by Pranil Sawe | Apr 1, 2022 | Uncategorized
वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस पहिला

व्हावी मानवास जीवन मुक्ती ।
वेदांत ज्ञानाची हीच प्राप्ती ।
ज्ञानराजे प्रज्वलीत केली ज्योती ।
वेदांत सप्ताह महोत्सवाची ॥१॥
कोरोना महामारीच्या काळात ।
खंड पडला महोत्सवात ।
पुन्हा एकदा उत्साहात ।
सप्ताह रंगला ॥२॥
वेदांचे संक्षिप्त विवरण ।
कर्म, उपासना, ज्ञान ।
कांडांची तीन प्रकरण ।
वेदांमध्ये सांगीतली ॥३॥
जीवा समाधान नोहे कर्मकांडे ।
तैसेचि नाही ते उपासनाकांडे ।
तृप्तीचा अनुभव मात्र ज्ञानकांडे ।
वेदांताचा गाभा जो ॥४॥
प्रभु परमात्मा स्वरूपाची जाण ।
जीव-ब्रह्माच्या ऐक्याचे प्रतिपादन ।
ज्ञान अंतरी रूजण्याचे नियोजन ।
केले वेदांत सप्ताहात ॥५॥
भगवद्गीतेचा मुख्य आधार ।
वेदांत सप्ताहास खरोखर ।
एकेका अध्यायावर प्रखर ।
प्रकाशझोत सप्ताहात ॥६॥
पुन्हा एकदा सिंहावलोकन ।
भगवद्गीता अध्यायांचे विवेचन ।
तीन षटकवार निरूपण ।
पूर्वतयारी भक्तजनांची ॥७॥
सतरावा अध्याय गीतेचा ।
श्रद्धात्रय विभाग योगाचा ।
ज्ञानार्जना पुरक जीवनशैलीचा ।
मार्ग सांगे परमात्मा ॥८॥
श्रद्धा जरी अंतरात ।
परी शास्त्रविधी उल्लंघीत ।
अशांची लक्षणे सांगावीत ।
अर्जुन पुसे कृष्णासी ॥९॥
देहाची जशी परिस्थिती ।
श्रद्धेची तैसी स्थिती ।
रजतमसत्व नित्य बदलती ।
एकच मानवी देहात ॥१०॥
रसाळ निरूपणाच्या आहुती ।
ज्ञानराज स्वहस्ते टाकती ।
ज्वाळा गीतायज्ञाच्या उठती ।
चेतविण्या भक्तांस ॥११॥
by Pranil Sawe | Jan 31, 2022 | Marathi

गुंतलो जरी प्रपंचाच्या मायाजाळात ।
गुंगलो जागरहाटीच्या कोलाहलात ।
गुरफटलो जरी मायेच्या व्यवहारात ।
मन मात्र रमते नित्य माणिकनगरात ॥१॥
पाहता श्रीमाणिकनगराची भव्य कमान ।
होई लागोलाग माझे, मन तेथेच उन्मन ।
कमानीतूनच शिरतो श्रीप्रभुच्या अंतरंगात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥२॥
पाहता श्रीप्रभुमंदिराचे भव्य सिंहद्वार ।
चूर चूर होई, आत्माभिमानाचा अहंकार ।
शरणागतीची भावना मग प्रकटे हृदयात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥२॥
पाहता श्रीमाणिकप्रभुंची समाधी ।
विटून जाई ह्या नश्वर देहाची उपाधी ।
प्रकटे प्रभु समोर द्वंद्वातीत रूपात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥३॥
पाहता समोरच श्रीदत्तप्रभुंची गादी ।
अद्वैत सिद्धांताची खळखळणारी नदी ।
सकलमत संप्रदाय प्रकटे सप्ताहभजनांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥४॥
पाहता गोल घुमटाकार, अद्भुत प्रभुमंदिर ।
सुवर्ण कलश जरी, पाया त्याचा मनोहर ।
घोर तपाची अनुभूती येई प्रत्येक दगडात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥५॥
पाहता प्रदक्षिणेत सर्वेश्वर, अखंडेश्वर ।
हृदयात निनादे शिवतत्वाचा जागर ।
श्रीदत्ततत्व प्रकटे सदाबहार औदुंबरात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥६॥
पाहता पुढे दत्ताची संगमरवरी मूर्ती ।
भिक्षान्न अवधूताची जाज्वल्य स्फूर्ती ।
भरोसाची प्रभुनिष्ठा, व्यक्त स्मारकात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥७॥
पाहता वाकून समाधिस्त मनोहर योगी ।
तळघरात जो चिरंतन आत्मसौख्य भोगी ।
ब्रह्मचर्य व्रताची ध्वजा घेऊन हातात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥८॥
पाहता प्रभु अभिमंत्रीत सटक्यांचे कक्ष ।
स्वातंत्र्यसंग्रामाची असे तेजोमय साक्ष ।
देशभक्तीचे रक्त मग दौडे नसानसांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥९॥
पाहता हात जोडलेला मुख्यप्राण मारूती ।
करे प्रकट दास्यत्वभावाची सगुण स्थिती ।
चैतन्याची अनुभूती येई प्रत्येक प्रदक्षिणेत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥१०॥
स्थापत्यकलेचा उत्कृष्ट आविष्कार मुक्तीमंटप ।
वसे ज्यात शंकरासहित मार्तंड सदगुरू भूप ।
श्रीसिद्धराजाची समाधीही त्याच परीसरात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥११॥
श्रीव्यंकम्मामातेचे मंदिरही भव्य विराट ।
श्रीदत्तात्रेयांच्या मधुमतीशक्तीचा जो घट ।
शक्त्यानुभूती देई क्षणैक विसावता ओसरीत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १२॥
बाजूलाच वायुपुत्राचे मंदिर अतिपुरातन ।
तैसाचि अश्वत्थाखाली कालाग्निरूद्र हनुमान ।
सदा दक्ष माणिकक्षेत्र अभिमान रक्षणात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १३॥
गुरूगंगा विरजेचा जेथे होई संगम ।
पुष्करणी तीर्थ तेथे बांधिले अनुपम ।
सकल तीर्थांचे पुण्य, स्नान करीता त्यात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १४॥
गावाबाहेर महबूब सुभानींचा दर्गा ।
मुक्त प्रवेश तेथे समस्त जातीवर्गा ।
हिंदूमुसलमानांना बांधिले एकाच धाग्यात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १५॥
सायंकाळी भजन ऐकता प्रभुमंदिरात ।
पडता जय गुरू माणिकचा कल्लोळ कानांत ।
चैतन्य बनून वाहे श्रीप्रभु नसानसांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १६॥
by Pranil Sawe | Nov 30, 2021 | Marathi
भाग सहावा
आज सकाळी श्रीप्रभुमंदिरातील काकड आरती आटोपून दुपारी परतीचा प्रवास म्हणून सामान आवरून घेतले. माणिक विहारच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रकाशदादाच्या टपरीवर चहा घेतला. आज महबूब सुबहानी दर्गा, माणिक पब्लिक स्कूल व सिद्धराज क्रिकेट ग्राऊंडचा फेरफटका मारायचे ठरविले होते. नाश्ता करून प्रभु दर्शन घेतले. आज श्रीप्रभु एकदम नखशिखांत नटला होता, इतका की त्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडावेत. रोजचा साज कसा असावा ही प्रेरणाही बहुतेक त्याचीच असावी. वस्त्रांची सुरेख पण तितकीच मनमोहक रंगसंगती, फुलांची सुबक मांडणी, शिरपेचातील सुवर्णफुल, गळाभर रूळणारी माळ श्रीप्रभुसमाधीची शोभा अजूनच वाढवते. विशेष प्रसंगी विशेषतः राजोपचार पूजेच्या वेळी प्रभुसजावटीचा थाट काही औरच असतो. असो.

श्रीप्रभूंचे गुणगान करीत श्रीव्यंकम्मा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्गा, शाळा व क्रिकेट ग्राऊंड प्रभुमंदिरापासून जवळच सातशे मीटरवर आहे. चालत निघालो, वाटेत एका मोटरसायकलवाल्याला विचारले, त्याने थेट मेहबुब सुबहानी दर्ग्यावर सोडले. माणिकनगराच्या उत्तरेला हा दर्गा आहे. श्रीमाणिकप्रभूंना त्यांचे मुसलमान भक्त महबूब सुबहानीचा अवतार मानीत. आपल्या समाधीनंतर हिंदू मुसलमानांमध्ये तंटा होऊ नये म्हणून श्रीमाणिकप्रभूंनी आपल्या डोक्यावरील मंदिल देऊन या ठिकाणी स्वतःचीच तुरबत उभारली. मुसलमान लोक स्वतःच्या धर्मपरंपरेनुसार येथे उपासना करतात. परिसरात छान चिंचेचे झाड आहे. माझ्या मनातील इतर धर्मांतील जरी काही अनादर असलाच तर तो दूर होऊन तो आदरामध्ये परावर्तीत होवो, अशी मनोमन प्रार्थना करून नतमस्तक झालो.

रस्ता ओलांडल्यावर दर्ग्याच्या विरुद्ध बाजूलाच माणिक पब्लिक स्कूल आहे. श्री सिद्धराज माणिकप्रभूंचे शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये झाले होते. असे दर्जेदार शिक्षण माणिकनगर परीसरातील मुलांनाही मिळावे म्हणून श्रीसिद्धराज माणिकप्रभूंनी १९७२ साली हे इंग्रजी माध्यमाचे माणिक पब्लिक स्कूल चालू केले. मुख्य प्रवेशद्वारावरून जाऊ का बरे असा विचार मनात आला. पण परवानगीशिवाय शाळेत आत जाणे योग्य वाटले नाही. म्हणून मोर्चा थेट पुढे क्रिकेट ग्राऊंडकडे वळवला. शाळा व क्रिकेट ग्राऊंड अगदी जवळ आहे. मुख्य रस्त्यातून डाव्या बाजूला वळण घेतानाच शाळेचे संगीत शिक्षक श्री अजयजी सुगावकर समोरच दिसले. त्यांनी हाक मारून बोलावले. आज शाळेत बहुतेक परिक्षा होती, त्यामुळे ते गडबडीत होते. पण त्याही परिस्थितीत त्यांनी अत्यंत आत्मीयतेने संगीताची खोली उघडून दाखवली. शाळा आपण पाहू शकता हे ही सांगीतले. शाळेच्या प्रांगणात आलो. समोरच श्रीमाणिकप्रभूंचा मनोवेधक पुतळा होता. १९७२ पासून ही शाळा १००% निकाल देत आली आहे. माणिकनगराबाहेरील श्रीमाणिकप्रभुभक्तांपेकी खूप जणांनी आपल्या मुलांना ह्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमंगला जागीरदार ह्या श्रीज्ञानराजप्रभु महाराजांच्या भगिनी आहेत. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या मॅडमशी माझ्या मागील दोन दिवसांत परीचय झाला. शाळेचा परिसर भव्य आहे. पुढील वेळीस सवड काढून शाळेला भेट द्यायचे ठरवून सिद्धराज क्रिकेट मैदानाकडे आलो. श्रीआनंदराज प्रभूंना क्रिकेटची फार आवड आहे. हे क्रिकेट ग्राऊंड जणू त्यांच्याच ध्यासाची स्वप्नपूर्ती आहे. हिरवेगार, गोलाकार असे मैदान पाहून मन हरखून जायला होते. येथे जिल्हास्तरीय सामने चालू होते. आताशा येथे घडलेले काही खेळाडू कर्नाटक राज्याकडून खेळताहेत. एकदोन षटकांचा खेळ पाहून परतीच्या वाटेवर लागलो. येताना पुन्हा एक मोटरसायकलवाला भेटला, त्याने प्रभुमंदिरापाशी सोडले. रूमवर जाऊन पुन्हा स्नान केले व सामानाची बांधाबांध करून पुन्हा श्रीप्रभुमंदिरात आलो. थोड्या वेळाने निघायचं म्हणून आतून गलबलायला झालं. प्रयत्न करूनही हुंदके थांबत नव्हते, शेवटी बांध फुटलाच. हलके होईस्तोवर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. करुणाकर, भक्तवत्सल प्रभू आपल्या प्रेमभरित नजरेने माझ्याकडे पाहत होता.
श्रीमाणिकनगरातून निघताना भक्त श्रीजींना सांगून निघतात. श्रीजीही त्यांना प्रसाद देतात. पुढच्या वेळेस येईपर्यंत हा प्रसाद जवळ ठेवायचा असतो. श्रीमाणिकनगरी पुन्हा आल्यावर हा प्रसाद खायचा अथवा खराब झाल्यास विसर्जीत करायचा. जणू काही पुढच्या भेटीस येईस्तोवर श्रीप्रभूने घेतलेली भक्ताची जबाबदारीच होय. मी श्रीजींना भेटावयास त्यांच्या घरी गेलो. माझी संध्याकाळी चारची गाडी होती. आदल्या दिवशी श्रीचैतन्यराज प्रभूंनी किती वाजता आणि कसे निघायचे ह्याचे मार्गदर्शन केले होतेच.

श्रीजी माध्यान्ह पुजेसाठी अजून यायचे होते. थोड्यावेळाने श्री आनंदराजप्रभूंच्या सौभाग्यवती सौ ममतावहिनी आल्या, मला पाहताच म्हणाल्या, आपण माणिकनगरांत पहिल्यांदा आलेले दिसताहेत. त्यांना नमस्कार करून माझी ओळख करून दिली. ह्या श्रीचिद्घनप्रभूंच्या मातोश्री, त्यामुळे ओळख करून देताना फारसे कष्ट पडले नाही. श्रीजी कुटुंबियांचे प्रभुभक्तांवर किती लक्ष असते हेही ह्यातून दिसते. श्रीजी येताच माध्यान्हपूजा सुरू झाली. नुकताच प्रभुमंदिरात अश्रूंचा बांध मोकळा झालेला तरी येथेही मनाची विचित्र परिस्थिती झाली होती. डोळ्यांच्या कडा सतत ओलावत होत्या. गेल्या चारपाच दिवसांत मी येथे खूपच रूळलो होतो, किंवा श्रीप्रभुचरित्रातून ज्याप्रकारे श्रीमाणिकप्रभु व त्यांच्या नंतरचे आचार्य उमगले कदाचित हा त्याचाच परिपाक असावा, येथून आज निघावेसेच वाटत नव्हते. मनातील द्वंद्व घनघोर होत चालले होते. समोर श्रीजी शिवलिंगावर पाण्याची संततधार धरत होते आणी मी डोळ्यांतून. पूजा आटोपल्यावर मूकपणे प्रसाद घेतला. श्रीजींना आज निघतोय हे सांगतानाही स्वर कातर झालेला. एकदा का सदगुरू माया करू लागला की त्याच्या मायेतून सहज अलिप्त होणं कठिण असतं. दुपारचा प्रसाद घ्यायला गेलो खरा पण घशाखाली फार काही उतरलं नाही. आत भावनेचा प्रचंड कोलाहल माजलेला. हात, ताट धुवून परत प्रभुमंदिरात आलो. कर्पूर आरती केली. श्रीप्रभूंच्या अपार मायेबद्दल, निर्व्याज्य प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व दर्शनासाठी पुन्हा लवकर बोलवण्याची विनंती केली. गाभाऱ्यात लोभसपणे विराजमान झालेल्या प्रभुला पाहून साष्टांग नमस्कार केला. श्रीभक्तकार्यकल्पद्रुम महामंत्राचा जयघोष करत जड अंतःकरणाने परतीच्या मार्गाला लागलो. मनात उपदेशरत्नमालेतील ओळी घोळत होत्या. चैतन्य देवा हीच प्रार्थना। एकचि तूं दिससी नाना.
श्रीमाणिकप्रभूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ह्या पवित्र भूमीत आपणांस वारंवार किंवा किमान एकदा तरी येण्याची प्रेरणा मिळो ह्या श्रीप्रभुचरणांच्या नम्र विनंतीसह, श्रीगुरू माणिक, जय गुरू माणिक….
समाप्त.
by Pranil Sawe | Nov 25, 2021 | Marathi
भाग पाचवा
आज रविवार, श्रीप्रभुसन्निध्यातला चौथा दिवस. आजही अगदी पहाटेच जाग आली, अगदी पावणेपाचलाच. एरव्ही घरी असताना प्रपंचात गढलेला माणूस थोडासा आळसावलेला असतो, पण ज्या स्थानांत चैतन्याची कारंजी थुईथुई नाचत असतात तेथे मनाबरोबर शरीरही ताजेतवाने असते. बाहेर येऊन श्रीप्रभुमंदिराच्या कळसाला पाहून नमस्कार केला. तयार होऊन पुन्हा काकड आरतीसाठी श्रीप्रभुमंदिरात पोहोचलो. आज आसमंतात सूर्य वेगवेगळे रंग भरत होता. प्रदक्षिणा झाल्यावर समोर पाहिले तर सूर्य नुकताच उगवत होता. महाद्वाराच्या कमानीतून लोभसपणे डोकावत होता. श्रीप्रभुमंदिर परीसरातून वेगवेगळ्या जागेतून मी सूर्याला महाद्वाराच्या तीन कमानीपैकी मधल्या कमानीत ठेवून फोटो काढण्याचा निष्फळ प्रयत्न केला, कितीतरी वेळ. जागा बदलल्या, मोबाईलचे कोन बदलले पण व्यर्थ. कदाचित मधल्या कमानीची,मुख्य जागा कोटिसूर्यांचे तेज असलेल्या, श्रीमाणिकप्रभुंची आहे, हेच जणू तो मला सुचवत होता. आजही पारिजातकाची ओंजळभर फुले आणून प्रभुमंदिरात दिली, अभिषेक संकल्प केला. श्रीप्रभुमंदिर गाभाऱ्यातील समया साफसफाईसाठी बाहेर आणल्या होत्या. एका माणसाला उचलायला जड होतील इतक्या मोठ्या त्या समया होत्या. मला ह्यात पितळेची छोटी फुले ठेवलेली दिसली. ह्याफुलांत वात लावतात. समई लावल्यावर वातीतून खाली ओघळणारे तेल ह्याने टाळता येते. छोट्या छोट्या गोष्टींतून खूप काही शिकता येते. मला ही संकल्पना खूप आवडली. आज श्रीप्रभूंचा साजही अत्यंत आकर्षक होता. लाल रंगाच्या वस्त्रांवर हिरव्या रंगाची सोनेरी नक्षीदार शाल श्रीप्रभूंची शोभा वाढवत होती. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील श्रीदत्तप्रभूंचे तैलचित्रही फारच सुंदर आहे.
आज सिद्धराजप्रभु आराधना होती. नाश्त्याला वेळ होता म्हणून व्यंकम्मा मंदिरात जाऊन आलो. आईच्या सान्निध्यात आज जरा जास्तच रंगाळलो. श्रीव्यंकम्मा मंदिराचे बांधकाम स्तिमित करत होते. कमानीचे दगड अत्यत सफाईने तासून बसवले आहेत. एकंदर शांत व प्रशस्त जागा शहराच्या कोलाहलापासून मला शांत करत होती. काल परमयोगिनी श्री व्यंकम्मा मातेचे चरित्र विकत घेतले, ते चाळत बसलो. घड्याळात लक्ष गेले, बापरे साडे नऊ झालेले. लगेच श्रीप्रभुमंदिर परीसरात आलो. श्रीजीमहाराज घराच्या व्हरांड्यात बसले होते. तेथे जाऊन त्यांना नमस्कार केला. सकाळी आणी संध्याकाळी श्रीजी थोडावेळ नित्य व्हरांड्यात बसतात, भक्तांना सहज उपलब्ध असतात. श्रीजींचं हे साधेपण मनास खूप भावलं. आज श्रीजी मुंबईच्या श्री शिरीषदादांशी काही महत्वाच्या विषयांवर बोलत होते. मला त्यांनी त्यांच्या ऑफीसात बसण्यास सांगीतले. आजवर कधीतरी झूम मिटींगमध्ये पाहिलेले श्रीजींचे ऑफीस प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. आत श्री माणिकप्रभु इत्यादींच्या तसविरीबरोबरच श्रीसिद्धराज माणिकप्रभूंचे भव्य तैलचित्र मन वेधून घेत होते. मी आत माझं नामस्मरण चालू ठेवल. श्रीसिद्धराज प्रभूंच्या डोळ्यांतून माया पाझरत होती आणि तीच माया हळूहळू माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या करत होती. श्रीमाणिकप्रभु व त्यांच्या नंतरच्या प्रत्येक उत्तराधिकाऱ्यानी स्वतःच घर उन्हात बांधून इतर जनांस आश्रय दिला, सावली दिली. सिद्धराजप्रभूंचे कार्य व लीला आठवून गद्गद व्हायला होत होते. तासाभराने श्रीजी ऑफीसात आले. माझ्याकडे कटाक्ष टाकून पहिला प्रश्न केला, ‘प्रणिल, आपने कुछ खाया?’ नेमका आजच माझा नाश्ता चुकला होता. प्रामाणिकपणे नाही म्हणालो, तसे मला घरात घेऊन गेले. सूनबाईंना मला आधी नाश्ता देण्यास सांगीतले. लगेचच चिवडा, सुशिला (हा कर्नाटकात कुरमुऱ्यांचा पोह्यासारखा बनविलेला पदार्थ) पेढे असा पोटभर नाश्ता मिळाला. वर गरमागरम चहा. व्यक्ती देण्याघेण्याने नव्हे तर आपल्या वागणूकीने, आचरणाने व प्रेमळ शब्दांनी मनात घर करते. श्रीजी आणि त्यांच्या परीवारातील सदस्यांशी जुळलेल्या स्नेहबंधाचे, अनेक प्रभुभक्तांच्या श्रीसंस्थानाशी जुळलेल्या नाळचे नेमके हेच मर्म आहे. पदोपदी प्रेम अनुभवायास मिळते. एकचि सर्वांतरी हो आत्मा… ह्या पदाची श्रीमाणिकनगरात जागोजागी प्रचिती येते. माध्यान्हकाळी श्रीप्रभूंना माधुकरी भिक्षेचा नैवेद्य दाखवला जातो. श्रीमाणिकप्रभु स्वतः माधुकरी मागून भिक्षान्न स्वीकारत होते, चरित्रात असा उल्लेख आहे. श्रीप्रभुसंस्थानाने आजही ती परंपरा जपली आहे. आजही श्रीप्रभुनैवेद्यात भोवताली पंचपक्वान्ने जरी असली तरी मध्यभागी झोळीतले भिक्षान्नच असते. दुपारच्या प्रसादामध्ये झोळीतले ही भिक्षा भक्तांना वाटली जाते.

आज सायंकाळी मुक्तिमंटपात श्रीसिद्धराजप्रभूंची आराधना होती. भजनाची आजही रेलचेल होती. श्रीप्रभुसंस्थानाचे तृतीय आचार्य श्रीमार्तंड माणिकप्रभु व चतुर्थ आचार्य श्रीशंकर माणिकप्रभूंचे एकत्र देवालय म्हणजे मुक्तिमंटप. शुभ्र संगमरवरी दगडांनी बांधलेला हा मुक्तिमंटप हा शिल्पकलेचा नितांत सुंदर नमुना आहे. श्रीसिद्धराज प्रभूंच्या दैदीप्यमान कारकिर्दीत हा मुक्तिमंटप १९७० साली बांधला गेला. श्रीमार्तंड माणिकप्रभु आणि श्री शंकरमाणिकप्रभु ह्यांच्या समाध्या दोन बाजूस आहेत आणि मधोमध चैतन्यलिंग महादेवाची स्थापना केली आहे. आराधनेचा कार्यक्रम ह्या मुक्तिमंटपातच पार पडला. आजही सर्वांना तीर्थ मिळाले. वेदांतातील अद्वैत सिद्धांताच्या तिर्थक्षेत्री, भजनानंदात न्हाऊन गेल्यावर, श्रीजींच्या हातून मिळालेले तीर्थ प्राशन करताना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘धन्य धन्य अति धन्य धन्य, आम्ही झालो पूर्णानंद’ असाच भाव होता.
सायंकाळी श्रीप्रभु पश्चिम क्षितीजावर मुक्तहस्ते रंग उधळत होता. गर्द जांभळ्या, काळ्या रंगाची ही मनस्वी उधळण पाहताना अगदी हरखून जायला होत होते. आजही श्रीजींच्या घरी भोजनाचे निमंत्रण सर्व भक्तांना होते. भारतीय बैठकीत, केळीच्या पानंवर भारतीय पद्धतीच्या भोजनाची मजा औरच आहे. कालच्या प्रमाणेच साग्रसंगीत भोजन होते. जेवल्यानंतरही शुद्ध घरगूती तुपाचा वास व स्निग्धता हातावर रेंगाळत होती. आज मुंबईच्या आयुर्वेदिक डॉक्टर जोशींचा परीवार पक्तींस साथसोबत करत होता.

जेवल्यानंतर श्रीप्रभुमंदिरात भजन होते. श्रीप्रभुमंदिरात जांभळ्या सतरंजीवर लाल गालीचा अंथरला होता. श्रीजींच्या बैठकीसाठी पिवळ्या रंगाची गादी तयार केली होती. मशालीच्या उजेडात, श्रीजींचे सवाद्य आगमन झाले. आरती, भजन सुरू झाले. आज मल्हारी म्हाळसाकांताचे भजन होते. जसजसा भजनाला रंग चढत होता, तसतसा वाद्यांचा गजर अधिक तीव्र होत होता. श्रीआनंदराज प्रभु आपल्या दैवीसुरांत सुरेल भजने म्हणत होते, श्री अजयजी ताना घेत होते. भजन टीपेस पोहोचल्यावर श्रीजीं हातात झांज घेऊन भजनरंगी रंगले. अवघा आनंद सोहळा. स्वर्गसुख येथे अनुभवता येते. ही वेळ संपूच नये असे वाटत होते. ह्या भजनकल्लोळाने श्रीप्रभुही आनंदला होता. सकाळी बांधलेली फुलांची पूजा रात्री उशीरापर्यंतही तशीच टवटवीत असते हे गेले चारही दिवस पाहिले होते. चैतन्याच्या सहवासात ती फुलेही टवटवीत राहत असावीत. कुरमुरे खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला, शेजारती झाली. श्रीप्रभुमंदिराची द्वारे बंद झाली. जो तो आपापल्या विश्रामस्थानी परतला. उद्या परत निघायचे म्हणून आज प्रभुमंदिर परिसरातच शरदाचं चांदणं पीत पायऱ्यांवर रेंगाळत बसलो. क्रमशः …
by Pranil Sawe | Nov 21, 2021 | Uncategorized
भाग चौथा
आज सकाळी सव्वापाचलाच जाग आली. एरव्ही अलार्म झाल्यावर पाच दहा मिनीटे तरी बिच्छान्यात रेंगाळणारा मी झटकन उठून बसलो, पावणेसहाला तयार होऊन काकड आरतीसाठी निघालो. आज गेस्टहाऊसच्या गेटमध्येच धक्क्यावर सात आठ वानरे बसली होती. आज शनिवार आणि वानरराज असे अवचित पुढ्यात आले. जय बजरंगबलीचा पुकारा करून कडेने सावकाश निघालो. बिचाऱ्यांनी काही त्रास दिला नाही. आज आसमंतात हलक्या धुक्याची चादर होती. हवेतील मंद गारवा मनास अजूनच प्रफुल्लीत करत होता. मुख्य प्रवेशद्वारावर आलो. कोणीही वाजवू शकणार नाही इतक्या अशक्य उंचीवर असलेल्या घंटेने लक्ष वेधले. ती इतक्या उंचावर का ह्याचे सुंदर विवेचन Manik Prabhu ह्या YouTube चॅनेलवर ‘प्रभुमंदिर का सिंहद्वार’ ह्या छोट्याशा व्हिडीयोतून मिळते. जीवनात आपण कितीही उंची गाठली, कितीही साध्य केलं तरी आपण सर्वशक्तीमान अशा श्रीप्रभुसमोर सदैव छोटे असतो, ह्या जगात सर्वात उंच, सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठा आणी सर्वात महान श्रीप्रभूच आहे, अशी छानशी संकल्पना ह्या उंचावर टांगलेल्या घंटेमागे आहे. श्रीप्रभुसंस्थानाने श्रीप्रभुमंदिर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांचे असे अनेक छोटे छोटे व्हिडीओ बनवले आहेत. श्रीचैतन्यराज प्रभूंच्या सुष्पष्ट आवाजातील हे व्हिडीओ ऐकणे हा एक सुखद अनुभव आहे. You Tube आणि फेसबुकवर हे व्हिडीओ आपणांस पाहता येतात. आज सकाळी मी लवकर आल्याने शांतता होती. आकाशात शेंदऱ्या रंगाची प्रभा होती. पश्चिमेला चंद्रमा अस्ताला जाण्याच्या तयारीत होता. सूर्य देव आपल्या किरणांनी श्रीप्रभुला स्नान घालण्यास तयार होत होते. मुख्य दरवाजा उघडल्यावर आत आलो. गाभाऱ्यात श्रीप्रभुसमाधीवर केवळ एक भगवे वस्त्र होते. समस्त योगियांचा राजा श्रीप्रभु त्या योगीरूपातही किती लडिवाळ आणि मोहक दिसत होता. आपण एकदा सद्गुरूच्या प्रेमात पडलो की तो ही मग आपल्या निरनिराळ्या रूपांनी प्रगटून आपल्या डोळ्यांचे पारणे फेडत राहतो. येथे आल्यावर पहिल्या दिवसांपासून श्रीप्रभु मला त्याच्या रंगात रंगवत होता, प्रभुभक्तीत असे रंगून जाणे ही वेगळी अनुभूती आहे. निवांत असल्यामुळे मी ती मनमुराद अनुभवत होतो. आजही अभिषेकाचा संकल्प केला. आज श्रीप्रभुसमाधीवर निळ्या रंगाचा साज होता. त्यावर जांभळ्या रंगाची, हिरव्या किनारीची व सोनेरी नक्षी असलेली रेशमी शाल पांघरली होती. गुलाब आणि निशीगंधाचा भरगच्च हार गळ्यात रूळत होता. वरील बाजूस गुलाबी रंगाची फुग्याची फुले छान, अलगदपणे रचली होती. माणिक रत्नाने जडवलेले सुवर्णफुल मस्तकी शोभून दिसत होते. त्यावर तुळशीचा तुरा श्रीप्रभुरूपास चार चांद लावत होता. गळ्यात टपोऱ्या मण्यांची माळ श्रीप्रभूंचे रूप अजूनच खुलवत होती. एकंदरीत श्रीप्रभूंची आजची सजावट मनाचा ठाव घेत होती. प्रभु जात्याच सुंदर, प्रभूंची सजावटही तितकीच सुंदर. कितीतरी वेळ श्रीप्रभूंचे हे गोड रूप पाहत बसलो. श्रीप्रभुला कुणाची नजर लागू नये म्हणून हळूच दोन्ही हाताची बोटे कानाजवळ नेऊन मोडली. असो, नित्य उपासना करून भंडारखान्यात जाऊन नाश्ता करून आलो. दोन दिवसांत भंडारखान्यातील बऱ्याच जणांचे चेहरे परिचयाचे झाले होते. येथील सेवेकरी वर्ग अत्यंत साफसूफ, मेहनती, सुहास्यवदन आणी वेळेची बंधन पाळणारा असा अनुभवास आला. वेद पाठशाळेत अध्ययन करणारे विद्यार्थी येथे नाश्ता व भोजनास येत असतात.

आज श्रीसिद्धराज प्रभुमहाराजांची पुण्यतिथी होती. साधारण साडेदहा अकराला कार्यक्रम सुरू होणार होता. माझ्याकठे दीड दोन तास होते. आज मी गुरूगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमावर जाऊन यायचे ठरविले होते. त्याप्रमाणे पुलावरून डाव्या हाताच्या गेटने संगमस्थानाकडे एकटाच निघालो. समोरच भारद्वाज पक्षाचे दर्शन घडले. माणिक नगराच्या दक्षिणेला गुरूगंगा वाहते व पूर्व दिशेकडून विरजा नदी येऊन आग्नेय दिशेस दोन्ही नद्यांचा संगम होतो. येथे छान घाट बांधला आहे त्यास पुष्करणी म्हणतात. सभोवताली वटवृक्षांची दाटी आहे. हा एकंदरीत नयनरम्य व मनास आत्यंतिक शांतीप्रदायक असा परिसर आहे. येथेच श्रीमाणिकप्रभूंची माता, श्रीबयाम्मामाता, श्रीप्रभूंचे वडीलबंधू श्रीहणमंतदादा महाराज, कनिष्ठ बंधू श्रीनृसिंहतात्या महाराज ह्यांच्या समाध्या आहेत. त्यांचे मनोभावे दर्शन घेतले. पुष्करणी तीर्थात खाली उतरून ते पवित्र जल अंगावर शिंपडले. परीसरातील झाडांवर पांढरे घुबड होते. गुरूगंगा नदीत तीच दोन बदके स्वच्छंदपणे विहार करत होती. ही जोडी मला रोज दिसायची. मोरांचा केकारव अगदी स्पष्ट ऐकू येत होता. अगदी जवळपासच कुठेतरी असावेत. परत मंदिरात जात असताना गेटमधून श्रीजींचे गोधन समोरून चालत नव्हे नव्हे, धावत, बागडत येत होते. मोकळ्या कुरणात चरण्याचा आनंद त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होता. त्यांना मार्ग प्रशस्त करून देऊन मी एक कडेला थांबलो.

यथावकाश श्रीप्रभुमंदिराच्या मुख्य दरवाज्याजवळ आलो. कानावर संबळाचा आवाज पडला. श्रीजी आपल्या घरातून मंदिरात येण्यासाठी निघाले होते. मी ही उत्साहाने श्रीजींपाठोपाठ निघालो. मुक्तिमंडपाजवळ मंदिरात श्रीसिद्धराज प्रभूंच्या तसविरीची मंत्रोच्चारात विधिति् पूजा केली गेली. समोरच शामियाना उभारला होता. श्रीप्रभु कटुंबीय व जमलेले भक्त सवाद्य भजनांत रंगले होते. पुजेची सांगता झाल्यानंतर आरती झाली व नंतर नवीन निर्माणाधीन असलेल्या श्रीसिद्धराज प्रभुसमाधीचे सर्वांनी दर्शन घेतले. संध्याकाळी साडेचारला श्राद्धकार्य सुरू झाले. श्रीजी व आनंदराजप्रभूंनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने वार्षिक श्राद्धविधि मंत्रघोषात पार पाडला. ब्राह्मणभोजन, दक्षिणा उपरांत आम्हासही तीर्थप्रसाद मिळाला. येथेही भजन म्हटले गेले. श्रीजींचे संपूर्ण कुटुंब ह्यात सहभागी होते.
संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर श्रीप्रभु कितीतरी रंगांची मुक्तपणे उधळण करीत होता, जांभळा, निळा, केशरी, राखाडी, गुलाबी, लाल, पिवळा. जणू माझ्या अंतरंगात सकलमताचे रंग भरत होता. मुक्तिमंडपाशेजारील औंदुबराखाली बसून श्रीप्रभुची ही चित्रकला पाहण्यात कितीतरी वेळ गेला. जागोजागी चैतन्याची अनुभूती येत होती.

सात सव्वासातच्या सुमारास श्रीजींच्या घरी भक्तमंडळी जमली होती. दर्शनी भागातल्या मंद दिव्यांनी श्रीजींची हवेली अत्यंत मनोहर दिसत होती. यथावकाश सर्वांना आत बोलावले गेले. वयस्कर नागरिकांना, ज्यांना खाली बसता येत नाही अशांना टेबलाची व्यवस्था केली होती. भारतीय बैठक घालून समोर केळीच्या पानांतून सर्वांना भोजन वाढले. चटण्या, कोशिंबीरी, कढी, भाज्या, वड्या, सांबार , शीरा वरण, भात, तूप असा समग्र बेत होता. सर्वांना जातीने काही हवे नको ते पाहिले जात होते, आग्रह होत होता. श्रीप्रभूंचा हा स्नेह अनुभवत पोटभर जेवलो. आज बाजूला श्रीप्रभुपदांना आपल्या पेटीने सूरसाज चढवणारे श्री माणिक पब्लिक स्कूलचे संगीत शिक्षक श्री अजयजी सुगांवकर होते. त्यांच्याशी ह्यायोगे ओळख झाली. एकंदरीत ही संगीत मेजवानी पार पडली.
भोजनानंतर श्रीप्रभु मंदिरात शनिवारचे भजन होते. लवकर जाऊन जागा पटकावली. श्रीप्रभुसमाधिसमोर लाल गालीचा अंथरला होता. समोर श्री ज्ञानराजप्रभूंच्या गादीची व्यवस्था करण्यात आली होती. थोड्या वेळाने दिवट्या मशाली सहित, भक्तकार्यकल्पद्रुम मंत्राच्या जयघोषात, श्रीजींचे आगमन झाले. आरती नंतर भजन सुरू झाले. आजपर्यंत ज्यांची भजने, पदे युट्यूबवर ऐकली होती ते श्रीआनंदराज प्रभुमहाराजही भजनाला उपस्थित होते. शनिवारचे सप्ताह भजन फारच रंगले. श्रीज्ञानराजप्रभूंना भजनात रंगलेले असताना त्यांच्या हाताची, देहाची हालचाल पाहणे हा अविस्मरणीय अनुभव होता. श्री आनंदराजप्रभूंची सुरांवरील हुकूमत, श्री अजयजींच्या ताना, तबला पेटीची जुगलबंदी, टाळ, झांचांचे कितीतरी वैविध्यपूर्ण आवाज हे सर्व वातावरण अद्भूत होते. येथे जीवाला मीपणाचा विसर पडतो. श्रीमाणिकप्रभूंच्या काळात भजने म्हणताना किती आनंदसोहळा असेल? मारुतीरायाला मनोभावे आळवून श्रीप्रभूंची शेजारती झाली. कुरमुरे खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला. अत्युच्च समाधानाचे गाठोडे बांधून मीही गेस्टहाऊसकडे वळालो. मनाच्या प्रफुल्लित अवस्थेत भजनातील ओळी ओठावर सहज रेंगाळत होत्या. निद्रा करी श्रीवनमाळी, नित्याहुनि निशी बहु झाली… क्रमशः…
Recent Comments