श्री सिद्धराज प्रभु आणि अमीन सयानी

श्री सिद्धराज माणिकप्रभु आणि त्यांचा सिंधिया स्कूल मित्रपरिवार हा नेहमीच माझ्यासाठी आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. त्यात मला जास्त आकर्षण होते ते अमीन सयानी यांचे. सुप्रसिद्ध बिनाका गीतमालेचे होस्ट अमीन सयानी हे श्रीजींचे सिंधिया स्कूल मधील मित्र होते. एकदा बोलण्याच्या ओघात श्रीजींकडून अमीन सयानींचा उल्लेख होताच मी मुंबईत त्यांची भेट घेण्याचे ठरविले व श्रीजींकडून परवानगी घेतली. मुंबईत आल्यावर रीगल सिनेमाचे इमारतीतील ऑफीसमधे अमीन सयानींना भेटावयास गेलो. श्रीजींकडून आलो असे सांगताच ‘‘कैसे हैं हमारे सिद्धराज?’’ असं त्यानी विचारलं.  मी ‘‘श्रीजी ठीक हैं और आपकी हमेशा याद करते हैं’’ असे म्हणताच त्यांनी पुन्हा मला ‘श्रीजी’ म्हणावयास लावले आणि ‘‘कितना अच्छा संबोधन है’’ असे म्हटले. त्यावर ‘‘We devotees respectfully and lovingly call him SHREEJI’’ असे म्हणताच त्यांचा नूरच बदलून गेला. ‘‘आमच्या बॅचमधे अतिशय साधे सरळ प्रेमळ असे सिद्धराज होते, त्यांचे ठायी वास करीत असलेल्या देवत्वाविषयी सर्वांच्या मनात आदराची भावना होती’’ असे त्यांनी सांगितले. अमीन सयानीं बरोबर बोलताना ते आपल्या शालेय सहकारी बद्दल बोलत आहेत की एका श्रद्धेय सत्पुरुषाबद्दल तेच कळत नव्हते.

सन् १९४९ साली श्रीजींना वयाच्या दहाव्या वर्षी घरापासून १५०० की. मी. दूर असलेल्या ग्वालियरच्या सुप्रसिद्ध सिंधिया स्कूल येथे शालेय शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. लौकरच आपल्या शांत, कर्तव्यदक्ष व विनयशील स्वभावाने श्रीजींनी आपल्या मित्रपरिवाराची व अध्यापकवर्गाची मनं जिंकून घेतली. श्रींजीचे आपल्या शाळेवरील उत्कट प्रेमाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे सिंधिया स्कूलच्या प्रेरणेने माणिकनगर येथे स्थापित केलेले माणिक पब्लिक स्कूल. श्रीजी नेहमी चर्चेत सिंधिया स्कूलच्या आपल्या मित्रपरिवाराबद्दल आत्मीयतेने सांगत व शाळेतील त्यांच्या स्वर्णिम स्मृतींना उजाळा देत. ४०-५० वर्षानंतरही श्रीजींच्या ६०व्या जन्मदिवसाचे आयोजन जेव्हां माणिक पब्लिक स्कूल येथे करण्याचे ठरले तेव्हां अमीन सयानी आणि त्यांचे सिंधिया स्कूलचे मित्र केवळ श्रीजींना भेटण्यासाठी देशाच्या कोन्याकोन्यातून व विदेशातूनही माणिकनगरला आले होते.

धन्य ते श्रीजी व त्यांचे शालेय मित्र!

अंतर्ज्ञानी सद्गुरू

आज अशे अनेक सौभाग्यशाली लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्षरूपाने श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या दिव्य सत्संगाचा लाभ मिळविला. महाराजांच्या सान्निध्यात राहिलेले – वावरलेले आज कितीतरी लोक आहेत, ज्यांना वेगवेगळ्या काळी निरनिराळ्या प्रकाराने महाराजांच्या दैवी सामर्थ्याची प्रचीती अनुभवण्यास मिळाली. नवीन लोकांना बाहेरून बघतांना आमचे महाराज जरी अगदी साधारण माणसासारखे दिसत होते परंतु आतून त्यांचे खरे स्वरूप किती दिव्य आणि विराट हाते हे अनुभवण्याचा सौभाग्य ज्या प्रभुभक्तांना मिळाला तेच खरे सौभाग्यशाली होत.

माझे वैय्यक्तिक सौभाग्य म्हणजे मला जन्मापासून नव्हे तर जन्माच्या आधीपासूनच महाराजांची छत्रछाया लाभली. त्यांच्यावर माझे अपार प्रेम आणि श्रद्धा बाल वयापासून होती. लहानपणापासूनच माझ्या मनावर महाराजांच्या भव्य व्यक्तित्वाचा प्रभाव पडला होता. मुबंईकर प्रभुभक्तांकडून अनेक वेळेला महाराजांच्या शक्तीने कशे चमत्कार घडले आणि महाराजांची त्यांच्यावर कशी कृपा झाली हे सर्व ऐकत होतो. या गोष्टी मला खूप रोमांचित करायचे. महाराजांच्या उजव्या हातात एक सोन्याचा कडा असायचा, जो आज श्रीज्ञानराज महाराजांच्या हातात आहे. अगदी वयाच्या ८-१० वर्षा पासून मला अस वाटयचं  की महाराजांची शक्ती बहुतेक त्या कड्यात आहे. हा विचार मी कधीही कोणापुढे व्यक्त केला नव्हता. चक्क आई वडलांना सुद्धा नाही. फक्त माझ्या मनांत ठेवायचो आणि जेव्हां महाराजांचे दर्शन व्हायचे तेव्हां मनोमनी त्या कड्याला नमन करायचो. दर वर्षा प्रमाणे मी सन्‌ १९७६ सालच्या दत्त जयंती उत्सवा साठी माणिकनगरला गेलो होतो, त्या वेळी मी १८ वार्षाचा होतो. नेहमी प्रमाणे लोकांना दर्शन देण्यासाठी महाराज बैठकीत बसलेले होते आणि मी तिथे एका बाजूला थांबलो होतो. उपस्थित मंडळीशी कुठल्यातरी विषयावर महाराजांची चर्चा चालली होती अचानक चर्चेत महाराजांच्या हातातल्या कड्याचा संदर्भ निघाला. माझे लक्ष अचानक त्यांच्या संभाषणाकडे गेले. महाराज त्या लोकांना म्हणाले, ‘‘काही लोकांना वाटते की माझी शक्ती या कड्यात आहे. पहिली गोष्ट, माझ्याकडे कुठलीही शक्ती-फक्ती काही ही नाही. ती शक्ती या पीठाची, या जागेची आणि या गादीची आहे. ती सत्ता प्रभूंची आहे आम्ही फक्त माध्यम आहोत.’’ मी चकितच झालो आणि महाराजांचे ते वाक्य ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मी कधीही महाराजांसमोर कड्याचा विषय काढलाच नव्हता. माझा विचार माझ्याच मनातच असायचा, तरीही हा विचार ओळखून महाराजांनी माझा भ्रम दूर केला. मला अप्रत्यक्षरूपाने उद्देशून काहीही न बोलता वेळ साधून माझा भ्रम दूर केला. त्या क्षणाला मलाच माझ्या मूर्खतेवर हसू आले आणि महाराजांनी रचलेल्या पदाच्या एका ओळीच्या अर्थाचा बोध झाला ‘‘ही जीवन नौका आमुची। प्रभु आज्ञा जलवर तरती।।’’

असे होते आमचे सद्गुरु श्रीसिद्धराज माणिकप्रभु महाराज. साक्षात्‌ सिद्ध पुरुष! काहीही उघड न दाखवता आपल्या मनातले ओळखायचे आणि मौनपणें सर्व संशयाचे निरसन करून टाकायचे – ‘‘गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु छिन्न संशया:।।’’

आरती श्रीमनोहरप्रभूंची

श्री मनोहर माणिकप्रभु महाराजांच्या १५८व्या जयंती निमित्त

श्री ज्ञानराज माणिकप्रभूंची नूतन रचना

आरती श्रीमनोहरप्रभूंची

(चाल: आरती सगुण माणिकाची…)

आरती सद्गुरुरायाची।
मनोहरप्रभुच्या पायाची।।ध्रु.।।

श्रोत्रियब्रह्मनिष्ठ त्यागी।
स्वयं परिपूर्ण वीतरागी।
ज्ञानविज्ञानतृप्त योगी।
चिरन्तन आत्मसौख्य भोगी।।

घेई विषयापासुनि मोड।
लागे नामामृत बहु गोड।
कर निज प्रभुचरणाप्रति जोड।
ठेवी अंतरि अविरत ओढ।।

असा सद्गुरू।
परात्परतरू।
कल्पतरुवरू।
आरती करू चला त्याची।
मनोहरप्रभुच्या पायाची।।१।।

प्रभाते दीप्त जशी प्राची।
समुज्ज्वल दिव्य तनू ज्याची।
जशी श्रुति शास्त्र पुराणाची।
सुसंस्कृत गिरा तशी त्याची।।

मूर्ति जरि असे वयाने सान।
ठेवुनि परंपरेचे मान।
राखुनि संप्रदाय अभिमान।
रचिले अनुपम नित्य विधान।।

जयाची कृती।
आत्मसुख रती।
स्वरूपस्थिती।
सकलमत मती असे ज्याची।
मनोहरप्रभुच्या पायाची।।२।।

बालरूपांत दत्तमूर्ती।
अमित आलोक यशोकीर्ती।
सच्चिदानंदकंद स्फूर्ती।
मूर्तिमत्‌ ज्ञानकर्मभक्ती।।

सुंदर प्रभुमंदिर निर्माण।
अविरत प्रभुमहिमा गुणगान।
माणिकनामामृत रसपान।
करवुनि देई आत्मज्ञान।।

शरण जा त्वरा।
चरण ते धरा।
स्मरण नित करा।
मरणभयहराकृपा ज्याची।
मनोहरप्रभुच्या पायाची।।३।।

श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराज

बरे होते घरी …

‘गुरु: साक्षात्परब्रह्म’ म्हणतात ते खरेच असावे याची प्रचीती आली. सन २०१८ च्या जून महिन्यात आम्ही बदरी-केदार, हरिद्वार यात्रेला एका धार्मिक विचाराच्या गटामार्फत जाऊन आलो. यात्रा निर्विघ्न व सफल व्हावी यासाठी प्रथेप्रमाणे श्रीमहाराजांची परवानगी-आशीर्वाद व प्रसाद घ्यावा म्हणून आम्ही माणिकनगरला गेलो व श्रीजींना ही बाब सांगितली तेंव्हा अनपेक्षितपणे श्री ज्ञानराज प्रभू म्हणाले, “कशाला जाता देसाई?” म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की “कशाला उगाच त्रास करून घेता? ‘‘या वयात ही यात्रा अवघड आहे.” मी जरा चपापलोच! पण मला जायचेच होते, कारण आमच्या काही मित्रांनी यासाठी खूप म्हणजे खूपच आग्रह केला होता व भिडेखातर मला हो म्हणावे लागले. त्यातून आमच्या सौ.बाईसाहेबांचीही फार इच्छा होती. त्यांना कुठे नेणे आजवर जमले नाही किंवा तसे म्हणण्यापेक्षा आमच्या अरसिकतेमुळे नेलेच नाही. असो. श्रीजींना मी माझा भिडस्तपणा व नाइलाजाचे कारण सांगितले. त्यावर ते म्हणाले “ठीक आहे. जाऊन या पण सांभाळून रहा”

पण श्रीजींनी मनातून परवानगी दिली नाही याची जाणीव झाली आणि याची प्रचीति यात्रेत लगेच आली. तिथे केदारनाथला सीतापूरपर्यंत पायथ्याला आम्ही ट्रेनने व बसने कसेतरी पोहोचलो. पण तिथून पुढे १५ किमी केदारनाथापर्यंत घोडे-डोली किंवा हेलीकॉप्टरने जायचे, पण हेलीकॉप्टरच्या फेऱ्या तीन दिवसांपूर्वीच ऑनलाईन अॅडव्हान्स बुकींग पूर्ण झालेल्या होत्या. आता घोडे, डोली किंवा पायी या शिवाय पर्याय नव्हता. घोड्यावर जायला चार तास, परत यायला चार तास व तिथे मंदिराजवळ अडीच ते तीन तास रांगेत, असे अकरा-बारा तास लागणार होते. तरीही जाऊ कसे तरी, म्हणून आम्ही पहाटे तीन वाजता घोड्यांच्या स्थानकावर पोहोचलो. तिथे पोहचताच अॅसिडिटीमुळे किंवा अन्य कशामुळे कुणास ठाऊक मला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. उजवीकडे खोल दरीत, घोंघावत, तुफान वेगाने धावणारी अलकनंदा नदी व डावीकडे उंचच उंच डोंगराचे भयंकर रूप व मध्ये जाणे-येण्यासाठी फक्त आठ ते दहा फूट रुंदीचा दगडा गोटयांचा रस्ता हे पाहून माझ्या छातीवर भयंकर दडपण आले. तशात आदल्या रात्री पोट साफ होण्यासाठी घेतलेल्या जुलाबाच्या गोळयांनी आपला प्रताप दाखवण्यास सुरूवात केली. मला कमोडची सवय, तिथे साधे टॉयलेट देखील मिळणे दुरापास्त होते. एक होते तिथेही अर्धा – एक तास रांगेत उभे राहावे लागणार होते. मी म्हणालो “आता मेलो.” माझी अवस्था व कण्हणे पाहून सोबतचे इतर लोक चिंतातुर झाले. मी सौभाग्यवतींना म्हणालो, “तुम्ही या लोकांबरोबर जाऊन या, मी रूमवर थांबतो” पण त्यांना ते योग्य वाटले नाही. शेवटी आम्ही दोघेही रूमवर परत आलो. बाकीचे सर्वजण पहाटे तीनला निघून रात्री दहा-साडेदहाला कुंथत-कण्हत-दमून-भागून परत आले व म्हणाले, “देसाई, तुम्ही न आलेलेच बरे झाले. भयंकर हाल झाले. मध्येच वाटेत गारांच्या पावसाने चिंब भिजलोही. जवळ परत आल्यानंतर हॉटेलचा रस्ताही चुकलो. शोधण्यात दीड-दोन तास अंधारात भटकत राहिलो” श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराज विनोदानें म्हणायचे – ‘‘बरे होते घरी – कुठे आठवली पंढरी’’ याची या यात्रेत मला प्रकर्षाने आठवण झाली.

म्हटले, श्रीजींच्या म्हणण्याची आता खरी प्रचीति आली. तिथूनच केदारनाथाला नमस्कार केला. सगरोळीला घरी आल्यावर सर्वेश्वर मंदिरात केदारनाथरूपी महादेवाची पूजा केली व माणिकनगरला गेल्यावर श्रीप्रभूंच्या प्रांगणातील सर्वेश्वर मंदिरातील महादेव हाच केदारनाथ आहे असे मानून पूजा करण्याचा संकल्प व क्षमायाचना केली.

तिथून घरी परत येताना व आल्यावर सात-आठ दिवस निरनिराळया व्याधींनी आम्ही व आमचे सोबतचे बरेच लोक त्रस्त होते. पण श्रीप्रभूंच्या कृपेने अघटित काही घडले नाही. या प्रसंगातून श्रीप्रभुचरित्रातील श्री विठ्ठलराव शेकदार – सावत्र भावाचे लग्न – “लवकर परत या” असे श्रीप्रभूंचे सांगणे – सावत्र आईचा सावत्रपणाचा हिसका व त्यातून बेतलेले प्राणसंकट व प्रभुकृपेने पुढे ते विठ्ठलराव शेकदार कुटुंब सुखरूप घरी आलेल्या प्रकरणाची आठवण होते. श्रीप्रभूंच्या सांगण्याची सत्यता इथे पटते. या गोष्टींची यावेळी प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहीली नाही.

आता दुसरी प्रचीति अशी की, बदरीनाथला गेलेवेळी मंदिरात अतोनात गर्दी-चेंगराचेंगरी. बाहेर पडणाऱ्या बर्फाची थंडी व आत मरणाचा उकाडा याला जीव वैतागून गेला. मंदिर व्यवस्थापनाला शिव्या देण्यातच मन गुंतून गेले. रेटारेटीत कसेतरी श्री बदरीनाथाचे ओझरते दर्शन झाले. प्रसाद समोर ठेवला, तो पुजाऱ्याने घेऊन तो प्रसादाचा पुडा न फोडता लगेच माझे हातात कोंबला व ढकलाढकलीत तसेच पुढे ढकलले जात श्री बदरीनाथांच्या मूर्तीकडे पहात आम्ही बाहेर पडलो. म्हटले, एवढा आटापिटा करून नीट दर्शनही झाले नाही. मग पुन्हा रांगेत गेलो. तेंव्हा दुपारचे नैवेद्य व आरतीसाठी दार बंद झाले होते. गर्दी कमी दिसत होती म्हणून परत दाराजवळ जाऊन उभे राहिलो. तो मधमाश्यांचे पोळ उठल्याप्रमाणे कुठून लोक आले कुणास ठाऊक, पण दार उघडताच रेटारेटी परत सुरू झाली. पण यावेळी कसे डोक्यात आले कुणास ठाऊक, रामेश्वर यात्रेला जाताना श्री ज्ञानराजप्रभू आपल्या प्रवचनात म्हणाले होते, “माणिकनगरला श्रीप्रभूंच्या रूपात सर्व ठिकाणच्या देवता आहेत. मग यात्रा कशाला? असे सर्वजण म्हणतात. श्रीप्रभूंच्या रूपात इतर सर्व क्षेत्रदेवता पाहणे सोपे आहे पण सर्व क्षेत्रात त्या त्या देवतांच्या ठिकाणी श्रीप्रभूंना पाहणे अवघड आहे. हीच खरी भक्ती व श्रद्धा होय. ही श्रध्दा जडवून घेण्यासाठी यात्रेलाही जाऊन यावे.”

मग हा विचार त्या गर्दीतही मनात आला व बदरीनाथाच्या मूर्तीजवळ येताच बदरीनाथाच्या ठिकाणी श्रीप्रभूंचे रूप आठवले. श्रीप्रभूंच्या रूपात बदरीनाथाला पाहिले, नमस्कार केला अन् काय आश्चर्य नेहमीप्रमाणे आमच्या आई वडीलांचा फोटो हातात घेऊन श्रीप्रभुरूपी बदरीनाथाला नमस्कार केला. त्याचवेळी ध्यानीमनी नसतांना माझेकडून हे दुसऱ्यांदा दर्शन म्हणून, हार-फुले किंवा प्रसादाचे काहीही बरोबर नेले नसताना देखील आम्ही आई-वडिलांच्या फोटोसह डोके टेकवले. तिथल्या पूजाऱ्याने जवळच पडलेला एक हार घेऊन आमचे आई वडीलांच्या फोटोला घातला व आमचे हातावर त्यांचेकडचा प्रसादही दिला. अकल्पितपणे हे घडून गेले. मी इतका आनंदित व प्रभावित झालो आणि श्रीजींच्या त्या दिवशीच्या प्रवचनाची आठवण झाली. म्हटलं यात्रा सफल झाली. समाधान वाटले. या प्रसंगी श्रीप्रभुचरित्रातील रामेश्वर यात्रा- कावड- प्रभुला अभिषेक तसेच तुळजापूरवासिनीची प्रभुरूपात पूजा या प्रकरणाची आठवण झाली.

अशी ही ‘प्रचीति गुरुतत्त्वाची’ आहे. श्रीसिध्दराजप्रभूंना वाचासिध्दी होती. त्या ‘सिध्दांच्या’ वाचेला आता ‘ज्ञानाची’ झालर लागली आहे ही खूप मोठी प्रासादिक बाब आहे. श्रीप्रभुकृपेने सर्वांचे कल्याण होवो व श्रीप्रभुचरणी आमची अनन्य भक्ती वृद्धिंगत होवो हीच श्रीप्रभुचरणी प्रार्थना.

प्रभुसेवेचा अखंड वारसा

आमचे श्री माणिकप्रभु संस्थानशी अतूट नाते आहे आणि ते जोडण्यास श्री सद्गुरु मार्तंड माणिकप्रभु महाराजांच्या सगरोळी दौऱ्याचे निमित्त घडले. माझे वडील श्री बापूराव सगरोळीकर त्या वेळी तरुण होते. श्री महाराजांनी सगरोळीहून माणिकनगरला परतताना उत्साही व होतकरू बापूस “माझ्या बरोबर माणिकनगरला येशील का?” असे विचारताच क्षणाचाही विचार न करता माझ्या वडिलांनी “हो, येतो महाराज” असे तत्परतेने उत्तर दिले. एकदा ते माणिकनगरला आले आणि माणिकनगरचेच झाले. श्रीजींनीच आपल्या देखरेखीखाली माझ्या वडिलांचे शिक्षण पूर्ण करविले, संस्कार घडविले, लग्न लावून संसार थाटून दिला व श्री संस्थानच्या कारभारात रुजू करून घेतले.

श्री सद्गुरु शंकर माणिकप्रभु महाराज पीठारूढ झाल्यावर बापूराव हे त्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख झाली. माझे व माझ्या बंधु-भगिनींचे जन्म माणिकनगरातच झाले व आम्ही प्रभुमंदिराच्या परिसरात खेळत-खेळतच मोठे झालो. जेव्हां आमच्या वडिलांचा हैदराबाद येथे सरकार-दरबारी चांगला जम बसला तेव्हां श्री शंकर माणिकप्रभूंची हैदराबादची सगळी कामे बापुराव यशस्वीरीत्या करतात अशी ख्याती झाली. माझ्या वडिलांनी आपले संपूर्ण जीवन श्रीप्रभूंच्या सेवेतच खर्च केले.

पुढे शामराव या नावाने माझी वाटचाल सुरू झाली. श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांच्या कारकीर्दीतही आमच्या घरण्याची प्रभुसेवा वृद्धिंगत होत राहिली. श्रीजींच्या आज्ञेवरून ई. स. १९६५ सालच्या दत्तजयंती पासून दरवर्शी उत्सवाच्या लेखा विभागाची सेवा माझ्याकडे आली. ही सेवा प्रभुकृपेने ५५ वर्षांपासून आजतागायत चालू आहे. श्री ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांचीही आमच्या घराण्यावर विशेष कृपादृष्टी आहेच. श्री प्रभुकृपेने श्री संस्थानच्या तीन पीठाधीशांची (श्री शंकरप्रभु, श्री सिद्धराजप्रभु व श्रीज्ञानराजप्रभु) कारकीर्द पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. या काळात श्रीसंस्थानची होत असलेली सर्वतोमुखी अभिवृद्धि पाहून कै. श्री बाबासाहेब महाराजांचे स्वर्णिम स्वप्न साकार होत असल्या सारखे वाटते.

श्री प्रभूंच्या कृपाछत्राखालीच आमच्या परिवाराची आजही वाटचाल ‌सुरु आहे. प्रभुशी ऋणानुबंध आहेत याची रोज अनुभूती मिळते. अशीच सेवा आमच्या घराण्याकडून निरंतर घडत राहो हीच प्रभुचरणी प्रार्थना.

आरती श्रीअन्नपूर्णेश्वरीची

जयदेवि जयदेवि जय अन्नपूर्णे श्री अन्नपूर्णे।
मां पाहि मां पाहि सच्चित्सुख स्फुरणे॥ध्रु.।।

दर्वी-पात्रसुशोभितशशिमुखि श्रीचरणे।
क्षुत्पीडा संहारिणि भक्तोदर भरणे।
‘अन्नब्रह्मेति’ श्रुतिवाक्यालंकरणे।
सुर नर मुनि संतोषिणि षड्‌रस परिपूर्णे।।1।।

माणिकनगर निवासिनि माणिकरवि किरणे।
सिद्धप्रभु प्रस्थापित तेजाविष्करणे।
ज्ञानाज्ञान निवारिणी कलिमल संतरणे।
माणिक क्षेत्र कुटुंबिनी तापत्रय हरणे।।२।।