आज श्रीजींची पाद्यपूजा करावयास मिळणार होती त्यामुळे, अगदी पहाटेच जाग आली. स्नानादी कर्मे उरकून छतावर गेलो. आजचीही पहाट प्रसन्न होती. निलगिरीच्या झाडांवर बसलेले दोन मोर मन वेधून घेत होते. मधूनच त्यांचा केकारव पहाटेच्या नीरव शांततेचा भंग करत होता. पूर्वेला क्षितिजावर सूर्यनारायणाची शेंदरी छटा आकर्षक वाटत होती. चहा घेऊन रूम मध्ये आलो. पाद्यपूजेसाठी मला हार हवे होते म्हणून सकाळी साडेसातच्या सुमारास मी एसटी स्टॅंडवर गेलो. हुमणाबादेत व्यवहार थोडेसे उशिराच चालू होतात.  काल संध्याकाळीच एका फुलवाल्याला हारासंबंधी सांगून ठेवले होते. त्यानेही निशिगंधाचे ताजे हार बनवून ठेवले होते. संपूर्ण हारांवर मधमाशांचा घोळका होता. ज्या शिताफीने त्या फुलवाल्याने मधमाशांना हटवले, ते पाहून मला गंमत वाटली. प्रत्येक ठिकाणी पुस्तकी ज्ञानच कामी येते असे काही नाही. अनुभवांतून खूप काही शिकता येते.  तुम्ही शांत उभे रहा, त्या तुम्हाला काहीही करणार नाहीत, असे खास हैदराबादी हिंदीत म्हणाला.‌ मनासारखे हार मिळाल्यामुळे मीही खुश झालो. बाजूलाच नंदिनी डेअरीतून पेढे मिळाले. श्रीफळ फळे घेऊन परतीच्या वाटेवर एका दुचाकीस्वाराला हात दाखवला आणि त्याच्या सोबत यात्री निवासावर आलो.  पुन्हा स्नान उरकून नाश्ता उरकून पारायण करण्यासाठी श्रीप्रभुमंदिरात आलो.

आज श्रीप्रभुचरित्र वाचताना खूपदा डोळ्यांच्या कडा अलगद ओलावल्या. पारायणकाळात दर दिवसागणिक श्रीप्रभुशी आपली नाळ इतकी घट्ट होत जाते की आपण त्या त्या कथानकात आपण प्रत्यक्ष शिरकाव करतो आणि श्रीप्रभुंच्या लीला वाचताना, त्यांची करुणामयता, परोपकारी वृत्ती आणि भक्तवत्सलता अनुभवताना आपसूकच कंठ दाटून येतो. असो, श्रीप्रभुच्या आनंदलहरी अनुभवत आजचे पारायण पूर्ण केले. श्रीप्रभु दर्शनासाठी मंदिरात आलो. श्रीप्रभु आज अत्यंत शोभिवंत दिसत होता. गडद लाल रंगाच्या समाधीवरील वस्त्रावर, सोनेरी नक्षीकाम असलेली शेंदरी रंगाची रेशमी शाल अत्यंत मोहक दिसत होती. नवरत्नांची, सोन्याच्या, रुद्राक्षांच्या, मोत्यांच्या अनेकविध माळा घालून हा नटनागर आज नटला होता. कागडा आणि अबोलीच्या सुंदर माळा गळाभर रुळत होत्या. नागकेशर, गुलाब, शेवंती आणि फुग्यांच्या फुलांची नेत्रदीपक सजावट, श्रीप्रभभुसौंदर्यात आणखीनच भर घालत होती. श्रीप्रभु समाधीवरील चांदीचे छत्र अबोलीच्या माळांमुळे अत्यंत आकर्षक दिसत होतं. कदाचित माझ्या अंतरंगातील भावनांचे प्रतिबिंबच श्रीप्रभुच्या समाधीवर उमटले होते. श्रीप्रभु मंदिराला प्रदक्षिणा घालून यात्री निवासावर आलो. पाद्यपूजेचे सामान ठेवून श्रीजींच्या घरी आलो.

श्रीजी आपल्या नित्यपूजेत रमले होते. पाद्यपूजेचे सामान एका कोपर्‍यात लावून प्रसन्न चित्ताने श्रीप्रभुच्या तसवीरीकडे एक टक पाहत राहिलो. आज मी सकलमत संप्रदायी होणार होतो. कोरोना काळात श्रीचिद्घन प्रभुंनी मला पुस्तकांचा एक संच पाठवला होता त्यात, साधना प्रदीप नावाचं श्रीसद्गुरू माणिकप्रभु महाराज यांच्या सकलमत संप्रदायाची उपासना पद्धती असलेले हे अगदी छोटेखानी पुस्तक होते. अगदी सोळा पानांचं… गुरुउपदेश घेणाऱ्यांसाठी हे पुस्तक विनामूल्य दिले जाते किंवा इतर जनांसाठी हे केवळ वीस रुपयांत उपलब्ध आहे. कितीतरी वेळा हे पुस्तक वाचून झाले असेल. प्रत्येक वेळेस वाचताना सकलमत संप्रदायाचीची दीक्षा घ्यावी असे मनोमन वाटायचे. मृत्युनंतर मला मोक्ष वगैरे मिळेल की नाही हे माहीत नाही पण, सदेह जीवनमुक्तीचा अनुभव सकलमत संप्रदाय आपल्याला सहज करून देतो.  सर्व रूपांमध्ये श्रीप्रभुला पाहावे, कोणाची निंदा करू नये, सर्वांचा आदर करावा, असेअगदी सहज सोपे आचरण ह्या संप्रदायात आहे. कुठल्याही धर्माचे, कुठल्याही जातीचे, स्त्री-पुरुष ह्या संप्रदायाची दीक्षा घेऊ शकतात. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापासून सुटका होऊन, आपला उद्धार व्हावा, अशी तीव्र इच्छा ज्यास आहे, तोच हा संप्रदाय दीक्षेचा अधिकारी होय. सकलमताचार्य श्रीमाणिक प्रभुमहाराजांच्या कृपेनेच माझा उद्धार होईल, अशी संपूर्ण श्रद्धा आणि भक्ती असणाऱ्यांना या मार्गाचा अवलंब सहज शक्य आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातील गेल्या दोन वर्षातील घडामोडी लक्षात घेता, ही सर्व त्या प्रभुचीच इच्छा आहे, ह्याची मला मनोमन खात्री पटत होती. आज माझ्याबरोबर आणखी एकजण सकलमत संप्रदाय दीक्षा घेणार होता. पूजा करून श्रीजी गादीवर बसले. श्री भक्तकार्य कल्पद्रुमचा जयजयकार झाला. श्रीजींचे पाद्यपूजन यथासांग पार पडले. आरती नैवेद्य झाला.  दि.२३.०३.२०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी श्रीजींनी मला मंत्रोपदेश दिला आणि मी सकलमत संप्रदायी झालो. श्रीजींनी आपल्या गळ्यातला पुष्पहार, माझ्या गळ्यात जेव्हा घातला, त्यावेळी कृतार्थतेच्या परमोच्च शिखरावर मी उभा होतो. मनी अष्टभाव दाटून आले होते. त्यावेळेस झालेली मनाची भावविभोर अवस्था शब्दांत वर्णन करणे कदाचित अशक्य आहे. पाद्यपूजेच्या वेळी श्री. राजन  मोहिलेकाकांचं  आणि श्री. चौबळ काकांचं खूप सहकार्य लाभले. त्यांच्याही प्रती कृतज्ञता अर्पण करतो.

ताक पिऊन श्रीजींच्या प्रवचनासाठी श्रीनृसिंह निलय मध्ये येऊन बसलो. पिशवितल्या निशिगंधाच्या हाराचा वास हॉलमध्ये दरवळून राहिला होता. आज प्रवचनासाठी ११ ते १४ असे चार श्लोक होते. सुरुवातीलाच गीता वंदना च्या संस्कृत श्लोक याचा भावानुवाद श्रीजींनी समजावून सांगितला. एखादं कार्य किंबहुना सर्व कार्ये जर श्रीप्रभुला साक्षी ठेवून केली तर जीवनातली सर्व कर्मे ही यज्ञकर्मे होऊ शकतात. कोणतेही कार्य करण्याआधी ते कार्य आपण श्रीप्रभुस अर्पण करू शकतो काय? असे स्वतःलाच विचारून पहावे. कालच्या प्रवचनात पंचायज्ञापैकी राहिलेल्या ब्रह्मयज्ञाचे स्वरूपही श्रीजींनी समजावून सांगितले. आजच्या श्लोकांमध्ये आलेले यज्ञ आणि तपाचे विवरण आपल्या अत्यंत रसाळ वाणीने करताना, समस्त श्रोत्यांना रुचेल, पचेल आणि ते पूर्णपणे समजेल ह्याकडे श्रीजींचा कटाक्ष होता. त्यांचे वेदांतावरील प्रभुत्व, कंठस्थ असलेले अनेक संस्कृत श्लोक, पुराणातील अनेक कथा हे पाहून श्रीजींविषयीचा आपल्या मनातील आदर अधिकच दुणावतो. आपल्या जवळ असलेले ज्ञान उधळायला श्रीजी नेहमीच तयार असतात, आणि त्या रंगात रंगून जाण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ मात्र हवा. तेवढी सवड तरी काढायला हवी.

प्रवचनानंतर महाप्रसाद घेऊन पुन्हा यात्री निवासावर आलो. आजच्या दिवसाचे प्रवचन अर्धेअधिक ओवीबद्ध करून, दुपारचा चहा घेतल्यावर, मी यात्री निवासच्या बाजूच्या झाडीमध्ये शिरलो. जमिनीवर सागाच्या पानांचा खच पडला होता. त्यामधून चालताना पावलागणिक कर-कर असा लयबद्ध आवाज येत होता. काल मोर ज्या ठिकाणी बसले होते त्या झाडाखाली मोरपीस मिळते का? हा माझा प्रयत्न होता. सागाच्या झाडीतून पुढे पेरूच्या बनातून विरजेच्या काठाकाठाने चालत चालत संगमा पर्यंत जाऊन आलो. मोरांची एक दोन पिसे मिळाली. आजही ती आठवण जपून ठेवली आहे. वाटेत अनेक रंगाचे वेगवेगळे पक्षी पहायला मिळाले. नदीकाठी साप पशुपक्षी आणि झाडे ह्यांचं एक स्वतःचे विश्व आहे आणि प्रत्येक जण बिनधास्तपणे त्या विश्वात रममाण आहे. भटकंती करून पुन्हा खोलीवर आलो. सर्व जाणांना पाद्यपूजेचे तिर्थ वाटले. निशिगंधाचा सुगंध आज संपूर्ण यात्री निवासात दरवळत होता.

सायंकाळी भक्तकार्यासाठी पुन्हा श्रीजींच्या घरी आलो. त्यानंतर कोल पाहण्यासाठी श्रीप्रभु मंदिराच्या पटांगणात आलो. अमावास्येनंतर चंद्र जसा कलेकलेने वाढतो, तसा हा खेळ दिवसागणिक रंगतदार होत होता. गावातले बाळगोपाळ, स्त्री-पुरुष विविधरंगी पोषाख घालून हा खेळ खेळत होते. आताशा दोन वर्तुळामध्ये ही बाल गोपाल क्रीडा खेळली जाऊ लागली. सायंकाळी, दिवेलागणीला, प्रकाश झोतात, वाद्यांच्या गजरात श्रीप्रभुंच्या पदांवर, त्याच्याच समाधीसमोर, फेर धरून खेळणे हे कोल खेळणाऱ्या समस्त जनांचे अहो भाग्यच… द्वापार युगातील हे कदाचित कृष्णाचे सवंगडीच असावेत…

रात्रीचा महाप्रसाद घेऊन पुन्हा श्रीप्रभु समाधीसमोर येऊन उभा राहिलो. श्रीप्रभु समाधीवर वाहिलेल्या फुलांबाबत एक विशेष गोष्ट मला नेहमी जाणवते ती म्हणजे श्रीप्रभु समाधीवरील फुले संध्याकाळीही तितकी ताजी असतात. वास्तविक पाहता, श्रीप्रभु समाधीवर एक विद्युत प्रकाशाचा एक झोत सतत चालू असतो, त्याच्या उष्णतेने खरेतर ती फुलं मलूल व्हायला हवीत, पण तसे काही होत नाही. कदाचित ती फुलेही श्रीप्रभुच्या सानिध्यात त्याच्या चैतन्याचा अनुभव करत असावीत. आज बुधवार… आज विठ्ठलाचे भजन… आजचा रंग फिकट निळा होता. श्रीप्रभु समाधीसमोर आनंदमंटपात घातलेली फिकट निळ्या रंगाची गादी मनमोहक दिसत होती. आजही गावातली मुलं श्रीजींच्या प्रवचनाआधी भजनात दंग झाली होती. अगदी वेळेवर, साडेआठच्या सुमारास श्रीजी श्रीप्रभु मंदिरात आले आणि श्रीप्रभु दर्शन घेऊन गादीवर स्थानापन्न झाले. आज प्रवचनासाठी आता मी सखे कैसे काय करू, कधी भेटेल मम सद्गुरु… हे प्रभु पद होते. कोण मी कैचा ,काही कळेना हे कडवं समजावताना स्वस्वरूपाची खरी ओळख श्रीजींनी आपल्या नेहमीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत उपस्थितांना सांगितली. आजचे प्रवचनही जवळपास तासभर चालले. श्रीजींचे प्रवचन इतके सहजपणे स्फुरलेले असते की प्रवचनाच्या सुमारे अर्धा तास आधी ते विचारतात की आज कुठले पद आहे? ह्यावरून त्यांच्या ज्ञानस्वरूपाची यथार्थ ओळख पटते.

प्रवचनानंतर आजही गणराज पायी मन जड जड जड…‌ ह्या गणपतीच्या पदावर सुर आणि वाद्यांची जुगलबंदी अनुभवायला मिळाली. शास्त्रीय संगीत आपण जसजसं आपल्या आत उतरवतो, तशी तशी त्याची गोडी अधिक वाढत जाते. श्रीप्रभुच्या पदांना अनेक तालांवर ऐकणे हीसुद्धा एक पर्वणीच आहे. आजही भजनानंतर आरती झाली. आरतीनंतर शेजेचे पद झाले. कुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटला गेला. रात्री भजनवाल्यांना श्रीजींनी आशीर्वाद दिला. श्रीजींची स्वारी घराकडे परतत असताना कमलावदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा चे दिव्य सुर आसमंतात पुन्हा भरून राहिले. आज सर्वांना आईस्क्रीम दिले गेले. भजनामुळे झालेल्या मनाची आणि आईस्क्रीममुळे झालेल्या शरीराची शीतलता अनुभवत पाय हळूहळू यात्री निवासच्या दिशेने पडत होते…

क्रमशः…