भाग चौथा

आज सकाळी सव्वापाचलाच जाग आली. एरव्ही अलार्म झाल्यावर पाच दहा मिनीटे तरी बिच्छान्यात रेंगाळणारा मी झटकन उठून बसलो, पावणेसहाला तयार होऊन काकड आरतीसाठी निघालो. आज गेस्टहाऊसच्या गेटमध्येच धक्क्यावर सात आठ वानरे बसली होती. आज शनिवार आणि वानरराज असे अवचित पुढ्यात आले. जय बजरंगबलीचा पुकारा करून कडेने सावकाश निघालो. बिचाऱ्यांनी काही त्रास दिला नाही. आज आसमंतात हलक्या धुक्याची चादर होती. हवेतील मंद गारवा मनास अजूनच प्रफुल्लीत करत होता. मुख्य प्रवेशद्वारावर आलो. कोणीही वाजवू शकणार नाही इतक्या अशक्य उंचीवर असलेल्या घंटेने लक्ष वेधले. ती इतक्या उंचावर का ह्याचे सुंदर विवेचन Manik Prabhu ह्या YouTube चॅनेलवर ‘प्रभुमंदिर का सिंहद्वार’ ह्या छोट्याशा व्हिडीयोतून मिळते. जीवनात आपण कितीही उंची गाठली, कितीही साध्य केलं तरी आपण सर्वशक्तीमान अशा श्रीप्रभुसमोर सदैव छोटे असतो, ह्या जगात सर्वात उंच, सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठा आणी सर्वात महान श्रीप्रभूच आहे, अशी छानशी संकल्पना ह्या उंचावर टांगलेल्या घंटेमागे आहे. श्रीप्रभुसंस्थानाने श्रीप्रभुमंदिर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांचे असे अनेक छोटे छोटे व्हिडीओ बनवले आहेत. श्रीचैतन्यराज प्रभूंच्या सुष्पष्ट आवाजातील हे व्हिडीओ ऐकणे हा एक सुखद अनुभव आहे.  You Tube आणि फेसबुकवर हे व्हिडीओ आपणांस पाहता येतात. आज सकाळी मी लवकर आल्याने शांतता होती. आकाशात शेंदऱ्या रंगाची प्रभा होती. पश्चिमेला चंद्रमा अस्ताला जाण्याच्या तयारीत होता.  सूर्य देव आपल्या किरणांनी श्रीप्रभुला स्नान घालण्यास तयार होत होते. मुख्य दरवाजा उघडल्यावर आत आलो. गाभाऱ्यात श्रीप्रभुसमाधीवर केवळ एक भगवे वस्त्र होते. समस्त योगियांचा राजा श्रीप्रभु त्या योगीरूपातही किती लडिवाळ आणि मोहक दिसत होता. आपण एकदा सद्गुरूच्या प्रेमात पडलो की तो ही मग आपल्या निरनिराळ्या रूपांनी प्रगटून आपल्या डोळ्यांचे पारणे फेडत राहतो. येथे आल्यावर  पहिल्या दिवसांपासून श्रीप्रभु मला त्याच्या रंगात रंगवत होता, प्रभुभक्तीत असे रंगून जाणे ही वेगळी अनुभूती आहे. निवांत असल्यामुळे मी ती मनमुराद अनुभवत होतो. आजही अभिषेकाचा संकल्प केला. आज श्रीप्रभुसमाधीवर निळ्या रंगाचा साज होता. त्यावर जांभळ्या रंगाची, हिरव्या किनारीची व सोनेरी नक्षी असलेली रेशमी शाल पांघरली होती. गुलाब आणि निशीगंधाचा भरगच्च हार गळ्यात रूळत होता. वरील बाजूस गुलाबी रंगाची फुग्याची फुले छान, अलगदपणे रचली होती. माणिक रत्नाने जडवलेले सुवर्णफुल मस्तकी शोभून दिसत होते. त्यावर तुळशीचा तुरा श्रीप्रभुरूपास चार चांद लावत होता. गळ्यात टपोऱ्या मण्यांची माळ श्रीप्रभूंचे रूप अजूनच खुलवत होती. एकंदरीत श्रीप्रभूंची आजची सजावट मनाचा ठाव घेत होती. प्रभु जात्याच सुंदर, प्रभूंची सजावटही तितकीच सुंदर. कितीतरी वेळ श्रीप्रभूंचे हे गोड रूप पाहत बसलो.  श्रीप्रभुला कुणाची नजर लागू नये म्हणून हळूच दोन्ही हाताची बोटे कानाजवळ नेऊन मोडली. असो, नित्य उपासना करून भंडारखान्यात जाऊन नाश्ता करून आलो. दोन दिवसांत भंडारखान्यातील बऱ्याच जणांचे चेहरे परिचयाचे झाले होते. येथील सेवेकरी वर्ग अत्यंत साफसूफ, मेहनती, सुहास्यवदन आणी वेळेची बंधन पाळणारा असा अनुभवास आला. वेद पाठशाळेत अध्ययन करणारे विद्यार्थी येथे नाश्ता व भोजनास येत असतात.

आज श्रीसिद्धराज प्रभुमहाराजांची पुण्यतिथी होती. साधारण साडेदहा अकराला कार्यक्रम सुरू होणार होता. माझ्याकठे दीड दोन तास होते. आज मी गुरूगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमावर जाऊन यायचे ठरविले होते. त्याप्रमाणे पुलावरून डाव्या हाताच्या गेटने संगमस्थानाकडे एकटाच निघालो. समोरच भारद्वाज पक्षाचे दर्शन घडले. माणिक नगराच्या दक्षिणेला गुरूगंगा वाहते व पूर्व दिशेकडून विरजा नदी येऊन आग्नेय दिशेस दोन्ही नद्यांचा संगम होतो. येथे छान घाट बांधला आहे त्यास पुष्करणी म्हणतात. सभोवताली वटवृक्षांची दाटी आहे. हा एकंदरीत नयनरम्य व मनास आत्यंतिक शांतीप्रदायक असा परिसर आहे. येथेच श्रीमाणिकप्रभूंची माता, श्रीबयाम्मामाता, श्रीप्रभूंचे वडीलबंधू श्रीहणमंतदादा महाराज, कनिष्ठ बंधू श्रीनृसिंहतात्या महाराज ह्यांच्या समाध्या आहेत. त्यांचे मनोभावे दर्शन घेतले. पुष्करणी तीर्थात खाली उतरून ते पवित्र जल अंगावर शिंपडले. परीसरातील झाडांवर पांढरे घुबड होते. गुरूगंगा नदीत तीच दोन बदके स्वच्छंदपणे विहार करत होती. ही जोडी मला रोज दिसायची. मोरांचा केकारव अगदी स्पष्ट ऐकू येत होता. अगदी जवळपासच कुठेतरी असावेत. परत मंदिरात जात असताना गेटमधून श्रीजींचे गोधन समोरून चालत नव्हे नव्हे, धावत, बागडत येत होते. मोकळ्या कुरणात चरण्याचा आनंद त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट जाणवत होता. त्यांना मार्ग प्रशस्त करून देऊन मी एक कडेला थांबलो.

यथावकाश श्रीप्रभुमंदिराच्या मुख्य दरवाज्याजवळ आलो. कानावर संबळाचा आवाज पडला. श्रीजी आपल्या घरातून मंदिरात येण्यासाठी निघाले होते. मी ही उत्साहाने श्रीजींपाठोपाठ निघालो. मुक्तिमंडपाजवळ मंदिरात श्रीसिद्धराज प्रभूंच्या तसविरीची मंत्रोच्चारात विधिति्‌ पूजा केली गेली. समोरच शामियाना उभारला होता. श्रीप्रभु कटुंबीय व जमलेले भक्त सवाद्य भजनांत रंगले होते. पुजेची सांगता झाल्यानंतर आरती झाली व नंतर नवीन निर्माणाधीन असलेल्या श्रीसिद्धराज प्रभुसमाधीचे सर्वांनी दर्शन घेतले. संध्याकाळी साडेचारला श्राद्धकार्य सुरू झाले. श्रीजी व आनंदराजप्रभूंनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने वार्षिक श्राद्धविधि मंत्रघोषात पार पाडला. ब्राह्मणभोजन, दक्षिणा उपरांत आम्हासही तीर्थप्रसाद मिळाला. येथेही भजन म्हटले गेले. श्रीजींचे संपूर्ण कुटुंब ह्यात सहभागी होते.

संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर श्रीप्रभु कितीतरी रंगांची मुक्तपणे उधळण करीत होता, जांभळा, निळा, केशरी, राखाडी, गुलाबी, लाल, पिवळा. जणू माझ्या अंतरंगात सकलमताचे रंग भरत होता. मुक्तिमंडपाशेजारील औंदुबराखाली बसून श्रीप्रभुची ही चित्रकला पाहण्यात कितीतरी वेळ गेला. जागोजागी चैतन्याची अनुभूती येत होती.

सात सव्वासातच्या सुमारास श्रीजींच्या घरी भक्तमंडळी जमली होती. दर्शनी भागातल्या मंद दिव्यांनी श्रीजींची हवेली अत्यंत मनोहर दिसत होती. यथावकाश सर्वांना आत बोलावले गेले. वयस्कर नागरिकांना, ज्यांना खाली बसता येत नाही अशांना टेबलाची व्यवस्था केली होती. भारतीय बैठक घालून समोर केळीच्या पानांतून सर्वांना भोजन वाढले. चटण्या, कोशिंबीरी, कढी, भाज्या, वड्या, सांबार , शीरा  वरण, भात, तूप असा समग्र बेत होता. सर्वांना जातीने काही हवे नको ते पाहिले जात होते, आग्रह होत होता. श्रीप्रभूंचा हा स्नेह अनुभवत पोटभर जेवलो. आज बाजूला श्रीप्रभुपदांना आपल्या पेटीने सूरसाज चढवणारे श्री माणिक पब्लिक स्कूलचे संगीत शिक्षक श्री अजयजी सुगांवकर होते. त्यांच्याशी ह्यायोगे ओळख झाली. एकंदरीत ही संगीत मेजवानी पार पडली.

भोजनानंतर श्रीप्रभु मंदिरात शनिवारचे भजन होते. लवकर जाऊन जागा पटकावली. श्रीप्रभुसमाधिसमोर लाल गालीचा अंथरला होता. समोर श्री ज्ञानराजप्रभूंच्या गादीची व्यवस्था करण्यात आली होती.  थोड्या वेळाने दिवट्या मशाली सहित, भक्तकार्यकल्पद्रुम मंत्राच्या जयघोषात, श्रीजींचे आगमन झाले. आरती नंतर भजन सुरू झाले. आजपर्यंत ज्यांची भजने, पदे युट्यूबवर ऐकली होती ते श्रीआनंदराज प्रभुमहाराजही भजनाला उपस्थित होते. शनिवारचे सप्ताह भजन फारच रंगले. श्रीज्ञानराजप्रभूंना भजनात रंगलेले असताना त्यांच्या हाताची, देहाची हालचाल पाहणे हा अविस्मरणीय अनुभव होता. श्री आनंदराजप्रभूंची सुरांवरील हुकूमत, श्री अजयजींच्या ताना, तबला पेटीची जुगलबंदी, टाळ, झांचांचे कितीतरी वैविध्यपूर्ण आवाज हे सर्व वातावरण अद्भूत होते. येथे जीवाला मीपणाचा विसर पडतो. श्रीमाणिकप्रभूंच्या काळात भजने म्हणताना किती आनंदसोहळा असेल? मारुतीरायाला मनोभावे आळवून श्रीप्रभूंची शेजारती झाली. कुरमुरे खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला. अत्युच्च समाधानाचे गाठोडे बांधून मीही गेस्टहाऊसकडे वळालो. मनाच्या प्रफुल्लित अवस्थेत भजनातील ओळी ओठावर सहज रेंगाळत होत्या. निद्रा करी श्रीवनमाळी, नित्याहुनि निशी बहु झाली… क्रमशः…

[social_warfare]