उद्यानातून आता दिंडी वेशीकडे निघाली होती. सध्याचा जो नौबतखाना आहे, त्याच्या द्वारापर्यंत अर्थात सिंहद्वारापर्यंत, म्हणजेच वेशीपर्यंत दिंडी येते. उद्यानापासून वेशीपर्यंत जाताना “छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा मायबाप” हे माझं अत्यंत आवडतं पद म्हटलं गेलं. दिंडी आता सिंहद्वाराच्या कमानीखाली आली होती. येथून कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला कालाग्निरुद्र हनुमानाचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला श्रीप्रभु मंदिर आहे. हनुमानाचे मंदिर इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधले आहे की कालाग्निरुद्र हनुमानाची मूर्ती आणि श्रीप्रभु समाधी बरोबर एका सरळ रेषेत, एकाच पातळीवर आहेत. सिंहद्वाराच्या कमानीखाली “जयदेव जयदेव जय हनुमंता” ही हनुमंताची आरती म्हटली गेली. त्यानंतर “नमो घोरतर कालाग्नीरुद्ररूपा” हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी रचलेलं, अंगी चैतन्य स्फुरवणारं , अत्यंत तेजस्वी असे पद म्हटले गेले. ह्या वेळेस वाद्यांचा कल्लोळ अगदी टीपेला पोहोचला होता. भजनाचा आनंद उचंबळून येत होता. श्री कालाग्निरुद्र हनुमानाला “माणिक क्षेत्र अभिमान रक्षण दक्ष” असेही म्हटले जाते. दास्यभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या हनुमंताला आळवून दिंडी आता श्रीजींचे निवासस्थान असलेल्या नागाईकडे निघाली होती. सिंहद्वारातच थोड्या उंचीवर एक हंडी बांधली होती.‌ भागवत सप्ताहामध्ये काल्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या हंडी मध्ये दहीपोहे ठेवलेले असतात. मातीच्या हंडीला शेंदरी आणि हिरव्या रंगाने रंगवले होते. त्यावर छान नक्षीही काढली होती. योगायोगाने संकलमत संप्रदायाच्या झेंड्यामध्येही हेच दोन रंग आहेत. झेंडूचे हार घालून दहीहंडीला छान सजवले होते. श्रीजी आपल्या हातात काठी घेऊन ही हंडी फोडतात आणि दहीकाल्याचा सोहळा संपन्न होतो. हंडी फोडण्याआधी सगळ्यांचे लक्ष ह्या दहीहंडी वर खिळले होते. श्रीजींनी एका फटक्यातचही हंडी फोडली. दहीहंडी फोडताना “गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण” हे भजन म्हटले गेले. हंडीमधला प्रसाद मिळवण्यासाठी एकच लगबग उडाली. ज्यांच्या हाती हंडीतला प्रसाद लागला, तो हाती लागलेला प्रसाद थोडा थोडा करून इतरांनाही वाटत होते. आपल्या जवळचे असलेले इतरांना वाटण्यामध्ये असलेला आनंद प्रभुभक्तांच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. दहीकाल्याचा आनंद लुटून दिंडी आता श्रीजी यांच्या निवासस्थानी म्हणजेच नागाईकडे निघाली होती. वाटेमध्ये बकुळीच्या झाडासमोर “नंद मुकुंद मुरारी सावळा, गोकुळांत हरि आला हो” हे पद म्हटले गेले. तिथून पुढे पालखी आता श्रीजींच्या निवासस्थानाच्या मुख्य दरवाजा समोर आली होती. रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या पाटावर श्रीजी येऊन उभे राहिले. येथूनच कुलदैवत मल्हारी म्हाळसाकांतावर श्रीजींनी मुक्तहस्ते बुक्का उधळला. दिंडीसाठी आपल्या कुलदैवताचे आशीर्वाद घेऊन निघालेले श्रीजी, आता पुन्हा आपल्या कुलदैवताकडे नतमस्तक व्हायला आले होते. येथे “जयदेव जयदेव जय खंडेराया” खंडोबाची आरती आणि “कुलस्वामी माझा देव खंडेराया तयाचे हे पाय हृदयी माझ्या” हे पद अत्यंत उत्साहात म्हटले गेले. घड्याळाचा काटा सकाळी दहाची वेळ दाखवत होता. दिंडी सुरू होऊन एव्हाना साडे दहा तास होत आले होते आणि तरीही सर्व प्रभुभक्त त्याच जोशामध्ये दिंडीचा आनंद लुटत होते. श्रीजींमध्ये इतका उत्साह संचारला होता की त्यांनी त्या आनंदामध्ये “ले गुलाल प्रभु पर डाल, मलकर गाल, मैने प्रभु से खेली होली” हे त्यांनीच रचलेले पद म्हटलं. हे पद म्हणताना श्रीजींची भक्तांवर आशीर्वादपर बुक्क्याची उधळण सुरू होती. अधून मधून माझ्यावरही होणाऱ्या ह्या अमृत वर्षावाने मन कृतज्ञतेचा आणि कृतार्थतेचा अनुभव करीत होतं.

श्रीजींच्या निवासस्थानातून दिंडी आता आपल्या अंतिम टप्प्यावर निघाली होती. नागाईपासून श्री प्रभू मंदिर पटांगणापर्यंत “असा पातकी सांगू मी काय देवा, कधी नाही केली मनोभावे सेवा, नसे वंदिले म्या तुझे निज पाया, मला तारी रे तारी मार्तंड राया” हे अष्टक म्हटले गेले. श्री प्रभुमंदिराच्या पटांगणामध्ये “हा दिसे स्फुरे जो आनंद” हे पद म्हटलं गेलं. पटांगणामध्ये दोन्ही बाजूस ओळीने उभे राहून मधे थोडीशी जागा ठेवतात. ह्याची रचना अगदी वारीची आठवण करून देते. श्री प्रभु मंदिराच्या पायऱ्या चढून दिंडी आता श्री प्रभुमंदिराच्या आवारातील आनंद मंटपात आली होती. येथे “कधी पाहिन मी माझ्या स्वरूपाला, आनंद पूर्णब्रह्माला” हे पद म्हटलं गेलं. समोर गाभाऱ्यामध्ये श्रीप्रभु दिंडीचा हा कौतुक सोहळा पाहत होता. दिंडीतल्या प्रत्येक पदागणिक आपण आपली श्रीप्रभुशी नकळत होणारी एकरूपता अनुभवू शकतो. श्रीप्रभुचे चैतन्य ठाई ठाई जाणवू लागते. अंगावर रोमांच उभे राहू लागतात, मन आनंदाची अनुभूती करू  लागते.

आनंद मंटपातून दिंडी आता श्री प्रभु समोरील कैलास मंटपात आली होती. येथे “मणिका लोकपालका दैन्यहारका सुरासुरवंद्या” ही श्री माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. श्री प्रभू समाधीसमोरील पायर्‍यांवर डोकं टेकवून प्रत्येकाची पावले आता उत्तर दरवाजातून मुक्ती मंडपात जाण्यासाठी पडत होती. ह्या दरम्यान सप्ताह भजनात रोज म्हटले जाणारे “पातकी घातकी मी असे की असा, मन हे भजनी न वसे सहसा” हे तारक अष्टक म्हटले गेले. अष्टकानंतर “जन चला चला गुज पाहण्या हो” हे पद म्हटले गेले. ह्या पदाच्या शेवटी “श्री माणिक आपणचि होण्या हो” ही ओळ येते. आपल्या स्वस्वरूपाची ओळख होऊन, आपल्यातील द्वैतभाव पूर्णपणे नष्ट होऊन, आपणच श्री प्रभू परमात्मा आहोत, ही जाणीव दिंडीतील पदे आपल्याला करून देतात.

दिंडी आता परत मुक्तीमंटपात आली होती. आईच्या कुशीतून निघून मुक्तपणे इथे तिथे हिंडून दिंडीचं हे पाडस आता पुन्हा आपल्या आईच्या कुशीत आलं होतं. चैतन्याचं एक वर्तुळ पूर्ण होत होतं. श्रीजी मुक्तिमंडपात प्रवेश करण्याच्या आधी, दृष्ट उतरवण्यासाठी अकरा नारळ ओवाळून फोडले गेले. त्यानंतर श्रीजी मुक्तिमंटपात प्रवेश करते झाले. मुक्तीमंटपात श्री शंकर माणिकप्रभुंच्या समाधीसमोर “जय देव जय देव जय शंकर गुरुवर्या, श्री शंकर गुरुवर्या वात्सल्य घन योगींन्द्र रक्षी प्रभुवर्या” ही शंकर माणिक प्रभुंची आरती म्हटली गेली. येथे “झालो आम्ही बहु धन्य रे, भेटले सगुण हे ब्रह्म रे” हे स्वस्वरूपाची जाणीव झाल्यावर, होणाऱ्या आत्मानंदाची अनुभूती करून देणारे पद म्हटले गेले. येथून दिंडी आता श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या समाधीसमोर आली होती. येथे “धन्य धन्य अति धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद, बंध मोक्ष भ्रम कोण तो जाणे अवघा ब्रम्हानंद” हे आत्मानंदाने ओतप्रोत भरलेले पद म्हणताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहता येत होता. त्यानंतर “हंसः सोऽहं सोऽहं हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा” हे श्री मार्तंड माणिकप्रभुंचे अद्वितीय गोडी चे पद म्हटले गेले. मी-तू पणाची बोळवण होत होती. अद्वैताची ज्योत हृदयामध्ये पूर्ण तेजाने तेवत होती. ह्या तीव्रतेची सुखानुभूती मी प्रथमच अनुभवत होतो. सुखाच्या आनंद लहरीवर तरंगत असतानाच “माणिक माणिक जय गुरु माणिक, माणिक माणिक शिव हर माणिक” चा गजर झाला आणि नकळत श्रीप्रभु प्रेमाने हृदय उचंबळून आले. अलगद ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा आता दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. भावनेच्या ह्या कल्लोळातच “जय देव जय देव जय गुरु मार्तंडा सद्गुरु मार्तंडा, आत्मोल्हास प्रभाकर कारण ब्रह्मांड” ही श्री मार्तंड माणिकप्रभुंची आणि तद्नंतर “आरती मधुमती व्यंकेची जननी हेरंब श्यामलेची” ही श्री देवी व्यंकम्मा मातेची आरती म्हटली गेली. त्यानंतर “श्री माणिक जय माणिक, हर माणिक हरी माणिक, चिन्माणिक सन्माणिक” हे परवलीचे भजन म्हटले गेले. वाद्यांचा कल्लोळ चरम पदावर होता. हे पद संपल्यावर “नमः पार्वतीपतये हर हर महादेव”, “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त”, “श्री सद्गुरू माणिकप्रभु महाराज की जय” चा जयघोष मुक्ती मंडपात भरून राहिला. दोन क्षण कमालीची शांतता जाणवली. कानात मात्र झांजांची किणकिण अजून ऐकू येत होती. मन प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. सकाळचे साधरण पावणे अकरा झाले होते.

दिंडी आता समाप्तीसाठी श्री मार्तंड माणिक प्रभूंच्या समाधीसमोर होती. आता दिंडीचे सर्व साहित्य  बुक्का, पदांचे पुस्तक, झेंडा, वाद्ये,  सप्ताहात  सात दिवस पारायणासाठी वापरलेली श्री प्रभुमंदिरातील श्रीमद्भागवतची पोथी, चांदीची छोटी वीणा व अखंड वीणा हे सर्व परत श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीसमोर ठेवले गेले व दिंडीची परिसमाप्ती झाली. दिंडीच्या समाप्तीनिमित्त श्रीमार्तंड माणिकप्रभुंना पेढ्यांचा नैवेद्य दाखवला गेला.‌ दिंडीचा हा प्रसाद श्रीजींनी सर्वांना वाटला. ह्या पेढ्याच्या प्रसादाची गोडी अवीट होती. श्रीजी आता चैतन्यलिंगासमोर आले होते. तेथे सर्वांना पुन्हा कुरमुरे पेढ्याचा प्रसाद वाटला गेला. श्री प्रभु परिवारातील सदस्य गण आणि प्रभुभक्त सर्वजण मुक्तीमंटपात सुखानैव बसले होते. जवळजवळ बारा तासांनी शरीर असल्याची जाणीव झाली. संपूर्ण रात्रभर क्षणाचीही उसंत न घेताही कमालीचा तजेला जाणवत होता. दिंडी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे समाधान प्रत्येक चेहऱ्यावर झळकत होते. दिंडीचा महासोहळा आता पूर्ण झाला होता. दिंडीच्या गप्पांचा फड उपस्थितांमध्ये चांगलाच रंगला होता.

गेल्या आठ दिवसांचा काळ झरझर डोळ्यांपुढे तरळला. सकाळचे पारायण, माध्यान्ह काळी श्रीजींचे प्रवचन, सायंकाळी बालगोपाळांची रासक्रीडा, रात्री प्रवचन आणि भजन… संपूर्ण दिवसरात्र कार्यक्रमाची रेलचेल असायची. ह्या आठ दिवसांत बहुतेक वेळ मोबाईल बंद असायचा. त्यामुळे कदाचित समग्रपणे वेदांत सप्ताहाचा आनंद घेता आला. आपल्या आणि भगवंतामध्ये ह्या मोबाईलचे किती व्यवधान आहे हेही जाणवले. दिवसभरात कधीकधी सहा तास ही झोप न होता मन आणि शरीर अत्यंत ताजेतवाने असायचे. सात्विक आहार, सात्विक आचार आणि सात्विक विचार ह्यांचा त्रिवेणी संगम वेदांत सप्ताहात अनुभवता आला. ह्या जीवनशैलीचा आपल्या जगण्यावर किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो, आधीच सुंदर असलेले जीवन अजून सुंदर कसे करता येईल ह्याचा परिपाठचं माणिक नगरातील ह्या वेदांत सप्ताहाने घालून दिला. वेदांत सप्ताहाचे हे वर्णन श्री प्रभु कृपेनेच तेरा भागांमध्ये लिहून पूर्ण झाले. सब कुछ तेरा कुछ नही मेरा ह्या अंतरीच्या कृतज्ञ भावनेने श्री प्रभुसेवेची ही शब्द सुमने त्याच्याच चरणी मनोभावे अर्पण. संपूर्ण वेदांत सप्ताहामध्ये आम्हा समस्त भक्तजनांची अत्यंत दक्षतेने, आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल श्री माणिक प्रभू संस्थान आणि समस्त सेवेकरी ह्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये श्री प्रभुलाच पाहून त्यांचे आदरातिथ्य करणाऱ्या श्री संस्थानाप्रती वारंवार कृतज्ञता, आपल्या विद्वत्ताप्रचुर प्रवचनांनी आमच्या अज्ञानरुपी अंधकाराचा नाश करणारा ज्ञानसूर्य, श्री ज्ञानराज माणिक प्रभु यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम… वेदांत सप्ताह आणि दिंडी तसेच श्री माणिक प्रभु संस्थान आणि त्या संबंधित कोणतीही माहिती अविलंब आणि तितक्याच प्रेमाने उपलब्ध करून देणाऱ्या श्री चिद्घन प्रभुंप्रतीसुद्धा वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. वेदांत सप्ताह जरी संपला तरी त्याचे गारुड मनावर अजूनही तसेच आहे. सप्ताह भजनातली पदे, झाजांची किणकिण, अखंड वीणेचा झंकार अजूनही कानात गुंजत आहे, बुक्क्याचा मंद परिमळ अजूनही नाकात भरून राहिला आहे. जीवनात आजवर जे शोधत होतो, ते सापडल्याचे समाधान आहे. स्वर्गिय सुख म्हणजे काय असतं हे दिंडी अनुभवल्यावर कळालं. मनातील द्वैत भाव मिटवून, आत्मानंदाची अनुभूती करून देणारा हा वेदांत सप्ताह, ही दिंडी, प्रत्येकाने जीवनात एकदा तरी अनुभवावी आणि त्या अनुभूतीचा योग आपणा सर्वांना लवकरात लवकर यावा, ह्या श्री प्रभुचरणीच्या आणखी एक लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…दिंडी प्रत्यक्ष अनुभवताना किंवा त्याचे वर्णन शब्दात करताना मनात एकच भाव उमटतो आणि तो म्हणजे…धन्य धन्य अति धन्य आम्ही झालो, पूर्णानंद

।।श्री माणिकचरणार्पणमस्तु।।

 

[social_warfare]