चैतन्यराज प्रभु द्वारा रचित ‘सकलमत शतक’ कविता पर प्रभुभक्तों के अभिप्राय।

श्रीजींनी आपल्या आशिर्वचनात म्हटले प्रमाणे सातत्याने आठव्या पिढीतील आपली ही काव्यस्फुर्ती श्रीप्रभु कृपेचीच साक्ष आहे. वेदान्तासारखा क्लिष्ट विषय रोजच्या जड व्यवहाराशी सांगड घालत आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या पचनी पडेल असे सोपे करून सांगण्याची किमया या काव्यात आपण केली आहे. आपल्या प्रस्तावनेतहि आपण या काव्याचे निरुपण करताना म्हटले आहेच की, स्वधर्माचा दुराभिमान सोडून – सकलमतांचा विचार करीत या साधनेत स्वतःला पूर्णपणे हरवून घेतल्यास जीवन प्रभुमय बनेल. आपल्या जन्मतिथीला प्रसिद्ध झालेली ही ‘काव्यशलाका’ म्हणजे भवसागरी अंधकार दूर करणारा या दीपोत्सवातील अपूर्व योगच म्हणावा. खरोखरीच सातत्याने आठव्या पिढीतही तितक्याच प्रगल्भतेने अष्टदिशांना मार्ग दाखविणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे आपले नेतृत्व, गायकी, प्रभुकथा प्रवचनांतून ज्ञानदान, कार्यक्रमांचे नियोजन, त्यांची अंमलबजावणी, संस्थानच्या परंपरांची निष्ठेने जपणूक, कमालीचा शांत स्वभाव, व शेवटी सर्वात महत्वाचे – श्रीप्रभूंवर अतूट निष्ठा या अष्टावधानी गुणांचा संचय आपल्यावर श्रीप्रभूंची पूर्ण कृपा असल्याचीच प्रचीती देते.

आपल्या काव्यात सुरुवातीस श्री प्रभूकालीन समाजस्थिती, तत्कालीन मागासलेल्या मानवी मनाची बैठक, त्याचे दुष्परिणाम नंतर श्रीप्रभूंचे अवतार कार्य, त्यातून झालेली सुधारणा, पुढे श्रीप्रभूंनी दिलेली शिकवण – वसुधैव कुटुंबकम्‌, परधर्मियांचा आदर, सकलमत संप्रदायावर विश्वास, नद्यांचे सर्व दिशांनी वाहणे व शेवटी सागराला एकत्र मिळणे किंवा “सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति” हा सद्विचार व त्याद्वारे सिद्ध होणारे सकलमत संप्रदायाचे महत्व, त्यावरील एकनिष्ठता व शेवटी त्यातून मिळणारे ‘‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’’ या तानाजी मालुसारेंच्या विचाराप्रमाणे केवळ स्वतः पुरता संकुचित विचार सोडून आधी दुसऱ्यांना सुखाविण्याचा प्रयत्न – ‘‘सर्वेजनाः सुखिनो भवन्तु – सर्वेसन्तु निरामयः’’ हि शिकवण, श्रीसंस्थानचे बोधवाक्य ‘‘एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति’’ तसेच ‘‘One in All, And All in One’’ हे सकलमती तत्व तसेच ‘‘शीतोष्णसुखदुःखेषु समस्संग विवर्जित:” गीतेतल्या यासारख्या उपदेशांचा पाठपुरावा, संसारात राहून नि:संग जीवन व्यतीत करणे, मुंगीने थाळीतील पाकात स्वतःला पूर्णपणे बुडवून घेऊन मरण्यापेक्षा थाळीच्या काठावरच बसून पाकाचा थोडा थोडा मर्यादित अस्वाद घेणे, जीवभावातून निघून अहंब्रह्मास्मि, किंवा तू कोण आहेस? असे गुरुंने विचारल्यानंतर ‘‘शिवोहम-शिवोहम’’ असे उत्तर देण्याची शक्ती मिळवणे – हे सर्व विषय आपण या काव्याद्वारे उत्कृष्टतेने मांडले आहे. शेवटी श्री मार्तंडप्रभूंनी म्हटल्याप्रमाणे “स्वनुभवस्फुर्ती  पद मनी सार्थ जडे। ब्रह्मकपाट अविद्या सहजी उघडे। चिन्मार्तांड प्रसादे हा योग घडे। सकलमत प्रभू नांदे जिकडे तिकडे।। ही श्रीप्रभूंची शिकवण आमच्या मनी ठसो व आम्हांस त्याची प्रचीती येवो अशी श्री प्रभूचरणी प्रार्थना –  श्री देविदास के. देशमुख – सगरोळी, महाराष्ट्र

या काव्यात आपला स्वानुभव पूर्णपणे प्रदर्शित झाला आहे. केवळ स्वानुभवात विरून न जाता आपण आम्हा भक्तांना उपासना मार्ग सोपा करून सांगत आहात हे खरोखर आमचे सौभाग्य आहे. या कावितेच्या सहाय्याने आम्हा भक्तांना सकलमताच्या मार्गावर पाय घट्टपणे रोवून चालणे सुलभ वाटत आहे. – श्री चंद्रकांत देशपांडे – ठाणे, महाराष्ट्र

श्री चैतन्यराजांची प्रभुभक्ती आणि प्रभुसेवेची ओढ त्यांच्या काव्य रचनांमधून नेहमीच झळकत असते. दिवाळीमध्ये रांगोळीचे ठिपके ठिपके एकत्र जोडून, त्यात रंग भरून सुंदर कलाकृती निर्माण होते त्याप्रमाणे आजच्या मंगलदिनी प्रभूंच्या दिव्य उपदेशांना एकत्र जोडून चैतन्यराजांची ही अमूल्य भेट श्रीप्रभु संस्थानच्या महानतेत भर टाकत आहे. प्रभु उपदेशाची महानता संपूर्ण जगात पोहोचविण्याचे जे कार्य त्यांनी हाती घेतले आहे ते यशाची परिसीमा गाठो, ही भक्तांची इच्छा प्रभु नक्की पूर्ण करतीलच. श्रीमार्तंड प्रभूंचे वचनच तसे आहे ‘‘जी भक्तप्रतिज्ञा तीच श्रीगुरू आज्ञा’’ – सौ. किशोरी पाठारे – मुंबई, महाराष्ट्र

फारच सुंदर रचना आणि बोधात्मक प्रकटन. असाच लाभ निरंतर घडो ही प्रभु चरणी प्रार्थना – श्री राजीव सगरोळीकर – सातारा, महाराष्ट्र

प्रभूंची संपूर्ण कृपा, महराजश्रींचा लाभलेला परंपरागत वारसा आणी आपले अथक परिश्रम या त्रिवेणी संगमातून  ‘‘सकलमत शतक’’ रुपी अमृत सद्भक्तांसाठी प्राप्त झाले. सकलमत परंपरेचा उत्कर्श होत राहो, प्रभु चरणी हीच प्रार्थना. – श्री मधुकर राव महाजन – बसवकल्याण, कर्नाटक

अतिशय सुंदर रचना! ‘‘सकलमत शतकाचे’’ वर्णन करणे  शब्दांच्या पलीकडचे आहे. शेवटी एवढेच म्हणावे वाटते कि मौनाचे बोलणे सरले । ब्रम्हासी ब्रम्हपण आले।। – श्री शैलेश सगरोळीकर – उमरगा, महाराष्ट्र

काल निवांतपणे ‘‘सकलमत शतक’’ वाचले. अप्रतिम काव्यरचना! अतिशय सहजसोपी, अर्थपूर्ण रचना. आपली शब्दांवरील हुकूमत, रचनेतील नादमयता आणि ‘श्रीप्रभूजीवनी’ पासून अवतारकार्य ते सकलमत संप्रदायाच्या वैशिष्ट्यांची केलेली मांडणी निव्वळ अदभुत आणि आनंददायी आहे.आपल्यावर असलेली श्रीप्रभूपरंपरेची कृपा सर्व रचनांमध्ये ठळकपणे जाणवत होती आणि त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. अशा विविध निर्मितीप्रयोगांद्वारे आपण सकलमत संप्रदाय अधिकाधिक भक्तजनांपर्यंत पोहोचवाल याची खात्री बाळगतो आणि आपणांस मनापासून शुभेच्छा देतो. – श्री विवेक दिगंबर वैद्य – मुंबई, महाराष्ट्र

‘‘सकलमत शतक’’ ही आपली अप्रतिम रचना अतिशय सुंदर आहे, मनात विचार आला माझ्या सारख्या अल्पमती साठीच आपण हा सारा प्रयास केला असावा. सकलमत शतक चे वारंवार वाचन  केले आणि मग उमगलं, अरे आज पर्यंत आपण प्रभूंचे अति विशाल साहित्य आत्मसात्‌ करण्याचा प्रयास करत होतो पण या संसार व्यपातून ते पूर्णत्वास जात नव्हत. पण आज आपल्या या रचनेतून ‘‘प्रभू साहित्य सार अमृत’’ आमच्या हाती लागले असं मला वारंवार जाणवत आहे. – सौ. सुषमा बन्नीकोड – पुणे, महाराष्ट्र

‘‘सकलमत शतक’’ ही सकलमत संप्रदायाच्या सिद्धांताची काव्यात्मक संस्तुति आणि त्यासाठी दिलेले आशीर्वाद रुपी वचने वाचून मनास मोहर आला.खरे तर आशीर्वचनानंतर सकलमत शतकपर काही लिहावे ही माझी योग्यता नाही.पण जवाहिऱ्याकडील रत्न पाहून, त्यावरचे तास (dimensions) पाहून जसे नेत्र सुखावतात तद्वत माझे लेखणी रुपी नेत्र स्त्रवू लागले आहे. नदीचे घाट वेगळे असले तरी पाणी एकच! त्यात फरक नाही, आत्मभावात राहण्याचा अभ्यास, दूर कोठेही न जाता ठायी बसुनी करा एकचित्ताची संथा, अविद्येने साचलेली जीवावरील मायेची धूळ, जीवाचे खरे स्वरूप, त्यासाठी आवश्यक असणारी सावधानता, मायेला न घाबरता भवनिद्रेतून उठण्याचा संकल्प, समोर सदैव वाहणारी गुरूकृपा आणि प्रभु आशीर्वाद हा सगळा वेदांताचा काव्यमध सिद्धहस्त कवी सकलमत संप्रदायाच्या सुवर्णपळीने सर्व भक्तजनांना पाजीत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ज्ञानदेवांच्या हरिपाठासारखा दिशादर्शक असा सकलमत संप्रदायाचा हा 102 श्लोकांचा हरिपाठच प्रसवला आहे ह्या भावनेने समस्त गुरुपरंपरेला वंदन करून नतमस्तक होण्यातच ही लेखणी भूषण मानते. डॉ. अविता विनय कुलकर्णी – मुंबई, महाराष्ट्र

अतिशय सुंदर रचना! Words are not sufficient to appreciate your work, efforts and devotion. Excellent! no words to express the depth of this wonderful piece of poem. श्री प्रकाश नेरुरकर – जिनिवा स्विट्ज़रलॅन्ड

सकलमत शतक काल पूर्ण वाचले. खूपच छान लिहिले आहे. प्रभूंच्या रूपाचे, गुणांचे, स्वरूपाचे अनेकांनी वर्णन केले आहे. तथापि त्यांच्या सिद्धांतांवर काव्य करावे, हा विचारच खूप आगळा-वेगळा आहे. ह्यातून संप्रदायाविषयी आपल्या मनात असलेला अभिमान व श्रद्धा तर दिसून येतेच, तसेच ह्या सिद्धांताचा प्रचार-प्रसार होण्यासाठी आपल्या मनातील तळमळ सुद्धा प्रकर्षाने जाणवते. आणि काव्याचे तर कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपली काव्य संपदा, शब्दांची निवड, प्रत्येक ओळीतील छंदबद्धता ह्या सगळ्या मुळे हे काव्य अतिशय सुमधुर झाले आहे. सकलमत शतकास व आपल्या काव्य-प्रतिभेस शतशतकोटी प्रणाम – सौ. प्राची चित्रे – ठाणे, महाराष्ट्र

‘‘सकलमत शतक’’ शब्दातीत आहे. एक-एक वाक्य सकलमत संप्रदायाची सहज आणि सरळ व्याख्या समजवून सांगतं. आपल्या स्वभावातील विनयशीलता जागोजागी अनुभवता येते. हे शतक वाचनीय तर आहेच पण मननीय झाले तर संपूर्ण मानवजातीवर ह्याचा प्रचंड प्रभाव पडेल. आपली शब्दसंपदाही विपुल आणि विशाल आहे. प्रभुंची काव्यप्रतिभा नवीन पीढीही चालवतेय ही अत्यंत आनंददायी अन् स्पृहणीय बाब आहे.सकलमत संप्रदायाची शिकवण, ह्या काव्यातून, आपण आपल्या सशक्त खाद्यांवर समर्थपणे पेलली आहे. प्रत्येक शब्दागणिक उत्कंठावर्धक होणारे असे हे काव्य प्रथम भागाकडून द्वितीय भागात जाताना जीवन जगण्याचा राजमार्ग हळूवारपणे उलगडत जाते. ते समजून आचरणांत आणणे ही प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचे निर्वहन करण्याची सद्बुद्धी श्रीप्रभु सर्वांस देवोत ही श्रीप्रभुचरणी विनम्र प्रार्थना. सुंदर सादरीकरण. सविस्तर वाचेन. अभिनंदन, कौतुक अन् शुभेच्छा. श्री प्रणिल सावे – मुंबई, महाराष्ट्र

हिंदी वाचण्याची अजीबात सवय नसली तरीही, ज्या प्रमाणे मिष्टान्न खायला सुरु केलं की त्या रसोत्पत्तीत भूक निर्माण होउन तृप्ती ही मिळते त्याच प्रमाणे श्री चैतन्य राज प्रभूंच्या या कवितेच्या बाबत झाले. खर तर लेखक कोण ते नंतर बघितलं आणि नतमस्तक झालो. ज्ञान स्त्रोताशी निरंतर अनुसंधान असल्याखेरीज अशी रचना संभवत नाही –  श्री जनार्दन सुरेश सपरे.

[social_warfare]