कोलच्या खेळानंतर महाप्रसाद घेऊन दिंडीला तयार होण्यासाठी यात्री निवासावर आलो. झटपट स्नान उरकले आणि अवघ्या पंधरा मिनिटांत पुन्हा श्रीप्रभु मंदिरात हजर झालो. अनेक प्रभुभक्तांकडून दिंडीची ख्याती ऐकली होती. दिंडीतला एकही क्षण मला नजरेआड करायचा नव्हता. सर्वप्रथम श्रीप्रभु मंदिरात श्री माणिक प्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आज हा भक्तकार्यकल्पद्रुम सार्वभौम श्रीगुरु पूर्ण कलेने नटला होता. चैतन्याची अनुभूती गाभाऱ्यात सुखासनी पहुडलेल्या श्रीप्रभुला पाहून क्षणोक्षणी येत होती. त्या गर्दीतही मनाचा बांध फुटला आणि बसल्याजागीच डोळ्यांत अश्रू तरळले. आनंदाश्रु म्हणतात कदाचित हेच असावेत…‌ गेल्या आठवडाभरात हा नटनागर दररोज लोभसपणे समोर आला होता. आजही श्रीप्रभुची ती प्रत्येक छबी हृदयामध्ये तशीच कोरलेली आहे. एखाद्याने आपल्या मनाचा ताबा घेणे म्हणजे काय? हे श्रीप्रभु समाधीसमोर नतमस्तक होताना कळते. श्रीप्रभु जेव्हा नकळत आपल्या मनाचा ताबा घेतो, तेव्हा आपल्या मनाची होणारी भावविभोर अवस्था, चराचरातील श्रीप्रभुचे अनुभवायला येणारे चैतन्य, मनात आलेले क्षुद्रातीक्षुद्र लाडसुद्धा श्रीप्रभुने लडीवाळपणे पुरवणे, असे जेव्हा वारंवार घडते, तेव्हा श्रीप्रभुने नक्कीच आपला हात त्याच्या हातात घेतला आहे, ह्याची जाणीव होते आणि ही जाणीव अत्यंत सुखावह आणि तितकीच आश्वासकही असते.

पूर्ण तेजाने झळाळत असलेल्या श्रीप्रभुचे वर्णन करायला आज कदाचित शब्दही अपुरे पडावेत. सौंदर्य जणू दास बनून श्रीप्रभु चरणी अदबीने, नजाकतीने उभं होतं. रत्नांच्या, मोत्यांच्या, रुद्राक्षांच्या माळा गळाभर ऐटीत रुळत होत्या. अबोलीचे नाजूक हार, मोगऱ्याचा सुगंधी हार, पिवळ्या झेंडूचा हार, शेवंतीचा जाडजूड हार आणि गुलाबांच्या अनेक प्रकारच्या भरगच्च हारांमध्ये श्रीप्रभुला सुशोभित करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. श्रीप्रभु समाधीच्या वरच्या बाजूला शेंदरी, पिवळे, लाल, गुलाबी गुलाबांचे गुच्छ श्रीप्रभुच्या रूपाला चारचाँद लावत होते. गुलाबांच्या ह्या तोबा गर्दीमध्येही लाल टपोरा जरबेरा आपलं अस्तित्व दाखवून देत होता. श्रीप्रभु समाधीस अगदी बाहेरच्या बाजूस घातलेल्या भरगच्च गुलाबाच्या हाराला, तगरीच्या फुलांची सुंदर जाळी विणली होती. लाल आणि पांढया रंगसंगतीतला तो हार अत्यंत आकर्षक दिसत होता. श्रीप्रभु समाधीभोवती केळी लावल्या होत्या, जणू कर्दळीवनातच श्रीप्रभु आज विहरत होता. श्रीप्रभु समाधीवरील छत्रावरून मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या आणि त्या माळांच्या शेवटी झेंडूची फुले आकर्षकपणे माळली होती. समोरच श्रीप्रभुच्या पादुका दृष्टीस पडत होत्या. बाजूला चांदीच्या समया मंदपणे तेवत होत्या. श्रीप्रभुला पंचपक्वान्नांचा, डाळिंब, चिकू, कलिंगड, संत्री, मोसंबी, केळी, अननस, टरबूज, अंजीर इत्यादी फळांचा नैवेद्य अर्पण केला होता. नैवेद्याच्या भोवती सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. चारी बाजूंना समया तेवत होत्या. ह्या सर्व मांदियाळीत समोर पत्रावळीत असलेला भाजीभाकरीचा नैवेद्य लक्ष वेधून घेत होता. श्री माणिकप्रभु महाराज नेहमी माधुकरीचे अन्न खात. श्री प्रभुंना चटणीभाकरी खूप आवडायची. श्रीसंस्थानाने ती परंपरा आजतागायत जपली आहे. आजही श्रीप्रभुंना पंचपक्वान्नांचा नैवेद्य असला, तरी मध्यभागी माधुकरीचे भिक्षान्नच असते. असो, सच्चिदानंद दयाघनाच्या ह्या विलोभनीय रूपाला कुणाची नजर लागू नये म्हणून हळूच बोटे डोक्याला लावून मोडली. तुझा हा आनंद सोहळा‌ मला संपूर्णपणे अनुभवायला मिळू देत, अशी विनंतीवजा प्रार्थना श्रीप्रभुला केली आणि श्रीजींच्या निवासस्थानी नागाई येथे पोहोचलो. ढोल, ताशे, संबळ वाजवणारे श्रीजींच्या निवासस्थानाच्या आवारात उभे होते. भालदार, चोपदार लाल रंगाच्या वेषात मावळ्यांसारखी पगडी घालून अब्दागिरी घेऊन सज्ज झालेले होते. एक सेवेकरी श्रीजींवर धरण्यात येणारी छत्री घेऊन सज्ज होता. अंगणामध्ये जवळपास दहा फूट लांबीची सुस्वागतमची रांगोळी मन वेधून घेत होती. प्रभुभक्त घोळक्याघोळक्याने जमून उभे होते. दिंडीचा सोहळा अनुभवण्यासाठी आतुर झालेला प्रत्येक जण आता दिंडीसाठी नागाईतून श्रीजींच्या प्रस्थानाचीच वाट पाहत होता.

दिंडीदिंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चटकन पंढरपुरची वारी उभी राहते. वारकरी संप्रदायाचे लोक आषाढी कार्तिकी एकादशीला संतांच्या आणि देवाच्या पालखीपुढे भजन करत नाचत जातात त्याला दिंडी असे म्हणतात. संस्कृत भाषेतदिंडि:” आणिदिण्डिर:” असे शब्द आहेत, आणि या दोन्ही शब्दांचा अर्थएक विशिष्ट प्रकारचे वाद्यअसा आहे. त्यामुळे वाद्यांच्या गजरात होणाऱ्या हरिसंकिर्तनास दिंडी म्हणता येईल. इतिहासामध्येही आपल्याला किल्ल्यांच्या दिंडी दरवाज्याचे वर्णन अनेकदा आढळतेमराठीत दिंडी ह्या शब्दाचे लहान दरवाजा आणि पताका असे दोन अर्थ आहेत. आपल्याला स्वर्गाची दारे उघडावी, या हेतूने वारकरी लोक भजन करतात आणि म्हणूनच त्यांच्या वाटचालीला दिंडी हे नाव पडले अशी कल्पना आहे. किंवा वारकऱ्यांच्या खांद्यावर पताका असतात, त्यावरून दिंडी हे नाव आले असावे, असेही एक मत आहे. भजनी मंडळातील एक जण दिंडी नावाचे वीणेसारख एक वाद्य पुढे वाजवीत जातो बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला दिंडी असे म्हणतात. असो. भागवत सप्ताहच्या पारायण पद्धतीत असे नमूद केले गेले आहे की, सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी वाजत गाजत भगवंताचे स्मरण करत मिरवणूक काढावी हरिसंकिर्तन करीत रात्री जागरण करावे. श्री मार्तंड माणिकप्रभुंना रात्री जागरण, हरिसंकीर्तन मिरवणुकीची ही कल्पना फारच आवडली आणि त्यांनीच ह्या मिरवणुकीला वारकरी संप्रदायाच्या दिंडीचे स्वरूप देऊन श्री संस्थानाच्या लौकिकास साजेल, असा कार्यक्रम आखला त्यास दिंडी हेच नाव दिले.

श्री मार्तंड माणिकप्रभु महाराज हे स्वतः एक प्रतिभासंपन्न कवी आणि प्रत्युत्पन्नमति विद्वान असल्यामुळे दिंडीच्या कार्यक्रमात जागच्याजागी पदे रचून त्यांनी गायल्याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. दिंडीच्या कार्यक्रमात श्रीजी स्वस्वरूपाशी इतके तादात्म्य पावत की त्यांना कशाचेही भान उरत नसे. पुढे १९३६ साली श्रीजींच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु महाराज श्रीसंस्थानाचे पुढचे पीठाचार्य झाले. त्याच वर्षी त्यांनी, अधिक भाद्रपद मासात श्रींच्या मासिक आराधनेस जोडून, आपल्या कारकीर्दीचा प्रथम वेदांत सप्ताह उत्सव साजरा करून, दिंडीच्या भव्य कार्यक्रमाने त्याची सांगता केलीश्री शंकर माणिक प्रभुनींच वेदांत सप्ताहाच्या विविध कार्यक्रमास आणि दिंडीच्या मिरवणुकीस एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली, जी अद्यापही चालू आहे.

पुढे १९३७ सालच्या फाल्गुन महिन्यात श्रीजींच्या प्रथम पुण्यतिथीस असे ठरले की, श्रीजींच्या पुण्यतिथीस जोडून,, प्रतिवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्थीपासून वेदांत सप्ताह उत्सव श्रीजींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जावा. १९३७ ते १९४३ सालापर्यंत हा कार्यक्रम अत्यंत वैभवात साजरा केला गेला. १९४४ साली श्रीमाणिक नगरात प्लेगचा प्रकोप होता. त्यात श्री शंकर माणिकप्रभु महाराज स्वतः उदर व्यथेने आजारी होते. त्यांनी सर्व भक्तांस पत्रे पाठवून कळवले की, यंदा वेदांत सप्ताह होऊ शकणार नाही. योगायोग असा की, वेदांत सप्ताह ज्या दिवशी प्रारंभ होत असे त्याच्या दोनच दिवस आधी श्री शंकर माणिकप्रभु महाराज पंचतत्वात विलीन झाले आणि म्हणूनच १९४६ सालापासून वेदांत सप्ताह उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेस प्रारंभ होऊ लागला चतुर्थीला श्री मार्तंड माणिकप्रभु महाराजांची पुण्यतिथी साजरी होऊन, नवमीस दिंडी असा क्रम प्राप्त झाला, तो आजतागायत चालू आहे.

दिंडीत म्हणावयाच्या पदांची यादी एका फलकावर लिहून ते फलक दिंडीत मिळवण्याची पद्धत श्री शंकर माणिकप्रभु महाराजांनी घालून दिली. भक्तजन फलकावरील पदांचा क्रमांक पद्यमाला या पुस्तकातील त्या पदांचे पृष्ठ क्रमांक पाहून पद्यमालेच्या आधारे पदे म्हणत असत. बऱ्याच भक्तांकडे पद्यमाला नसते अथवा पदेही मुखोद्गत नसतात, म्हणून दिंडीत भाग घेऊनही त्यांना पदे म्हणता येत नाहीत. काही पदे, आरत्या ह्या सप्ताह भजनाच्या पुस्तकातील असल्यामुळे भक्तांचा बराच वेळ पुस्तकाचे पाने उलटण्यात जातो आणि त्यामुळे एकंदरीतच रसभंग होण्याची पाळी येते. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांनी दिंडीत म्हटल्या जाणाऱ्या पदांची एक क्रमवार पुस्तिका प्रकाशित केली आणि त्याची मांडणी अशी केली की एकदा पुस्तिका हातात धरल्यावर दिंडी संपेपर्यंत पाने शोधण्याची वेळच येऊ नये. त्या अनुषंगाने १९९४ सालीदिंडीची पदेही पुस्तिका छापून प्रसिद्ध झाली. आजही दिंडीमध्ये वेळोवेळी म्हटल्या जाणाऱ्या त्या त्या पदांचे फलक उंच धरले जातात, जेणेकरून सर्व भक्तांना ती ती पदे फलक पाहून म्हणता येतात.

मनामध्ये दिंडीच्या इतिहासाची पाने उलगडत असतानाच भक्तकार्य कल्पद्रुमचा जोशपूर्ण जयघोष झाला. जो तो आपापल्या परीने सावध झाला. श्रीजींनी आधी आपल्या निवासस्थानातील देवतांचे दर्शन घेतले. कुलदेवता श्री मल्हारी म्हाळसाकांत कुलस्वामिनी श्रीनागवेलांबा देवीची आरती म्हटली. नंतर श्रीजींनी मातोश्री मीराबाई साहेबांकडून आशीर्वाद घेतले मातोश्रींनी श्रीजींना दहीसाखर दिला. मातोश्रींकडून मिळालेल्या भरभरून आशीर्वादानंतर श्रीजी त्यांच्या निवासस्थानातून दिंडीसाठी मुक्तीमंटपात जाण्यासाठी प्रस्थान करते झाले.

क्रमशः

[social_warfare]