सगरोळी दौरा वृत्तांत (भाग सहावा)

ज्ञानादान हा श्रीजींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा जेव्हा ते व्यासपीठावर ज्ञानदान करण्यासाठी विराजमान होतात, तेव्हा त्यांची मुद्रा विलक्षण तेजस्वी होते. ज्ञान देताना होणारा अंतरंगातील आनंद यांच्या मुखकमलावरही झळकतो. चैतन्याचा झरा त्यांच्या वाणीतून खळखळत वाहत राहतो. सद्गुरु हा सदैव भक्तांमध्ये रमणारा असतो. समोर खचाखच भरलेले सभागृह पाहून श्रीजींची कळी अधिकच खुलली होती. सत्पुरुषांच्या अंगी असणारी सर्व लक्षणे आपल्याला श्रीजींमध्ये ठासून भरलेली आढळतात आणि दौऱ्यामध्ये त्याचे प्रमाण जागोजागी मिळत होते. आपल्या प्रवचनातील मुख्य विषयाला हात घालण्याआधी प्रभुवंदना आणि गुरुपरंपरेला वंदन करून, सर्वप्रथम ज्या प्रेमाने, श्रद्धेने आणि आपुलकीने श्रीप्रभु पादुकांचे स्वागत केले त्याबद्दल श्रीजींनी समस्त सगरोळीकरांचे आभार मानले. तसेच तुम्ही अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तीभावाने केलेल्या आदरातिथ्यामुळे मला अत्यंत आनंद झाला, असेही प्रतिपादन केले. श्रीजींच्या या विनयशीलतेमुळे उपस्थितांत टाळ्यांचा कडकडाट झाला. येथे स्वागत माझे नसून श्रीप्रभु पादुकांचे आहे, हा श्रीजींचा अकर्ता भाव माझ्या मनास अत्यंत भावला.

श्रीजी पुढे म्हणाले की, सगरोळी गावचा आणि श्रीप्रभु संस्थानाचा अत्यंत प्राचीन, अत्यंत पुरातन असा संबंध आहे. गेल्या दीडशे पावणे दोनशे वर्षापासून सगरोळीकरांचे प्रभु संस्थानाशी अत्यंत प्रेमाचे, भक्तीचे आणि श्रद्धेचे नाते आहे, आणि ते उत्तरोत्तर दृढ होत आहे, हे पाहून मला खूप खूप आनंद होत आहे. श्रीजींच्या ह्या वाक्यावर टाळ्यांचा पुन्हा कडकडाट झाला. मुळात: गोरगरिबांचे दुःख निवारण करून, त्यांना भक्ती मार्गात आणणे हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी सुरू केलेल्या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट होते, आणि इतक्या वर्षांनी ही हा हेतू सफल होत आहे, किंबहुना त्याची व्याप्ती वाढत आहे, हे पाहून श्रीजींना अत्यानंद होत होता. ह्यातून सद्गुरूंची दृष्टी कशी असते, याची आपल्याला जाणीव होते.

प्रवचनाच्या मुख्य विषयाला हात घालताना श्रीजी म्हणाले, भक्तकार्य कल्पद्रुम हे श्रीप्रभुचे ब्रीद आहे. श्रीप्रभु हा भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहे. हे सर्वसामान्य जनांना समजावून सांगताना, श्रीजींनी स्वर्गातल्या कल्पवृक्षाची कथा सांगितली. त्यामुळे श्रीप्रभु आपण जे जे इच्छिले, ते ते देणारा आहे. पण असे असले तरी प्रभुकडे काय मागावे, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. आपल्या इच्छांची यादी कधीही संपत नाही. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मनुष्यांच्या केवळ दोनच इच्छा आहेत. पहिली म्हणजे, मला सदासर्वदा सुख मिळावं आणि दुसरी इच्छा म्हणजे, मला कधीही दुःख होऊ नये. मग या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग किंवा उपाय काय? तर माणसाच्या ह्या इच्छा केवळ ज्ञानानेच पूर्ण होतात.‌ श्रीजींनी पुढे सांगितले की, ह्या पृथ्वीवर मिळून जेवढं धान्य, सोनं, पैसा, पशु, स्त्रिया आहेत, ते एका माणसालाही पुरे पडणारे नाहीयेय, त्याला तृप्त करणारे नाहीयेय. आणि म्हणून असा विचार करून माणसाने समाधानाने राहावं. आपण देवाकडे नेहमी प्रार्थना करतो की, देवा, मला सुख दे आणि शांती दे! श्रीजी म्हणतात, केवळ सुख काही कामाचे नाही. सुखामध्ये शांती हवी, समाधान हवं. आजच्या काळातील सर्व समस्या, ह्या शांतीच्या अभावामुळे आहेत.

मग आता हे सुख कुठे मिळेल? वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे, जो सर्व सृष्टीचे नियमन करतो, जो सर्वांचा पालन पोषण करणारा आहे, जो सर्वांवर स्वामित्व गाजवतो, असा तो, परमात्मा आहे. तो एक रूप असूनही अनेक रूपांमध्ये नटतो आणि अशा परमात्म्याला जो आपल्या अंतरात पाहतो, त्यालाच शाश्वत सुखाची प्राप्ती होते.

जसा दाहकता हा अग्नीचा स्वभाव आहे, त्याप्रमाणे तो आनंद, ते सुख सतत त्या वस्तूत असावं. जगातील कोणत्याही गोष्टीत सुख देण्याचं सामर्थ्य नाहीयेय. कारण सुख हा वस्तूचा स्वभावच नाहीयेय. आपल्याला ज्या ज्या गोष्टींमध्ये सुख आहे असं वाटतं, त्या त्या गोष्टींमध्ये शाश्वत सुख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वस्तू  सुखदायक वाटतात, त्यामध्येही मुख्यत्वे तीन दोष आहेत. पहिला दोष म्हणजे दुःख मिश्रित तत्व अर्थात् जगात जेवढी सुखे आहेत त्या दुःख मिसळलेले आहे. सुख संपताना ते नेहमी दुःख देऊन जातं. दुसरा दोष म्हणजे बंधतत्व म्हणजेच ते सुख तुम्हाला बंधनात टाकते. त्याची सवय लागते, त्याचं व्यसन लागते, त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाहीत. शेवटचा तिसरा दोष म्हणजे अतृप्तीकरत्वम् म्हणजेच सुख कितीही मिळालं तरी आता पुरे असे कोणीही म्हणत नाही. म्हणूनच अशा दोषयुक्त वस्तूंपेक्षा जो परमात्म्याला आपल्या हृदयात वारंवार पाहतो, त्यालाच शाश्वत सुखाची प्राप्ती होते. आणि अशा शाश्वत सुखाला शास्त्रामध्ये आणखीन एक नाव आहे. ते म्हणजे, मोक्ष. मोक्ष म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती.‌ म्हणजेच, जेव्हा आपण सुखाची अपेक्षा करतो, तेव्हा आपण खरेतर मोक्षाचीच अपेक्षा करतो.

सामान्य जणांना वाटते की, माझ्या नशिबात असेल तर मला मोक्ष मिळेल, दैवाने दिला तर मला मोक्ष मिळेल. पण श्रीजी म्हणतात, मोक्ष हा कोणाच्याच नशिबात नसतो. मोक्ष हा दैवाधीन नाही, मोक्ष हा प्रारब्धाधीन नाही. मोक्ष हा पुरुषार्थ आहे म्हणजेच मोक्ष ही मनुष्याने स्वप्रयत्नाने मिळवायची गोष्ट आहे. शास्त्र म्हणते, मानवाने जर आपले जीवन सार्थ करायचे असेल, तर, धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ करावेत. शास्त्राने जरी धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा क्रम घालून दिला असला, तरी व्यवहारात मात्र अर्थ, काम, धर्म, मोक्ष असा क्रम संयुक्तिक आहे. अर्थ, काम आणि धर्मावर आपले जे अवलंबून असणे आहे, विसंबून असणे आहे, ती निर्भरता सुटण्याचं नाव म्हणजे मोक्ष! शास्त्राने जो धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा क्रम घालून दिला आहे त्याचा अर्थ असा की, अर्थ आणि काम हे धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असावेत. माणसाची प्रवृत्ती ही धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असावी. मोक्ष मिळवण्याची अनेक साधने आहेत पण त्या सर्व साधनांपैकी भक्ती हे साधन सर्वश्रेष्ठ आहे.

श्रीजींचे प्रवचन उत्तरोत्तर रंगत होते. वेदांतातील अनेक कठीण संकल्पना स्पष्ट करताना, व्यवहारातील अनेक उदाहरणे देऊन शंकांचे समाधान झाल्यामुळे उपस्थितांमध्य टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि प्रसंगानुरूप श्रीजींच्या प्रवचनशैलीमुळे हास्याचे फवारे उडत होते. नदी आपल्या उगमापासून वाहताना, वाटेमध्ये अनेक उपनद्या जशा तिला येऊन मिळतात त्याचप्रमाणे, श्रीजींच्या प्रवचनामध्ये मुख्य संकल्पनेला जोडूनच, विषयाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी अनेक उपसंकल्पना येतात. मोक्ष मिळवण्याच्या अनेक साधनांपैकी भक्ती हे एक मुख्य साधन आहे असे म्हटल्यावर, श्रीजींनी आता भक्ती म्हणजे नेमकं काय, हे प्रकरण उपस्थितांना विशद करून सांगितले.

श्रीजी म्हणतात, भक्ती म्हणजे काय? त्याचा उहापोह करताना श्रीजी, नारद महर्षींची भक्तीची व्याख्या उद्धृत करतात. नारद महर्षी म्हणतात, भक्ती म्हणजे परमप्रेम! मग आता परमप्रेम म्हणजे काय? प्रेम तर आपण सगळेच करतो, कोणी गाडीवर, कोणी साडीवर, कोणी दाढीवर… पण हे प्रेम परमप्रेम आहे का? तर नाही, कारण ते चिरकाल टिकणारे नाही. आपल्यापेक्षा ज्येष्ठावर, आदरयुक्त आणि अपेक्षारहित प्रेम म्हणजेच परमप्रेम. आपले आपल्या मुलावर प्रेम असते, त्याला परमप्रेम म्हणता येईल का? आपण साधारणतः पितृभक्ती, मातृभक्ती, देशभक्ती असेच शब्द ऐकतो. परमेश्वराप्रती जे परमप्रेम आहे, त्याचच नाव भक्ती. श्रीजी पुढे म्हणतात, पण इथे एक समस्या आहे. ज्याला आपण कधी पाहिलं नाही, ज्याचं आपल्याला कुळ, गोत्र, नाव, गाव, ठावठिकाणा माहीत नाही, तो काळा आहे की गोरा आहे, हे माहीत नाही, मग त्याच्यावर परमप्रेम करा, असं नारद महर्षी का बरं म्हणत असावेत?

साधं लग्न करायचं तरी आपण अनेक चौकश्या करतो आणि मगच होकार देतो. अशावेळी आपल्याला परमेश्वराबद्दल काय माहित आहे? श्रीजी पुढे सांगतात, भक्ती ही तीन प्रकारची आहे. साधन भक्ती, साध्य भक्ती आणि आत्मस्वरूप भक्ती. मनुष्यप्राणी या तीनच गोष्टींवर प्रेम करू शकतो. ह्याशिवाय इतर गोष्टींवर प्रेम करायला त्याला जागाच शिल्लक नाही.

साधन भक्ती – जी वस्तू माझ्या सुखाचे साधन आहे, त्यावरील प्रेम म्हणजेच साधनावरील प्रेम.

साध्य भक्ती – जी वस्तू माझ्या सुखासाठी साध्य आहे, त्यावरील प्रेम म्हणजेच साध्यावरील प्रेम.

आत्मस्वरूप भक्ती – म्हणजे स्वतःवरील प्रेम.

ही संकल्पना स्पष्ट करताना श्रीजी म्हातारी सासूबाई, सुनबाई आणि हिऱ्यांचे कुडे ह्याचे उदाहरण देतात. सासूबाईंकडे असलेले हिऱ्यांचे पुढे मला कसे मिळतील, असा हेतू ठेवून सुनबाईने सासुबाईची (साधन) अहोरात्र सेवा आरंभली. तिच्या सेवेने संतुष्ट होऊन सासूबाईंनी दसऱ्याच्या दिवशी हिऱ्यांचे ते कुडे सुनबाईला देऊन टाकले. हिऱ्यांचे ते कुडे (साध्य) मिळताच, सुनबाईने सासूची सेवा बंद केली. म्हणजे साधनावरचे प्रेम समाप्त होऊन आता ते साध्यावर आले होते. हिऱ्यांचे कुडे घालून काढलेले फोटो वगैरे पाठवून झाल्यावर एके दिवशी रात्री  जिवापाड प्रेम असलेले ते हिऱ्यांचे कुडे घालून, सुनबाई रात्री प्रवासाला निघाली. वाटेत दरोडेखोरांनी रस्ता अडवताच अंगावरील सगळ्या दागिन्यांसह अत्यंत प्रिय असलेले ते कुडे तिने दरोडेखोरांना देऊन टाकले. तुम्हाला काय हवं ते घ्या, पण मला मारू नका. म्हणजे साध्यावरील प्रेम‌ आता स्वतःवर आले होते.‌

ईश्वर आपल्या सुखाचे साधन आहे असे समजून, जेव्हा आपण ईश्वराकडे जातो त्यास निकृष्ट भक्ती म्हणतात.‌ त्याचप्रमाणे ईश्वराला साध्य समजून, त्याला प्राप्त करून घ्यायच्या उद्दिष्टाने केलेल्या भक्तीला मध्यम भक्ती म्हणतात.‌ पण तो परमात्मा, तो प्रभु माझंच स्वरूप आहे, अशा तादात्म्य भावनेने, एकात्म भावनेने जे परमेश्वरालाच आत्मा समजून, प्रेम करतात ती सर्वोत्कृष्ट भक्ती आहे. अशा ह्या ईश्वराची भक्ती करायचे ज्ञानोबा तुकोबारायांपासून सर्वांनीच सांगितले आहे.‌ पण ह्या ईश्वराचे नेमके स्वरूप काय? ते वर्णन करण्यासाठी अनेक संतांनी, अनेक ऋषींनी नाना प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण कोणीही ईश्वराचे यथायोग्य स्वरूप वर्णन करू शकले नाहीत. जसे एका हत्तीला सहा आंधळ्यांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून पाहिले. ज्याने हत्तीच्या पायाला हात लावला, तो म्हणाला, हत्ती खांबासारखा आहे. ज्याने हत्तीच्या कानाला हात लावला, तो म्हणाला, हत्ती सुपासारखा आहे. अशाप्रकारे प्रत्येकाने सोंड, शेपूट ह्या अनुरूप हत्तीचे वर्णन केले. वास्तविक हत्तीचे समग्र वर्णन कोणीही करू शकला नाही.

पण वेदांमध्ये ईश्वराचे स्वरूप तीन तत्त्वात केले आहे. पहिले म्हणजे ईश्वराने जग निर्माण केले. या जगाची निर्मिती ज्याने केली तो म्हणजे ईश्वर. सबंध जगामध्ये एक प्रकारची सुव्यवस्था असल्याचे आपल्याला दिसून येते. सर्वत्र जिथे तिथे सुव्यवस्था आहे, याचा अर्थ त्या व्यवस्थेचा कोणीतरी एखादा कर्ता किंवा नियामक असला पाहिजे, आणि तो म्हणजेच ईश्वर!  पण मग असा प्रश्न उठतो की, ईश्वराने हे जग निर्माण केले हे ठीक, पण ह्या जगाच्या निर्मितीसाठी सामग्री कुठून आली? ईश्वर हा जगद्कर्ता आहे मग जग निर्माण कसे झाले? मग दुसरे तत्व सांगितले गेले की, ईश्वराने जग निर्माण केले नाही तर, ईश्वर स्वयं जगद्रूप झाला. मग पुन्हा अपवाद उठतो की, ईश्वर जर स्वयं जगद्रूप झाला तर जगात जेवढे दोष आहेत, दुःख आहेत, जग जड आहे, जगात अनाचारी आहेत, पापी आहेत, मग हे सगळे इश्वर स्वरूप आहे काय? ह्याला ही उत्तर म्हणून वेदांत पुढे सांगितले आहे की, ईश्वर हे जगताचे अधिष्ठान आहे आणि हे जगत् त्या अधिष्ठानावर भासणारा केवळ एक भ्रम आहे. हे समजावून सांगताना, श्रीजी मग सिनेमाचा पडदा आणि त्यावर दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटाचे उदाहरण देतात. सिनेमाचा पडदा हे अधिष्ठान असून त्यावर दाखविली जाणारी कथा हा भ्रम आहे. चित्रपटगृहात जोपर्यंत अंधार असतो, तोपर्यंतच आपल्याला चित्रपट दिसतो. पण चित्रपटाची कथा संपल्यावर, चित्रपटगृहातले दिवे लागल्यावर, आपल्याला पांढरा पडदाच दिसतो. त्याचप्रमाणे अज्ञानाचा अंधकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत मायेमुळे भ्रांती होतच असते. पण एकदा का ज्ञानाचा प्रकाश पडला की, सत्तेचे अधिष्ठान दिसू लागते आणि आपल्याला अधिष्ठानाचे ज्ञान होते.

सुखापासून सुरू झालेला हा प्रवास हा अनेक नागमोडी वळणे घेऊन, ईश्वराच्या अधिष्ठानापर्यंत येऊन म्हणजेच अथांग ज्ञानसागरापर्यंत येऊन पोहोचला होता. सर्व प्रभुभक्तांना एकाच नावेमध्ये बसवून श्री ज्ञानराज प्रभुरुपी कुशल नावाड्याने, ज्ञानाच्या ह्या खळखळ वाहणाऱ्या नदीतून, वेदांतसागरापर्यंत सर्वांना सुखरूप आणून पोहोचवले होते. प्रवचनाच्या शेवटी अवधूत चिंतनाचा गजर होताच उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाटाने श्रीप्रभु मंदिराचे सभागृह भरून राहिले होते.

प्रवचननंतर श्रीजींनी श्रीप्रभुंची आरती केली आणि अतिथीगृहाकडे प्रस्थान आरंभले. श्रीप्रभु मंदिराच्या बाहेरच सगरोळी गावातील सावकार श्री.गंगाधर शक्करवार ह्यांनी श्रीजींच्या प्रवचनानंतर, भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. श्रीजींच्या प्रवचनासाठी गावातील आबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रवचनानंतर प्रत्येकजण प्रभुचा प्रसाद घेऊन जात होता. पण भक्तांची संख्या पाहता केलेला प्रसाद कमी पडेल की काय अशी काळजी यजमानांना वाटू लागली. पातेल्यात असलेला प्रसाद आणि भक्तांची संख्या याचे प्रमाण अगदीच व्यस्त होते. प्रसादासाठी भक्तांची खूपच मोठी रांग होती, त्यामुळे ऐन वेळी आता काय करावे, अशी चिंता प्रसादाचे वाटप करण्याऱ्यांना भेडसावू लागली. भाताचे मोठे पातेले रिकामे होत आले होते आणि नव्याने जास्तीचा भात शिजवायला वेळही नव्हता. त्यातच पावसाची रिपरिप चालूच होती. त्यामुळे श्रीप्रभुला शरण जाण्याशिवाय आता कोणताही पर्याय नव्हता. हे प्रभुराया, तूंच आता आमचे आता सत्व राख, असे म्हणून भक्तकार्याचा जयघोष झाला. आहे तेवढा प्रसाद वाढूयात, असा विचार करून कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रसाद वाटपाला सुरुवात केली. रांगेतून भक्त येतच होते, प्रत्येकाला भरपूर प्रसाद मिळत होता. पातेल्यात असलेल्या प्रसादाचे आणि भक्तांचे व्यस्त प्रमाण वाटत असतानाही, सर्वांनी मनसोक्त प्रभुचा प्रसाद घेतला. श्रीगुरु जेथे असतो, तेथे देवी अन्नपूर्णेचा निरंतर वास असतो आणि त्यांच्याच कृपेच्या कटाक्षाने पुढील गोष्टी विनासायास घडून येतात. ह्या प्रसंगाच्या निमित्ताने श्री माणिक चरितामृतातील भालकीच्या जंगलातील  माधुकरी मागून आणलेल्या अन्नाने हजारो लोक जेवल्याचा प्रसंग आठवला. श्रीगुरूंचा अवतार काळ, स्थळ जरी बदलले, तरी ते एकच गुरुतत्व त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष कार्यरत असते. श्री गंगाधर सावकारांच्या अन्नदानाच्या प्रसंगातून हीच व्यवस्था, श्रीगुरुंचा हाच निर्विवाद अधिकार अधोरेखित होतो.

अतिथीगृहावर परतल्यावर आमच्या सर्वांचे भोजन झाले. श्रीगुरुंच्या कृपावर्षावाची अनुभूती निरंतर घेत असतानाच, बाहेरही पावसाची जोरदार वर्षा सुरू होती. श्रीप्रभु चरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करून निद्रादेवीच्या अधीन झालो.

क्रमशः

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग पाचवा)

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने उसंत घेतली. श्रीगुरुंच्या शब्दांबाहेर जायचे धारिष्ट्य कदाचित त्याच्यातही नसावे. पाऊस थांबल्यामुळे गावकऱ्यांतही उत्साहाचे वातावरण होते. त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. संध्याकाळी सव्वासहा वाजता आम्ही अतिथीगृहातून, शोभायात्रेचा प्रारंभ जेथून होणार होता, त्या विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ पोहोचलो. जवळपास संपूर्ण सगरोळी गाव येथे जमला होता. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच लगबग चालू होती. श्रीजींच्या स्वागतासाठी संस्कारभारतीच्या भल्या मोठ्या आकर्षक रांगोळ्या मंदिर परिसरात काढल्या होत्या. शोभायात्रेसाठी घोडेस्वार, बँड पथक, लेझीम पथक, वारकऱ्यांचे पथक, सुवासिनींचे पथक घोळक्या घोळक्याने उभे होते. वारकरी मंडळ भजनानंदात एव्हाना दंग झाले होते. शाळेच्या मुलांमध्ये अमुप उत्साह होता. श्रीजींच्या आमच्या गावी येण्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत, आणि त्यांच्यासमोर शोभायात्रेतून आमची कला सादर करण्याची संधी आम्हाला मिळते, हे आमचे भाग्यच. या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आम्ही खूप तयारी केली आहे आणि पाऊसही थांबल्यामुळे आता शोभायात्रेत आम्ही आमची कला सादर करू, अशी प्रतिक्रिया एका चिमुकलीने दिली.

साधारणतः साडेसहाच्या दरम्यान श्रीजींचे शोभायात्रेसाठी आगमन झाले. श्रीजींच्या शोभायात्रेसाठी रथ आकर्षक रोषणाईने सजवलेला होता. श्रीजी रथावर आरूढ होताच, श्रीप्रभुच्या भक्तकार्यच्या ब्रीदावलीने आसमंत दुमदुमला. शोभायात्रेच्या सुरुवातीला घोडेस्वार, त्यांच्यापाठी बँड पथक, त्यानंतर लेझीम पथक शिस्तबद्ध पद्धतीने निघाले. त्यानंतर वारकरी मंडळ, सुवासिनी स्त्रिया ह्या आपल्या गावाच्या संस्कृतीचे दर्शन घडवत होत्या. त्यानंतर गावातील सर्व मान्यवर, आबालवृद्ध शोभायात्रेत सहभागी झाले होते. सगरोळी गावच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं, संस्कारांच प्रतिबिंबच जणू ह्या शोभायात्रेत उमटले होते. ह्या शोभायात्रेचा सुखसोहळा पाहण्याची संधी सूर्यदेवही जणू दडवू इच्छित नव्हता आणि म्हणूनच काय ढगांच्या आडून अधूनमधून तोही पाहत होता. सायंकाळच्या संधीप्रकाशात, सूर्यानेही ही अपूर्व संधी साधली होती. गोरज मुहूर्तावरील त्या संधी प्रकाशात, आल्हाददायक वातावरणात अत्यंत उत्साहात शोभायात्रा निघाली. बँडच्या तालावर, लेझीम पथकाने सुंदर लयबद्धता साधली होती. अब्दागिरीवाले बँडच्या तालावर अब्दागिरी उंचच उंच झुलवत होते. इकडे वारकरी मंडळाचा माणिक नामाच्या गजर आसमंतात दुमदुमून राहिला होता. मधूनच फटाक्यांची आतिषबाजी आसमंत उजळवून टाकत होती. रस्त्याच्या दुतर्फा स्त्री-पुरुष उभे राहून श्रीजींना मानवंदना देत होते, कोणी नमस्कार करत होते, कोणी कुतुहलाने, कोणी कौतुकाने, श्रीजींना न्याहाळत होते  गावाच्या वेशीपासून थोड्या पुढे आल्यावर दुकानदारांकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी श्रीजींवर गुलाबदलांची उधळण सुरू झाली, ती शोभायात्रा श्रीप्रभु मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत सुरूच राहिली. श्रीजीही सुहास्य वदनाने सर्वांचे अभिवादन, नमस्कार स्वीकारत होते. अशा सुखसोहळ्याच्या वेळी श्रीजींच्या मुखकमलावर चैतन्याची अनुपम छटा फाकली होती. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम आत्मानंदात निमग्न होऊन रथावर आरुढला होता. आपापल्या मोबाईलमध्ये श्रीजींची ही अदा साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. मिनिटागणिक हजारो फोटो पडत होते. साधारण पाचशे मीटरचे अंतर कापण्यासाठी आम्हाला पाऊण तास लागला. संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास आम्ही श्रीप्रभु मंदिरापाशी पोहोचलो. फटाक्यांची एकच आतिषबाजी झाली. नेमके ह्याच वेळी वारकरी मंडळ या सुखसोहळ्याला अनुरूप असे “या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनि संत सदनी राहिला” हे पद म्हणत होते. बँड आणि लेझीम पथकाने श्रीजींना पुन्हा मानवंदना दिली. श्रीजी रथातून उतरल्यावर सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. श्रीप्रभु मंदिरामध्ये प्रभुचे दर्शन घेऊन श्रीजी आता व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते. सगरोळी गावातील सर्वात जेष्ठ नागरिक श्री. शंकर गंगाराम मुत्येपवार यांनी श्रीजींचे पुष्पहार घालून स्वागत केले. पाच एक मिनिटांनी सर्व स्थिरस्थावर झाल्यावर, श्रीजींचा खर्जातला “वन्दे श्रीप्रभुसद्गुरुं”चा आवाज सभागृहात निनादला आणि श्रीजींच्या उद्बोधनाला सुरुवात झाली. पुढच्या पाचच मिनिटात अतिशय जोराचा वारा सुटून, पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने नेमकी पाद्यपूजेच्या वेळेस आणि शोभायात्रेचे वेळेस उसंत घ्यावी, हे श्रीजींचे पंचमहाभूतावरील असलेल्या अधिकाराचेच द्योतक होते. ह्याआधीही मी अशा स्वरूपाच्या कथा इतर प्रभुभक्तांकडून ऐकल्या होत्या, पण त्याचा प्रत्यय आज याची देही, याची डोळा मी अनुभवला.

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग चौथा)

पहाटे ५ वाजताच मोरांच्या केकारवाने जाग आली.‌ येथे माणिकनगरसारखेच वातावरण आहे. मणिचूल पर्वतरांगासारखीच बालाघाटाच्या डोंगरांची रांग, गुरुगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमासारखाच मांजरा आणि मन्याड नद्यांचा संगम, वृक्ष, लता, वेलींची विपुलता, मोर आणि माकडांचा मुक्त संचार. नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्याही सगरोळी माणिकनगरशी एकरुप झालेले दिसते.‌  सकाळीच उपासना आटपून आठच्या सुमारास आम्ही उतरलेल्या, संस्कृती संवर्धन मंडळाच्या, सोयीसुविधांनी अतिशय सुसज्ज अशा, अतिथीगृहात तयार होऊन बसलो. गरमागरम चहा नाश्ता झाल्यावर श्री. विलास जकातेसरांबरोबर संस्थेचा परिसर फिरावयास निघालो. ह्याच परिसरात एकेकाळी श्री मार्तंड माणिक प्रभुंचा संचार असायचा.‌ त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विद्यानगरच्या या भूमीत फिरताना अंगी रोमांच दाटत होते. सुरुवातीला राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाला भेट दिली.  येथून पुढे सगरोळीच्या शिवाजी हायस्कूलमध्ये आलो. “कर्मयोग” नावाची संस्थेचे कार्यालय असलेली इमारत लक्ष वेधून घेत होती. थोडा वेळ शाळेमध्ये व्यतीत केला. या शाळेच्या इमारतीची पायाभरणी श्री सिद्धराज माणिक प्रभुंच्या हस्ते १९७५ साली झाली आहे. शाळेच्या मुख्य फलकावर श्री ज्ञानराज प्रभुंचे रंगीत खडूंनी चित्र काढून त्यांना स्वागतपर मानवंदनाच दिली होती. शाळेच्या विविध इमारतींच्या उद्घाटनशीला व इमारतींची नावे व संस्थेचे उद्दिष्ट पाहता, संस्कृती संवर्धन संस्थेची श्री माणिकप्रभु संस्थानाच्या पिठाचार्यांप्रती असलेला कृतज्ञभाव आणि त्यांची माणिकनगरशी घट्ट जुळलेली नाळ प्रकर्षाने जाणवते.

अतिथिगृहावर परतताना नागकेशराची, प्राजक्ताची फुले गोळा करून आणली. एव्हाना श्रीजी आपल्या नित्य पूजेला बसले होते. त्यांच्या पूजेला फुले अर्पण करून श्रीजींच्या पूजेचा आनंद घेत बसलो. साडेदहाच्या सुमारास श्रीजींची पूजा आटोपल्यावर सकाळी अकरा वाजता देशमुखांच्या गढीवर निघायला सज्ज झालो. आजच्या दिवसाच्या पाद्यपूजांची सुरुवात येथूनच होणार होती.

साधारण सव्वा अकराच्या सुमारास आम्ही “केशव दुर्ग” ह्या सगरोळीच्या देशमुखांच्या (देसायांच्या) गढीवर (वाड्यावर) आलो. वाड्याच्या भोवती पाच भव्य बुरुज आहेत. अत्यंत प्रशस्त असलेला हा वाडा आपल्या गतवैभव अजूनही सांभाळून आहे. मुख्य बुरुजावर देवीचे पांढरे निशाणही, श्रीजींच्या आगमनाने होणाऱ्या आनंदामुळे डौलाने फडफडत होते. वाड्यामध्ये ठिकठिकाणी रंगबिरंगी रांगोळ्या काढल्या होत्या. श्रीजी येण्याच्या मार्गावर गुलाबदलांच्या पायघड्या घातल्या होत्या. श्रीजींच्या आगमन होताच देशमुख कुटुंबातील सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. भक्तकार्याच्या जयघोषामध्ये श्रीजींची स्वारी देशमुखांच्या वाड्यामध्ये आली. श्रीजींनी प्रथम देवीचे दर्शन घेतले. नंतर देशमुख कुटुंबीयांनी श्रीजींची पाद्यपूजा केली. आसपासचे अनेक लोक वाड्यामध्ये पाद्यपूजेसाठी आले होते. अधिक महिना सुरू असल्यामुळे अधिक महिन्याचे वाण देणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. सुमारे तासभर हा सोहळा सुरू होता. घरातल्या सुवासिनींनी वहिनीसाहेबांची ओटी वगैरे भरली. त्यावेळेस वहिनी साहेबांनी श्री सिद्धराज प्रभुंचा ह्या खोलीमध्ये मुक्काम असायचा, असे सांगत गत आठवणींना उजाळा दिला. श्रीजींच्या आपल्या गृही येण्यामुळे झालेला आनंद देशमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर टिपता येत होता. इथे श्रीजींची पाद्यपूजा सुरू असताना, श्री. देवीदास दादांनी आम्हाला देवीचे निशाण असलेल्या बुरुजावर नेले. दरवर्षी नवरात्रीमध्ये हे निशाण बदलले जाते. या बुरुजावरून सगरोळी गावाचा परिसर, बालाघाटाची डोंगररांग, मांजरा नदीचे नयनरम्य दर्शन होते. सगरोळीचा परिसर शक्य होईल तितका डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न केला.

देशमुखांच्या वाड्यावरून आम्ही श्री मार्तंड माणिकप्रभु कृपांकितआणखी एक प्रभुभक्त श्री. खंडेराव देशमुख यांच्या घरी पोहोचलो. येथेही अनेक प्रभुभक्तांची मांदियाळी जमली होती.‌ श्री. खंडेरावांच्या आजीबाईं (कै.‌ तान्यामा) ह्या श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या अत्यंत जवळच्या शिष्यांपैकी होत्या. त्याकाळी श्री मार्तंड माणिकप्रभुंनी तान्यामांना प्रसादस्वरूप दिलेली नथ,  हनुमानाचा टाक, सोन्याची अंगठी, मण्यांची माळ आजही देशमुख कुटुंबीयांनी आत्मियतेने जपून ठेवली आहे. तसेच पुढील पिढ्यांचे संरक्षण होण्यासाठी चांदीच्या महादेवाची पिंडीही आत काहीतरी वस्तू ठेवून, ती कधीही न उघडण्याची आज्ञा करून भेट दिली.  महाराजश्रींच्या दौऱ्याच्या वेळी उपयोगात येणारी मोठी भांडी, हंडे आजही ह्या भाग्यवान कुटुंबाने श्रद्धेने राखले आहेत. आज ह्या सर्व वस्तू श्री. देशमुख कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत. आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली, पण श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या कृपाप्रसादाने आम्ही सर्वांतून सुखरूपपणे तरुन गेलो, अशी कृतज्ञतेची भावनाही श्री. खंडेराव दादांनी व्यक्त केली. श्री मार्तंड माणिक प्रभुंनी सुरू केलेल्या दौऱ्याचे प्रयोजन आणि त्यांची वास्तविक कृती यातील सुयोग्य सांगड आपल्याला ह्या कृपांकित भक्तांनी उलगडलेल्या आठवणींच्या पेटार्‍यातून घालता येते. श्री. खंडेराव देशमुखांकडून आम्ही श्री. चंद्रकांत जोशी, श्री. अनुप जाधव यांच्या घरी पाद्यपूजेसाठी गेलो. सर्वत्र उत्साह व प्रभुभक्तीतला आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येक जण श्रीजींना आपल्या जीवनातील घडामोडी, प्रभुकृपेमुळे झालेली प्रगती श्रीजींना उत्साहाने सांगत होता. प्रत्येकाच्या कथा, व्यथा ऐकून श्रीजी त्यांना खारकांचा प्रसाद व यथायोग्य उपासना देत होते.

पाद्यपूजेच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही श्री. शंकरराव जोशी यांच्या घरी आलो. श्री. शंकररावांच्या प्रशस्त घरात मनोभावे पाद्यपूजन झाले. श्री. शंकररावांनीही श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.श्री शंकररावांकडील पाद्यपूजेनंतर आम्ही त्यांचे बंधू श्री. संतोष नारायणराव जोशी आणि श्री. राजेश्वर जोशी यांच्या घरी आलो. श्री. जोशी बंधुद्वयांच्या आदरातीथ्यानंतर आम्ही आजच्या दिवसाच्या पाद्यपूजेचे शेवटचे ठिकाण असलेल्या श्री. सगरोळीकरांच्या निवासस्थानी आलो. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या काळापासून श्रीप्रभु परिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आजही माणिकनगर येथील उत्सवकाळात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सगरोळीकर कुटुंबाकडे असतात आणि ते तितक्याच निस्पृह भावनेने त्याचे यशस्वी निर्वहन करतात. जेव्हा पहिल्यांदा श्री मार्तंड माणिकप्रभु सगरोळीला देशमुखांच्या वाड्यावर आले होते, तेव्हा बापूसाहेब सगरोळीकर अवघ्या दहा वर्षांचे होते. त्यावेळेस त्यांनी श्री मार्तंड माणिकप्रभुंची परोपरीने सेवा केली होती. बापूरावांचे आई-वडील लहानपणीच निवर्तल्यामुळे, श्री मार्तंड माणिकप्रभु बापूरावांच्या कुटुंबीयांना म्हणाले की, याला मी माणिकनगरला घेऊन जातो. अशाप्रकारे बापूराव माणिकनगरी आले. माणिकनगरात वास्तव्याला असतानाच बापूरावांचे गीताबाईंशी लग्न झाले. गीताबाईंच्या वडिलांच्या स्वप्नात श्री मार्तंड माणिक प्रभुंनी जावून, तुझी मुलगी सगरोळीच्या बापूरावांस दे, असे म्हणाले. सुरुवातीला या स्वप्नाकडे दुर्लक्ष केल्यावर, पुन्हा तसेच स्वप्न पडले. आणि मग सगरोळीच्या बापूरावांचा शोध घेता घेता गीताबाईंचे वडील सगरोळीहून माणिकनगरात आले. बापूसाहेबांनी जवळपास ४० वर्षे श्री माणिकनगर संस्थानाच्या कारभारात व व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सरकार दरबाराची कामे करण्यात त्यांचा हातखंडा होता. दरम्यानच्या काळात बापूरावांना सहा-सात मुले झाली. आपल्या वाढत्या परिवारासाठी माणिकनगर येथे घर बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्यांनी श्री मार्तंड माणिकप्रभुना विनंती केली. पण महाराजश्रींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. वारंवार विचारणा केल्यावर महाराजश्री म्हणाले, तिकडे सगरोळीचे जे आहे, ते कोण बघणार? पुढे तुलाच तिकडे जायचे आहे. श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या महासमाधीनंतर श्री शंकर माणिकप्रभु गादीवर बसले. श्री शंकर माणिकप्रभुंनी आपल्या महासमाधीच्या काही दिवस आधी बापूसाहेबांना खारकांचा प्रसाद देऊन म्हणाले की, मी तुला आता मुक्त करतो. तू आता सगरोळीस परत जा. आपल्या चुलत्यांचे निधन झाल्यानंतर, ते निपुत्रिक असल्यामुळे बापूरावांना संपत्ती व जमीन राखण्यासाठी सगरोळीला परतणे गरजेचे झाले. श्री शंकर माणिकप्रभुंच्या आज्ञेवरून बापूसाहेब पुन्हा सगरोळीला परतले. त्यानंतर बापूसाहेब माणिकनगरला येऊन जाऊन सेवेत राहिले. बापूसाहेबांनंतर त्यांचे चिरंजीवांनी प्रभुसेवेची ही धुरा समर्थपणे सांभाळली. श्री. शामराव सगरोळीकर सुमारे १९६५ पासून २०१९ पर्यंत सुमारे ५५ वर्ष प्रभुसेवेत राहिले. माणिक नगरच्या प्रत्येक महोत्सवात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. माणिकनगरला जाऊन आलो की तिथली ऊर्जा मला वर्षभर पुरते, असे ते नेहमी म्हणायचे. कधी कोणता फोड वैगरे आला की ते त्याला श्रीप्रभुच्या खारकेच्या प्रसादाची बी उगाळून लावत. अशा या प्रभुनिष्ठ परिवाराच्या घरी सर्वांसाठी दुपारच्या महाप्रसादाचीही सिद्धता केली होती. अत्यंत भावनेने सगरोळीकर कुटुंबाने श्रीजींची पाद्यपूजा केली. सध्याच्या पिढीतले श्री. राजीवकाका, श्री. शैलेशकाका आणि श्री. संजीवदादा अगदी अगत्याने सर्वांची व्यवस्था पाहत होते. सगरोळीकरांकडे श्रीजींच्या दर्शनासाठी नांदेडहून अनेक अनेक प्रभुभक्त आले होते. नांदेडच्या भक्तांच्या श्रीजींच्या दर्शनाची व्यवस्था आमचे स्नेही श्री. श्रीनिवास पाटील अगदी तत्परतेने पाहत होते. दुसरीकडे सुवासिनींचे वहिनीसाहेबांची ओटी भरण्याचे‌ व एकमेकींना हळदीकुंकू देण्याचे मंगलकार्य चालू होते. एकंदरीतच वातावरण भारलेले होते. सर्वांची दर्शने पार पडल्यावर, सर्वांनी एकत्र बसून श्रीजींसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. सगरोळीकर कुटुंबाच्या न मोडवणाऱ्या आग्रहामुळे सर्वांचेच आकंठ भोजन झाले. सगरोळीकरांच्या घरातील सदस्यांबरोबरच आम्हीही श्रीजींच्या उच्छिष्टाच्या प्रसाद सेवनाने धन्य धन्य झालो.

दुपारी तीनच्या सुमारास आम्ही सर्व पुन्हा शारदानगर येथील अतिथीगृहात आलो.‌ सततच्या पडणाऱ्या पावसामुळे श्रीजींना थोडीशी सर्दीची बाधा झाली होती. पाद्यपूजेच्या वेळेस मात्र सगरोळी गावामध्ये फिरताना पावसाने विश्रांती घेतली होती. एखाद-दुसऱ्या ठिकाणी मंद मंद सरी बरसल्या, पण त्याने कोणताही प्रभुभक्त भिजला नाही. अतिथीगृहावर देशमुखदादा श्रीजींना म्हणाले, महाराज संध्याकाळी शोभायात्रा आहे. तेव्हा श्रीजी म्हणाले, अहो इतका पाऊस पडतो आहे कशाला शोभायात्रा काढता? आपण प्रभुमंदिरात थेट प्रवचनाला जाऊया! यावर उपस्थितांपैकी कुणीतरी म्हटलं, महाराज शोभायात्रेची सर्व तयारी झाली आहे. लहान मुले ढोल, लेझीम पथकांसह तयार आहेत. तेव्हा एक क्षण थांबून श्रीजींनी म्हटलं, असं म्हणता, ठीक आहे!!! काढूया शोभायात्रा… असे म्हटल्याबरोबर समस्त सगरोळीकरांना आनंदाचे भरते आले. सहा वाजता शोभायात्रा निघणार होती.  मधल्या काळात थोडासा विश्राम करण्याकरता आम्हीही आपापल्या खोलीकडे निघालो. आम्ही विश्रांतीला जात असताना, पावसाने मात्र आता जोर धरला होता…

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग तिसरा)

 

सगरोळी, नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक प्राचीन गाव आहे. सगरोळीचे एकेकाळचे नाव सावरवल्ली असे होते. या परिसरात अनेक शिलालेख आहेत. श्री गुरुचरित्रामध्ये उल्लेख असलेले श्रीक्षेत्र बासर आणि तेथील सरस्वतीचे शक्तिपीठ (श्री नृसिंहसरस्वती महाराजांशी सायंदेवाची प्रथम भेट इथेच झाली.) आजच्या घडीला द्रष्टे कर्मयोगी कै. बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली संस्कृती संवर्धन मंडळ ही स्वयंसेवी संस्था आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून विस्तारित झालेल्या अनेक उपसंस्था हीच सगरोळी गावाची मुख्य ओळख बनून राहिली आहे. येथील कृषी विकास केंद्र संपूर्ण भारतामध्ये आपली छाप पाडून, आपली वेगळी ओळख जपून आहे. सध्याच्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये आधुनिकदृष्ट्या सर्वांग सुधारणेचे आदर्श गाव अशी सगरोळीची ख्याती आहे.

सगरोळी गाव मांजरा नदीकाठी आहे. येथे मांजरा आणि मन्याड नद्यांचा संगम आहे. गावाच्या खाली कुंदकुर्ती येथे मांजरा आणि गोदावरी नदीचा संगम आहे या भागाला गोदा पंचक्रोशी असेही म्हणतात. उत्खननात सापडलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या आधारे हे गाव सातवाहनांच्या काळात वसलेले असावे, असे मानायला अनेक आधार आहेत. सगरोळीचा भाग कधीकाळी सातवाहन, चालुक्य, काकतीय इत्यादी राज्यांत होता. पुढे तो बहामनी, कुतुबशाही व निजामाच्या अंमलाखाली राहिला. पेशव्यांच्या काळात देशमुख-देशपांडे चौथ वसुलीसाठी सर्वत्र पसरले. ते गढी उभारून मुलकी व्यवस्था पाहत. तहसील वसूल करून ठराविक भाग सरकारात जमा करीत. सगरोळी येथे आजही देशमुख (देसाई) कुटुंबाची पाच बुरुजांची गढी आहे. पेशव्यांनी ह्या देशमुखांना सनदा देऊन करीमनगरपर्यंतच्या भागाची जबाबदारी सोपविली होती. सगरोळी गावामध्ये श्रीप्रभु मंदिराच्या बाजूला चालुक्यकालीन गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात शेंदूरचर्चित गणपतीची भव्य मूर्ती मन वेधून घेते.

सगरोळी गावाचा आणि माणिकनगरचा हृदय संबंध आहे. जवळपास सर्व गावच प्रभुसेवेत आहे. माणिकनगरच्या उत्सवांमध्ये सगरोळी गावच्या अनेक अभिमानी प्रभुभक्तांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या पाहायला मिळतात.‌ सगरोळीचा श्री माणिकप्रभु संस्थानाशी कसा संबंध आला ह्याचा मागवा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला असता, श्रेष्ठ, संत-महात्मे ह्या भागात (श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या मुधोळ वगैरे दौऱ्यावेळी) येत आहेत, तेव्हा आपणही त्यांना आपल्या गावी निमंत्रित करावे, असा विचार येऊन जहागिरीचे प्रमुख या नात्याने कै. अमृतराव देशमुख (बापूसाहेब) (श्री. देवीदास दादांचे पणजोबा) ह्यांनी त्यांना निमंत्रित केले असावे, अशी माहिती श्री. देवीदास दादांनी दिली. हा काळ साधारणतः १९०१-१९०३च्या दरम्यान असावा. म्हणजे साधारणतः सव्वाशे वर्षापासून सगरोळीच्या ग्रामस्थांची श्री माणिक प्रभु संस्थानाशी नाळ जोडली गेली आहे.

बापूसाहेबांचे नारायणराव आणि गोविंदराव असे दोन पुत्र. उभयतांचा तुळजापुरात जाण्याचा वार्षिक नेम होता. पुढे तुळजापूरच्या भवानीने सांगितले की, तू आता थकला आहेस, याकरिता तू येऊ नकोस, मीच तुझ्याबरोबर तुझ्याकडे येते. मात्र, तू मागे पाहू नकोस! जर मागे पाहिले तर मी त्याच ठिकाणी राहीन! देशमुख मागे न पाहता निघाले, सगरोळीच्या सीमेपर्यंत आल्यावर खरोखरच श्री भवानी आली की नाही म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले आणि देवी तिथेच थांबली, अशी दंतकथा आहे. सगरोळीच्या सीमेवर जिथे देवी गुप्त झाली, त्या स्थळी देशमुखांनी देवीचे देऊळ उभारले आहे. प्रथम देवीचे मानपान होऊन, नंतर नवरात्र उत्सव आरंभ होतो. याच देवीच्या आज्ञेवरून देशमुख श्री प्रभुंच्या दर्शनास गेले आणि महाराजश्रींच्या हस्ते प्रसाद घेऊन आले. गावात श्री प्रभुगादीची स्थापना केली. श्रीदेवी नवरात्राप्रमाणेच, श्रीप्रभु गादीचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. संप्रदायदृष्ट्या शिष्यवृंद नात्याने सगरोळी आणि माणिकनगर एकजीव बनले आहेत.

आपल्या पहिल्या सगरोळी दौऱ्याच्या वेळी श्री मार्तंड माणिकप्रभु, सध्याचे जे शारदानगर आहे, तेथे राहत. पूर्वी हा भागावर मोहाच्या झाडांचे जंगल होते. बालाघाटाच्या डोंगररांगाच्या कुशीत असलेल्या या निसर्गरम्य स्थानी महाराजश्रींचा मुक्काम असे. बाबासाहेब लहान असतानाच त्यांचे मातृ-पितृछत्र हरपले. आजीने आणि चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. बाबासाहेब लहानपणी अत्यंत शामळू स्वभावाचे होते. त्यांच्या आज्जीला त्यांची चिंता लागून राहायची. एक दिवस धीर धरून त्यांनी श्री मार्तंड माणिक प्रभुंना आपल्या नातवाबद्दल विचारले. तेव्हा महाराजश्री म्हणाले, याची अजिबात चिंता करू नका, हा एक दिवस खूप मोठा माणूस होईल. पुढे आजींचे वय झाल्यामुळे त्यांना गढीच्या बाहेर असलेल्या प्रभु मंदिरातही जाता येईना, तेव्हा श्री मार्तंड माणिकप्रभुंनी आजींना त्यांच्या घरीच प्रभुगादीची स्थापना करून दिली. घरातील श्री देवीच्या देव्हाऱ्याशेजारच्या खोलीत एक प्रसादाची डबी भरून जमिनीत ठेवली व त्यावर एक छोटासा कट्टा उभारला. रोज त्या कट्ट्याची पूजा करण्याची आज्ञा देशमुख यांना देवून ही खोली कोणी वापरू नये, अशी ताकीद दिली. दौऱ्यादरम्यान येथे नित्य श्री नित्य मंगल होत होते. महाराजश्रींचा दौरा संपल्यानंतर कोणी एक विद्वान सत्पुरुष संचार करीत सगरोळीस आले. त्यांची पाद्यपूजा, दर्शन वगैरे कार्यक्रम संपल्यावर श्रीदेवीचे दर्शन घेऊन झाल्यावर त्या सत्पुरुषांचे लक्ष देवीच्या शेजारील खोलीकडे गेले. एकांतात अशी सोईस्कर ही खोली झोपावयास बरी आहे असे पाहून, त्यांनी देशमुखांच्या नोकरास आपली झोपण्याची व्यवस्था त्या खोलीत करायची आज्ञा केली. पुढे ते सत्पुरुष त्या खोलीत झोपले असता, त्यांना सटक्याचा मार बसून, “येथून चालता हो” असे शब्द होऊन, खोली बाहेर फेकले गेले. देशमुखांना हे वर्तमान समजताच त्यांनी त्या सत्पुरुषांना नम्रतेने सांगितले की, ह्या खोलीत जो लहानसा कट्टा आहे, त्यात श्री प्रभुंचा प्रसाद ठेवला आहे. दररोज त्या कट्ट्याची पूजा झाल्यावर नंतर ती खोली कुणालाही वापरास देत नाहीत आणि तिकडे कुणीही जात नाही. त्यानंतर त्या सत्पुरुषांनी श्रीदेवीच्या दर्शनानंतर बाजूच्या खोलीतील कट्ट्यांवर फुले वाहून नमस्कार करण्याचा नित्यक्रम ठेवला होता. आजींना दिलेली प्रसादाची ती डबी आजही आपल्याला देशमुखांच्या पूजेमध्ये पाहता येते. श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या वास्तव्याने, त्यांच्या पादस्पर्शाने पुनित झालेल्या ह्या पुण्यभूमीतच कै. बाबासाहेबानी संस्कृती संवर्धन मंडळाचे बीज रोवले. श्री प्रभुच्या असीम कृपेने आणि कै. बाबासाहेबांच्या अविश्रांत परिश्रमाने आजच्या घडीला आपल्याला संस्थेचा हा डेरेदार वटवृक्ष बहरलेला दिसतो.

क्रमशः….

सगरोळी दौरा वृत्तांत (भाग दुसरा)

मंगळवारी सकाळीच श्री व्यंकम्मादेवी मंदिरात ओटी भरून कुंकुमार्चन केले. थोडा वेळ माणिक प्रभु अंध विद्यालयात मुलांसोबत रमलो. दुपारी भंडारखान्यातील महाप्रसादानंतर तयारीनिशी श्रीजींच्या निवासस्थानी आलो. दुपारी दोनच्या सुमारास भक्तकार्य कल्पद्रुमच्या जयघोषात श्रीजी श्री प्रभुमंदिरात दर्शनासाठी निघाले. श्री माणिकप्रभु संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन, त्यांची प्रार्थना करून, आरती केली, आशीर्वाद घेतले आणि पुढे श्री मनोहर प्रभुंच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर श्रीजी, श्री मार्तंड माणिक प्रभुसमाधीसमोर आले. वर वर्णन केल्याप्रमाणे श्रीजींचा श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीशी जणू काही संवाद झाला. श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या समाधी समोरच, श्रीजी, श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या चांदीच्या पादुका आणि खारकांचा प्रसाद स्वीकारतात. संपूर्ण दौऱ्यादरम्यान ह्याच पादुकांचे भक्तांच्या घरोघरी पूजन होते. श्री मार्तंड माणिकप्रभु समाधीची आरती करून, त्यांना निमंत्रण देऊन पुढे श्री शंकर माणिकप्रभु आणि श्री सिद्धराज माणिकप्रभु यांच्याही समाधीसमोर नतमस्तक झाले. श्रीप्रभु दर्शनानंतर श्रीजी पुन्हा निवासस्थानी आले. दौऱ्यामध्ये श्रीजींबरोबर असणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांनी श्रीजींचे आशीर्वाद घेतले. श्रीजींचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपला दौरा निर्विघ्नपणे पार पडणार, अशी सर्वांचीच मनोमन खात्री झाली. दौऱ्यामध्ये श्री. गुरुनाथ गुरुजी (मुख्य अर्चक), श्री. नरसिंह गुरुजी, श्री. तिरुमल गुरुजी होते आणि सेवेकऱ्यांमध्ये श्री. राजेश गिरी, श्री. माणिकलाल, श्री. इसामभाई, श्री. वीरप्पा आणि निर्मलाकाकूही सहभागी झाल्या होत्या. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास भक्तकार्याच्या जयघोषात माणिकनगरहून आम्ही सगरोळीसाठी प्रस्थान केले.

वातावरण ढगाळ होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या बारीक सरी, मनास प्रफुल्लित करत होत्या. संध्याकाळी सुमारे सहाच्या दरम्यान आम्ही देगलूरला श्री. राजेश्वर देशपांडे यांच्या घरी पाद्यपूजेसाठी पोहोचलो. श्रीजींच्या आगमनाने देशपांडे कुटुंबात लगबग चालू झाली. श्रीजींची पाद्यपूजा झाल्यावर दारामध्ये पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली. सौ. रमा देशपांडेकाकूंनी सर्वांसाठी मुगडाळीची भजी केली होती.‌ त्या गरमागरम नाश्त्याची चव जिभेवर रेंगाळत असतानाच, आम्ही श्री. पुरुषोत्तम देशपांडे यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथेही श्रीजींची पाद्यपूजा झाली. श्री. मार्तंड माणिक प्रभु आपल्या कार्यकाळात सगरोळी दौऱ्याहून माणिकनगरला येताना श्री. पुरुषोत्तमकाकांच्या घरी तीन दिवस राहिले होते. त्या जुन्या आठवणींना येथे उजाळा मिळाला. त्यानंतर आणखीन एक प्रभुभक्त श्री. अरुण शेळकीकर ह्यांच्याकडे श्रीजींची पाद्यपूजा झाली. अधिक श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीजींचे आगमन आपल्या घरी झाल्यामुळे, देगलूरच्या प्रभुभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सात सव्वा सातच्या सुमारास आम्ही देगलूर सगरोळीसाठी निघालो आणि संध्याकाळी आठ वाजता सगरोळीच्या प्रभुमंदिरात पोहोचलो.

पावसाची रिपरिप चालू होती, परिसरातील लाईट गेलेली, पण सगरोळीकरांच्या उत्साहामध्ये तसूभरही कमी नव्हती. अनेक प्रभुभक्तांची श्रीजींच्या स्वागतासाठी श्रीप्रभुमंदिर परिसरात दाटी झाली होती. श्रीप्रभु मंदिरास लावलेले, मांगल्याचे प्रतिक असलेले नारळाचे झाप, प्रभुमंदिरासमोर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या मन वेधून घेत होत्या. फटाक्यांच्या आतिषबाजीने श्रीजींचे स्वागत केले गेले. सुवासिनींनी श्रीजींना ओवाळले. भक्तकार्यच्या जयघोषात श्रीजी श्रीप्रभु मंदिरापाशी पोहोचले. गाभाऱ्यात श्रीदत्त, श्री गणपतीबरोबरच श्री माणिक प्रभुंची अत्यंत सुबक, संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. बाजूलाच एका आरामखुर्चीमध्ये श्री मार्तंड माणिक प्रभुंचा फोटो ठेवला आहे. आपल्या सगरोळी भेटीत महाराजश्री ह्या खुर्चीत बसत. गावकऱ्यांनी आजही ती खुर्ची अत्यंत आत्मीयतेने जपली आहे. तसेच श्रीजींनी दिलेले तीन सटके, त्यांची काठी, त्रिशुळ ह्याही वस्तू गाभाऱ्यामध्ये नेटकेपणे जपून ठेवलेल्या आहेत. श्रीप्रभु मंदिरामध्ये आरती करून आम्ही संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे प्रमुख आणि दौऱ्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली असे बंधूत्रय, श्री. देविदासदादा, श्री. प्रमोद दादा आणि श्री. सुनील दादा यांच्या शारदानगर येथील निवासस्थानी सव्वा आठच्या सुमारास पोहोचलो. घरच्या सुवासिनींच्या औक्षणानंतर सायंकाळचे भक्तकार्य येथेच झाले. देशमुखांच्या घरी रात्रीचे गरमागरम भोजन करून आम्ही संस्थेच्या विश्रामगृहात स्थिरस्थावर झालो. येथेही भरपूर पाऊस होता. उत्तम नियोजन, उतरण्यासाठी स्वच्छ आणि निसर्गरम्य जागा, चोख व्यवस्था आणि दिमतीला अत्यंत तत्पर मदतनीस, ह्यामुळे पहिल्याच भेटीत सगरोळीकरांनी मन जिंकून घेतले.

क्रमशः….