ज्ञान आणि भक्तीचा अनुपम संगम अशी दिगंत कीर्ती असणाऱ्या श्रीमाणिकनगरच्या वेदांत सप्ताहाचे ह्यावेळेस सदेह साक्षीदार व्हायचे, अशी खूणगाठ दत्तजयंतीच्या वेळीसच मनात बांधली होती. श्रीप्रभु समाधी समोर तशी सविनय याचनाच केली होती. नोकरीच्या ठिकाणी आठवडाभर सुट्टीचे सोपस्कार श्रीप्रभुकृपेने विनासायास पार पडले. श्रीप्रभुच्या रंगात रंगून जाण्यासाठी, धुळवडीच्या दिवशीच (१८मार्च २०२२), रात्री मनाच्या प्रफुल्लित अवस्थेत, श्रीमाणिकनगरी जाण्यासाठी कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये पाऊल ठेवले. योगायोगानेच ठाण्याचे श्री. रणदिवे आणि श्री. फणसे कुटुंब सोबतीला होते. श्रीप्रभुंच्या लीलांचे गुणगान करत कलबुर्गीस (आधीचे नाव गुलबर्गा) उतरलो. तेथून यथावकाश हुमणाबाद व पुढे श्रीमाणिकनगरी साधारणपणे सकाळी साडेदहाच्या सुमारास येऊन पोहोचलो. श्रीजी म्हणतात तसे, प्रपंचाचे गाठोडे श्रीमाणिकनगराच्या कमानीबाहेरच ठेऊन दिले. रिक्त मनाने श्रीमाणिकनगरस्थित गुरुगंगा आणि विरजा नद्यांच्या संगमाप्रमाणेच, ज्ञान आणि भक्तीचा संगम असलेल्या वेदांत सप्ताहाच्या खळखळणा-या प्रवाहात यथेच्छ डुंबण्यास आतूर झालो. तसे पाहता, ज्ञान आणि भक्तीची ही सरीता श्रीमाणिकनगरी नित्य प्रवाहित होत असते, पण वेदांत सप्ताहाच्या वेळी ती दुथडी भरुन वाहत असते. जिज्ञासूंनी येथे मनसोक्त डुंबावे, आपली अज्ञानाची घागर रीती करून ज्ञान जलाने ती भरूभरुन घ्यावी. अखंड ज्ञानदान हे श्रीमाणिकनगर संस्थानाचे परमविशेष आहे.

महाराष्ट्रातील उकाड्याने त्रस्त झालो होतो पण, येथील वातावरण सुखद होते. मोरांचे केकारव ऐकून माझ्याही मनाचा पिसारा अत्यानंदाने फुलत होता. अनेक माकडेही आनंदाने इकडून तिकडे उगाचच उड्या मारत होती. जणू ती मला माझ्या मनाच्या चंचलतेचीच जाणिव करुन देत होती. माणिकविहारच्या दर्शनी भागातच, सर्व आस्तिक महाजनांचे स्वागत करणारा फलक मन वेधून घेत होता. माणिकविहारच्या काऊंटरवर राहाण्याच्या व्यवस्थेबद्दल चौकशी केली असता, ती यात्री निवासमध्ये असल्याचे कळले. येथील यात्रीव्यवस्था नेहमीच चोख असते. वेदांत सप्ताहाच्या सुमारे तीन आठवडे आधी श्रीचैतन्यराज प्रभुंनी फोन करून कधी, कोण, किती जण येणार? पारायणास बसणार ना? वैगरे चौकशी केली होतीच. काटेकोर नियोजनाचे सुंदर प्रतीबिंबच एकंदर व्यवस्थापनेतून सर्वत्र दिसून येत होते. यात्री निवासात एका खोलीत पाच जणांच्या रहाण्याची व्यवस्था केली होती. गाद्यांवर अंथरलेल्या चादरी स्वच्छ (शुभ्र) होत्या. पिण्याच्या पाण्याचे भरपूर कॅन्स भरून ठेवले होते. आंघोळीसाठी गरम पाणी एका मोठ्या भांड्यात उकळत होते. भक्तांच्या सोयीसाठी चोवीस तास एक मदतनीस व एक सफाई कामगार अगदी शेवटच्या दिवसापर्यंत होते. “अतिथी देवो भव” हे वाक्य श्रीसंस्थानातील प्रत्येक जण येथे नित्य जगत असतो. “सर्व रुपे हा श्री प्रभु जाण” ह्या महावाक्याचे संस्करण श्रीमाणिकनगरातल्या प्रत्येक सेवकांवर झालेले आपणांस पदोपदी अनुभवायास येते. वेदांत सप्ताहात श्रीगुरुचरित्र तसेच श्रीमाणिक प्रभु चरितामृताचे पारायण असल्यामुळे अनेक दत्तभक्तांची मांदियाळीच येथे जमली होती. बहुतेक ज्येष्ठ नागरिक होते पण, प्रत्येकात सळसळता उत्साह होता. पारायणासाठी आलेल्या, नव्वदीच्या घरात असलेल्या, काणेमामांना पाहताच, श्रीप्रभु कुणास, कशी प्रेरणा देतो, हे पाहून स्तिमीत व्हायला होत होते. जणू काही इतक्या तरूणांत मी एकटाच म्हातारा होतो. असो…सामान झटकन लावून, स्नानादी कर्मे आटपून, पुढच्या वीस मिनिटांत श्रीप्रभु मंदिराच्या वाटेवर चालूही लागलो. श्रीमाणिकनगरीच्या कमानीतून प्रवेश करताच श्रीप्रभुभेटीची तीव्र ओढ आपल्याला स्वस्थ बसू देतच नाही.

गुरुगंगेच्या प्रवाहात अनेक बदके विहरत होती. मागच्या वेळी आलो होतो त्यापेक्षा आज खूपच जास्त होती. माकडे, मोर, बदके, वटवाघळे अशा अनेक पशूपक्ष्यांनाही श्रीमाणिकनगर हे जणू काही आपले हक्काचे घरच वाटत असावे. पुलावरून पुढे सिंहद्वारातून श्रीप्रभु मंदिराच्या मुख्य पटांगणात आलो. प्रवेशद्वारावर भगवे झेंडे डौलाने फडकत होते. आनंद मंटप, कैलास मंटप ओलांडून श्रीप्रभु समाधीसमोर कधी उभा राहिलो ते माझे मलाच कळले नाही. वस्त्रांच्या मनमोहक रंगसंगतीत, फुलांच्या नयनरम्य साजात श्रीप्रभु अजूनच लोभस वाटत होता. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करून डोळेभरून त्यास पाहिले. परस्पर भेटीचा आनंद अनुभवला. श्रीप्रभुमंदिर परीसरातील श्री सर्वेश्वर महादेव, औदुंबर, श्रीदत्तात्रेय, भरोसाची समाधी आणि श्रीमनोहर माणिकप्रभु समाधी, जाज्वल्य देशभक्तीचे प्रतिक असणारे सटक्यांचा कक्ष आणि श्रीमुख्यप्राण मारुतीचे मनोभावे दर्शन घेतले. श्रीप्रभुमंदिरास प्रदक्षिणा घालून शरीरास व मनास ऊर्जावान (चार्ज) केले. इथली सकारात्मक ऊर्जा आणि स्पंदनं आपल्या चित्तवृत्तीला क्षणार्धात प्रफुल्लित करतात आणि मन अंतर्बाह्य शांततेचा अनुभव करू लागतं. थोडावेळ श्रीप्रभुशी मौन संवाद साधून मुक्तिमंटपात श्रीमार्तंड माणिकप्रभु, चैतन्यलिंग आणि श्रीशंकर माणिकप्रभुंच्या समाधीचे दर्शन घेतले. पुढे नव्याने बांधलेल्या श्रीसिद्धराज माणिकप्रभुंच्या समाधी समोर नतमस्तक झालो. नंतर श्रीजींच्या घरी आलो. ओसरीत श्रीजी, श्री आनंदराज, श्रीचैतन्यराज, श्रीचिद्घन प्रभु एकत्रच भेटले. श्रीजींच्या घरी आलेल्या कोणताही प्रभुभक्ताचे अतिशय आत्मियतेने स्वागत केले जाते. तो आनंद आपण श्रीप्रभुपरिवारातील प्रत्येक सदस्याच्या देहबोलीतून सहज टीपू शकतो. असो…श्रीप्रभुमंदिरात दुपारचा महाप्रसाद घेऊन यात्री निवासमध्ये परतलो.

एव्हाना खोलीतले इतरजणही आले होते. कोल्हापूरचे साधले, कुलकर्णी, सांगलीचे कुलकर्णी आणि पुण्याचे पेटकरकाका अश्या ज्येष्ठांचा सहवास लाभला. दुपारी थोडासा आराम केला. चारच्या सुमारास चहा आला. सर्व जण चहाला जमले. अनेकजण महाराष्ट्रातील विविध भागांतून वेदांत सप्ताहासाठी आलेले. बरेचसे मागच्या पारायणाच्या आठवणींना उजाळा देत होते. प्रत्येकाचे वेगवेगळे कथाकथन गरमागरम चहाची घोटागणीक लज्जत वाढवत होता. दोन कप चहा घेतला. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. माझ्यासारखा एखाददुसरा पहिल्यांदाच सहभागी होत होता. सकलमत संप्रदायात कुठलाही भेदभाव नाही, ह्याचा पदोपदी अनुभव आपल्याला श्री माणिकनगरात येतो. जय गुरु माणिक हे तीन शब्द एकमेकांना प्रभुप्रेमाच्या एकाच माळेत सहजपणे गुंफतात.

संध्याकाळी पुन्हा प्रभुमंदिरात आलो. क्षितीजावर श्रीप्रभु आपल्या चित्रकलेचं सुंदर प्रदर्शन मांडून बसला होता. मुक्तिमंटपाच्या बाजूलाच असलेल्या औदुंबराखाली बसून, सायंकाळी श्रीप्रभुच्या चैतन्याच्या ह्या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होणे मला खूप भावतं. श्रीमाणिकनगरातील अनेक आवडत्या जागांपैकी ही माझी एक आवडती जागा. जीवनात अनेक आनंदाचे क्षण देणाऱ्या श्री प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करताना येथे गहिवरायला होतं, मन आनंदाने उचंबळून येतं. भावनांच्या ह्या कल्लोळात कानांत श्रीमार्तंडप्रभुंची श्रीआनंदराज प्रभुंनी आपल्या सुमधुर सुरांनी सजवलेली पदे गुंजत असतात. धन्य धन्य अती धन्य धन्य आम्ही झालो पूर्णानंद…

दिवेलागणीला भक्तकार्यासाठी पुन्हा श्रीजींच्या घरी आलो. भक्तकार्यानंतर सर्व भक्तांना उद्यापासून सुरु होणाऱ्या पारायणासंदर्भात व नंतरच्या आयोजनाबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या गेल्या. तदनंतर प्रभुप्रसाद घेऊन शनिवारच्या भजनात सहभागी झालो. भजनानंतर श्रीप्रभुला निजवून पटांगणात आलो. वेदांत सप्ताहानिमित्त केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे श्रीप्रभुमंदिर परीसर अधिकच शोभायमान दिसत होता. उद्यापासून सुरु होणाऱ्या वेदांत सप्ताहसाठी संस्थानाच्या कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. स्वतः श्रीजीही सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून होते. कालच्या प्रवासाच्या शीणामुळे म्हणा किंवा उद्याच्या वेदांत सप्ताहाच्या ओढीने म्हणा, यात्रीनिवासात येऊन स्वत:ला निद्रादेवीच्या हवाली केले….

क्रमशः…

[social_warfare]