ज्ञानप्रबोध भाग तिसरा

वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,

ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस तिसरा

भगवद्गीतेसी करूनि नमन ।
तिस-या दिवसाचे विवेचन ।
टाकण्या भक्तापदरी ज्ञान ।
ज्ञानगुरू सरसावला ॥१॥

आहार, यज्ञ, तप, दान ।
उहापोह या अध्यायी जाण ।
याविषयीचे सम्यक ज्ञान ।
सांगतसे ज्ञानराजा ॥२॥

आहाराचेही असती तीन प्रकार ।
सात्विक, राजसिक, तामसिक आहार ।
प्रिय आहार आपापल्या प्रकृतीनुसार ।
प्रत्येक जीवास ॥३॥

यज्ञ, तप, दान ।
त्याचेही प्रकार तीन ।
भेद अर्जुनासी समजावीत ।
जगद्गुरू श्रीकृष्ण ॥४॥

जीवनात करावयाचे पंचयज्ञ ।
ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ ।
भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ ।
व्याख्या समजावीत ज्ञानराजा ॥५॥

आता आहाराचा विस्तार ।
सात्विक जनांचा विचार ।
कैसा भोजन प्रकार ।
वर्णिले समग्र ॥६॥

आयुष्य, बल आरोग्य, बुद्धी ।
सुख, प्रीतीची होई वृद्धी, ।
रूचकर, छान, स्निग्धी ।
सात्विकांचा तो आहार ॥७॥

कडू, आंबट, अतिगरम, खारट ।
कोरडे, जळजळीत आणि तिखट ।
दुःख, काळजी उत्पन्न करणारे ताट ।
राजसांना अतीप्रिय ॥८॥

अर्धकच्चे, शिळे, दुर्गंधीयुक्त ।
निरस, उष्टे, अपवित्र ।
परमात्म्यास देण्यास वर्जित
आहार तामसीजनांचा ॥९॥

ज्ञानप्रबोध भाग दुसरा

वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,

ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस दुसरा

दुस-या दिवसाचे विवेचन ।
श्रद्धेचे विस्तृत प्रकरण ।
ज्ञानराजा समजावतसे सोदाहरण ।
अज्ञानतम हरावया ॥१॥

विश्वास आणि श्रद्धेतील भेद ।
मनातील गोंधळाचा करूनि छेद ।
वेदांती मती करूनी अभेद ।
ज्ञानमार्तंड तळपतसे ॥२॥

ज्याची जशी श्रद्धा असे ।
तसा तो माणूस बनतसे ।
श्रद्धेचे प्रतिबिंब डोकावतसे ।
मानवी स्वभावात ॥३॥

घरातील असलेले वातावरण ।
अनुवंशीकता हे ही कारण ।
पूर्व जन्मातील संस्करण ।
श्रद्धेसी कारणीभूत ॥४॥

विचारांचे शब्दांशी नाते ।
शब्दांनी कृती घडते ।
कृतीतून सवय जडते ।
सवयीतून स्वभाव ॥५॥

स्वभावातून घडे भविष्यातील व्यक्तीमत्व ।
आणि म्हणूनच विचारांचे महत्व ।
उलगडूनि त्यातील गुह्यत्व ।
ज्ञानराज सांगतसे ॥६॥

सात्विक करीती देवांचे पूजन ।
राजस करीती यक्षादी अर्चन ।
तामसी करीती भूतप्रेतांसी आवाहन ।
श्रद्धेची ऐसी पडताळणी ॥७॥

श्रद्धेचे अनुमान लावण्यासाठी ।
उपासनाप्रकार घेई दृष्टी ।
कसली, कशाप्रकारे, कशासाठी ।
जाणता, कळो येई ॥८॥

सात्विक देवतेने आध्यात्मिक उन्नती ।
राजसी देवतेने भौतिक प्रगती ।
तामसी देवतेने दुस-यांची अधोगती ।
पूजाफल विविध ॥९॥

देवता अनेक, परी ईश्वर एक ।
अभिव्यक्ती अनेक, परी सत्ता एक ।
देह अनेक, परी चैतन्य एक ।
ज्ञानगुरू मनावर ठासवित ॥१०॥

पुढे दंभ आणि अहंकार ।
भेद यातील सांगे सविस्तर ।
विषय समजविण्याची तळमळ खरोखर ।
ज्ञानराज प्रभुरायाची ॥११॥

परमात्मा वसे आपुल्याच अंतरात ।
राजसी तामसी शरीरासी कष्टवीत ।
त्याने परमात्म्यास पीडा पोहोचत ।
दुस-या दिवसाची सांगता येथे ॥१२॥

ज्ञानप्रबोध भाग पहिला

वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२

ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस पहिला

व्हावी मानवास जीवन मुक्ती ।
वेदांत ज्ञानाची हीच प्राप्ती ।
ज्ञानराजे प्रज्वलीत केली ज्योती ।
वेदांत सप्ताह महोत्सवाची ॥१॥

कोरोना महामारीच्या काळात ।
खंड पडला महोत्सवात ।
पुन्हा एकदा उत्साहात ।
सप्ताह रंगला ॥२॥

वेदांचे संक्षिप्त विवरण ।
कर्म, उपासना, ज्ञान ।
कांडांची तीन प्रकरण ।
वेदांमध्ये सांगीतली ॥३॥

जीवा समाधान नोहे कर्मकांडे ।
तैसेचि नाही ते उपासनाकांडे ।
तृप्तीचा अनुभव मात्र ज्ञानकांडे ।
वेदांताचा गाभा जो ॥४॥

प्रभु परमात्मा स्वरूपाची जाण ।
जीव-ब्रह्माच्या ऐक्याचे प्रतिपादन ।
ज्ञान अंतरी रूजण्याचे नियोजन ।
केले वेदांत सप्ताहात ॥५॥

भगवद्गीतेचा मुख्य आधार ।
वेदांत सप्ताहास खरोखर ।
एकेका अध्यायावर प्रखर ।
प्रकाशझोत सप्ताहात ॥६॥

पुन्हा एकदा सिंहावलोकन ।
भगवद्गीता अध्यायांचे विवेचन ।
तीन षटकवार निरूपण ।
पूर्वतयारी भक्तजनांची ॥७॥

सतरावा अध्याय गीतेचा ।
श्रद्धात्रय विभाग योगाचा ।
ज्ञानार्जना पुरक जीवनशैलीचा ।
मार्ग सांगे परमात्मा ॥८॥

श्रद्धा जरी अंतरात ।
परी शास्त्रविधी उल्लंघीत ।
अशांची लक्षणे सांगावीत ।
अर्जुन पुसे कृष्णासी ॥९॥

देहाची जशी परिस्थिती ।
श्रद्धेची तैसी स्थिती ।
रजतमसत्व नित्य बदलती ।
एकच मानवी देहात ॥१०॥

रसाळ निरूपणाच्या आहुती ।
ज्ञानराज स्वहस्ते टाकती ।
ज्वाळा गीतायज्ञाच्या उठती ।
चेतविण्या भक्तांस ॥११॥

मन रमते नित्य माणिकनगरात

गुंतलो जरी प्रपंचाच्या मायाजाळात ।
गुंगलो जागरहाटीच्या कोलाहलात ।
गुरफटलो जरी मायेच्या व्यवहारात ।
मन मात्र रमते नित्य माणिकनगरात ॥१॥

पाहता श्रीमाणिकनगराची भव्य कमान ।
होई लागोलाग माझे, मन तेथेच उन्मन ।
कमानीतूनच शिरतो श्रीप्रभुच्या अंतरंगात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥२॥

पाहता श्रीप्रभुमंदिराचे भव्य सिंहद्वार ।
चूर चूर होई, आत्माभिमानाचा अहंकार ।
शरणागतीची भावना मग प्रकटे हृदयात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥२॥

पाहता श्रीमाणिकप्रभुंची समाधी ।
विटून जाई ह्या नश्वर देहाची उपाधी ।
प्रकटे प्रभु समोर द्वंद्वातीत रूपात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥३॥

पाहता समोरच श्रीदत्तप्रभुंची गादी ।
अद्वैत सिद्धांताची खळखळणारी नदी ।
सकलमत संप्रदाय प्रकटे सप्ताहभजनांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥४॥

पाहता गोल घुमटाकार, अद्भुत प्रभुमंदिर ।
सुवर्ण कलश जरी, पाया त्याचा मनोहर ।
घोर तपाची अनुभूती येई प्रत्येक दगडात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥५॥

पाहता प्रदक्षिणेत सर्वेश्वर, अखंडेश्वर ।
हृदयात निनादे शिवतत्वाचा जागर ।
श्रीदत्ततत्व प्रकटे सदाबहार औदुंबरात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥६॥

पाहता पुढे दत्ताची संगमरवरी मूर्ती ।
भिक्षान्न अवधूताची जाज्वल्य स्फूर्ती ।
भरोसाची प्रभुनिष्ठा, व्यक्त स्मारकात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥७॥

पाहता वाकून समाधिस्त मनोहर योगी ।
तळघरात जो चिरंतन आत्मसौख्य भोगी ।
ब्रह्मचर्य व्रताची ध्वजा घेऊन हातात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥८॥

पाहता प्रभु अभिमंत्रीत सटक्यांचे कक्ष ।
स्वातंत्र्यसंग्रामाची असे तेजोमय साक्ष ।
देशभक्तीचे रक्त मग दौडे नसानसांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥९॥

पाहता हात जोडलेला मुख्यप्राण मारूती ।
करे प्रकट दास्यत्वभावाची सगुण स्थिती ।
चैतन्याची अनुभूती येई प्रत्येक प्रदक्षिणेत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥१०॥

स्थापत्यकलेचा उत्कृष्ट आविष्कार मुक्तीमंटप ।
वसे ज्यात शंकरासहित मार्तंड सदगुरू भूप ।
श्रीसिद्धराजाची समाधीही त्याच परीसरात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥११॥

श्रीव्यंकम्मामातेचे मंदिरही भव्य विराट ।
श्रीदत्तात्रेयांच्या मधुमतीशक्तीचा जो घट ।
शक्त्यानुभूती देई क्षणैक विसावता ओसरीत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १२॥

बाजूलाच वायुपुत्राचे मंदिर अतिपुरातन ।
तैसाचि अश्वत्थाखाली कालाग्निरूद्र हनुमान ।
सदा दक्ष माणिकक्षेत्र अभिमान रक्षणात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १३॥

गुरूगंगा विरजेचा जेथे होई संगम ।
पुष्करणी तीर्थ तेथे बांधिले अनुपम ।
सकल तीर्थांचे पुण्य, स्नान करीता त्यात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १४॥

गावाबाहेर महबूब सुभानींचा दर्गा ।
मुक्त प्रवेश तेथे समस्त जातीवर्गा ।
हिंदूमुसलमानांना बांधिले एकाच धाग्यात ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १५॥

सायंकाळी भजन ऐकता प्रभुमंदिरात ।
पडता जय गुरू माणिकचा कल्लोळ कानांत ।
चैतन्य बनून वाहे श्रीप्रभु नसानसांत ।
मन माझे रमते नित्य माणिकनगरात ॥ १६॥

भेट माझ्या माणिकाची

भाग सहावा

आज सकाळी श्रीप्रभुमंदिरातील काकड आरती आटोपून दुपारी परतीचा प्रवास म्हणून सामान आवरून घेतले. माणिक विहारच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रकाशदादाच्या टपरीवर चहा घेतला. आज महबूब सुबहानी दर्गा, माणिक पब्लिक स्कूल व सिद्धराज क्रिकेट ग्राऊंडचा फेरफटका मारायचे ठरविले होते. नाश्ता करून प्रभु दर्शन घेतले. आज श्रीप्रभु एकदम नखशिखांत नटला होता, इतका की त्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडावेत. रोजचा साज कसा असावा ही प्रेरणाही बहुतेक त्याचीच असावी. वस्त्रांची सुरेख पण तितकीच मनमोहक रंगसंगती, फुलांची सुबक मांडणी, शिरपेचातील सुवर्णफुल, गळाभर रूळणारी माळ श्रीप्रभुसमाधीची शोभा अजूनच वाढवते. विशेष प्रसंगी विशेषतः राजोपचार पूजेच्या वेळी प्रभुसजावटीचा थाट काही औरच असतो. असो.

श्रीप्रभूंचे गुणगान करीत श्रीव्यंकम्मा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्गा, शाळा व क्रिकेट ग्राऊंड प्रभुमंदिरापासून जवळच सातशे मीटरवर आहे. चालत निघालो, वाटेत एका मोटरसायकलवाल्याला विचारले, त्याने थेट मेहबुब सुबहानी दर्ग्यावर सोडले. माणिकनगराच्या उत्तरेला हा दर्गा आहे. श्रीमाणिकप्रभूंना त्यांचे मुसलमान भक्त महबूब सुबहानीचा अवतार मानीत. आपल्या समाधीनंतर हिंदू मुसलमानांमध्ये तंटा होऊ नये म्हणून श्रीमाणिकप्रभूंनी आपल्या डोक्यावरील मंदिल देऊन या ठिकाणी स्वतःचीच तुरबत उभारली. मुसलमान लोक स्वतःच्या धर्मपरंपरेनुसार येथे उपासना करतात. परिसरात छान चिंचेचे झाड आहे. माझ्या मनातील इतर धर्मांतील जरी काही अनादर असलाच तर तो दूर होऊन तो आदरामध्ये परावर्तीत होवो, अशी मनोमन प्रार्थना करून नतमस्तक झालो.

रस्ता ओलांडल्यावर दर्ग्याच्या विरुद्ध बाजूलाच माणिक पब्लिक स्कूल आहे. श्री सिद्धराज माणिकप्रभूंचे शिक्षण ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये झाले होते. असे दर्जेदार शिक्षण माणिकनगर परीसरातील मुलांनाही मिळावे म्हणून श्रीसिद्धराज माणिकप्रभूंनी १९७२ साली हे इंग्रजी माध्यमाचे माणिक पब्लिक स्कूल चालू केले. मुख्य प्रवेशद्वारावरून जाऊ का बरे असा विचार मनात आला. पण परवानगीशिवाय शाळेत आत जाणे योग्य वाटले नाही. म्हणून मोर्चा थेट पुढे क्रिकेट ग्राऊंडकडे वळवला. शाळा व क्रिकेट ग्राऊंड अगदी जवळ आहे. मुख्य रस्त्यातून डाव्या बाजूला वळण घेतानाच शाळेचे संगीत शिक्षक श्री अजयजी सुगावकर समोरच दिसले. त्यांनी हाक मारून बोलावले. आज शाळेत बहुतेक परिक्षा होती, त्यामुळे ते गडबडीत होते. पण त्याही परिस्थितीत त्यांनी अत्यंत आत्मीयतेने संगीताची खोली उघडून दाखवली. शाळा आपण पाहू शकता हे ही सांगीतले. शाळेच्या प्रांगणात आलो. समोरच श्रीमाणिकप्रभूंचा मनोवेधक पुतळा होता. १९७२ पासून ही शाळा १००% निकाल देत आली आहे. माणिकनगराबाहेरील श्रीमाणिकप्रभुभक्तांपेकी खूप जणांनी आपल्या मुलांना ह्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमंगला जागीरदार ह्या श्रीज्ञानराजप्रभु महाराजांच्या भगिनी आहेत. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या मॅडमशी माझ्या मागील दोन दिवसांत परीचय झाला. शाळेचा परिसर भव्य आहे. पुढील वेळीस सवड काढून शाळेला भेट द्यायचे ठरवून सिद्धराज क्रिकेट मैदानाकडे आलो. श्रीआनंदराज प्रभूंना क्रिकेटची फार आवड आहे. हे क्रिकेट ग्राऊंड जणू त्यांच्याच ध्यासाची स्वप्नपूर्ती आहे. हिरवेगार, गोलाकार असे मैदान पाहून मन हरखून जायला होते. येथे जिल्हास्तरीय सामने चालू होते. आताशा येथे घडलेले काही खेळाडू कर्नाटक राज्याकडून खेळताहेत. एकदोन षटकांचा खेळ पाहून परतीच्या वाटेवर लागलो. येताना पुन्हा एक मोटरसायकलवाला भेटला, त्याने प्रभुमंदिरापाशी सोडले. रूमवर जाऊन  पुन्हा स्नान केले व सामानाची बांधाबांध करून पुन्हा श्रीप्रभुमंदिरात आलो. थोड्या वेळाने निघायचं म्हणून आतून गलबलायला झालं. प्रयत्न करूनही हुंदके थांबत नव्हते, शेवटी बांध फुटलाच. हलके होईस्तोवर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. करुणाकर, भक्तवत्सल प्रभू आपल्या प्रेमभरित नजरेने माझ्याकडे पाहत होता.

श्रीमाणिकनगरातून निघताना भक्त श्रीजींना सांगून निघतात. श्रीजीही त्यांना प्रसाद देतात. पुढच्या वेळेस येईपर्यंत हा प्रसाद जवळ ठेवायचा असतो. श्रीमाणिकनगरी पुन्हा आल्यावर हा प्रसाद खायचा अथवा खराब झाल्यास विसर्जीत करायचा. जणू काही पुढच्या भेटीस येईस्तोवर श्रीप्रभूने घेतलेली भक्ताची जबाबदारीच होय. मी श्रीजींना भेटावयास त्यांच्या घरी गेलो. माझी संध्याकाळी चारची गाडी होती. आदल्या दिवशी श्रीचैतन्यराज प्रभूंनी किती वाजता आणि कसे निघायचे ह्याचे मार्गदर्शन केले होतेच.

श्रीजी माध्यान्ह पुजेसाठी अजून यायचे होते. थोड्यावेळाने श्री आनंदराजप्रभूंच्या सौभाग्यवती सौ ममतावहिनी आल्या, मला पाहताच म्हणाल्या, आपण माणिकनगरांत पहिल्यांदा आलेले दिसताहेत. त्यांना नमस्कार करून माझी ओळख करून दिली. ह्या श्रीचिद्घनप्रभूंच्या मातोश्री, त्यामुळे ओळख करून देताना फारसे कष्ट पडले नाही. श्रीजी कुटुंबियांचे प्रभुभक्तांवर किती लक्ष असते हेही ह्यातून दिसते. श्रीजी येताच माध्यान्हपूजा सुरू झाली. नुकताच प्रभुमंदिरात अश्रूंचा बांध मोकळा झालेला तरी येथेही मनाची विचित्र परिस्थिती झाली होती. डोळ्यांच्या कडा सतत ओलावत होत्या. गेल्या चारपाच दिवसांत मी येथे खूपच रूळलो होतो,  किंवा श्रीप्रभुचरित्रातून ज्याप्रकारे श्रीमाणिकप्रभु व त्यांच्या नंतरचे आचार्य उमगले कदाचित हा त्याचाच परिपाक असावा, येथून आज निघावेसेच वाटत नव्हते. मनातील द्वंद्व घनघोर होत चालले होते. समोर श्रीजी शिवलिंगावर पाण्याची संततधार धरत होते आणी मी डोळ्यांतून. पूजा आटोपल्यावर मूकपणे प्रसाद घेतला. श्रीजींना आज निघतोय हे सांगतानाही स्वर कातर झालेला. एकदा का सदगुरू माया करू लागला की त्याच्या मायेतून सहज अलिप्त होणं कठिण असतं. दुपारचा प्रसाद घ्यायला गेलो खरा पण घशाखाली फार काही उतरलं नाही. आत भावनेचा प्रचंड कोलाहल माजलेला. हात, ताट धुवून परत प्रभुमंदिरात आलो. कर्पूर आरती केली. श्रीप्रभूंच्या अपार मायेबद्दल, निर्व्याज्य प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व दर्शनासाठी पुन्हा लवकर बोलवण्याची विनंती केली. गाभाऱ्यात लोभसपणे विराजमान झालेल्या प्रभुला पाहून साष्टांग नमस्कार केला. श्रीभक्तकार्यकल्पद्रुम महामंत्राचा जयघोष करत जड अंतःकरणाने परतीच्या मार्गाला लागलो. मनात उपदेशरत्नमालेतील ओळी घोळत होत्या. चैतन्य देवा हीच प्रार्थना। एकचि तूं दिससी नाना.

श्रीमाणिकप्रभूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ह्या पवित्र भूमीत आपणांस वारंवार किंवा किमान एकदा तरी येण्याची प्रेरणा मिळो ह्या श्रीप्रभुचरणांच्या नम्र विनंतीसह, श्रीगुरू माणिक, जय गुरू माणिक….

समाप्त.