वेदांताच्या असीम ज्ञानराशीतील प्रमेयांचे एक एक दालन उघडत असताना, श्रीजींचा परावलीचा, धीरगंभीर आवाजातील वंदे श्री प्रभु सद्गुरुं गुणनिधीं हा श्लोक कानावर आला की, एरवी इतस्ततः अखंड भूणभूण करत असलेला मनाच्या विचारांचा भुंगा, सद्गुरु चरणावर अलगद जाऊन विसावतो. भ्रमर जसा कमळाच्या मकरंदाने देहभान विसरून, कमळामध्ये रात्रभर बंदिस्त होऊन जातो, अगदी तसेच काहीसे श्रीजींचे प्रवचन ऐकताना होते. श्रीजी आपल्याला समजावून देत असलेल्या, स्वतःच्या विद्वत्ताप्रचूर संभाषणातून आपल्यासमोर ठेवत असलेल्या अद्वैत मकरंदाची गोडी ही अशीच अविट आहे.

ह्यावेळी ठाणे दौऱ्यातील प्रवचनांमध्ये पुन्हा एकदा श्रीजींनी श्रीमद्भगवद्गीतेचे सार उपस्थितांसमोर उलगडले. ह्या आधीच्या प्रवचनांमध्ये श्रीजींनी जरी हे विषय घेतले असले तरी, साधकाला अत्यावश्यक असणारी उजळणी ह्या प्रवचनाच्या निमित्ताने झाली. सद्गुरुंच्या मुखकमलांतून होणाऱ्या ह्या दिव्य वाणीच्या अमृतवर्षावात न्हाऊन निघताना होणाऱ्या उजळणीमुळे, तो तो विषय, जीवन जगण्यासाठी गरजेचे असलेले तत्वज्ञान, आपल्या मनावर चांगले ठसते. आणि जनसामान्यांच्या नित्याच्या व्यवहारातील उदाहरणांचा धागा पकडून, ते त्यांच्यासमोर सुलभतेने मांडण्याच्या श्रीजींच्या ठाई असलेल्या हातोटीमुळे, परिणामकही होते.

जीवनात ईश्वराची आवश्यकता का आहे? ईश्वराचे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक स्वरूप, तो आपल्यातच आहे व तो कसा ओळखावा? जगावे आणि त्याचबरोबर मरावे कसे? कोणता आहार आणि कसा घ्यावा, इत्यादी प्रश्नांची उत्तरे शास्त्र आणि पुराणातील अनेक अनेक संदर्भ देऊन, श्रीजीं ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून जनमानसांवर सुसंस्कारच केले. मानवी जीवनाला समृद्ध करणारी, पण जनसामान्यांना माहीत नसलेली जीवन जगण्याची कलाच, जणू ह्या प्रवचन मालिकेच्या निमित्ताने श्रीजींनी समजावून सांगितली.

ही प्रवचने इतकी सरळ आणि सहज होती की, अगदी पाच-सहा वर्षाच्या मुलांनीही त्यात प्रत्येक दिवशी समरसून सहभाग घेतला आणि प्रवचनाच्या अनुषंगाने शेवटच्या दिवशी श्रीजींना प्रश्न विचारले. आणि अर्थातच श्रीजींनीही प्रसंगी बालक होऊन, त्यांचे सम्यक समाधान केले. यातच श्रीजींची प्रवचन समजावून सांगण्याची सहजता उद्धृत होते.

प्रकृती अस्वास्थ जरी असले तरी, समोर विराट जनसमुदाय असला की, श्रीजींना स्फुरण येते आणि चैतन्याचा हा अविष्कार आपल्याला त्यांच्या देहबोलीतून आणि अखंड पाझरणाऱ्या वाणीतून अनुभवता येतो. प्रवचनादरम्यान श्रीजींचे, त्या परमात्म्याशी असलेले तादात्म्य अनुभवता येते. प्रवचनानंतरही येणाऱ्या सर्व भाविकांना अत्यंत प्रसन्नतेने सामोरे जाणे, त्यांना हवा तसा अत्यंत आवश्यक असलेला, संपूर्ण आधार देणे आणि त्यातच आनंद मानणे हे सद्गुरूंच्या ठाई असलेले सद्गुणही ह्या प्रवचन मालिकेदरम्यान अनुभवता आले. अनेक सदभक्तांनी दिलेल्या दुर्मिळ प्रेमळ भेटवस्तूही सकलमत संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसांमध्ये रुजत असल्याचेच द्योतक होते.

संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!

[social_warfare]