बाळ माणिका

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

देव साधु गण शोधती ज्यासी
सवंगड्या सह खेळेे वनासी
भाव धरीता सहजची पावे

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

कुणास वाटे अंतरी धरीला
कुणी म्हणे मी नयनी देखिला
प्रगट होवुनी गुप्तची राहे

बाळ माणिका दुडु दुडु धावे
मात बयंमा मनी सुखावे

मला श्री माणिकप्रभु दिसले

नामामृत हे कानावर पडले
मला श्री माणिकप्रभु दिसले

दत्तगुरुंची अवघी माया
मानवरुपी धरली काया
बयादेवीच्या उदरा मधुनी देवच अवतरले

गुरुगंगा विरजेचा संगम
तेथ वसविले माणिक धाम
प्रभु स्पर्शाने या भुमीचे नंदनवन झाले

सगुण भक्तींने भजता प्रभुला
उचलून घेई प्रभु भक्ताला
चैतन्याचा जिथे सोहळा नित्य नवा चाले

मला श्री माणिकप्रभु दिसले
जय गुरू माणिक नामामृत हे कानावर पडले
मला श्री माणिकप्रभु दिसले

मी चरणाचा दास प्रभुचा

मी चरणाचा दास प्रभुचा
लागो मजला ध्यास प्रभुचा

अवतरले श्रीदत्त भूवरी
उदया आली माणिकनगरी
आश्रय घेती बहु नरनारी
मुखी प्रभुचा गजर करी

माणिकप्रभु ही माय माऊली
जवळी जाता लागे सावली
ध्वजा सकलमताची धरली
जन्म मरण ही चिंता मिटली

योग याग तप नकोस मजला
भक्ति घडावी तव भक्ताला
या हृदयीचे त्या हृदयीला
अवघा जन्मच तुझ वाहिला

सदा चित्त तव चरणी

प्रभु एक तुझ आर्जव आहे
सदा चित्त तव चरणी राहे

विषय सुखाचा त्याग करावा
ध्यास निरंतर तुझा असावा
तव स्वरुपाचा विसर न व्हावा
हाची एक वर मजला द्यावा

प्रभु एक तुझ आर्जव आहे
सदा चित्त तव चरणी राहे

असेल बहु पुण्याचा ठेवा
तरीच होईल प्रभुची सेवा
अहंभाव हा मनी नसावा
हाची एक वर मजला द्यावा

प्रभु एक तुझ आर्जव आहे
सदा चित्त तव चरणी राहे

माणिक मंत्र हा नित्य स्मरावा
भजनी प्रभुच्या देह भिजावा
मनोहर करीतो प्रभुपदी धावा
हाची एक वर मजला द्यावा

प्रभु एक तुझ आर्जव आहे
सदा चित्त तव चरणी राहे

भक्तांची माऊली हो

प्रसन्न होवोनि दत्तगुरु अवतरले या भुवरी हो
माणिकप्रभु हे नाम घेवुनी जडमुढ जन तारीले हो
भक्तकार्य कल्पद्रुम ब्रीद हे बसले भक्ता मनी हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

सवंगड्या सम खेळ खेळता लिला अनंत केल्या हो
घेवोनि कवड्या भीमाबाईच्या अष्टपुत्र फळ दिधले हो
व्यंकम्माचा भाव मनीचा पाहुनी प्रभु मनी द्रवले हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

प्रभु फिरतीवर असती जिकडे तिकडे उत्सव घडती हो
भक्तही येती दर्शन घेती नवसे ही फेडती हो
पंथ सकलमत करुनी स्थापन भक्तां पावन करी हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

प्रभु आज्ञेने यज्ञ जाहला वेद घोष बहु झाले हो
गुढ्या पताका रांगोळ्या अन दारी तोरणे सजली हो
आम्हीच आम्हा धन्य मानतो प्रभुचरणी मन जडलो हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो