौदा आहे. खरे आहे काही अंशी – सौदाच की तो.. पण कसला? तर आपल्या भावना आणि त्याची कृपा ह्यांचा!! वस्तु तर निमित्तमात्र आहेत, एक माध्यम आहेत – आपल्या भावना आणि त्याची कृपा एकमेकांना व्यक्त करून दाखविण्याकरिता.

अशा छोट्या-छोट्या अनुभवांतून हे सतत जाणवत रहाते की भगवद्गीतेत भगवंतांनी दिलेले ‘योगक्षेमं वहाम्यहम’ हे वचन आपले प्रभु आज ही पूर्ण करीत आहेत, आणि म्हणुनच एका प्रसिद्ध गाण्याचा आधार घेत असे म्हणावेसे वाटते –

लाभले आम्हास भाग्य भजतो प्रभु माणिकेश

लाभले आम्हास भाग्य भजतो प्रभु माणिकेश
जाहलो खरेच धन्य पुजतो प्रभु माणिकेश

कृष्ण, विष्णू, जगदंब, सांब, राम – माणिकेश
काशी, पुरी, गिरीनार, चारधाम – माणिकेश

नित्य आमुचे प्रात:स्मरण – प्रभु माणिकेश
जप, तप, ध्यान आणि धारण – प्रभु माणिकेश

बेसुरेसे सूर अमुचे भजन करत – माणिकेश
वाणी आणि लेखणी करी स्तवन सतत – माणिकेश

परिक्षे, प्रवासा आधी स्मरतो प्रभु माणिकेश
असो काहीही प्रसंग प्रार्थितो प्रभु माणिकेश

वारसा पुढील पिढीस – भक्तिभाव माणिकेश
स्थान श्रद्धेचे अमुचे, एक ठाव – माणिकेश

 

[social_warfare]