भाग पहिला

एप्रिल २०२० ला लॉकडाऊन झाल्यानंतर व्हाटस्ॲपवर ‘गिरनारीके ध्वजाधारी। दीनानाथ पत राखो हमारी।।’ हा गजर आला. मनास भावला म्हणून तो माझे सोलापुरचे परममित्र श्री प्रेमदादा ह्यांना पाठवला, त्यांनी हा आवाज श्रीआनंदराज माणिकप्रभूंचा असल्याचे सांगीतले. फेसबुकवर, YouTube वर Manik Prabhu टाकल्यावर श्रीआनंदराज प्रभुमहाराजांच्या अवीट गोडीच्या आरत्या, पदे, स्तोत्रांचा अमूल्य ठेवा गवसला. विद्यमान पीठाधीश श्रीज्ञानराज माणिकप्रभूंचे गीता विवेचन व पौर्णिमा पर्वांचे व्हिडीयो ऐकले. श्रीचैतन्यराजप्रभूंच्या धीरगंभीर, खड्या आवाजातील स्तोत्रे, अष्टके ऐकली. श्रीमाणिकप्रभूंची ही अद्वितीय अशी पदे अभ्यासताना श्रीप्रभूंबद्दल एक अनामिक गोडी लागली. यथावकाश संस्थानाशी संबंधित श्रीप्रभुभक्तांचा परिचय झाला व त्यातून पुढे श्रीज्ञानराजप्रभूंच्या परिवाराशी स्नेह जुळला. श्रीप्रभुचरित्र गद्य व ओवीबद्ध मिळवून झरझर वाचून काढले. अंतरात प्रभूंबद्दलची ओढ, प्रेम दिवसेंदिवस दृढ होत होती. श्रीप्रभूंच्या बाललीला श्रीप्रभूंनीच माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडून ओवीबद्ध करून घेतल्या. श्रीमनोहर प्रभूंचे पूर्ण जीवनचरित्रही ओवीबद्ध करवून घेतले पण, प्रत्यक्ष श्रीमाणिकनगरी जाण्याचा योग काही येत नव्हता. प्रभुभेटीसाठी मन आक्रंदत होते. २०२१ च्या मार्चमध्ये माणिकनगरी जाण्याचे ठरविले पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ते रहीत करावे लागले, जून मध्ये मी स्वतःच पॉझीटिव्ह झालो. हो ना करता व्हॅक्सिनचा दुसरा डोस झाल्यावर २०. १०.२०२१ ला बुधवारी कोईम्बतूर गाडीचे आरक्षण केले. जायचे यायचे आरक्षण झाले होते. पण निघायच्या दोन दिवस आधी रेल्वेकडून संदेश आला की, कोईम्बतूर गाडी कोंकणरेल्वे मार्गावरून वळवली आहे. तसदीबद्ल क्षमस्व. दुसऱ्या गाडींच्या आरक्षणाबाबत तपासले असता इतर कोणत्याही गाड्यांमध्ये आरक्षण नव्हते. शेवटी चेन्नई एक्सप्रेसचे तीन वेटिंग असलेले आरक्षण केले. संध्याकाळपर्यंत तीनवरून दोनवर नंबर आला. पण त्यानंतर, प्रवासाच्या दिवसापर्यंत दोनच वेटिंग राहिले. संध्याकाळी सातची गाडी होती. आरक्षण न झाल्याने खट्टू झालो. काहीच तयारी नव्हती. दुपारी तीन वाजता महाराजांपुढे बसलो, त्यांना निवेदन दिलं की दोन वर्षांपासून तुम्हाला भेटायचे ठरवतोय, तुम्हाला मला भेट द्यावीशी वाटत नाही का? मला यायची जबरदस्त इच्छा आहे, बाकी काय ते आपण पाहावे. त्यावेळी श्रीसकलमत संप्रदायाच्या उपदेशरत्नमालेतील एक ओळ उच्चारली, हे प्रभु, जी भक्तप्रतिज्ञा असते तीच श्रीगुरूंची आज्ञा असते. मला आपल्या द्वारी यायचे आहे. बाकी आपण काय ते जाणोत… सव्वातीनला रेल्वेकडून आरक्षण निश्चितीचा संदेश आला. पुढच्या अर्ध्या तासात, पावणेचारला सामान बांधून मी तयार सुद्धा झालो. प्रभुभेटीची तळमळ इतकी दृढ होती की केवळ तीन चपात्या आणि गुळाचा खडा घेऊन प्रफुल्लित अवस्थेत साडेपाचला ठाणे स्थानकाकडे धूम ठोकली.

सव्वासातला गाडीत बसलो. श्रीप्रभुदर्शनास उतावीळ मन श्रीप्रभूंच्या आठवणीने, लीला अनुभवत, सतत उचंबळून येत होते. रात्रभर डोळा लागला नाही. पहाटे चार वाजता कुलबुर्गीला उतरलो. रिक्षाने बस स्टॅन्ड गाठला. मोडक्यातोडक्या कन्नड भाषेत हुमणाबाद बसची चौकशी केली. हुमणाबादमार्गे हैद्राबादला जाणारी बस तयारच होती. खिडकीत बसून पहाटेचा गारवा अनुभवत होतो. प्रवासात शरीर जरी बसमध्ये होता तरी, मन मात्र कधीच माणिकनगरात पोहोचले होते. साधारणतः साडेसहाला हुमणाबादला पोहोचलो. रिक्षा पकडून अगदी पाच-दहा मिनीटांतच माणिक विहार गाठले. योगायोगाने मुंबईचे प्रभुभक्त श्री प्रकाश मामा पाठारे समोरच उभे होते. त्यांनीच सकाळच्या गुलाबी थंडीत गरमागरम चहा पाजला. मी येथे येण्याचे अगोदरच कळविल्याने, श्री चिद्घन प्रभुजी ह्यांनी श्रीमार्तंडविलास ह्या भक्तनिवासमध्ये उतरण्याची सोय केली होती. अगदी वीस मिनिटांतच स्नानादी कर्मे आटोपून पाचशे मीटर अंतरावरील श्रीप्रभुमंदिराकडे धाव घेतली.

श्रीप्रभुमंदिर ते राहण्याची जागा हे अवघे पाच मिनिटांचे अंतर. सुर्यदेवता आपल्या कोवळ्या किरणांचा आशीर्वाद सृष्टीस मुक्तहस्ते देत होते. वातावरण आल्हाददायक होते. मधूनच मोरांचा केकारव ऐकू येत होता. वानरराज झाडांवर उड्या मारत होते. गुरुगंगा विरजा नदीवरील पुलावरून जाताना पाण्यात दोन डौलदार बदके मुक्तपणे विहार करीत होती. मंद पण गार वारा मनास प्रसन्न करीत होता. श्रीमाणिकप्रभूंच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीमाणिकनगरीतले चैतन्य पदोपदी अनुभवीत होतो. श्रीप्रभूंचे गुणगान करीत श्रीप्रभुमंदिराच्या महाद्वारी पोहोचलो. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कालाग्निरुद्र हनुमानाला नमस्कार केला. दयाघन प्रभुही जणू आतुरतेने माझी वाट पाहत होता. महाद्वारातून आत येताच श्रीप्रभुमंदिराचे विशाल प्रांगण नजरेस पडले, दोन्ही बाजूस बकुळ फुलांचे हिरवेगार, डेरेदार वृक्ष मन वेधून घेत होते.

मुख्य मंदिरात जाण्याआधी दरवाज्यावरील जय जय हो, सकलमता विजय हो ही पाटी लक्ष वेधून घेत होती. दरवाजा ओलांडल्यावर आत येताच दत्ताची गादी व त्यापुढील श्रीमाणिकप्रभूंची संजीवन समाधीचे दर्शन घडले. काळ्या दगडांचा भव्य मंडप व त्यात असलेले भव्य झुंबर मन वेधून घेत होते. पुढे कमानीवर असलेले श्रीमाणिकप्रभू, श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमार्तंड माणिकप्रभू, श्रीशंकर माणिक प्रभू व श्रीसिद्धराज माणिकप्रभू ह्यांचे फोटो मनाचा ठाव घेत होते. कमान ओलांडताच असलेल्या कासवाचे दर्शन घेऊन मुख्य गाभाऱ्याच्या दरवाज्यातून श्रीप्रभुसमाधीचे दर्शन घेतले. येथे मनाचा बांध फुटला अन् डोळ्यावाटे अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमाणिकप्रभु चरित्र वाचताना श्रीप्रभु किती दयाळू, मृदू, कनवाळू, भक्तवत्सल होते ते आठवून अश्रूंच्या धारा वाहतच राहिल्या, कितीतरी वेळ. ज्या स्थानाच्या भेटीची इतके दिवस वाट पाहिली, त्या चैतन्यासमोर मी उभा होतो. डोळे तृप्त होईस्तोवर श्रीप्रभुसमाधीचे दर्शन घेतले. ब्रह्मवृंद श्रीप्रभुसमाधीस मंगल स्नान घालत होते. सुवासिनी हातात आरतीचे तबक घेऊन उभ्या होत्या, सेवेकरी साफसफाईत गुंतले होते. घरून नेलेल्या तुळशी, श्रीफळ, दुर्वा, बिल्वपत्रे श्रीप्रभूस मनोभावे अर्पण केली. पुढे जाऊन मंदिर परीसरातील श्रीसर्वेश्वर महादेवाचे, औंदुंबर वृक्ष व त्याखालील अखंडेश्वराचे, दत्तमूर्ती, श्री माणिकप्रभूंचा लाडका कुत्रा भरोसाचे स्मारक, श्रीमनोहर माणिकप्रभूंची समाधी, योगदंडाचे कक्ष, मुख्य प्राण मारुतीचे दर्शन घेतले. श्रीप्रभुमंदिराचा सोन्याचा कळस सकाळच्या कोवळ्या उन्हात अधिकच झळाळत होता. जणू श्रीमाणिकप्रभु संस्थानाच्या, सकलमत संप्रदायाच्या झळाळत्या इतिहासाची साक्ष देत होता. क्रमशः …

[social_warfare]