by Pranil Sawe | Aug 31, 2024 | Uncategorized
श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष, परम श्रद्धेय डाॅ. श्री गोविंददेव गिरी महाराजांचा श्री सज्जनगड संस्थानातर्फे जो हृदय सत्कार झाला तो सोहळा अनुभवताना वेगळीच धन्यता लाभली. परमात्मा पुरुष श्रीप्रभुरामचंद्राने आपल्या जन्मभूमी मंदिराच्या निर्माणच्या कार्याचे कोषाध्यक्षपद ज्या समर्थ गोविंदाचार्यांकडे सोपविले, त्यांचा सत्कार सकलमताचार्य श्रीज्ञानराज माणिकप्रभु यांच्यासारख्या अत्यंत सुयोग्य आणि आत्मसाक्षात्कारी पुण्यात्म्याकडून होणं, आणि तो सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभणं, हा दुग्धशर्करा योग श्री सज्जनगड संस्थानाच्या वतीने जुळून आला.
आज काल बरेच सत्कार सोहळे होतात. व्यक्तिनिष्ठ उदो उदो होतो. पण श्री गोविंददेव गिरी आचार्यांचा सत्कार सोहळा या सोहळ्यास उपस्थित व्यासपीठावरील ज्ञानी, प्रतिभावंत आणि मुख्यत्वेकरून आजच्या काळातही समाजाला जोडण्याची भाषा करणाऱ्या आणि त्यादृष्टीने सम्यक आणि अथक प्रयत्न करणाऱ्या विविध संप्रदायांच्या अर्ध्वयुंच्या उपस्थितीमुळे आगळा ठरला, वेगळा ठरला. कृतज्ञतेचा भाव सर्वच महानुभावांच्या आशीर्वाचनातून ओसंडून वाहत होता.

परमपूज्य श्री ज्ञानराज माणिकप्रभुंनी श्री समर्थ रामदासांचे वंशज श्री भूषण महाराजांसाठी ‘आदरणीय आणि परम आत्मिय’ असे संबोधन करून श्री माणिकप्रभु संस्थान आणि श्री सज्जनगड संस्थानाच्या परस्पर स्नेह सर्वांनाच जाणवून दिला. त्या ‘परम आत्मिय’ संबोधनात परस्पर प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर आणि मायेचा ओलावा जाणवला. मराठी माझी मातृभाषा नाही, त्यामुळे पुणेकरांना मराठीत उद्बोधन करताना, जणू काही लंडनला जाऊन इंग्लिश बोलल्याप्रमाणे आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्या, माझ्या व्याकरणाकडे लक्ष न देता, मुख्य भावाकडे लक्ष द्या, असे मिश्कीलपणे सांगताच, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
समर्थांचा रामदासी संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि श्री माणिक प्रभुंचा दत्त संप्रदाय (सकलमत संप्रदाय) ह्या तिन्ही संप्रदायांचा त्रिवेणी संगम आपल्याला कार्यक्रम स्थळी झालेला दिसत होता. नेमका हाच धागा पकडून श्री ज्ञानराज माणिक प्रभुंनी आपण सर्व भक्ती मार्गाने परमेश्वररुपी एकाच धाग्यामध्ये गुंफले गेलेलो आहोत, असे प्रतिपादन केले.

श्री गोविंददेव गिरी महाराजांबद्दल प्रसंशोद्गार काढताना श्रीजी पुढे म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्याकडे असलेला पैसा आपण आपल्या अत्यंत प्रिय आणि विश्वासू माणसाकडे ठेवायला देतो, तद्वतच श्रीप्रभु रामचंद्रांनी आपला कोष स्वामीजींकडे ठेवला. ही फार मोठी उपलब्धी आहे. आपला पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या कोषाच्या चाव्या देऊन, ज्यांचा भगवंताने आधीच सत्कार केला आहे, त्यांचा अजून सत्कार आम्ही काय करणार?
सर्वांना भेट देण्यात आलेल्या दासबोधातील खालील ओव्या उद्धृत करून श्रीजी पुढे म्हणतात,
संत धर्माचे धर्मक्षेत्र
संत स्वरूपाचे सत्पात्र
ना तरी पुण्याची पवित्र
पुण्यभूमी ।।
खरं पाहता, संत हेच खरे धर्मक्षेत्र आहे, तीच खरी पुण्यभूमी आहे. संतांच्या वास्तव्याने ते क्षेत्र अधिक पुण्यवान होते, कारण त्यांच्यामध्ये साक्षात् परमात्म्याचा वास असतो.
श्री गोविंददेव गिरी महाराजांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारदर्शक आणि सचोटीच्या व्यवहारामुळेच श्रीराम जन्मभूमी मंदिर दिमाखात उभे राहिले. अन्यथा आपल्या देशामध्ये सरकारी कारभार कसा चालतो याचा श्रीजींनी ‘शिवधनुष्य कोणी तोडले?’ हे मार्मिक, व्यवहारिक उदाहरण देऊन उलगडून सांगितले, तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांच्या कडकडाटासह उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच देशातील रामाला न मानणाऱ्या काही अधर्मी, निधर्मी आणि विधर्मी लोकांचाही श्रीजींनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. राम म्हणजे नेमकं काय? ह्याचाही खुलासा श्रीजींनी आपल्या आशीर्वाचनात केला. श्री गोविंददेव गिरी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना श्रीजींनी, त्यांच्या समाजातील नास्तिकता, अधार्मिकता मिटवण्याच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. त्यामध्ये आठ-दहा लाखांहून जास्त लोकांच्या हृदय मंदिरामध्ये गीता स्थापित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य श्री गोविंददेव गिरी महाराजांनी गीता परिवाराच्या माध्यमातून केले आहे, हे श्रीजींनी खास करून नमूद केले.

आपल्या आदरातित्थ्यशिलतेचा परिचय देताना श्रीजींनी अत्यंत प्रेमाने श्री गोविंद गिरी महाराजांना माणिक नगरास भेट देण्यासाठी हृदय निमंत्रण मंचावरूनच दिले आणि पुनःश्च त्यांचा गौरव केला.
सकल मत संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ रामदासी संप्रदाय यांच्या तत्त्वज्ञानाचा सुरेख एकत्रित त्रिवेणी संगम ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना अनुभवायला मिळाला. आजच्या घडीला समाजात जे नकारात्मक, विश्वात युद्धाचे जे वातावरण आहे, त्याला छेद देत आपल्या दैदिप्यमान सनातन संस्कृतीची, तत्त्वज्ञानाची झलक ह्या हृदय सोहळ्यामध्ये पाहायला मिळाली. श्रीजींसारख्या विद्वत्ताप्रचूर आणि प्रतिभावंत पीठाधीशांच्या आशीर्वचनाने सन्मान सोहळ्याची शान अधिकच वाढविली आणि उपस्थित सर्वच लोकांना धन्यता वाटली. जय जय हो सकलमता विजय हो…
by Pranil Sawe | Jul 5, 2024 | Uncategorized
मणिगिरी की लाल मिट्टी का रंग लगने में, वक़्त तो लगता है
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,
केवल प्रभुदर्शन की यह बात नहीं,
आदतन बाहर देखने वाली दृष्टि को अंदर मोडने में वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,
केवल प्रसाद खानेकी बात नही,
अनेक जन्मों के ज्ञान की भूख मिटने मे, वक़्त तो लगता है
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,
केवल गाना बजानाही नही
वेदांत सार से भरे हुए पदों का गूढार्थ समझने में, वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,
केवल आचार विचार ही नाही,
प्रभु जैसी स्थिर सकलमत मती बनने में, वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,
प्रभुवाणी का केवल श्रवन, पठन ही नहीं,
प्रभुको आत्मदृष्टी से, देखने में वक़्त तो लगता है,
श्रीप्रभु से प्यार होने में वक़्त तो लगता है,
by Pranil Sawe | May 26, 2024 | Uncategorized
वेलघेवडा हेच उपजिविकेचे साधन
अज्ञानवश ब्राह्मण खरोखर मानून
घेवड्याच्या मुळाशीच होते निधान
उपटून दाविले श्रीगुरुंनी ।।१।।
अथवा नाना नाच्याचे वर्तन
स्त्रीपात्र वेशभूषेत करी नर्तन
प्रभु करी हरी-लीलांत परीवर्तन
स्वरूपदर्शन तया करवोनि ।।२।।
बहिरंग प्रचार वेष्टण आवरण
बाह्यांगाचा मोह मोठा विलक्षण
सत्यधर्मासी हेच खरे व्यवधान
सावधान अखंड याकारणे ।।३।।
करिसी समस्त जगताचे पोषण
अन् सृष्टीतील घडामोडींचे नियंत्रण
माणिका तुजवांचूनि जगत्रयी कोण
सर्वशक्तिमान ऐसा त्रिभूवनी ।।४।।
सत्याच्या स्वरुपास सोन्याचे आच्छादन
मजलाही सदोदित तयाचेच आकर्षण
हिरण्यमयी आच्छादन दूर सारून
सत्यदर्शन घडवीसि गुरुराया ।।५।।
by Pranil Sawe | May 7, 2024 | Uncategorized
दह्यामध्येच असे लोणी,
समजले नाही कुणी,
जाता रवीने घुसळोनि,
कळोनि येत ।।१।।
जरी प्रभु अंतरात,
वसत असे दिनरात,
भक्ती विना भेटगाठ,
पडत कैसी ।।२।।
दास मारुतीच्या अंतरात,
प्रकटले स्वये सीताकांत,
भक्तीच्या प्रेम बंधनात,
भगवंत बंधे ।।३।।
व्यंकेची निर्व्याज भक्ती,
सदोदित स्मरावी चित्ती,
तिस देवीपदाची प्राप्ती,
शक्ती भक्तीची ।।४।।
भक्त रामण्णापंत दुबळगुंडी,
तैसेचि संतरामदादा गवंडी,
अभिमानी प्रभुभक्तांची दिंडी,
अखंडीत चाले ।।५।।
किती एक वर्णिती,
भक्तीची दिव्य महती,
नच होय तृप्ती,
किती जन्मांतरी ।।६।।
प्रभुचे नाम रामबाण,
साधी अचूक संधान,
येई भक्तीस उधाण,
मन उन्मन ।।७।।
भक्ती सरीतेचा उगम,
श्रीप्रभु नामात सुगम,
स्वरूप दर्शन विहंगम,
संगम अपूर्व ।।८।।
by Pranil Sawe | Dec 11, 2023 | Uncategorized
माणिकनगर येथे आपली गौरवशाली संस्कृती आणि अनेक परंपरा अत्यंत आत्मियतेने जपल्या जातात. “नित्य माधुकरी सेवा” हीसुद्धा मला अतिशय भावलेली, अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा.
वेदांमध्ये पाच प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केले आहे. ब्रह्म यज्ञ, देव यज्ञ, पितृ यज्ञ, भूत यज्ञ आणि मनुष्य यज्ञ. ह्यापैकी मनुष्य यज्ञामध्ये, आपल्या घरी आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य करून त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावे, असे सांगितले आहे. आपणही आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना फराळ किंवा भोजन देऊन संतुष्ट करतो किंवा प्रवासात आपण काही खाताना सहप्रवाशांनाही देतो, हाही मनुष्ययज्ञाचाच भाग. पूर्वीच्या काळी भोजनाच्या वेळी आपल्या घराच्या आसपास कुणी भुकेला तर नाही ना, ह्याची खात्री केली जायची. तसे कुणी आढळल्यास त्याला भिक्षा अथवा भोजन देऊन मगच, आपण भोजन करायची पद्धत होती. कालौघात ही परंपरा हल्ली लुप्त होत चालली आहे.
ह्या मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊनच श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे दोन्ही वेळचा प्रभुप्रसाद येणाऱ्या सर्व भक्तांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे. गेले कित्येक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. माणिकनगरी झोळीची परंपरा अजूनही सुरू आहे. ह्या झोळीचा, माधुकरीचा प्रसाद आजही भंडारखान्यातील अन्नामध्ये मिळवून भक्तांना वाटला जातो. ह्या माधुकरी सेवेत आपल्याला दररोज सहभागी होता येईलच, असे नाही. माणिकनगरापासून दूर राहणाऱ्या भक्तांच्या मनात माधुकरी सेवेत आपल्याला सहभागी होता येत नसल्याची सल अनेक प्रभुभक्तांच्या मनात होती. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीप्रभु भक्तांच्या अंतरीची तळमळ जाणून द्रवला नाही, तर नवलच! आणि म्हणूनच की काय परगावी असणाऱ्या भक्तांसाठी नित्य माधुकरी सेवेचा सुंदर पायंडा श्री सिद्धराज माणिकप्रभुंच्या गौरवशाली कार्यकाळात पडला.
ह्या सेवेंतर्गत भक्ताला एक डबा आणि ओळख क्रमांक दिला जातो. प्रत्येकाने आपला डबा आपापल्या घरी घेऊन जायचा. दररोज तसेच, काही विशिष्ट प्रसंगी (पारायण, सण, मंगलकार्य) यथाशक्ती रक्कम अन्नदानसाठी ह्या डब्यात जमा करायची. दर दिवशी अगदी पाच-दहा रुपयांपासून आपण कितीही यथाशक्ती रक्कम ह्यात जमा करु शकता. मी साधारणपणे भोजनाला बसायच्या आधी प्रभुंच्या झोळीचे स्मरण करून, तसेच जगातील कोणी भुकेले असतील त्यांना आठवून, त्यांच्या वाट्याचा भाग म्हणून अन्नदानासाठी काही रक्कम नियमित ह्या डब्यात जमा करतो. ह्या निःस्वार्थी सेवेमुळे अन्नाची गोडी आणि खाल्ल्याचे समाधान अजूनच वाढते. साधारणपणे श्रीदत्त जयंतीला भक्त नित्य माधुकरी सेवेसाठी आपली नाव नोंदणी श्री प्रभु संस्थानात करुन, आपापला डबा घेतात आणि पुढच्या श्रीदत्त जयंतीला तो डबा श्रीप्रभु संस्थानात जमा करतात. नित्य माधुकरी सेवेतून जमा झालेल्या निधीचा विनियोग प्रभुंच्या नैवेद्यासाठी आणि भंडारखान्यात सुरु असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या अन्नदानासाठी वापरला जातो. अन्नदानासाठी आपण यथाशक्ती केलेल्या दानाचा विनीयोग, श्री प्रभुपादस्पर्शाने पुनित झालेल्या श्री दत्तक्षेत्री भक्तांच्या क्षुधा शांतीसाठी होतो, ह्यात समाधान तर अपार आहेच, पण नित्य माधुकरी सेवेने आपले प्रारब्ध क्षीण होऊन आपल्या पदरी अन्नदानाचे पुण्यही सहज जमा होते. श्रीप्रभु संस्थानातर्फे नित्य माधुकरी सेवेसाठीचे हे डबे विनामुल्य उपलब्ध आहेत. मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे पुण्यफळ सहज पदरी पाडून देणाऱ्या ह्या सत्पात्री दानाचा लाभ जास्तीत जास्त सद्भक्तांना मिळो, आणि त्यांना प्रभुंचे कृपाशीर्वाद प्राप्त होवोत, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…
Recent Comments