परवा मोरपिसे गोळा करायला गेलो असताना, येताना मला श्रीबयाम्मामातेची समाधी दिसली होती. एक दिवस निवांत येऊन या माऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करीन, असे मनोमन ठरवले होते. आज सकाळी सहाच्या चहानंतर संगमाच्या दिशेने, सागाच्या बागेतून निघालो. विरजा नदीच्या काठी एक छोटीसी समाधी बय्यामा माऊलीची आहे. तेथील पक्ष्यांची मंजुळ किलबिल मला सुखावत होती. ओढ्यावजा नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते. बगळे काही खाद्य मिळेल का ह्या आशेपोटी विरजेच्या पात्रात उगाचच ध्यानाचा आव आणून उभे होते. जवळच उगवलेली रानफुले घेऊन त्या माऊलीच्या समाधीवर मनोभावे अर्पण केली. जिने आपल्या उदरी नऊ मास प्रत्यक्ष दत्तावतारी श्री माणिक प्रभुंना धारण केले, त्या जगन्माता बयाम्माप्रती अष्टभाव दाटून आले. एकट्यानेच तिच्याशी गप्पा मारल्या. श्री माणिकप्रभुंसारखे नररत्न ह्या जगाला अर्पण केले, म्हणून तिच्या समाधीवर नम्रपणे मस्तक झुकविले. पुन्हा यात्री निवासवर येऊन आदल्या दिवसाच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून काढल्या.

नाश्ता उरकून झटपट पारायणासाठी औदुंबराखाली दाखल झालो. एव्हाना जो तो आपापल्या जागी स्थानापन्न होऊन पारायण करण्यात दंग झालेला होता. आज सहाव्या दिवसाचे श्री माणिक चरितामृताचे वाचनही मनाच्या अगदी प्रफुल्लित अवस्थेत पार पडले. विठ्ठलराव तालुकदाराची कथा, माणक्या पाटलाची कथा, यज्ञ समारंभ व त्यातील विघ्न, तात्यासाहेबांस आलेले वैराग्य, श्री माणिकप्रभुंची जगद्गुरु शंकराचार्यांची भेट, दमडीची साखर, ऐनुद्दीन उस्तादाचे गर्वहरण अशा अनेक कथांमध्ये रमताना आपला श्री माणिकप्रभुंप्रती असलेला स्नेह अधिकच दुणावतो. आपले मन अगदी माणिकमय होऊन जाते. आज पारायण यादरम्यान प्रसाद म्हणून काही भक्तांनी चिकू आणि पेढे वाटले. आजच्या दिवसाच्या पारायणानंतर तोच नैवेद्य म्हणून श्रीप्रभुला दाखवला.

पारायणानंतर औदुंबरास प्रदक्षिणा घातल्या, समोरील मनोहर दत्तमूर्तीचे दर्शन घेतले आणि श्रीप्रभु समाधीसमोर उभा राहिलो. आज श्रीप्रभु समाधीवरील गुलाबी रंगाच्या वस्त्रात अत्यंत विलोभनीय दिसत होता. आणि त्यावरील हिरव्या रंगाची नक्षीदार शाल लक्ष वेधून घेत होती. अबोली आणि कागड्यांच्या फुलांचा एकमेकांत बेमालूमपणे गुंफलेला हार ऐक्यत्वाची साक्ष देत होता. अंगावरील विविध माळा खुलून दिसत होत्या. समाधीवर गुलाबाची लाल फुले आपली सुगंध सेवा श्रीप्रभु चरणी अर्पण करत होती. आणि भोवतालचे अबोलीचे भरगच्च गजरे त्या साजाला भारदस्तपणा प्रदान करीत होते. संजीवन समाधी समोरील पादुकांना चंदनाचा लेप लावण्यात आला होता. श्रीप्रभुचं हे असं सजलेले रूप कितीही पाहिलं तरी मनाचे समाधान होत नाही. त्याच्या ह्या ऐश्वर्यसंपन्न रूपाला अनिमिष डोळ्यांनी पाहत, हृदयात साठवून ठेवणे, एवढेच आपल्या हाती असते. श्रीप्रभुसमाधीचे तीर्थ घेऊन कृतकृत्य झालो आणि नेहमीप्रमाणे श्रीप्रभु समाधीला प्रदक्षिणा घातल्या.

आज सकाळी, यज्ञशाळेमध्ये श्री गणेश यागाचे आयोजन केले होते. श्रीजी आपल्या घरची नित्य पूजा आटोपून यज्ञशाळेत हजर होते. उसाचे कांडे, मोदक, खोबरे पोहे, तीळ इत्यादी सामग्रीचे हवन होमकुंडात केले जात होते. सुमारे तासाभरानंतर पूर्णाहुती होऊन श्री गणेश याग संपन्न झाला. ताक पिऊन पुन्हा श्री नृसिंह निलयमध्ये श्रींच्या प्रवचनासाठी येऊन बसलो. परंपरेनुसार वाद्यांच्या आणि भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे व्यासपीठावर आगमन झाले. आज श्रीमद्भगवद्गीतेच्या वीस ते तेवीस ह्या चार श्लोकांचे अत्यंत विस्तृत विवेचन श्रीजींनी केले. आज मुख्यत्वेकरून दानावर उद्बोधन होते. यज्ञ, दान, तप हे माणसाचे कर्तव्य आहे. आणि ते सोडता येत नाही तसेच ते साधकांना, मनुष्यांना पवित्र करतात. दानाचे फायदे समजावताना दानामुळे अज्ञान, लोभ, मोह, कंजुषपणा याचे क्षालन होते, तसेच दान केल्यामुळे,‌‌ आपली प्रकृती बरोबर समरसता होते. दानामुळे सामाजिक न्याय होतो‌, असे श्रीजींनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना समजावले. तसेच सर्व दानांमध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे कारण अन्नदानामध्ये तृप्ती आहे, असे श्रीजी म्हणाले. पुढे जाऊन श्रीजींनी सात्विक, राजसिक आणि तामसिक दान कोणते हे अनेक कथांचा दाखला देऊन समजावले. पुढे जाऊन यज्ञ, दान, तप करताना त्यात काही न्यून राहिले, त्यात काही कमी झाले तर ते, परमात्म्याच्या नामस्मरणाने सुधारता येते हा मौलिक उपदेशही श्रीजींनी सर्वांना समजावून सांगितला. तसेच तेविसाव्या श्लोकातील ॐ तत् सत् च्या स्वरूपाचं विहंगावलोकन श्रीजींनी सर्वांना करून दिले. ॐ हे अक्षर आहे, तो स्वर आहे, तो ध्वनी आहे आणि ती निशाणीपण आहे. अव धातूपासून ॐची उत्पत्ती आणि ॐ म्हणजेच परमात्मा. तत् हे सर्वनाम, परमात्मा हा नेहमी डोळ्यांपाठी असतो, म्हणून तो डोळ्यांपुढे येत नाही जसे कॅमेरामन फोटो काढतो पण फोटोत तो कधीच दिसत नाही. परमात्मा हा कॅमेरामन सारखाच आहे. तसेच सत् म्हणजे सत्ता, एखाद्या वस्तूचे असणे. जसे चष्मा आहे, अंगठी आहे, पेला आहे. ह्यातील “आहे”पणा, म्हणजेच अस्तित्व म्हणजेच सत्.महावाक्याची इतकी सुरेख फोड क्वचितच कोणीतरी करून आपल्याला प्रेमाने भरवत असावं. परमात्मा अनादि-अनंत आहे अस्तित्व अनादि-अनंत आहे म्हणजेच अस्तित्व हाच परमात्मा आहे‌ आणि ॐ तत् सत् हे परमात्म्याचेच नाव आहे. तसेच ब्राह्मण म्हणजे कोण? तर ब्राह्मण म्हणजे ब्रह्माला जाणारा. मुंजीनंतर द्विज होतो, द्विज वेदाभ्यासने विप्र होतो आणि जो विप्र ब्रह्मास जाणतो तोच खरा ब्राम्हण. श्रीजींच्या ज्ञानपूर्ण आहुतींनी गीता यज्ञ धडाडत होता आणि उपस्थितांच्या अज्ञानाचा समूळ नाश होत होता. कलिंगड कधी अख्खे खाता येईल का? नाही ना.पण त्याला छान फोडी करून, मीठ मसाला लावून आपल्यासमोर ठेवले, तर ते आपण आवडीने खातो. श्रीजींच्या प्रवचनाची खासियत ही अशीच आहे. वेदांतासारखा कठीण विषय तो आपल्यासमोर फोड करून, त्यास पुराणांतील व्यवहारातील अनेक गोष्टींचा मसाला लावून आपल्याला समजेल, रुचेल आणि पचेल अशा स्वरूपात सादर करतात. आणि असा अनुभवसंपन्न ज्ञानी सद्गुरू वेदांताचे निरुपण करण्यासाठी भेटला, म्हणून आपल्याला आपल्याच नशिबाचा नकळत हेवा वाटू लागतो.

महाप्रसाद घेऊन यात्रीनिवासावर आलो. दोन-तीन दिवसांचे कपडे धुऊन टाकले. आजच्या प्रवचनाला ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संध्याकाळी श्रीप्रभुमंदिर प्रांगणात आलो. एव्हाना बऱ्याच प्रभुभक्तांच्या ओळखी झाल्या होत्या. प्रत्येकाची श्री माणिकनगरला जोडले जाण्याची एक वेगळी कथा होती. आणि त्या प्रत्येकाच्या कथा ऐकणे हीसुद्धा कानांना एक पर्वणीच होती. आज श्रीजी बाहेर गेल्यामुळे संध्याकाळचे भक्तकार्य थोडेसे उशिरा झाले. आज कोल खेळ खूपच रंगला होता. अवघे माणिकनगर कोल खेळण्यासाठी जमले होते. आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढून श्रीजी ही बालगोपाल क्रीडा पाहायला सहजतेने उपस्थित होते. हा खेळ पाहतानाही आपल्याला एका विशिष्ट चैतन्याची अनुभूती जाणवते.‌ भक्तकार्य कल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीप्रभु कदाचित एखाद्या बालगोपाळाचं रूप घेऊन कदाचित ह्यात क्रीडा करत असावा. सूर आणि वाद्यांच्या तालावर आपले पाय आपोआपच थिरकायला लागतात. ह्या कोल खेळाचा मनसोक्त आनंद लुटून श्रीप्रभुचा महाप्रसाद घेतला आणि नेहमीप्रमाणे भजनासाठी आनंद मंडपात येऊन बसलो.

आज शुक्रवारी बालाजीचे भजन होते. आजचा रंग गुलाबी होता. श्रीजींच्या मार्गातील लाल पायघड्यांसमोर ही गुलाबी गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. समोर जगत्प्रसुत्या श्रीप्रभु सुखानैव पहुडला होता. भजन ऐकण्यासाठी जणू तोही आज आतुरला होता. साडेआठच्या सुमारास श्रीजींचे दिवट्यांच्या प्रकाशात, भक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात आगमन झाले. श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेऊन श्रीजी गादीवर विराजमान झाले आणि रात्रीच्या प्रवचनास सुरुवात झाली. आज शुक्रवारचे श्रीगुरु स्तुतीपर “अरे गुरु राया माझी निरसली माया” हे अगदी तीन कडव्यांचे पद होते. ह्यालाही श्रीजींनी आपल्या वाक्चातुर्याने तासभर रंगविले. श्री माणिकप्रभुंची पदे अत्यंत श्रवणीय तर आहेतच पण त्यातला लपलेला गूढ अर्थ जेव्हा आपल्याला संपूर्णपणे कळतो तेव्हा, भजनाच्या त्या तल्लीनतेत आपल्या डोळ्यांच्या कडा सहज ओलावतात. आजही श्री. आनंदराज प्रभुमहाराज, श्री. जयंत कैजकर, श्री. सौरभ क्षीरसागर आणि श्री अजय सुगावकरजी ह्यांच्या सूरतालांची जुगलबंदी ह्याची देही, ह्याची डोळा अनुभवली. आपल्या अंतर्मनाला एक वेगळेच चैतन्य प्राप्त करून देण्याची क्षमता ह्या भजनांत आहे. चैतन्याची ही अत्यंत सुखद अनुभूती वारंवार घेणे हा श्रीमाणिक नगरातीच्या वास्तव्यातील परमोच्च सुखाचा क्षण आहे. शेजेच्या पदांआधी आरती झाली. सर्वांना प्रसाद वाटला गेला. रात्री भजनासाठी उपस्थित भजन मंडळींना श्रीजींचा आशीर्वाद मिळाला. नेहमीप्रमाणे “कमलवदनी हे अमृत भरा माणिक माणिक मंत्र स्मरा. ” या पदाचे दैवी स्वर आसमंतात भरून राहिले. आज भजनानंतर सर्वांना अल्पोपहार मिळाला. सर्वजण आपापल्या निवास्थानी परतू लागले. आज पुन्हा श्रीप्रभुमंदिरात येऊन त्याच्यासमोर हा सगळा आनंदसोहळा अनुभवायला दिल्याबद्दल श्रीप्रभु चरणी कृतज्ञता व्यक्त केली. अखंड वीणा आपल्या तारांवर माणिक माणिक नामाने श्रीप्रभुला रिझवत होती.

क्रमशः…

[social_warfare]