by Pranil Sawe | Apr 25, 2022 | Marathi
ज्ञान आणि भक्तीचा अनुपम संगम अशी दिगंत कीर्ती असणाऱ्या श्रीमाणिकनगरच्या वेदांत सप्ताहाचे ह्यावेळेस सदेह साक्षीदार व्हायचे, अशी खूणगाठ दत्तजयंतीच्या वेळीसच मनात बांधली होती. श्रीप्रभु समाधी समोर तशी सविनय याचनाच केली होती. नोकरीच्या ठिकाणी आठवडाभर सुट्टीचे सोपस्कार श्रीप्रभुकृपेने विनासायास पार पडले. श्रीप्रभुच्या रंगात रंगून जाण्यासाठी, धुळवडीच्या दिवशीच (१८मार्च २०२२), रात्री मनाच्या प्रफुल्लित अवस्थेत, श्रीमाणिकनगरी जाण्यासाठी कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये पाऊल ठेवले. योगायोगानेच ठाण्याचे श्री. रणदिवे आणि श्री. फणसे कुटुंब सोबतीला होते. श्रीप्रभुंच्या लीलांचे गुणगान करत कलबुर्गीस (आधीचे नाव गुलबर्गा) उतरलो. तेथून यथावकाश हुमणाबाद व पुढे श्रीमाणिकनगरी साधारणपणे सकाळी साडेदहाच्या सुमारास येऊन पोहोचलो. श्रीजी म्हणतात तसे, प्रपंचाचे गाठोडे श्रीमाणिकनगराच्या कमानीबाहेरच ठेऊन दिले. रिक्त मनाने श्रीमाणिकनगरस्थित गुरुगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमाप्रमाणेच, ज्ञान आणि भक्तीचा संगम असलेल्या वेदांत सप्ताहाच्या खळखळणा-या प्रवाहात यथेच्छ डुंबण्यास आतूर झालो. तसे पाहता, ज्ञान आणि भक्तीची ही सरीता श्रीमाणिकनगरी नित्य प्रवाहित होत असते, पण वेदांत सप्ताहाच्या वेळी ती दुथडी भरुन वाहत असते. जिज्ञासूंनी येथे मनसोक्त डुंबावे, आपली अज्ञानाची घागर रीती करून ज्ञान जलाने ती भरूभरुन घ्यावी. अखंड ज्ञानदान हे श्रीमाणिकनगर संस्थानाचे परमविशेष आहे.
महाराष्ट्रातील उकाड्याने त्रस्त झालो होतो पण, येथील वातावरण सुखद होते. मोरांचे केकारव ऐकून माझ्याही मनाचा पिसारा अत्यानंदाने फुलत होता. अनेक माकडेही आनंदाने इकडून तिकडे उगाचच उड्या मारत होती. जणू ती मला माझ्या मनाच्या चंचलतेचीच जाणिव करुन देत होती. माणिकविहारच्या दर्शनी भागातच, सर्व आस्तिक महाजनांचे स्वागत करणारा फलक मन वेधून घेत होता. माणिकविहारच्या काऊंटरवर राहाण्याच्या व्यवस्थेबद्दल चौकशी केली असता, ती यात्री निवासमध्ये असल्याचे कळले. येथील यात्रीव्यवस्था नेहमीच चोख असते. वेदांत सप्ताहाच्या सुमारे तीन आठवडे आधी श्रीचैतन्यराज प्रभुंनी फोन करून कधी, कोण, किती जण येणार? पारायणास बसणार ना? वैगरे चौकशी केली होतीच. काटेकोर नियोजनाचे सुंदर प्रतीबिंबच एकंदर व्यवस्थापनेतून सर्वत्र दिसून येत होते. यात्री निवासात एका खोलीत पाच जणांच्या रहाण्याची व्यवस्था केली होती. गाद्यांवर अंथरलेल्या चादरी स्वच्छ (शुभ्र) होत्या. पिण्याच्या पाण्याचे भरपूर कॅन्स भरून ठेवले होते. आंघोळीसाठी गरम पाणी एका मोठ्या भांड्यात उकळत होते. भक्तांच्या सोयीसाठी चोवीस तास एक मदतनीस व एक सफाई कामगार अगदी शेवटच्या दिवसापर्यंत होते. “अतिथी देवो भव” हे वाक्य श्रीसंस्थानातील प्रत्येक जण येथे नित्य जगत असतो. “सर्व रुपे हा श्री प्रभु जाण” ह्या महावाक्याचे संस्करण श्रीमाणिकनगरातल्या प्रत्येक सेवकांवर झालेले आपणांस पदोपदी अनुभवायास येते. वेदांत सप्ताहात श्रीगुरुचरित्र तसेच श्रीमाणिक प्रभु चरितामृताचे पारायण असल्यामुळे अनेक दत्तभक्तांची मांदियाळीच येथे जमली होती. बहुतेक ज्येष्ठ नागरिक होते पण, प्रत्येकात सळसळता उत्साह होता. पारायणासाठी आलेल्या, नव्वदीच्या घरात असलेल्या, काणेमामांना पाहताच, श्रीप्रभु कुणास, कशी प्रेरणा देतो, हे पाहून स्तिमीत व्हायला होत होते. जणू काही इतक्या तरूणांत मी एकटाच म्हातारा होतो. असो…सामान झटकन लावून, स्नानादी कर्मे आटपून, पुढच्या वीस मिनिटांत श्रीप्रभु मंदिराच्या वाटेवर चालूही लागलो. श्रीमाणिकनगरीच्या कमानीतून प्रवेश करताच श्रीप्रभुभेटीची तीव्र ओढ आपल्याला स्वस्थ बसू देतच नाही.
गुरुगंगेच्या प्रवाहात अनेक बदके विहरत होती. मागच्या वेळी आलो होतो त्यापेक्षा आज खूपच जास्त होती. माकडे, मोर, बदके, वटवाघळे अशा अनेक पशूपक्ष्यांनाही श्रीमाणिकनगर हे जणू काही आपले हक्काचे घरच वाटत असावे. पुलावरून पुढे सिंहद्वारातून श्रीप्रभु मंदिराच्या मुख्य पटांगणात आलो. प्रवेशद्वारावर भगवे झेंडे डौलाने फडकत होते. आनंद मंटप, कैलास मंटप ओलांडून श्रीप्रभु समाधीसमोर कधी उभा राहिलो ते माझे मलाच कळले नाही. वस्त्रांच्या मनमोहक रंगसंगतीत, फुलांच्या नयनरम्य साजात श्रीप्रभु अजूनच लोभस वाटत होता. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करून डोळेभरून त्यास पाहिले. परस्पर भेटीचा आनंद अनुभवला. श्रीप्रभुमंदिर परीसरातील श्री सर्वेश्वर महादेव, औदुंबर, श्रीदत्तात्रेय, भरोसाची समाधी आणि श्रीमनोहर माणिकप्रभु समाधी, जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक असणारे सटक्यांचा कक्ष आणि श्रीमुख्यप्राण मारुतीचे मनोभावे दर्शन घेतले. श्रीप्रभुमंदिरास प्रदक्षिणा घालून शरीरास व मनास ऊर्जावान (चार्ज) केले. इथली सकारात्मक ऊर्जा आणि स्पंदनं आपल्या चित्तवृत्तीला क्षणार्धात प्रफुल्लित करतात आणि मन अंतर्बाह्य शांततेचा अनुभव करू लागतं. थोडावेळ श्रीप्रभुशी मौन संवाद साधून मुक्तिमंटपात श्रीमार्तंड माणिकप्रभु, चैतन्यलिंग आणि श्रीशंकर माणिकप्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले. पुढे नव्याने बांधलेल्या श्रीसिद्धराज माणिकप्रभुंच्या समाधी समोर नतमस्तक झालो. नंतर श्रीजींच्या घरी आलो. ओसरीत श्रीजी, श्री आनंदराज, श्रीचैतन्यराज, श्रीचिद्घन प्रभु एकत्रच भेटले. श्रीजींच्या घरी आलेल्या कोणताही प्रभुभक्ताचे अतिशय आत्मियतेने स्वागत केले जाते. तो आनंद आपण श्रीप्रभुपरिवारातील प्रत्येक सदस्याच्या देहबोलीतून सहज टीपू शकतो. असो…श्रीप्रभुमंदिरात दुपारचा महाप्रसाद घेऊन यात्री निवासमध्ये परतलो.
एव्हाना खोलीतले इतरजणही आले होते. कोल्हापूरचे साधले, कुलकर्णी, सांगलीचे कुलकर्णी आणि पुण्याचे पेटकरकाका अश्या ज्येष्ठांचा सहवास लाभला. दुपारी थोडासा आराम केला. चारच्या सुमारास चहा आला. सर्व जण चहाला जमले. अनेकजण महाराष्ट्रातील विविध भागांतून वेदांत सप्ताहासाठी आलेले. बरेचसे मागच्या पारायणाच्या आठवणींना उजाळा देत होते. प्रत्येकाचे वेगवेगळे कथाकथन गरमागरम चहाची घोटागणीक लज्जत वाढवत होता. दोन कप चहा घेतला. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. माझ्यासारखा एखाददुसरा पहिल्यांदाच सहभागी होत होता. सकलमत संप्रदायात कुठलाही भेदभाव नाही, ह्याचा पदोपदी अनुभव आपल्याला श्री माणिकनगरात येतो. जय गुरु माणिक हे तीन शब्द एकमेकांना प्रभुप्रेमाच्या एकाच माळेत सहजपणे गुंफतात.
संध्याकाळी पुन्हा प्रभुमंदिरात आलो. क्षितीजावर श्रीप्रभु आपल्या चित्रकलेचं सुंदर प्रदर्शन मांडून बसला होता. मुक्तिमंटपाच्या बाजूलाच असलेल्या औदुंबराखाली बसून, सायंकाळी श्रीप्रभुच्या चैतन्याच्या ह्या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होणे मला खूप भावतं. श्रीमाणिकनगरातील अनेक आवडत्या जागांपैकी ही माझी एक आवडती जागा. जीवनात अनेक आनंदाचे क्षण देणाऱ्या श्री प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करताना येथे गहिवरायला होतं, मन आनंदाने उचंबळून येतं. भावनांच्या ह्या कल्लोळात कानांत श्रीमार्तंडप्रभुंची श्रीआनंदराज प्रभुंनी आपल्या सुमधुर सुरांनी सजवलेली पदे गुंजत असतात. धन्य धन्य अती धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद…
दिवेलागणीला भक्तकार्यासाठी पुन्हा श्रीजींच्या घरी आलो. भक्तकार्यानंतर सर्व भक्तांना उद्यापासून सुरु होणाऱ्या पारायणासंदर्भात व नंतरच्या आयोजनाबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या गेल्या. तदनंतर प्रभुप्रसाद घेऊन शनिवारच्या भजनात सहभागी झालो. भजनानंतर श्रीप्रभुला निजवून पटांगणात आलो. वेदांत सप्ताहानिमित्त केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे श्रीप्रभुमंदिर परीसर अधिकच शोभायमान दिसत होता. उद्यापासून सुरु होणाऱ्या वेदांत सप्ताहसाठी संस्थानाच्या कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. स्वतः श्रीजीही सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून होते. कालच्या प्रवासाच्या शीणामुळे म्हणा किंवा उद्याच्या वेदांत सप्ताहाच्या ओढीने म्हणा, यात्रीनिवासात येऊन स्वत:ला निद्रादेवीच्या हवाली केले….
क्रमशः…
by Pranil Sawe | Apr 8, 2022 | Marathi, Uncategorized
वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस सातवा

आधी श्रीगुरूपरंपरेचा जयजयकार ।
नंतर भगवद्गीतेसी नमस्कार ।
गीतायज्ञाच्या पूर्णाहूतीस तयार ।
ज्ञानराजा होतसे ॥१॥
गीता म्हणजेच मधूर गीत ।
परमात्म्याच्या मुखातून उपजले साक्षात ।
वर्णिले अगदी कमीतकमी शब्दांत ।
गीतेस ठासवा हृदयात ॥२॥
कर्माशिवाय नाही भक्तीयोगाची पात्रता ।
भक्तीशिवाय नाही ज्ञानयोगाची योग्यता ।
ज्ञानायोगानेच होई मुक्तीची सिद्धता ।
रहस्य समजावितसे ज्ञानराजा ॥३॥
प्रभुपरमात्मा आहे जरी अरूप ।
उलगडवून दाखवितसे त्याचे स्वरूप ।
रसाळ वाणीने समाधान ज्ञानगुरूभूप ।
करीतसे समस्त भक्तांचे ॥४॥
अरूपातूनच सर्व रूपे साकारतात ।
नाम-रूपात होई परमात्मा सीमित ।
परी प्रभुपरमात्मा तो भेदरहित ।
ॐ तत् सत् नाम जयाचे ॥५॥
वैदिक सिद्धांतांस मानती जे जन ।
शास्त्रसंम्मत तप, यज्ञ आणि दान ।
प्रथम करोनि ॐ काराचे उच्चारण ।
प्रारंभ करीती विधीसी ॥६॥
ॐ हेच सर्व मंत्रांचे आदिबीज ।
ॐकारातूनच सृष्टीचे झाले उपज ।
समजावितसे ॐकारस्वरूप सहज ।
चारी वेदही ॐकाराचे आख्यान ॥७॥
जगताचा अनुभव तीन अवस्थेतून ।
जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतून ।
जीव अनुभवतो त्या त्या जाणिवेतून ।
भेदाभेद निरूपण ॥८॥
विश्व म्हणती जागृतावस्था अभिमानी ।
तैजस म्हणती स्वप्नावस्था अभिमानी ।
प्राज्ञ म्हणती सुषुप्ती अवस्थाभिमानी ।
व्यक्तीगत स्तरावरील अनुभव ॥९॥
अ निघे तो नाभीतून ।
ऊ प्रकटे हा हृदयातून ।
म झंकारे ओठ मिटून ।
ॐकारातच जागृतीस्वप्नसुषुप्ती ॥१०॥
दोन ॐ कारातील शांतीस ।
दोन ॐ कारातील मौनास ।
तुरीया अवस्था म्हणावे तीस ।
तेच परमात्म्याचे स्वरूप ॥११॥
भागवतचे पारायण वेदांत सप्ताहात ।
रासक्रिडा त्यात खासकरून अंतर्भूत ।
दोन गोपींमध्ये एक कृष्ण खेळत ।
दोन ॐकारातील तोच परमात्मा ॥१२॥
विष्णू प्रकटे अ मधून ।
शिव प्रकटे ऊ मधून ।
ब्रह्मा प्रकटे म मधून ।
दत्तात्रेय स्वरूप ॐकार ॥१३॥
तत् नावाने परमात्म्यास स्मरून ।
यज्ञ-तप-दान इत्यादि क्रिया करून ।
मनी कुठलीही इच्छा न धरून ।
करीती कर्मे मोक्षार्थी ॥१४॥
वर्तुळात छोटे वर्तुळ काढून ।
छोट्या वर्तुळास जग मानून ।
मोठ्या वर्तुळास परमात्मा समजून ।
तत् स्वरूप समाजावितसे ॥१५॥
जेथे दाखविणे श्रेष्ठत्व ।
आणि परमात्म्याचे अस्तित्व ।
प्रकटीकरण जेथे प्रशस्त ।
सत् शब्दप्रयोग होतसे ॥१६॥
यज्ञ, तप, दानातील स्थिती ।
परमात्म्यासाठी जी कर्मे करती ।
सत् शब्द त्यासच म्हणती ।
जाणावे निश्चये ॥१७॥
शेवटचा श्लोक सतराव्या अध्यायाचा ।
श्रद्धासंबंध उपक्रम आणि उपसंहाराचा ।
आतील मजकूर ह्यातील सामंज्यसाचा ।
उत्तम व्याख्र्यान अध्यायाचे ॥१८॥
श्रद्धेशिवाय केलेले होम हवन ।
तैसेच तप आणि दिलेले दान ।
आणि काही शुभकार्य असेन ।
सर्वही ते असत् ॥१९॥
त्याचे फळ ना इहलोकात ।
ना मिळे परलोकात ।
असत् कर्माची परीणीती दुःखात ।
ज्ञानराज समजावीत ॥२०॥
अत्यंत श्रद्धापूर्वक कार्याचे निर्वहन ।
सात्विक आहार-यज्ञ-तप-दान ।
आदी अंती परमात्म्याचे नामस्मरण ।
सकल कार्यांत साधिजे ॥२१॥
सतराव्या अध्यायाचे समजावोनी सार ।
तदनंतर करोनि श्रीकृष्णाचा जयजयकार ।
वेदांत सप्ताहाचा करोनि उपसंहार ।
ज्ञानामृत पाजविले ॥२२॥
अनुपम सप्ताह सोहळा वेदांत ।
द्वैतभावनेचा करी समूळ अंत ।
अद्वैतभाव प्रकटवी सकल हृदयांत ।
ज्ञान मार्तंड तळपतसे ॥२३॥
संपूर्णम्
by Pranil Sawe | Apr 6, 2022 | Marathi, Uncategorized
वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस सहावा

आधी श्रीगुरूपरंपरेस वंदून ।
नंतर भगवद्गीतेसी नमून ।
आधीची उजळणी करून ।
गीतायज्ञ धडाडला ॥१॥
दान, तप, यज्ञ ।
हेच मानवाचे कर्तव्य ।
पवित्र करूनि धन्य ।
मानवा करीतसे ॥२॥
पंचभूत यज्ञातील शेष ग्रहण ।
करूनि देहाचे करावे समाधान ।
स्वतःपुरता शिजवून करिता भक्षण ।
पाप भक्षिल्यासमान होय ॥३॥
दानाचे प्रकरण चालवित ।
अनंत फायदे गिनवित ।
उदाहरणे देई अपरिमीत ।
ज्ञानराजा गुरूसार्वभौमा ॥४॥
अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणाचे क्षालन ।
प्रकृतीबरोबरची समरसता अनुभवे जाण ।
सामाजिक न्यायासही हेच कारण ।
फायदे अनेक दानाचे ॥५॥
दानात दान अन्नदान ।
सर्वश्रेष्ठ तेच जाण ।
तृप्ती होऊनि समाधान ।
केवळ अन्नदानानेच ॥६॥
दान देणे माझे कर्तव्य आहे ।
अंतरी ही भावना उपजली आहे ।
देश, कालही दानासी उत्तम आहे ।
पहावे नित्य दानसमयी ॥७॥
पात्रता पहावी समोरच्याची तपासून ।
उपकार न करणाऱ्यास शोधून ।
दान करावे मग मनापासून ।
लक्षण सात्विक दानाचे ॥८॥
क्लेशपूर्वक जे करीती दान ।
प्रत्युपकाराचा हेतू मनी ठेवून ।
अथवा फळाची अपेक्षा धरून ।
केलेले दान राजस ॥९॥
अयोग्य काळी, योग्य सत्कारावीण ।
उपमर्द करूनि, अयोग्य ठिकाण ।
कुपात्री केलेले सकळ दान ।
तामस केवळ जाणावे ॥१०॥
राहता यज्ञ-दान-तपात काही न्यून ।
सुधारण्याची परमात्मा सांगे खूण ।
सश्रद्धे करिता भगवंताचे नामस्मरण ।
सात्विक होय सकळही ॥११॥
तेवीसावा श्लोक अत्यंत महत्वाचा ।
ॐ तत्सतचा घनीभूत साचा ।
ज्ञानराजाची गोड मधूर वाचा ।
अमृतसिंचन करीतसे ॥१२॥
ज्याच्या मननाने येई त्राण ।
मंत्र त्यासी म्हणती विद्वज्जन ।
ॐ तत्सत् महामंत्र जाण ।
ज्ञानगुरू प्रतिपादतसे ॥१३॥
ॐ असे अक्षर ।
ॐ असे स्वर ।
ॐ ध्वनी मधुर ।
ॐ निशाणीही ॥१४॥
ॐ तत्सतचे स्वरूप ।
उदाहरणे देऊन अमुप ।
परमात्म्याचे वास्तविक रूप ।
ज्ञानगुरू सहज उलगडतसे ॥१५॥
परमात्मा हा अनादी अनंत ।
अस्तित्व ही अनादी अनंत ।
परमात्मा म्हणजेच अस्तीत्व ।
भेद मिटवी ज्ञानराजा ॥१६॥
ॐतत्सतचे करूनि उच्चारण ।
ब्रह्मदेवे सृष्टी निर्मिली जाण ।
मुख्यत्वे यज्ञ, वेद, ब्राह्मण ।
निर्मिली ब्रह्मदेवे ॥१७॥
ब्राह्मण म्हणजे नेमके काय ।
सविस्तर व्याख्या करीत जाय ।
ब्रह्मासी जाणणारा ब्राह्मण होय ।
अज्ञान तिरोहीत ज्ञानमाऊली ॥१८॥
आम्हा अज्ञानी लोकांची धडपड ।
ह्या जडजीवाची होतसे परवड ।
प्रभुकृपे लाभला ज्ञानराज आधारवड ।
धरून ठेवणे हितकर ॥१९॥
by Pranil Sawe | Apr 5, 2022 | Uncategorized
वेदांत सप्ताह महोत्सव – २०२२,
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस पाचवा

प्रथम वंदुनि श्रीगुरूपरंपरा ।
श्रीभगवद्गीतेसी करूनि नमस्कारा ।
लोपविण्या अज्ञानाच्या अंधारा ।
ज्ञान मार्तंड उगवला ॥१॥
चार दिवसांची उजळणी ।
विस्मृतीच्या कुंभास झळाळी ।
ज्ञानामृत पाजण्यास चंद्रमौळी ।
अमृतकुंभ घेऊन उभा ॥२॥
आरंभी योगाची महती ।
ज्ञानगुरू भक्तांस सांगती ।
परमात्म्याशी संबंधीत कृती ।
तीस योग म्हणती ॥३॥
कालच्या कायिक तपानंतर ।
आज वाणीच्या तपावर ।
सविस्तर विवेचन ज्ञानगुरूवर ।
सोदाहरण करीतसे ॥४॥
वाणीचे महत्व अपार ।
मानवाचा सर्वोत्तम अलंकार ।
मनुष्याबद्दलची धारणा वाणीनुसार ।
सदैव होतसे ॥५॥
प्राणियांस दिधला ध्वनी ।
मानवास दिधली वाणी ।
दिधला विशेष गुणी ।
केवळ मानुष्यास ॥६॥
जिव्हा जैसी कर्मेंद्रिय ।
तैसीच ती ज्ञानेंद्रिय ।
सर्व सुखाची सोय ।
तपविता वाणीसी ॥७॥
वाणीनेच पोपट राही पिंज-यात ।
मौनी बगळा स्वच्छंदे विहरत ।
वाणीस ठेवणे सदैव अनुशासनात ।
तप दिव्य वाणीचे ॥८॥
वाणीने महाभारत घडले ।
वाणीनेच रामायण घडले ।
वाणीनेच घडले बिघडले ।
सांगतसे ज्ञानराजा ॥९॥
पुढे सांखे संवादातील भेदाभेद ।
उत्तम संवाद, मध्यम संवाद ।
अधम संवाद आणि निंदापवाद ।
स्पष्टीकरण समस्ताचे ॥१०॥
जे दुसऱ्यास न दुखवेन ।
प्रिय हितकारक यथार्थ भाषण ।
प्रभुचे नाम, वेदशास्त्रांचे पठण ।
हेच तप वाणीचे ॥११॥
कायिक तप सहज साधेन ।
वाचिक तप त्याहून कठीण ।
मानसिक तप सर्वांत कठीण ।
महत्व मानसिक तपाचे ॥१२॥
माकडाची उपमा मनास देऊनि ।
चंचलता स्वभाव सांगे समजावूनि ।
मनाच्या अंकित काया, वाणी ।
मनास ठेवावे काबूत ॥१३॥
मनाची प्रसन्नता, शांत भाव ।
अखंड प्रभु चिंतण्याचा स्वभाव ।
मनाचा निग्रह, अंतरीचा पवित्रभाव ।
हेच तप मनाचे ॥१४॥
फळाची इच्छा न करता ।
योगी करिती सश्रद्धा अत्यंता ।
सात्त्विक तप तयासीच म्हणता ।
जाणावे सुजना ॥१५॥
मानसन्मान पूजा, सत्कारासाठी ।
पाखंडीपणाने करिती स्वर्थासाठी ।
अनिश्चित, क्षणिकफळ ज्याचे पोटी ।
तप राजस ते ॥१६॥
मूर्खतापूर्वक हट्टाने तप करून
मन, वाणी, शरीरास कष्ट देऊन
अथवा दुसऱ्यांचे अनिष्ट साधून
केलेले तप तामस ॥१७॥
by Pranil Sawe | Apr 4, 2022 | Marathi
वेदांत सप्ताह महोत्सव
ज्ञानप्रबोध वेदांत शिक्षा शिविर – दिवस चौथा

प्रथम गीतेसी करूनि वंदन ।
त्यातील मातृतत्वाचे निरूपण ।
तीन दिवसांचे सिंहावलोकन ।
ज्ञानगुरू करीतसे ॥१॥
आज मुख्यत्वे यज्ञ प्रकार ।
सात्विक, राजस, तामस यज्ञोपचार ।
ह्यातील मुख्य भेदाभेद साचार ।
उलगडतसे ज्ञानराजा ॥२॥
मानवी जीवनातील कर्माची रीत ।
भौतिक, आध्यात्मिक जीवनाशी संबंधीत ।
आध्यात्मिक उन्नतीकारणेस यज्ञकर्म संबोधित ।
उदाहरणासहित स्पष्टीकरण ॥३॥
परमात्म्यास जरी साक्षी ठेवील ।
सर्व कर्मे यज्ञकर्मे होतील ।
परी मनास विचारून पाहशील ।
परमात्म्या अर्पिण्याआधी ॥४॥
ब्रह्मयज्ञाशिवाय इतर यज्ञ प्रकार ।
आहाराशी संबंधीत ज्यांचा विचार ।
राहिला ज्याचा काल विस्तार ।
आज सविस्तर निवेदला ॥५॥
कैसा लाभला हा ज्ञानी गुरू ।
जिज्ञासूंची आळ पुरवी कल्पतरू ।
जगत्वंद्य कृष्ण हा खरोखरू ।
ज्ञानराज माणिकप्रभु ॥६॥
शास्त्रविधीने जे नेमून दिलेले आहे ।
यज्ञ हेच कर्तव्य, मनोमन धरूनि राहे ।
फळाची काही इच्छा न धरू पाहे ।
ऐसा यज्ञ सात्विक तो ॥७॥
केवळ दिखाव्यासाठी केलेला ।
फळाची अपेक्षा ठेवलेला ।
भावना शून्य असलेला ।
यज्ञ तो राजस ॥८॥
मंत्रांशिवाय, शास्त्राला सोडून ।
विनादक्षिणा, अन्नदानाला वर्जून ।
श्रद्धेला पूर्णपणे सोडून ।
केलेला यज्ञ तामस होय ॥९॥
पुढे तपाचे प्रकरण ।
ज्ञानराज चालवितसे सप्रमाण ।
सहा तपांची करवितसे जाण ।
सकल सद्भक्तांसी ॥१०॥
देव, ब्राह्मण, गुरू, ज्ञानींचे पूजन ।
पावित्र्य, सरळता, ब्रह्मचर्य पालन ।
अहिंसेच्या मार्गावरून मार्गक्रमण ।
शारीरिक तप जे का ॥११॥
Recent Comments