वरील एका वाक्यातच माणिकनगरचे संपूर्ण वैभव आणि सौंदर्य अनुभवता येते.‌ श्री चैतन्यराजप्रभुंच्या सिद्ध लेखणीतून स्फुरलेले अवीट गोडीचे, अतीशय सुमधुर असे हे गीत, आपण शरीराने कुठेही असले तरी मनाने आपल्याला निश्चितच माणिकनगरात घेऊन जाते. खाली दिलेल्या लिंकवर आपण युट्यूबवर आपण ह्या गीताचा आनंद घेऊ शकतो…

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून माणिकनगरला माझे जाणे सुरू झाले. माणिकनगरच्या सुरुवातीलाच असलेली भव्य कमान व त्यावरील मंगल कलशाची प्रतिकृती माणिकनगरच्या मांगल्याची चुणूक दाखवून देते. माणिकनगरमध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा झाडांची दाटी दिसून येते. आजूबाजूच्या शेतांतून मोरांचा केकारव ऐकू येतो. मुक्तपणे इथून तिथून उड्या मारणारी माकडे आपल्याला माणिकनगरात सहज नजरेस पडतात.‌ पशुपक्ष्यांसाठी हिरवगार माणिकनगर म्हणजे जणू आपलं हक्काचचं घर… श्री माणिकप्रभु स्थापित ह्या पुण्यभूमीमध्ये तेही स्वच्छंदपणे, मुक्तपणे आपले जीवन जगत असतात…

चतुर्थ दत्तावतारी श्री माणिकप्रभुंनी आपल्या अवतारकाळात सन १८४५च्या सुमारास माणिक नगरची स्थापना केली. श्री माणिकप्रभु स्वतः शिवस्वरूप होते, हे श्री माणिक चरित्रामृतातील अनेक कथांतून आपल्याला अनुभवता येते. या गीताच्या धृपदातही ह्या पृथ्वीवर कैलास पर्वताची जर कोणती प्रतिकृती असेल, तर ती म्हणजे माणिकनगर… येथे श्री माणिकप्रभू चराचरांमध्ये व्यापून उरले आहेत आणि ते कसे ह्याची एक समग्र यात्राच ह्या गीतातून आपल्याला अनुभवता येते. ह्या गीतामध्ये सुरुवातीला दिसणारा प्रभू मंदिराचा कळस हा आपल्याला कैलास पर्वताच्या उत्तुंगतेची आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या श्री माणिकप्रभुंची सुकोमल, सुहास्यवदन छबी त्या भोळ्या कर्पुरगौर सांब सदाशिवाचीच आठवण करून देते.‌

कलबुर्गी (आधीचे गुलबर्गा), बिदर आणि कल्याण ह्या तीन इतिहास प्रसिद्ध शहरांमधील त्रिकोणी क्षेत्रातील डोंगराळ प्रदेशास दरीपट्टी म्हणतात. वरील तिन्ही ठिकाणांच्या मधोमध माणिकनगर वसलेले आहे. त्यामुळेच माणिकनगराच्या सीमा त्रिविध आहेत. तसेच या प्रदेशात मराठी, कानडी आणि तेलगू ह्या भाषा बोलल्या जातात आणि ह्या अनुषंगाने लोक आपापली संस्कृती येथे जपतात.‌ त्यामुळेच त्रिविध सीमा, भाषा आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगमच आपल्याला माणिकनगरात पाहायला मिळतो. तसेच ह्या प्रदेशात वातावरण अत्यंत निरोगी असून येथे पाण्याची विपुलता आहे. माणिकनगरात चाफा, बकुळ, मधुमालती, सुंदर सुंदर कमळे अशी आणि अनेक प्रकारची फुले सदैव बहरत असतात. श्रावण महिन्यात श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीवर केलेल्या फुलांच्या अलंकारांवरून आपण त्याचा मनमुराद आनंद लुटला आहेच.‌ जरी येथील प्रदेशांत, लोकांत, संस्कृतीत, भाषेत विविधता असली तरी, केवळ जय गुरु माणिक हे तीन शब्द सर्वांनाच सकलमत संप्रदायाच्या एकच तत्वात गुंफतात.‌ वर वर्णिल्याप्रमाणे येथे विविध फुले जरी उमलली तरी ती प्रभुच्या एकाच समाधीवर अर्पण केली जातात.‌

दरीपट्टीचा डोंगराळ भाग लाल रंगाचा आहे. येथील माती लाल रंगाची आहे. श्री माणिकप्रभुंच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही दिव्य लाल रंगाची भूमी इतकी मंगलमय आहे की, अनेक योगी ह्या मातीचाच टिळा लावतात.‌ प्रेमाचा रंगही लालच असतो, म्हणून तो सौभाग्यकारक समजला गेला आहे. अशी ह्या माणिकनगरच्या मातीत सौभाग्याचं लेणं असलेल्या, कुंकूमाने भरलेल्या मळवटाचीही झलक आपल्याला दिसून येते. घनदाट वृक्षवल्लींनी व्यापलेल्या ह्या प्रदेशातील वातावरण कोणतेही ऋतूत अत्यंत आल्हाददायी तसेच आरोग्यकारक असते.‌

उत्तुंग आणि सुंदर अशा श्रीप्रभु मंदिरावर सोन्याचा झळाळता कळस आहे. ह्या कळसाच्या केवळ दर्शनानेच, त्याला केलेल्या नमस्कारानेच सर्व यश आणि सिद्धी प्राप्त होतात. माणिक नगरचे हे अपूर्व वैभव पाहून स्वर्गातील देव आणि गंधर्वसुद्धा विस्मय करत राहतात.

सकलमत संप्रदायात कोणताही जातीभेद नाही. इथे सर्वांचाच प्रभुस्वरूप म्हणून समान आदर केला जातो. आजही माणिक नगरात विविध धर्माचे उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे वाक्य इथे अक्षरशः जगले जाते.‌ ह्या संकल्पनेचे वर्णन करताना चैतन्यराज म्हणतात की, इथे कोणची हार होऊ नये आणि ह्यातच सकलमत संप्रदायाची जीत आहे. ह्यावरून सकल्पात संप्रदायाच्या विश्वबंधुत्वाची भावना अधोरेखित होते. माणिक नगर मध्ये आपण कुठल्याही दर्गा, मंदिर, मठ, शिवालयाला भेट दिली तर तेथे श्री प्रभुंचं अस्तित्व, त्यांच्या खुणा जाणवतात.

माणिकनगरला संगीताचे माहेरघर म्हटले जाते. भारतातील संगीतातील अनेक प्रसिद्ध विभूतींनी श्रीप्रभुंच्या गादीसमोर आपली कला सादर केली आहे. त्यांची अशी मान्यता आहे की श्रीप्रभुंच्या गादीस समोर संगीत सेवा समर्पित केल्याशिवाय त्यांची संगीत साधना पूर्णच होत नाही. माणिकनगरमध्ये संगीत शिकवण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. अनेक लोक येथे संगीताची आराधना करतात. लता मंगेशकर, पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी सारख्या अनेक विभूतींनी आपली सेवा श्रीप्रभुंच्या गादीसमोर सादर केली आहे.

माणिक नगरमध्ये अखंड अन्नदान केले जाते. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेल्या भंडारखान्यामध्ये आलेल्या सर्व भक्त जणांना श्रीप्रभुचा पोटभर प्रसाद मिळतो. अनेक भुकेलेले जन हा प्रसाद घेऊन संतुष्ट होतात. सोहळ्याचे वर्णन करताना कवी म्हणतात की, ह्या सुग्रास प्रसादासाठी देवतासुद्धा माध्यान्हकाळी तिष्ठत असतात. खरोखरच प्रभुंच्या माधुकरीचा प्रसाद ज्यात मिसळला आहे, त्या महाप्रसादाची गोडी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमधील जेवणापेक्षा अवीट आहे. ज्यांनी ह्या प्रसादाची चव चाखली आहे, त्यांनी हे अनुभवले असेलच.

माणिकनगरी वेद पाठशाळा आहे. येथे मुलांना वेदांताचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जाते. श्रीप्रभु कृपेने येथे गुरु आणि शिष्य, दोघेही वेदांच्या अध्ययनात सफलता प्राप्त करतात आणि त्यांनी उच्चारलेले मंत्र जणू श्रीप्रभु स्वतः सिद्ध करून त्यांची अज्ञानता दूर करतो. श्री माणिकनगर संस्थानाचा रथ ज्ञान आणि भक्ती या दोन चाकांवर दौडत आहे आणि त्यामुळेच ज्ञानाची ही सरिता माणिक नगर मध्ये नित्य खळखळून वाहत असते, ज्ञानाचे हे नगारे येथे अष्टौप्रहर वाजत राहतात.

श्री माणिकनगर संस्थानाने नेहमीच सामाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांना यथायोग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विकलांग जनांसाठीसुद्धा श्रीप्रभु त्यांचा मायबाप बनून सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. माणिकनगरमध्ये असलेल्या विकलांग शाळेमध्ये असलेले विद्यार्थी नेहमी श्रीप्रभुंची भजन म्हणतात. माणिकनगरातील प्रेमळ नगरवासी सुद्धा त्यांना वात्सल्य आणि प्रेम अगदी भरभरून देतात. आणि त्यांच्याच रूपात जणू श्रीप्रभु त्यांच्या हाताला धरून त्यांना जीवनामध्ये चालायला, स्वयंपूर्ण बनवायला मदत करतो.

श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आतापर्यंतच्या सर्व पिठाचार्यांनी स्वतः कल्पतरू म्हणून आपल्या भक्तांना जे जे हवे आहे ते ते आनंदाने दिले. त्यांच्या सर्व कामना पूर्ण केल्या आणि आजही अव्यहातपणे हे सर्व चालू आहे. ज्याने जे जे मागितले त्याला ते श्रीप्रभुने समर्थपणे दिले. म्हणूनच कवी पुढे म्हणतात की, आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी श्रीप्रभु येथे स्वतः हाती दंड धरून सदैव बसला आहे.

श्रीप्रभुंच्या वास्तव्याने पुनित झालेल्या ह्या दिव्यभूमीमध्ये भजनाचा घोष अखंड चालू असतो आणि त्यामुळेच काय की माणिकनगर हे कदाचित वैकुंठापेक्षाही श्रेष्ठतम असे स्थान आहे असे कवी ठामपणे म्हणतोय. माणिकनगरला आनंदवन, मंगलभुवन अशा कितीतरी नावांनी शब्दबद्ध केलाय. माणिकनगरचे हे सर्वदूर पसरलेले वैभव, इथे आपल्याला येणारी त्याची दिव्य अनुभूती हे शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्यप्राय आहे. ज्यांच्या नशिबात श्रीप्रभुचे हे आनंदभुवन आहे, असे सौभाग्यशाली लोक येथे श्रीप्रभु दर्शनासाठी पोहोचतात. माणिकनगरातील प्रत्येक घर हे श्रीप्रभु कृपेच्या छत्रछायेखाली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

श्री माणिकप्रभुंनंतर बालयोगी श्री मनोहर माणिकप्रभुंनी आपल्या अलौकिक शक्तीने सकलमत संप्रदायाचा आणि श्रीप्रभु संस्थानाचा नावलौकिक वाढवला. त्यानंतरचे आचार्य श्री मार्तंड माणिकप्रभु यांनी तर श्रीप्रभु संस्थानची कीर्ती आसेतु हिमाचल वाढवली. श्री मार्तंड माणिकप्रभुंनंतर श्री शंकर माणिकप्रभुंनी आपल्या कारकीर्दीत अतुलनीय प्रभुभक्तीचा आदर्श घालून दिला व माणिक नगरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या निर्वाणानंतर अगदी बालवयातच गादीवर बसलेल्या सिद्धराज माणिकप्रभूंनी संस्थानाचा संपूर्ण कायापालट केला. आपल्या मितभाषी पण मृदू वाढीने आणि सौहार्दपूर्ण वागणुकीने आजही श्री सिद्धराज प्रभू माणिक नगरातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात विराजमान आहेत. सध्याचे पिठाचार्य श्री ज्ञानराज माणिकप्रभु आधीच्या पिठाचार्यांचे दिव्य कार्य समर्थपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. श्रीसंस्थानाच्या आधुनिकरणाचा ध्यास श्री ज्ञानराज माणिकप्रभुंनी घेतला आहे. तसेच भगवद्गीतेच्या माध्यमातून वेदांतातील गूढ सिद्धांत जनसामान्यांना समजतील अशा सहज आणि सरळ, हसत खेळत प्रवचनांच्या माध्यमातून आज ते घराघरात पोहोचवत आहेत.

निसर्ग सौंदर्याने नटलेले, वृक्ष लता वेलींनी फुललेले, पशुपक्ष्यांचे हक्काचे माहेरघर असलेले, शांत प्रशांत असे माणिक नगर जणू काही श्रीप्रभु परमात्म्याचे ही आनंदमय निवासस्थानच आहे. येथील कणाकणांमध्ये चैतन्याची अनुभूती देणाऱ्या आणि प्रभुवास्तव्याने अतिशय पवित्र झालेल्या अशा पुण्यभूमीला कवी कोटी कोटी वंदन करत आहे. अशा ह्या असीम अनंत श्रीप्रभु परमात्म्याच्या दर्शनासाठी केवळ देवच नाही तर असुर सुद्धा दोन्ही हात जोडून उभे आहेत…

संपूर्ण गीतातून माणिक नगरचे हे दिव्य दर्शन आपल्याला साक्षात् माणिक नगराला घेऊन जाते. तेथे अनुभवलेले, हृदयाच्या कोपऱ्यात साठवलेले क्षण पुन्हा ताजेतवाने होतात. आणि शेवटी जेव्हा माणिक नगर माणिक नगर माणिक नगर माणिक नगर असा गजर होतो तेव्हा डोळ्यांच्या कडा प्रभुच्या आठवणीने हलकेच ओलावतात…

आपल्या आसपास कितीतरी तीर्थस्थळे असतील पण त्या त्या अवताराच्या काळापासून त्या दिव्य आठवणी, त्या त्या परंपरा, ती शिकवण अतिशय आत्मीयतेने जपणारे कदाचित माणिक नगर हे एकमेव स्थान असावे…

एखाद्या स्थानाचे वैभव हे केवळ तेथील भव्य वास्तू किंवा सोन्या चांदीच्या दागिन्यांऐवजी किती वेगळे असू शकते, हे आपण या गीताच्या माध्यमातून अनुभवू शकतो. प्रभू परमात्मा हा केवळ मूर्तींमध्ये नसून तो चराचरामध्ये चैतन्य रूपात प्रकट होत असतो आणि माणिकनगरामध्ये श्रीप्रभुचे हे चैतन्य आपण प्रत्येक गोष्टीत, होय, अक्षरशः प्रत्येक गोष्टीत अनुभव शकतो. अतिशय दैवी शब्दांमध्ये गुंफलेले व सुमधुर चाल असलेले हे गीत म्हणजे कवी चैतन्यराज प्रभू यांच्यावर बरसलेली ही दिव्य प्रभुकृपाच आहे. त्याला स्वतः श्री. चैतन्यराज प्रभु आणि श्री. कौस्तुभजी जागीरदार यांनी सुंदर स्वरसाज चढवलेला आहे. श्री आनंदराजप्रभुंच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदानेही अतिशय तोलामोलाची साथ त्यास दिलेली आहे आणि त्यामुळेच सर्वांप्रती मनस्वी कृतज्ञता.
आपण कधी माणिक नगरी गेला असाल, तर ह्या गीताच्या माध्यमातून आपल्या गतस्मृती निश्चितच जाग्या होतील, आपण यापूर्वी जर कधी माणिकनगरला गेले नसाल तर आपल्याला माणिक नगर ला जायची जायची प्रेरणा या गीतातून नक्कीच होईल आणि ती होवो, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंती सह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक…

 

[social_warfare]