प्रभू तयाकडे फिरून ।
म्हणती दत्तासी कांहीं अर्पण ।
आधीं तुवा केलियाविण ।
कंबर कसून न येची तो ॥११॥

करूनि घे कांहीं मागणें ।
ऐसें ऐकूनि केशवरायानें ।
अंतर्साक्षी आपण म्हणे ।
सगळे जाणूनि आहांच कीं ॥१२॥

तें खरें परंतु आतां पाहीं ।
प्रभु म्हणती तुजकडें कांहीं ।
असलियासी तितुकेचि देई ।
पुढचें आम्ही पाहूनि घेऊं ॥१३॥

केशवराव म्हणे सवेची ।
रोकडे केवळ आठ आणेची ।
आहे म्हणतां पुरे साची ।
मर्जी दत्ताची प्रसन्न म्हणती ॥१४॥

आतां दत्त बांधील कंबर ।
मिळवूनि देईल जहागीर ।
ऐसें बोलूनि दयाकर ।
स्तब्ध साचार राहिले ॥१५॥

श्रीप्रभूंनी पुन्हा केशवरावांकडे वळून म्हटले, “श्रीदत्तप्रभूंना आपण काही अर्पण केल्याशिवाय तो कंबर कसून धावून येणार नाही. त्यामुळे श्रीदत्ताला काहीतरी अर्पण करून तुझे इप्सित साध्य करून घे!” श्रीप्रभूंची वाणी ऐकून, “आपण अंतर्साक्षी आहात आणि आपल्याला सगळेच माहीत आहे,” असे केशवराव श्रीप्रभुंना म्हणाले. त्यावर श्रीप्रभूंनी पुन्हा आपल्या मधुरवाणीने म्हटले, “आपण म्हणता ते सर्व खरे आहे! परंतु या क्षणाला आपल्याकडे जे काही आहे, तेवढेच श्रीदत्ताला अर्पण करा, पुढचे आम्ही पाहून घेऊ!” त्यावर केशवरावांनी “आपल्याकडे केवळ आठ आणेच आहेत,” असे श्रीप्रभुंना सांगितले. त्यावर भक्तवत्सल श्रीप्रभु अत्यंत प्रसन्नतेने म्हणाले, “श्रीदत्ताला तेवढेही पुरेसे आहेत. त्याने श्रीदत्तप्रभु प्रसन्न होतील. आता श्रीदत्तप्रभु कंबर कसून आपणांस जहागीर मिळवून देतील,” असे म्हणून श्रीप्रभु काही झालेच नाही या आवेशात मौन धरून स्तब्ध राहिले.

वरील ओव्यांचे अध्ययन केले असता कृपेच्या विशिष्ट वेळेचे महत्त्व आपल्या लक्षात येते. मागे एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये आपण अक्कलकोटच्या भोसले राजांच्या कारभाऱ्याने भोजन करीत असल्यामुळे श्रीप्रभूंच्या प्रसादाची वेळ चुकविली होती, हे पाहिलेच आहे. तेथेही वेळेचे महत्व अधोरेखित होते. श्रीगुरुंच्या कृपेची एक विशिष्ट वेळ असते. त्या प्रसन्नवेळी श्रीगुरु अत्यंत कृपाळूपणे भक्ताचे अल्पसे धारिष्ट्य पाहतात. त्याच्या अंतरीचा भाव तपासून पाहतात. श्रीप्रभु केशवरावांना आधी म्हणतात की, तुझ्यावर कृपा करण्यासाठी मी उपाय शोधत आहे, परंतु मला काही सुचत नाही. परंतु एकाएकी, ‘तुझ्याकडे जे काही असेल ते आत्ताच, या क्षणाला श्रीदत्ताला अर्पण कर,’ असे केशवरावांना म्हणत श्रीप्रभूंनी केशवरावांची परीक्षा पाहिली. जहागीर गेल्यामुळे परागंदा झालेल्या केशवरावांनी पदरी असलेले केवळ आठ आणे क्षणाचाही विलंब न करता, पदरी काहीही राखून न ठेवता, भविष्याची चिंता न करता, अत्यंत निस्पृहपणे श्रीप्रभूंच्या वचनावर विश्वास ठेवून ताबडतोब अर्पण केले. या भोळ्या भावाने आणि शुद्ध अंतःकरणाने शरण आलेल्या प्रत्येकावर श्रीगुरु कृपेचा वर्षाव करतो. ‘श्रीदत्त आता जहागीर मिळवून देईल,’ असे म्हटल्यावर श्रीप्रभु मौन धारण करून गंभीर झाले. यावरून केशवरावांवर झालेल्या कृपाशीर्वादाची एक विशिष्ट वेळ होती आणि केशवरावांनीही ती नेमकी साधली. आपल्यासारख्या सामान्य भक्तांना कथाप्रसंग म्हणजे श्री गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी फार मोठी उपलब्धि आहे. त्याचप्रमाणे तुझ्याकडे जे काही आहे, ते श्रीदत्तप्रभूंना अर्पण कर असे म्हटल्यावर जवळ असलेले केवळ आठ आणे अर्पण केल्यावर दत्ताची मर्जी प्रसन्न आहे, असे जेव्हा श्रीप्रभु म्हणतात तेव्हा श्रीप्रभु हेच दत्त आहेत, हेही आपल्यासारख्या सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच. चतुर्थ दत्तावतार ही श्री माणिकप्रभु महाराजांचा जयजयकार असो.

[social_warfare]