कृष्णा मजकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून॥धृ॥
डोईवर घागर हातामधे झारी माझी वेणीच गेली सुटून॥1॥
शाम हा सुंदर अति मनोहर बहर हा घ्यावा लुटून॥२॥
माणिकप्रभु म्हणे प्रीतिची राधा हरी चरणी चाले जपून॥३॥

श्री सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज यांचे पावन चरणी शरण राहून त्यांच्या या काव्याचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते आहे.

नाथांच्या जशा गौळणी किंवा भारुडं आहेत की ज्यात विषय अगदी साधा, रोजच्या जीवनातला किंवा श्रीकृष्ण अणि गौळणींच्या जवळिकेचा असतो पण त्यात गूढ अर्थ भरलेला असतो जो साधकाला चिंतनाने – आत्मतत्त्वापर्यंत पोंचवितो.

वरील काव्यात असाच अर्थ भरलेला आहे असे मला वाटते. काव्यातील गौळण ‘राधा’ आहे जी मधुर भक्तीची मुकुटमणि आहे. ‘विषय तो त्यांचा झाला नारायण’ अशी तिची सर्व विषयासक्ति केवळ श्रीकृष्ण आहे. डोक्यावर भरलेली घागर घेऊन ती चाललेली आहे, ज्यामधे सर्व संचित भरलेलं आहे. हातात झारी आहे, ज्यात प्रारब्ध कर्म घेऊन ती चाललीय पण आता घागर तर फुटलीय आणि संचित सांडून संपून गेलयं. प्रारब्ध कर्माची झारी तेवडी शिल्लक राहिली आहे.

श्री प्रभूंनी वेणीचं रुपक संसारासाठी घेतलं असावं असं वाटतं. एकदा श्रीकृष्णाची ओढ लागली की मग त्या संसाराला काय महत्व? जो नीटनेटका होता तो (माझी वेणीच गेली सुटून) विस्कळीत झाला संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणें ‘सांडिला लौकिक, लाज भय चिंता। रातले अनंता चित्त माझे’ अशी अवस्था झाली. म्हणूनच राधा, ‘कृष्णा माझ्याकडे पाहू नका रे बाबा, माझ्या संसाराची ही दैना तुझ्यामुळे झालीय’ असं त्याला सांगतेय.

बाहेर अवस्था अशी झालीय पण अंतरंगाची स्थिती काय? ‘शाम सुंदर अति मनोहर, बहरहा घ्यावा लुटून’ हा श्रीकृष्ण सुंदर तर आहेच पण माझ्या मनाचंही हरण करतोय. माझं मन माझ्या ताब्यात राहत नाहीं. बहर आला की सर्व झाड कसं फुलांनी डवरून जातं राधेच्या अंत:करणाची अवस्था तशीच झालीय. न देखे, न बोले, नाइके आणिक। बैसला हा एक हरि चित्ती॥ (तुकाराम महाराज) आणि श्री प्रभूंनी ‘लुटून’ हा शब्द अगदी मर्मिकपणे वापरला आहे. लुटून नेण्यामधे हांवरेपणा आहे, किती घेतला तरी पुरेसाहोत नाही, हा भाव आहे.

राधा भक्त आहे. श्री नारदांनी भक्तीची व्याख्याच मुळी ‘सा तु अस्मिन् परम प्रेमरूपा’ अशीच केलीय. म्हणूनच श्री प्रभूंनी राधेला ‘प्रीतीची राधा’ म्हणून संबोधिले आहे. ‘कृष्ण कृष्ण कृष्ण’ ही तिची एक वृत्ती झाली आहे. तेव्हां अशामधे राधा कृष्णच बनली तर? विभक्त नव्हे तो भक्त बनली तर? माऊलीने एके ठिकाणी सांगितले आहे की त्या कोशातल्या किड्याला बाहेरून भुंगा टोचा मारीत असतो, त्याच्या भीतीने त्या किड्याला सारखा त्याचाच ध्यास लागलेला असतो. त्यामुळे एक दिवस तो किडाही त्या भूंग्यासारखाच होऊन बाहेर पडतो हीच भीती राधेला आहे जणू । म्हणूनच ती अति सावधतेने हरिचरणाजवळ जातेय न जाणो त्याच्या ध्यासानें मी कृष्णच झाले तर। मग त्या द्वैताचा आनंद भोगायचा कुणी? जसं संत तुकोबा म्हणतात, ‘जळो माझी ऐशी बुद्धी। जी घाली मज तुजमधी॥ ऐसे करी विठुबाई।, तुझे पाय, माझे डोई॥ बस्‌, यांतच आनंद आहे.

सगुणाचा हा द्वैतानंद गमावू नये म्हणून राधा ‘जपून’ चालते आहे. सावधगिरीने ‘जाणिवपूर्वक’ चालते आहे. अद्वैतापेक्षा सगुण भक्तीचा आनंद तिला जास्त गमतो आहे. खरे तर राधेचे ‘जाणोनि नेणते करी माझे मन’ असेच आहे. राधा ज्ञानी भक्त आहे, तरीही सगुण भक्तीच्या रसास्वादाचा आनंद अलौकीक आहे, तो तिला सोडायचा नाही.

महाराजांचे हे काव्य सगुण भक्ताला मधुरा भक्तीचा आनंद देणारं आहे आणि पारमार्थिक साधकाला ज्ञानी भक्तांच्या अवस्थेची जाणीव करून देणार आहे.

माझ्या अल्पबुद्धीने जेवढं चिंतन होईल तो प्रयत्न मी केला आहे. श्री प्रभूंच्या चरणी मी शरण आहे. माझ्या चिंतनामधे काहीं चुका असल्यास क्षमा करावी व मार्गदर्शन करावे ही श्री प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे.

[social_warfare]