भाग दुसरा

श्रीप्रभुमंदिर परीसरात प्रदक्षिणा घातल्यावर मंडपात येऊन बसलो. मन अंतर्बाह्य शांततेचा अनुभव करत होतं. थोड्यावेळाने ब्रह्मवृंदाने श्रीप्रभुसमाधीस मंगलस्नान संपवून सजविले. इतके दिवस श्रीप्रभुसमाधी सजावटीचे फोटो पाहिले होते पण आज ते प्रत्यक्ष सजवताना पाहण्याचा योग आला. श्रीप्रभुसमाधीस आज हिरव्या रंगाच्या नक्षीदार वस्त्रांचा साज होता. वरून सुंदर नक्षीदार गर्द हिरवी, सोनेरी काठाची रेशमी शाल नेसवली होती. टपोऱ्या मण्यांची सोनसाखळी व समाधीवर माणिक रत्न लावलेले सुवर्णफूल श्रीप्रभुसमाधीचे रूप अधिकच खुलवत होते. शेवंतीच्या व कागड्याच्या फुलांच्या लांबलचक माळा श्रीप्रभुसमाधीवर कुरळ्या केसांप्रमाणे रूळत होत्या. वरून पडणाऱ्या सोनेरी विद्युत प्रकाशझोतामुळे श्रीप्रभु अधिकच लोभस वाटत होता. श्रीप्रभुसमाधीच्या मागील खिडकीखाली असलेल्या जागेतली दत्ताची गादीही मन मोहून टाकीत होती. श्रीसकलमत संप्रदायाच्या संकल्पनेनुसार, मान्यतेनुसार, प्रत्येकाने आपापले आराध्य त्या गादीवर स्थानापन्न झालेले पाहावे व त्याप्रमाणे प्रार्थना करावी. म्हणूनच त्या गादीवर कोणत्याही दैवताचा फोटो नाही. श्रीप्रभुमंदिरात रोज सायंकाळी भजन असते. सोमवारी शंकर, मंगळवारी देवी, बुधवारी विठ्ठल, गुरूवारी दत्तप्रभु, शुक्रवारी बालाजी, शनीवारी मारुती व रविवारी मल्हारी मार्तांडाची पदे म्हटली जातात. श्रीसकलमत संप्रदायाचे हे परमविशेषच म्हणावे लागेल.

श्रीमाणिक प्रभूंची लागलेली गोडी व आतापर्यंतचा प्रवास झरझर डोळ्यांसमोर तरळून गेला. श्रीमाणिकप्रभूंचा हा सदगुरू अवतार इतका गोड होता की त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. श्रीप्रभूंनी माझ्यावर गेल्या दीडवर्षात केलेली माया आठवून वारंवार अश्रुधारा वाहत होत्या. सेवेकरी माझ्याकडे पाहत होते. मलाच थोडे अवघडल्यासारखे झाले म्हणून मुख्य दरवाज्याबाहेर आलो. उजव्या बाजूला पारिजात फुलांचा सडा पडला होता. एक सेवेकरी श्रीज्ञानराजप्रभु महाराजांच्या (श्रीजींच्या) घरच्या पुजेसाठी फुले गोळा करत होता. त्यास थोडी फुले गोळा करून दिली. मनाचा आवेग आता थोडा ओसरला होता.  महाद्वाराच्या बाहेर रस्त्याजवळ मुंबईचे आणखी एक प्रभुभक्त श्री अरुण वाटवे काका सपत्निक भेटले. थोड्या वेळाने चिद्घनप्रभूंचा संदेश आला की आपण घरी श्रीजींना भेटावयास येवू शकता.  वेदांताचा, ज्ञानाचा प्रसार हिरीरीने करणाऱ्या एका वैभवसंपन्न ज्ञानपीठाच्या विद्यमान पीठाधिशाशी, श्रीमाणिकप्रभु संस्थानाच्या सध्याच्या आणि एकंदरीत सहाव्या श्रीगुरूपीठाधिशाशी समोरासमोर भेट व्हायची होती. मनावर एकदम दडपण आल्यासारखे वाटले. पण माझ्या श्रीप्रभूंवरील लेखनाने मी त्यांच्या परीवारात बहुतेकांना अवगत होतो. घरी जायच्या आधी श्रीजींचे गोधन पाहाण्याचे सौभाग्य मिळाले. गायींची वासरे स्तनपान करण्यात मग्न होती. तेथला सेवेकरीही प्रेमळ होता. त्याने आनंदाने गायींची माहिती दिली. चारा कुठून आणायचा, चरायला कुठे न्यायचे पासून बरेच काही.  श्रीजीच्या घरी गेलो. घर कसले मोठा वाडा किंवा हवेलीच म्हणा. दर्शनी भागात सुंदर कमानी, जागोजागी श्रीप्रभूंचे मनोहर फोटो, ओट्यावर दिव्यांसाठी लागलेल्या काचेच्या हंड्या. रोज इतक्या माणसांचा राबता असतानाही पक्ष्यांनी आपली घरटी त्या काचेच्या हंड्यांत बांधली होती, हे विशेष. साफसूफ असलेल्या त्या वाड्यात मात्र ती पक्षांची घरटी तशीच ठेवली होती. सर्व रूपे हा श्रीप्रभु जाण ह्या वाक्याचीच ती जणू प्रचीती देत होती. दयाळू प्रभुच्या अंगणात ती मुक पाखरे निर्भयपणे संसार करीत होती. अंगणातल्या वेलीवर टपोरी कृष्णकमळे उमलली होती. गेटसमोरील वृक्षावर शेंदऱ्या रंगाची अमर्याद फुले उमलली होती. श्रीप्रभुच्या ऐश्वर्यात, सौंदर्यात जणू तीही आपपल्या परीने भर घालीत होती. थोड्या वेळाने श्रीचिद्घन प्रभु आले व त्यांनी मला नाश्ता करावयास घरात बोलावले. नम्रपणे मी नाही सांगीतले तरी त्यांनी चहाची पेशकश केलीच.

श्रीजींची वाट पाहत असतानाच श्रीआनंदराज प्रभु तेथे आले. कुठेतरी बाहेर जायच्या गडबडीत होते. तरीही नजरानजर होताच त्यांनी मला आपणहून समोरूनच ओळखले. त्यांनी माझ्या प्रेमळ कौतुकानंतर आस्थेने चौकशी केली व परत भेटीच्या आश्वासनानंतर झरझर निघून गेले. घराच्या ओटीवर बसूनच समोर दिसणारा श्रीप्रभुमंदिराचा कळस न्याहाळीत बसलो होतो. श्रीजींच्या घरी दुपारी माध्यान्हपूजा होते. भक्तांना समोर बसून ती पाहता येते. यथावकाश श्रीजींच्या घरातल्या हॉलमध्ये बसलो. पूजेची यथासांग तयारी झाली होती. श्रीजींच्या आगमनाची आता आतुरता होती. ह्या हॉलमध्ये आधीच्या सर्व पीठाधिशांची भव्य चित्रे लावली आहेत. पण श्रीमाणिकप्रभूंची छबी विशेष लक्ष वेधून घेत होती जणू प्रभु अगदी समोर बसल्यासारखी. ह्याच हॉलमधून श्रीजींनी केलेली कितीतरी प्रवचने युट्युबवर पाहिली,ऐकली होती. थोड्यावेळाने श्रीजींचे आगमन झाले. शुभ्र धोतर, उपरणे, सर्वांगी भस्म अन् कपाळावार कुंकवाचा ठसठशीत टिळा. लोभस, राजबिंडे रूप. अगदी आधी जसे पाहिले होते तेच साक्षात् अनुभवत होतो. श्रीजींची षोडषोपचार पूजा यथासांग पार पडत होती. येथेही हुंदक्यावर हुंदके येत होते. सगळाच मायेचा उमाळा. तासाभराच्या पूजेनंतर ज्यांना त्या दिवशी माणिकनगरांतून जायचे होते त्यांस श्रीजींनी प्रसाद दिला. मीही नमस्कार केला. श्रीजींनी प्रथम भोजन करून घ्या अशी प्रेमळ सुचना केली व संध्याकाळी साडेसहाला भेटीसाठी या म्हणून सांगीतले. त्वरीत सिद्धराज भवनमध्ये भोजनासाठी दाखल झालो. येथे नित्य अन्नदान चालते. भंडारखान्यातून जाताना श्रीप्रभूंच्या फोटोसमोर असलेल्या श्रीअन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला नमस्कार केला व तिच्या मायेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रीप्रभुभक्तांमध्ये समोरच्याला जय गुरू माणिक म्हणून नंतर पुढचे संबोधन करावयाची छान आणि कानास तितकीच गोड वाटणारी पद्धत आहे. जय गुरू माणिक संबोधनाने समोरच्या प्रती स्नेह आपसुकच वृद्धिंगत होतो. अविट गोडीचा गरमागरम प्रसाद घेऊन तृप्त झालो. भोजनउपरांत पुन्हा प्रभुमंदिरात जाऊन श्रीप्रभुंचे दर्शन घेतले. येथे कुणालाही मज्जाव नाही, कितीही वेळ बसा कुणी आपल्याला उठवत नाही, भजन, गायन, जप करा, कशालाही हरकत नाही.

दुपारची वामकुक्षी घेऊन संध्याकाळी सहा वाजता पुन्हा श्रीप्रभु मंदिरात आलो.  श्रीप्रभुसमाधी डोळ्यात साठविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होतो. असीम, अमर्याद, अनंत गुरूतत्व ह्या चिमुकल्या डोळ्यांत मावणार ते कसे? श्रीप्रभुचे सौंदर्य न्याहाळताना मला माझाच विसर पडत होता. साडेसहाला श्रीजींच्या घरी गेलो. गोरज मुहूर्तावर अनेक भक्तांच्या इच्छा पुरविणारी ही कामधेनू, श्रीजी, एका खूर्चीत बसले होते. अंगावरील कुर्ता आणी सफेद धोतर श्रीजींच्या साधेपणाची साक्ष देत होता. शब्दांत जरब आणि खणखणीतपणा. पण समोरच्याप्रती तितकेच निर्व्याज्य प्रेम प्रत्येक शब्दांतून उद्धृत होत होते. श्रीजींना वाकून नमस्कार केला व एका बाजूला जाऊन बसलो. संस्थानाची माणसे दिवसाच्या घडामोडी सांगत होती, भक्त आपापले प्रश्न विचारत होते, कोणी घरी परत जायची आज्ञा मागत होते. माझा नंबर येताच त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. येथे कसे वाटले ही विशेष विचारणाही हृदयाचा ठाव घेणारी होती. श्रीजींच्या संपूर्ण कुटूंबाचे त्यांच्या घरी येणाऱ्या भक्तांवर अगदी बारीक लक्ष असते. त्यांची व्यवस्था नीट लागलीय ना, त्यांना दोन्ही वेळचे भोजन मिळतेय ना, काही हवे नको वैगरे अगदी जातीने विचारले जाते. इतक्या आस्थेवाईकपणे प्रत्येक भक्ताची विचारपूस करणारे संस्थान अथवा मंदिर आजतागायत पाहिले नाही. तासभर श्रीजींच्या सान्निध्यात बसल्यावर भजनासाठी प्रभुमंदिरात आलो. सेवेकरी गिरी, माणिकगुरूजी व आसपासचे बरेच प्रभुभक्त भजनास जमले होते. कितीतरी लहान मुले वाद्ये घेऊन भजनासाठी उपस्थित होते. नवीन पीढीची ही आवड मनोमन सुखावून गेली. भजन चालू असताना श्री वाटवे काकांनी मला भोजन करून येण्यास सांगीतले. अगदी दहा मिनीटांत प्रसाद घेऊन पुन्हा प्रभुमंदिरात आलो. आजवर युट्युबवर ऐकलेलं सप्ताह भजन प्रत्यक्षात श्रीप्रभुसभोर बसून म्हणत होतो. तासाभराने हा सुखसोहळा संपला. शेजारतीनंतर नऊ वाजता श्रीप्रभुमंदिर बंद झाले.

मुख्य दरवाज्याबाहेर येऊन पायरीवर बसलो. दोनच दिवसांपूर्वी पौर्णिमा होती, त्यामुळे चंद्र आपली जवळजवळ पूर्ण कलेने शीतलता प्रदान करत होता. रात्रीच्या वेळी परिसरातील बकुळ वृक्ष अधिकच हिरवेगार वाटत होते. श्रीप्रभुची माया व चंद्राची शीतलता अनुभवत, रात्रीचे चांदणे पाहत तासभर रेंगाळलो. सकाळी सहाच्या काकड आरतीला यायचे असे मनाशी ठरवून खोलीवर आलो. आदल्या रात्रीचे जागरण होते पण दिवसभर जराही थकवा जाणवला नाही, श्रीप्रभुचैतन्य निःसंशय ह्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे ह्याची ती साक्ष होती. गुरूवारची लाडकविता लिहून, श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करून श्रीप्रभुप्रेमाची दुलई ओढून स्वतःस निद्रादेवीच्या स्वाधीन केले.

[social_warfare]