आज श्रीगुरु आराधना होती. सूर्य मावळतीला झुकत होता. आरक्त वर्णाच्या त्या बिंबातून बाहेर पडणारी सौम्य किरणे भोवतालच्या आसमंताला सोन्याच्या जेजुरीसारखी पिवळीधम्मक करत होती. गायकाच्या परावाणीतून सुरांचे कारंजे थुईथुई नाचत होते. हंस: सोऽहम् सोऽहम् हंस:, अजपाजप सद्ब्रह्म प्रकासा हे भजन अगदी टीपेला पोहोचले होते. वाद्यवृंदाच्या तालसुरांची मोहिनी, एव्हाना भक्तांवर गारुड करायला लागली होती. आराधनेच्या वेळी श्रीगुरु आपल्या शिरावर मंगल कलश घेऊन भजनाच्या तालावर लयबद्ध डूलत होते. शिवासुद्धा ह्या आनंद सोहळ्यामध्ये न्हाऊन निघत होता. श्रीगुरुंवरून त्याची नजर काही केल्या हटत नव्हती. देहभान हरपून तो अनिमिष नेत्रांनी श्रीगुरुंना आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याची नजर काहीतरी शोधत होती.

अस्त समय शिव नाचत प्यारा,
शांभवगण शिव हर ललकारा

हे वाक्य ऐकायला आणि श्रीगुरुंमध्ये त्याला साक्षात् शिवशंकर दिसायला एकच वेळ साधली गेली. अवघे दहा क्षण ही नसतील पण शिवाचा शोध आता संपला होता. समोर जे काही दिसलं तो भास नक्कीच नव्हता. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्याने मनोमन उभ्याउभ्याच श्रीगुरुंना अभिषेक घातला. ज्याच्या दर्शनाची आस आजवर लागली होती, तो क्षणात साक्षात् समोर येऊन, श्रीगुरुरुपात विलीनसुद्धा होऊन गेला होता.

दुसऱ्या दिवशी शिवाने श्रीगुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, त्यांना काल संध्याकाळी घडलेला प्रकार सांगितला. त्यावर खळखळून हास्य करीत श्रीगुरु म्हणाले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे… शिवा थोडा गोंधळला.‌ श्रीगुरुंचे ते शब्द त्याच्या कानामध्ये रुंजी घालत होते. दुपारी शिवा बाजूच्याच एका शिवमंदिरात गेला. दुपारच्या वेळी ऊन मी म्हणत होते. अगदी पुरातन असलेल्या ह्या मंदिर परिसराला गुप्तकाशीही म्हटले जायचे. मंदिराचा परिसर मोठा प्रशस्त होता. अनेक शिवलिंगे या परिसरात स्थापिली होती. पण मुख्य मंदिर काहीसे वेगळे होते. येथे शाळुंकेवर शिवलिंगाच्या ऐवजी शाळीग्राम होता, जणू तो हरिहराचे ऐक्यच दाखवीत होता. मंदिराच्या कळसावरही रामाच्या धनुष्यबाणाचे चिन्ह होते. मुख्य मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यावर, शिवा बाहेर आला आणि अचानक आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी जमली. जोराचा वारा वाहून गडगडाट व्हायला लागला. शिवा जगन्मातेचे दर्शन घेऊन तिच्या मंदिराच्या आवारात दोन मिनिटं बसला होता आणि त्याच वेळेस विजांच्या कडकडाटासहीत धुंवाधार पाऊस सुरू झाला. शिवाला परतीची घाई होती. कोसळणाऱ्या पावसातच त्याने मंदिराबाहेर एक पाय ठेवला आणि त्याचे अंग मोहरून गेले. पावसाच्या पाण्याचा स्पर्श त्याला शीतलता प्रदान करत होता. तो थंडगार स्पर्श त्याला हवाहवासा वाटू लागला. मंदिरातून परतीच्या मार्गात शिवा पुन्हा मुख्य मंदिराच्या समोर होता. एव्हाना शिवा अचानक आलेल्या पावसामुळे, नखशिखांत भिजला होता.‌ मंदिराच्या पायऱ्या उतरताना, पाच दहा मिनिटाच्या झालेल्या पावसाच्या पाण्याने मंदिर परिसरात पाण्याचं चक्क तळ साचलं होतं. गुडघाभर साचलेल्या त्या पाण्यातून वाट काढताना, शिवा मंदिराच्या महाद्वारापाशी आला. परतीचा नमस्कार करताना त्याला श्रीगुरूंचे शब्द आठवले, अरे मीच काय, तू ही शिवस्वरूप आहेस, अनुभव घे…

श्रीगुरुंनी त्याला आज त्याच्या शिवस्वरूपाची जाणीव करून दिली होती. पुरातन शिवमंदिरात जेथे लखलखीत ऊन पडले होते, तेथे क्षणात पाऊस येतो काय आणि आपल्या देहाला भिजवून जातो काय ह्याचे गूढ शिवाला उलगडले होते. शिवशंकराला जल अत्यंत प्रिय आहे आणि शिवाच्या देहरूपी पिंडीवर अस्तित्वाने आज पावसाची संततधार धरली होती. गुप्तकाशी स्थानामध्येही साठलेल्या पाण्यामुळे शिवाला जणू गंगास्नानच घडले होते. कृतज्ञ आणि कृतार्थ भावनेने ओघळलेले डोळ्यातील आनंदाश्रू पावसाच्या साचलेल्या पाण्यात मिळाले होते.‌ जीवाला शिवाची ओळख झाली होती, शिवाला अंत:स्थ शिवाची ओळख झाली होती. श्रीगुरुंनी शिवाला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली होती. आनंदाच्या त्या भरात शिवा झरझर परतीच्या मार्गाला लागला होता आणि त्याचवेळी त्याच्या कानाला कुठेतरी दूरवरून भजनाचे सूर ऐकू होते,

हा शैव नव्हें मनुजाधम मूढ तो ऐका,
मी सांब नव्हें कोण मी धरी जो शंका…

[social_warfare]