प्रभूंना बाहेर शोधणारी माणसं आणि स्वतःच्या अंतरंगात प्रभूंना अनुभवणारी माणसं या दोघांमधला फरक तुम्ही कधी पाहिला आहे? कधी अनुभवला आहे का? पहिल्या प्रकारात जिथे मूर्ती, तिथेच प्रभु. परिणामी, जितका वेळ आपण मूर्तीसमोर असतो, तितकाच वेळ प्रभूंची अनुभूती टिकते. एकदा का मूर्ती नजरेआड झाली की—“मूर्ती हटी, दुर्घटना घटी!” मनात शेकडो अनुत्तरित प्रश्न असतात आणि ही माणसं कायम त्यातच भरकटत राहतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रभूंनी द्यावीत, आपल्या मनासारखं घडवावं आणि शक्य असेल तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं कॉन्ट्रॅक्टही प्रभुनेच घ्यावं—अशी अपेक्षा असते!

ही मंडळी इतरांना माणिकप्रभू म्हणजे काय, ते किती दिव्य आहे वगैरे उत्तम सांगू शकतात. पण त्या सगळ्या भक्तीमुळे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील सद्गुणांचं Capital Investment किती वाढलं आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झाला की नाही—हे मात्र विचारायचं नसतं! दुसऱ्या प्रकारात, स्वतःच्या अंतरंगात प्रभूंना शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न आपोआपच सुटू लागतात. कारण माणिकप्रभु त्यांच्यासोबत केवळ मंदिरात नाही, तर चोवीस तास त्यांच्या आचार-विचारांत असतात.सर्वांत आधी सुटणारा प्रश्न बहुधा राग, लोभ आणि मत्सराचा असतो. याच विकारांतून हेवेदावे, भाऊबंदकी, नात्यांमधील दुरावा आणि कुटुंबव्यवस्थेतील बिघाड निर्माण होतात. पुढे त्यातूनच सामाजिक अस्वास्थ्य वाढत जातं.

याउलट प्रेम, स्नेह, जिव्हाळा, करुणा आणि कृतज्ञता हे दैवी गुण दुसऱ्या प्रकारातील माणसांच्या जगण्याचाच भाग बनतात. प्रभूंचे गुण स्वतःमध्ये उतरवले की प्रभुही भरभरून देणारच ना! मग तिकडून “देते जावं देते जावं आणि इकडून “घेत जावं घेत जावं असं जगण्याच्या समृद्धीचं जबरदस्त कॉम्बिनेशन तयार होतं शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?

प्रभूने दिलेल्या या जीवनाचा भरभरून उपभोग घेणं, प्रत्येक अनुभवाबद्दल कृतज्ञ राहणं आणि आपलं जगणंच आनंदाचा सोहळा बनवणं. या पलीकडे आयुष्य म्हणजे आणखी काय असतं? तुम्ही एक पाऊल प्रभूंच्या जवळ आलात तर ते दहा पाऊल तुमच्या जवळ येतात आणि प्रभूंनी म्हटलेच आहे !!आम्हाला धरता येते पण सोडता येत नाही!

[social_warfare]