प्रेमळ विठ्ठल

आषाढी एकादशीनिमित्त पालघरच्या श्री प्रेमळ विठ्ठल मंदिरात घुमला श्री माणिकप्रभुंच्या पदांचा गजर

आषाढी एकादशी निमित्त पालघरच्या श्री प्रेमळ विठ्ठल मंदिरामध्ये श्री माणिकप्रभुंच्या पदांचा गजर घुमला. या पुण्यप्रद प्रसंगी श्री चिज्ज्वल प्रभु यांची उपस्थिती विठ्ठल भक्तांसाठी भारावून टाकणारी होती. सुरुवातीला श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, पालघरचे मुख्य अर्चक श्री. मोरमुळे गुरुजी आणि अध्यक्ष श्री. जोशीकाका यांनी श्री चिज्ज्वलप्रभुंचे स्वागत करून, त्यांच्या शुभहस्ते विठ्ठल रखुमाईची पूजा करविली.

 

त्यानंतर श्री. मोरमुळे गुरुजींनी प्रेमळ विठ्ठल मंदिराचे मुख्य प्रेरणास्त्रोत असलेल्या माईसाहेब दांडेकर आणि श्री माणिकप्रभु संस्थानाचे तृतीय पीठाधिश, श्री मार्तंड माणिकप्रभु यांच्या परस्पर स्नेहाचा, गुरु शिष्य नात्याचा, माईंवर झालेल्या श्री मार्तंड माणिकप्रभुंच्या कृपेचा हृदय संबंध उलगडला. त्यानंतर मुंबईच्या श्री माणिकप्रभु सांप्रदायिक भजनी मंडळाने श्री माणिकप्रभु आणि माणिकनगरची माहिती उपस्थित पालघरवासीयांना दिली. त्यानंतर श्री चिज्ज्वल प्रभु यांच्या सुरेल आवाजात, श्रीमाणिकप्रभु सांप्रदायिक भजनी मंडळाच्या साथीने, झांज, संवादिनी, तबला, मृदंगाच्या कल्लोळात श्रीमाणिकप्रभुंची अनेक विठ्ठल भक्तीपर पदे आणि त्यानंतरच्या पीठाधिशांच्या अनेक वेदांतपर रचना सादर करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळेस पालघरच्या श्री. हेमंत लोखंडे यांना स्फूर्ती आवरेनाशी झाली आणि त्यांनीही भजनसंध्येमध्ये तबल्यावर साथ दिली. भजनसंध्येच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या अवतार काळात श्री माणिकप्रभु आणि श्री विठ्ठल यांच्या पंढरपूर येथील हृदयभेटीच्या प्रसंग श्री चिज्ज्वलप्रभु यांनी स्वतःच रचलेल्या ‘जय माणिक जय पुंडलिक वरदाता’ हे काव्य स्वतःच्याच आवाजात सादर केले. त्यावेळेस संपूर्ण सभागृहच जणू भक्तीच्या चंद्रभागेमध्येच डुंबत होते.

सुमारे दोन तास चाललेल्या ह्या भजनसंध्येमध्ये अनेकांना अद्वैतानंदाची अनुभूती झाली. भजनसंध्येच्या शेवटी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, पालघर यांच्यावतीने श्री चिज्ज्वल प्रभु यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री चिज्ज्वल प्रभु यांनी उपस्थित सर्वांनाच माणिकनगरला येऊन, श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन, कृतार्थ होण्यासाठी प्रेमळ निमंत्रण श्री माणिकप्रभु संस्थानाच्या वतीने दिले. जय गुरु माणिक!

योगी करबसप्पांचा विवेक

माणिकनगर समीप हुडगी ग्राम
तेच करबसप्पांचे विश्राम धाम
वृत्तीने अवधूत, दिगंबर कायम
परम योगी वर्ते स्थितप्रज्ञ ।।१।।

श्री मार्तंड माणिकप्रभु प्रयाणांतरी
निघाले हैद्राबादेहून श्रीप्रभु नगरी
हुडगी ग्राम परतीच्या वाटेवरी
तयारी स्वागताची करी योगी ।।२।।

जरी सदैव दिगंबर वर्तत
आज चिंध्या जमा करत
लज्जा रक्षणार्थ लंगोटी शिवत
करीत परीधान ते दिवशी ।।३।।

लंगोटी घालून श्रीजींचे स्वागत
करबसप्पा अत्यंत आनंदें वर्तत
श्रीजीही प्रेमे करबसप्पा समवेत
स्वीकारून आदर सत्कार हर्षभरे ।।४।।

आचारी आणिले प्रभु नगरीहून
पाहुणचार व्यवस्था चोख ठेवून
श्रीमार्तंड माणिक प्रभुसि तोषवून
वाहून घेतले प्रभु सेवेसि ।।५।।

दुसऱ्या दिवशी श्रीजींनी प्रस्थान
ठेविले हुडगीचा पाहुणचार घेऊन
जाता श्रीजी ग्रामसीमा ओलांडून
सोडून फेकत लंगोटी करबसप्पा ।।६।।

पुन्हा आपले दिगंबर वर्तत
समस्त लोक विस्मय करीत
धाडस करून तयासी पुसत
नेसत का नाही वस्त्रप्रावरण ।।७।।

खळाळून हसत करबसप्पा यावर
कुत्रीमांजरे, गाढव आणि डुक्कर
कशासाठी लाजावे यांच्या समोर
घोर जीवासी व्यर्थ लावूनी ।।८।।

ज्यासी झाले आहे आत्मज्ञान
तोचि एक मनुष्यप्राणि जाण
आला आपुल्या ग्रामी सगुण
म्हणून कौपिन केले धारण ।।९।।

तुम्हास नाही स्वस्वरुपाचे ज्ञान
माझ्या लेखी तुम्ही पशूसमान
नुरले काहीच लज्जेचे कारण
आवरण यास्तव फेकिले वस्त्राचे ।।१०।।

ज्ञानाविण नर पशूसमान होत
करबसप्पा सहज दाखवूनि देत
पुरवावा माझिया मनीचाही हेत
विनवित सप्रेमे दास प्रभुचरणी ।।११।।

प्रभु सर्व काही जाणतो

काल आमच्या एका गुरुबंधूसोबत सुखसंवाद चालू असताना आमच्या गुरुबंधूनी एक शंका उपस्थित केली की, आपण जी काही सेवा करतो, ती महाराजांना अवगत होत असेल काय? ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल काय?

याच अनुषंगाने श्री माणिकप्रभु चरित्रातील टर्रा हुसैनखांची कथा आठवली. श्रीप्रभु दरबारी देशभरातील बहुतेक गुणी लोक येत असत. त्यातल्या त्यात नामांकित गवई लोकांचा भरणा फारच असे. श्रीप्रभु गायनप्रेमी असून, त्या शास्त्राचे मार्मिक दर्दी आहेत, अशी प्रभुंची सर्वत्र ख्याती झाली होती. राजेरजवाड्यांकडून बिदागी मिळाली, तरी गुणाची पारख स्वतः राजेलोकांना तितक्यापुरतीच असल्यामुळे, खरे गुण प्रदर्शन त्यांच्याजवळ होत नसते. गुणी लोकांना गुणज्ञाची आवड असल्यामुळे लांब लांबहून गवई माणिकनगरात येत असत. अशाच प्रख्यात गवयांपैकी हुसैनखां नावाचा एक गवई प्रभुंचा लौकिक ऐकून माणिकनगरी आला. तो बहुतेक संस्थानात फिरून मान्यता मिळवून आला होता. त्याला आपल्या विद्येची आणि कर्तबगारीची अत्यंत घमेंड होती. राजदरबारात बहुमान होऊनही बिदागी कितीही मिळाली, तरी त्याचे समाधान होण्यासारखे नव्हते. आपले कसब ओळखणारा कोणी सापडत नाही, याचे त्याला दुःख वाटत होते. एकदा राजदरबारात त्याचे गाणे चालले असता, स्वतः राजाने त्याला शाबासकी दिली. पण त्याचा त्याला राग आला. “महाराज, काय समजून मला आपण वाहवा दिली?” असा रोकडा सवाल करून त्याने लगेच आपले गाणे संपविले. गाढवापुढे गाण्याकरताच आपण गाणे शिकलो, याचे त्याला वाईट वाटून, त्याने यानंतर कोणापुढे गावयाचे नाही असा निश्चय केला. उत्तम गवई पण, अशा फकीरी बाण्याने अधिकच उन्मत्त होऊन, विद्येचा चहाता कोणी मिळतो काय, या शोधात फिरत असतात प्रभुंचा लौकिक समजल्यावर तो माणिकनगरांत येऊन राहिला. येथील दरबारात त्याला अनेक गवई भेटले. सर्वांची हजेरी प्रभुपढे होऊन, त्यांना बिदागीही मिळाली. पण रोज भत्ता खाऊन, हा कित्येक दिवस पडून राहिला तरी, त्याची हजेरी लागण्याचा योग आला नाही.

माणिकनगरी राहिल्यावर प्रभुंना गाणे समजते असे त्याला दिसून आले, पण खात्री झाली नाही. स्वतः प्रभुंपुढे गायन झाल्याशिवाय आपली विद्या प्रभुंना कशी कळावी आणि प्रभुंना तरी कितपत यात गम्य आहे, हे आपल्यास कसे समजावे? बरेच दिवस अशा विचारात गेल्यावर प्रभुंपुढे आपले गायन झाले पाहिजे, असे त्याला वाटून, तसा योग घडवून आणण्याच्या खटपटीस तो लागला. प्रभुंकडे आज्ञा मिळवण्यास त्याला फारच प्रयास पडले. शेवटी एकदाचा योग आला. त्याचे गायन सुरू झाले. त्याचे गायन चालले असता प्रभुंनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. प्रभु आपले गाणे ऐकत नाही हे पाहून, त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावे अशा हेतूने, त्याने त्या दिवशी पराकाष्ठा केली. चोहीकडे गवई लोक भरले होते. सर्वांनी “वाहवा” दिली, पण प्रभुंनी त्याच्याकडे पाहिलेही नाही. ते दुसऱ्याशी बोलण्याच्या नादात होते. आपले कसब दाखवून प्रभुंचे मन आकर्षून घ्यावे, याची त्याला उत्कंठा लागली. अशा प्रकारच्या मानसिक झटापटीत सापडल्यामुळे, तो एके ठिकाणी अगदीच घसरला. त्याच्या मनाला ती चूक समजली. इतक्यात प्रभूंनीही “वाहवा खांसाहेब!” असे म्हटले. अंतरीची खूण पटली! इतर गवई लोकांच्या लक्षात हे मर्म आले नाही. पण खरा दर्दी हा प्रभु आहे, अशी त्याची खात्री होऊन त्या दिवशी त्याने पराकाष्ठेची बहार केली. प्रभुही अत्यंत खूष झाले. गवयाच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. हुसैनखां गायन संपवून प्रभुंपुढे दंडवत घालून म्हणाला, “महाराज, आज माझ्या विद्येचे व जन्माचे सार्थक झाले! माझ्या विद्येच्या मस्तीमुळे, मी तर्र झालो होतो. याकरिता मला टर्रा हुसैनखां हे नाव मिळाले आहे. येथे माझी मस्ती पार जिरून गेली. पण इत:पर आपल्या चरणाशिवाय, या जगात इतर कोठेही गावयाचे नाही असा माझा दृढ निश्चय झाला आहे.”

या कथेतील हुसैनखांची प्रभुंचे लक्ष आपल्या गायनसेवेकडे वेधून घेण्याची झटापट व त्यात त्याची एका ठिकाणी झालेली घसरण, अत्यंत बोधप्रद आणि मननीय आहे. प्रभुंचे आपल्याकडे लक्ष नाही, असे जरी हुसैनखांला वाटत होते तरी, त्याची मानसिक द्वंद्वातून उद्भवलेली गायनातली छोटीशी घसरणही सर्वज्ञ प्रभुंनी नेमकेपणाने पकडली. आपणही अनेकदा करत असलेल्या अनेक सेवा, मग त्या तनमनधनाच्या असोत, शब्दरूप असोत, गंधरूप असोत, स्वररुप असोत किंवा आणखीन कोणत्याही असोत, निरपेक्ष भावनेनी केलेली आपली सेवा श्रीप्रभु जाणून असतो. आपल्याला त्याचे प्रदर्शन करणे गरजेचे नसते किंवा त्यांच्यापर्यंत माझी सेवा पोचली काय? त्यांना मी केलेली सेवा कळली असेल काय? अशा प्रकारचा किंतु बाळगणे ही गरजेचे नसते. अशा मानसिक झटापटीमध्ये आपण सेवेमधला निखळ आनंद गमावून बसतो आणि आपले सर्व लक्ष त्यांच्याकडून अपेक्षित कौतुकावर, शाबासकीवर लागून राहते.

कोणतीही सेवा ही समर्पण भावनेनेच करावयाची असते आणि निष्काम भावनेने केलेली सेवा एकदा आपण प्रभुंच्या चरणी अर्पण केली की ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतेच. सर्वज्ञ श्रीप्रभु सर्व काही जाणून असतो, भेद मात्र आपल्या बुद्धीत असतो! भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमाणिकप्रभुंचा जयजयकार असो…

पीक मोप आले

नांगरले चांगले शेत
केली मेहनती मशागत
होऊनि अवकाळी बरसात
अवघे पीक वाया गेले ।।१।।

पुन्हा केली मेहनत
झाकोनि अवघे शेत
येता रोगाचे सावट
अवघे पीक वाया गेले ।।२।।

नशीबा दोष न देता
पुन्हा शेत फुलविता
जनावरें खाऊ जाता
अवघे पीक वाया गेले ।।३।।

नाही नाराजीचा सूर
सातत्यात नाही कसूर
सद्गुरू कृपा पुरेपूर
पीक मोप आले ।।४।।

मंतरलेली रात्र

काल ९ फेब्रुवारी, श्री प्रभुगादीचे पाचवे पीठाधीश श्री सिद्धराज माणिकप्रभु यांची ८६वी जयंती. अस्तित्वाचीही काही विशेष योजना होती की काल नेमका एकांत मिळाला. रोजची उपासना आटोपून, श्रीप्रभुंच्या फोटोपाशी हात जोडले आणि झोपेची तयारी केली.‌ अगदी त्याच वेळी श्रीप्रभु संस्थानाने उपलब्ध करून दिलेल्या “गुरुवाणी” ह्या प्रभुपदांच्या गीतांच्या, श्री सिद्धराज प्रभुंच्या सुरेल आणि दैवी स्वरांचा साज चढलेल्या अमुल्य ठेव्याची नेमकी आठवण झाली. ह्या पदांच्या ध्वनिमुद्रणाचा योग कसा जुळून आला, त्याची अत्यंत सुरस कथा श्रीजींनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सविस्तर कथन केली आहेच. छान पैकी स्नान करून, श्रीप्रभुंसमोर सुवासिक अगरबत्ती लावून, दिव्याच्या मंद परंतु, सोनेरी प्रकाशामध्ये ध्यान लावून सहजासनात बसलो. श्री सिद्धराजप्रभुंच्या हयातीत त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला कधी झाले नाही, परंतुज्ञ ह्या गुरुवाणीसाठी निवडलेल्या त्यांच्या लोभस चित्रामध्ये दिसत असलेल्या, तंबोऱ्यावर फिरणाऱ्या उजव्या हाताच्या बोटांची जादूच जणू एखाद्या मखमली स्पर्श प्रमाणे माझ्या मनबुद्धीवर झाली आणि मन क्षणार्धात श्रीप्रभु मंदिरातील आनंद मंटपात जाऊन पोहोचले.

त्यावेळी सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री सिद्धराज प्रभु म्हणाले होते, की तुमच्या इच्छेनुसार मी श्रीप्रभुंची पदे म्हणेन, पण ती कोणत्याही इतर ठिकाणी न म्हणता श्रीप्रभु मंदिरातच म्हणेन. आणि ध्वनिमुद्रणाच्या तांत्रिक बाबींना बाजूला ठेवून, त्यांची उपेक्षा करून आपल्या आवडत्या वादकांना घेऊन श्री सिद्धराज प्रभूंनी आपल्या दैवी स्वरामध्ये ही पदे अत्यंत भावविभोर होऊन गायली होती. काय मंतरलेली रात्र असेल ती. माणिक नगर म्हणजे संगीताचे माहेरघरचं आणि त्यातही श्री सिद्धराज प्रभुंसारखे सुरांचे आणि संगीताचे मर्म जाणणारे, आपल्या गायनाचे सर्व कसब पणाला लावून, श्रीप्रभुंच्या संजीवन समाधी समोर एकतानता साधत होते. तबल्यावरची ती मोहक थाप, टाळांची मंदमंद किणकिण, सारंगीची सुमधुर धुन, झांजांचा मोहक नाद, शास्त्रीय संगीताची जाण असलेल्या शिष्यांची तोलामोलाची साथ आणि श्री प्रभुभक्तीच्या रंगात पूर्णतः रंगून जाऊन टीपेला पोहोचलेला श्री सिद्धराज प्रभुंचा धीर गंभीर आणि तितकाच मंजुळ स्वर. आवाजातील चढ-उतार, तालसुरांची सुरेख लयबद्धता, प्रत्येक पदागणिक द्विगुणित होणारा आनंद, सगळा आसमंत प्रभुभक्तीने भरलेला, ही वेळ, ही रात्र संपूच नये, असे उपस्थित सर्वांनाच वाटत असणार. त्यावेळी उपस्थित प्रभुभक्तांचे भाग्य किती थोर की, ह्या सुरेल भजनाचा आनंद त्यांना मनमुराद लुटता आला.

क्षणभर ती बैठक डोळ्यासमोर तरळून गेली. श्री सिद्धराज प्रभुंची तंबोऱ्याच्या तारांवरून सहजतेने आणि तितक्याच नजाकतीने फिरणारी ती सुकोमल बोटे, तंबोऱ्याची साथ सोडून मध्येच हातामध्ये धरलेला झांज, मनाच्या त्या प्रफुल्लीत अवस्थेत उंचावलेले हात आणि हातवारे, चेहऱ्यावरचे प्रफुल्लित स्मित, वादकांसोबतची डोळ्यांची नजरानजर, परस्परांना दिलेली दिलखुलास दाद, सर्व काही डोळ्यासमोर साकारत होतं. श्री सिद्धराज प्रभुंच्या ह्या गायनसेवेने अतिशय संतुष्ट झालेल्या श्रीप्रभुंच्या संजीवन समाधीतून फांकलेली चैतन्याची आभा श्री सिद्धराज प्रभुंचा चेहरा जणू उजळवून टाकत होती. त्या मैफिलचा मीही आता एक भाग झालो होतो. ती भावविभोरता, ती एकरूपता ह्या पदांच्या माध्यमातून अनुभवता येत होती. साधारण दीड तासांनी ही अवीट गोडीची संगीत सभा जेव्हा संपली, तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. ध्यानावस्थेतून बाहेर आल्यावर निरभ्र आकाशामध्ये मध्यावर आलेल्या चंद्राचा शितल प्रकाश माझ्या डाव्या खांद्यावर पडला होता. रात्रीच्या गडद अंधारामध्ये आकाशातील चांदणे अजूनच मोहक वाटत होते. श्रीप्रभुंच्या तसविरीसमोर ठेवत असलेल्या दिव्याचा प्रकाशात श्रीप्रभु अजूनच लोभस वाटत होता. ध्वनिमुद्रणाच्या रात्रीच्या वेळेसच्या त्या भरलेल्या वातावरणाचा तोच आनंद, तीच अनुभूती मला अनुभवायला दिल्याबद्दल, श्रीप्रभुचे अत्यंत कृतज्ञतेने आभार मानले. रात्रीच्या त्या गडद अंधारामध्ये, त्या एकांतामध्ये भीतीचा लवलेशही मला जाणवला नाही. कानामध्ये मात्र श्री सिद्धराज प्रभुंचे “भजनी जो दंग, तोचि निर्भय” असे आश्वासक शब्द भरुन राहिले होते.