श्रीप्रभुनाम घ्यावे
रीध्दीसिद्धी दाता श्री एकदंता
आरंभ करीतो तव नाम घेता।
नमु तुला भगवती श्री भवानी
नमस्कार माझा तुझ्याच चरणी ।।१।।
हृदयी स्मरोनी प्रभु माणिकाला
आरंभ करीतो शुभ लेखनाला।
कर्ताकरवीता प्रभु माणिकेश
तुझीच भक्ती करीतो विषेश।।२।।
मनोहर बया दोघेही धन्य झाले
प्रत्यक्ष श्रीदत्त स्वप्नात आले।
तया रामनवमीस दृष्टांत झाला
सदा वंदितो माणिकाच्या पदाला।।३।।
मुखाने सदा श्रीप्रभुनाम घ्यावे
सदा संकटी श्रीप्रभु नित्य धावे।
अहंभाव सारा सोडुन द्यावा
जवळी करावी प्रभुनाम सेवा।।४।।
सदैव प्रभुरुप मनी स्मरावे
प्रभु पदासी सदा लीन व्हावे।
प्रभुभक्त तू काय चिंता वहासी
प्रभु घेई जवळी निजबालकासी।।५।।
सदा कर्म करिता प्रभु नाम घ्यावे
सेवेत प्रभुच्या सदा सिद्ध व्हावे।
मिळेना पुन्हा जन्म हा मानवाचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।६।।
उध्दार करण्या जगी मानवाचे
प्रभु पातले ग्राम कल्याण साचे।
संतोष वाटे अवघ्या जनाला
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।७।।
प्रभूस माझ्या माझीच चिंता
प्रभूवीनण वाली नसे कोणी आता।
चरणी प्रभूंच्या चला ठेवु माथा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।८।।
सदाशिव होवोनि काळंभटासी
प्रभु दाखवी रुप निजबालकासी।
मनी ध्यास राहो प्रभूंच्या पदाचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।९।।
नसे भिन्न ती शर्करा आणि गोडी
तसे श्रीप्रभु आणि भक्ताची जोडी।
जयाच्या शिरी वरदहस्त प्रभुचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।१०।।
अरे नासका नासका देह सारा
नको वाढवू हा फुकाचा पसारा।
सदा ध्यास राहो प्रभुच्या पदाचा
जगी धन्य तो दास श्रीमाणिकाचा।।११।।
करी श्रीहरी बोध त्या अर्जुनाला
चुकेना कधी कर्म ते मानवाला।
प्रभुनाम प्रेमे हृदयी धरावे
सदा सर्वदा त्या प्रभुला स्मरावे।।१२।।
गोविंद नामे सखा जो प्रभुचा
सजीव झाला तया साद देता।
अचंभित होवोनि ग्रामस्थ पाहे
सदा सर्वदा त्या प्रभूला स्मरावे।।१३।।
जगी जन्मला मृत्यू त्यासी टळेना
तुझा मी पणा हा तरीही सुटेना।
प्रभु कीर्तनी दंग होवुन जावे
सदा सर्वदा त्या प्रभुला स्मरावे।।१४।।
हृदयीं जयाच्या प्रभु राम आहे
सन्मुख प्रभुच्या उभा नित्य राहे।
चिरंजीव होवोनि भक्तास पावे
सदा सर्वदा त्या प्रभुला स्मरावे।।१५।।
असे शोभला मेखला श्री प्रभुला
मना वाटले भेटलो त्या हरीला।
लिला प्रभुच्या मज वर्णवेना
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१६।।
पहा श्रेष्ठ तो भक्त श्री पुंडलिक
तया कारणे श्रीप्रभु धाव घेत।
उभा चंद्रभागेतटी देवराणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१७।।
भक्तांस करीती प्रभु बोध एक
सकलमताचा पंथ सुरेख।
आत्मा तो सर्वांतरी एक जाणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१८।।
बहु गोड रे नाम श्री माणिकाचे
मुखी बोलता सुख होईल साचे।
नामाविना व्यर्थ हा देह जाणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।१९।।
प्रभूवीण नाही मिळे आत्मज्ञान
तुकाराम धनगर असे भाग्यवान।
घोंगडी श्रीप्रभुची मज वर्णवेणा
प्रभूवीण मजला कोणी असेना।।२०।।
गंगा शिरी घेतली त्या शिवाने
उचलुन गोवर्धन धरीला हरीने।
हरीहराचे प्रभु रुप माना
प्रभूवीण मजला कोणी असेना।।२१।।
किती धन्य तो भक्त दयालदास
प्रभु भेटले राम होवोनि त्यास।
भक्ताविना मन प्रभुचे रमेना
प्रभूवीण मजला कोणी असेना।।२२।।
भीमाबाईचा भाव जाणोनी मनीचा
प्रभु योजिती त्यास उपाय साचा।
देशील कवड्या मजला तु आठ
होईल पुत्र तुजला तितुकीच नीट।।२३।।
माता बयंबा होई चकीत
श्रीदत्त रुप प्रभु दाखवीत।
दिसे षड्भुजा भस्म धारी शरीरी
रुद्राक्ष माळा कंठी विहारी।।२४।।
अति कष्टी होता हा संग्रामराव
उदर पीडिचा त्या सुचेना उपाव।
येवुनी स्वप्नी महादेव बोले
प्रभुचरण तिर्थ तु घ्यावेसी भले।।२५।।
आबाचार्य होते प्रभुभक्त थोर
प्रभुचीच सेवा असे ध्यास फार।
तया भेटण्या श्रीप्रभु प्रगट झाला
नमस्कार माझा प्रभुच्या पदाला।।२६।।
चंदनापरी देह अवघा झिजावा
सेवेत प्रभुच्या उभा जन्म जावा।
प्रभुपाठी असता भिती कशाला
नमस्कार माझा प्रभुच्या पदाला।।२७।।
अरण्यात नांदे बलभीम मुर्ती
जाज्वल्य उग्र असे ज्याची कीर्ती।
प्रभु कारणे अंजनीपुत्र धावे
अचंबित होवूनी ग्रामस्थ पाहे।।२८।।
अवतार शिवाचा असे खंडेराव
मैलार क्षेत्री जयाचाच ठाव।
प्रभु जन्मीचा होई दृष्टांत जेथे
सदा वंदितो भक्त भूमीस तेथे।।२९।।
प्रभुच्या पदा सर्वदा मोक्ष प्राप्ती
कदापी नसोडी तयाचीच भक्ती।
मिळे ज्ञान वैराग्य एकेची ठाई
नमस्कार तुजला गुरु माणिकाई।।३०।।
प्रभु मंदिरी चंदनाचा सुगंध
येथे राहतो भक्त भजनात दंग।
भक्तासी अपल्या प्रभु पार नेई
नमस्कार तुजला प्रभु माणिकाई।।३१।।
Recent Comments