तुम्ही रोज किती तास झोपता ह्यापेक्षा, तुम्ही मनाच्या कोणत्या स्थितीत झोप घेता, हे फार महत्त्वाचे आहे. श्रीमाणिक नगरच्या वास्तव्यात ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. काल रात्री झोपताना रात्रीचा जवळ जवळ सव्वा वाजला‌ आणि आज सकाळी जेव्हा साडेपाचला जाग आली तेव्हाही मन आणि शरीर प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. प्रपंचाचं गाठोड जेव्हा तुम्ही श्रीमाणिकनगरच्या कामानी बाहेर ठेवता आणि इथल्या वातावरणात जेव्हा पूर्णपणे रंगून जाता, समरस होता, तेव्हा श्रीप्रभुच्या चैतन्याची अनुभूती आपल्याला नित्य घेता येते. मनाच्या आणि शरीराच्या ताजेपणाची कदाचित हिच गुरुकिल्ली आहे. आज चहा घेऊन यात्री निवासच्या छतावर गेलो. आज मळभ दाटलं होतं. आसपास कुठेतरी पाऊस पडला असावा. ढगांच्या आवरणातून मधूनच सूर्याची सोनेरी किरणे डोकावत होती. फिक्कट राखाडी रंगाच्या ढगांना सोनेरी-शेंदरी रंगाची कडा अतिशय सुंदर दिसत होती. बाजूच्या निलगिरीच्या झाडांवर दोन मोर बसले होते. आस्तिक जनांची उपासना चालू होती. हे सगळं भक्तिमय वातावरण मनास प्रसन्न करत होतं. गरमागरम उपमा चटणीचा नाश्ता करून श्रीप्रभुमंदिराची वाट धरली. वाटेवर अनेक प्रभुभक्त आपापल्या गप्पांमध्ये रंगले होते. ह्या गप्पांचे विषय वेगवेगळे होते. पाठीमागून चालता-चालता फक्त कान उघडे ठेवून ते ऐकणे हाही एक मोठा गमतीचा विषय होता.

श्रीप्रभु मंदिरात पोहोचून दयाघनाचे मनोभावे दर्शन घेतले आणि श्रीप्रभुला साक्षी ठेवून पारायण सुरु केले. साडेदहाच्या सुमारास तिसऱ्या दिवसाचे वाचन संपवून श्रीजींच्या घरची पूजा पाहण्यास गेलो. श्रीजीं पूजा चालू होती. श्रीजींची तासभर चालणारी ही पूजा पाहणे, हाही एक अत्यंत सुखद अनुभव आहे. गणपती, शंकराची पिंडी आणि श्रीलक्ष्मीयंत्रावरील अभिषेक, देवांना चंदन लेपन आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन शास्त्रोक्त पद्धतीने होत राहते. ऋतू कालानुसार उपलब्ध वेगवेगळ्या, आकर्षक फुलांची आरास श्रीजी स्वहस्ते देवांना करतात, ती आरासही अत्यंत देखणी असते. पूजेनंतर आरती होऊन तीर्थ घेतले. माझ्या पाद्यपूजेसाठी केलेल्या विनंतीवरून “उद्या पाद्यपूजा करूयात”, असे श्रीजी म्हणाले आणि मन आनंदाच्या हिंदोळ्यावर झोके घेत राहिले. पूजेनंतर अवघ्या पंधरा मिनिटांत श्रीजी प्रवचन देण्यासाठी हजर होते. आजही मसाला ताक घेऊन प्रवचनाला श्रीनृसिंह निलयात हजर झालो. बाहेरची गर्मी शमविण्यासाठी उतारा म्हणून ताक, वातानुकूलित सभागृह होते पण, अंतरातील आध्यात्मिक तापाच्या शमनासाठी श्रीजींचे प्रवचन होते. गर्मीतही शरीर आणि मन अंतर्बाह्य शीतलतेचा अनुभव करत होतं. आज सात ते दहा ह्या चार श्लोकांवर श्रीजींचे विस्तृत विवेचन झाले. आज मुख्यत्वेकरून आहारासंबंधित गोष्टींवर भर होता. सात्विक, राजसिक आणि तामसिक लोकांचा असलेला आहार, आपले मन हे अन्नाच्या सुक्ष्म अंशाने बनलंय आणि अन्नाच्या तेजोमय अंशाने वाणी बनते, प्रत्येकाने करावयाचे पंचयज्ञ (ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ)…‌ प्राण्यांचा बळी ही हत्या गणली जाते, पण वनस्पतींच्या बाबतीत तसे नाही. कारण, वनस्पतीत जीव आहे पण अंतःकरण नाही त्यामुळे वनस्पती पीडेचा अनुभव करू शकत नाही… श्रीमद्भगवद्गीतेच्या धडाडणाऱ्या ह्या यज्ञामध्ये श्रीजींच्या विद्वत्ताप्रचुर संबोधनाच्या आहुत्या एकापाठोपाठ एक पडत होत्या आणि संपूर्ण समाधानाने मन सात्विकतेचा अनुभव करत होतं.

महाप्रसाद घेऊन यात्री निवासात आलो. आजची दुपार निवांत होती. संध्याकाळी कोल आणि प्रवचन-भजनाचा कार्यक्रम होता. आजच्या प्रवचनालाही ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. थोडीशी वामकुक्षी घ्यावी म्हटले तर चहासाठी वर्दी आली. आजच्या दुपारच्या चहाला गप्पांचा फड छान रंगला होता. श्रीमाणिकनगरच्या आसपासची स्थाने आणि प्रत्येकाने त्या स्थानासंबंधीचे अनुभव कथन केले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उद्याच्या पाद्यपूजेसाठी प्रसाद आणि फुले आणण्यासाठी हुमणाबादला गेलो. येथे कर्नाटकची एसटी सुरळीत चालू होती. बाजारपेठेत फळांची रेलचेल भरपूर होती. येथे चिंचेसमवेत चिंचोकेही विकावयास होते. लहानपणी हे चिंचोके चुलीत भाजून, खिशात भरून जायचे दिवस आठवले. सध्याच्या आधुनिकतेमध्ये लहानपणीचा हा रानमेवा दुर्मिळ होत चाललाय. फळफुलादि गरजेच्या वस्तू घेऊन येताना, चालत यात्री निवासावर आलो. येताना विरजानदीच्या (ओढ्यावजा) पुलावर थांबलो. अनेक बगळे किडे टिपण्यात व्यस्त होते. दगड धोंड्यातून खळखळणारी विरजा छान संगीत ऐकवत होती. तिच्या सानिध्यात काही क्षण व्यतीत करून यात्री निवासावर आलो.

स्नान करून श्रीप्रभुमंदिरात सायंकाळी सव्वासहाला मुक्तीमंटपाजवळील औदुंबराखाली येवून बसलो. वेदांत सप्ताहात जमलेल्या भक्तांच्या मांदियाळीमुळे आनंदलेला श्रीप्रभु, आकाशात जांभळ्या गुलाबी रंगाच्या मुक्त उधळणीने आपला आनंद व्यक्त करत होता. श्रीजींच्या घरी भक्तकार्यास उपस्थित राहून कोल पाहायला श्रीप्रभुमंदिरासमोरील पटांगणात बकुळीच्या झाडाखाली बसलो. आज कोल खूपच छान रंगला होता. श्रीजींच्या परिवारासहित श्रीमाणिकनगरातील बहुतेक लोक हा कोल खेळायला उपस्थित असतात. वरवर जरी हा खेळ सोपा दिसला, तरी यात एक प्रकारची लयबद्धता आहे. पाच चरणांमध्ये खेळली जाणारी बालगोपाल क्रीडा शिकण्यासाठी अभ्यास आणि सराव अत्यंत गरजेचा आहे. श्री. सुभाष खडकेसरांनी माणिक नगरच्या जवळपास दोन पिढ्यांना हा खेळ शिकवला आहे. कोलच्या वेळी श्रीसंस्थानाचे गोंधळी श्री. राजा गरूडकर हे संबळ वाजवतात. मुंबईच्या श्री. प्रकाश साळसकर यांनी ढोलकीच्या तालावर कोलमध्ये स़ंपूर्ण सप्ताहात छान रंगत आणली होती. श्री संस्थानातील पुरोहित, सेवक वर्ग आणि ग्रामस्थ श्रीप्रभुपदांचे गायन करतात आणि वाद्यांच्या तालावर बाल गोपाल फेर धरून क्रीडा करतात. हा सोहळा फार मनोहर असतो. श्रीप्रभु कोणत्या ना कोणत्या रूपात ह्या बालक्रीडेत सहभागी होत असणार, ह्यात तीळमात्रही शंका नाही.‌

संध्याकाळचा महाप्रसाद घेऊन श्रीप्रभुमंदिरात भजनासाठी येऊन बसलो. आजचा रंग लाल होता. देवीलाही कुंकवाचा लाल रंग अती प्रिय आहे. मंगळवारचे भजन, हे देवी भजन आहे. श्रीजींच्या आगमनाआधी गावकऱ्यांचे भजन नित्यक्रम होता. आजची तरुण पिढी भजनामध्ये दंग होत असलेलं हे चित्र खूपच आश्वासक आहे. श्रीजींच्या पारंपरिक आगमनानंतर आज प्रवचनासाठी लाग लाग सख्या गुरु पायी.. हे श्रीमाणिक प्रभुंचच पद होते. आजचे निरूपणही सुमारे तासभर चालले. श्रीजींना सततच्या ऐकण्याच्या सवयीमुळे अध्यात्मातील संकल्पना हळूहळू समजायला लागल्यात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सुसंगत उत्तरे अंतरातून यायला सुरुवात झाली आहे. मनाचीआणि बुद्धीची एकवाक्यता होत होती. श्रीजींच्या प्रवचनानंतर, गणराज पायी मन जड जड जड… हे श्रीमाणिकप्रभु विरचित पद ऐकणे म्हणजे कानांसाठी एक अद्भूत पर्वणीच होती. श्रीआनंदराज प्रभुंसमवेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, श्री. जयंत कैजकर, श्री. सौरभ नाईक, तबला वादक श्री. सौरभ क्षीरसागर आणि श्री. राजू सिंग, सनई वादक श्री. प्रशांत जाधव, ढोलकीवर श्री. प्रकाश साळसकर, पेटीवर श्री अजयजी सुगावकर, तंबोरा वादक श्री. दिनेश कुलकर्णी ह्यांच्या सुरसाजांची जुगलबंदी अनुभवणे, हा स्वर्गीय अनुभव होता. हे एकच पद जवळ जवळ पंचवीस मिनिटे चालले. पुढच्या दिवसांतही ह्या जुगलबंदीने मनास मोहून टाकले. श्रीमाणिकनगरास संगिताचे माहेरघरही म्हणतात. लतादीदी, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज सारख्या अनेक दिग्गजांनी आपली सेवा श्रीप्रभुसमोर रुजू केली आहे. भजनानंतर आरती झाली आणि शेजेचे पद म्हणून भजन सेवा पूर्ण झाली. आज कुंकूवाचा टिळा सर्वांना लावला गेला. खोबरे कुरमुऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटला गेला. रात्री भजनाच्या मंडळींना श्रीजींनी आशीर्वाद दिला. श्रीजी परताना कमलावदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा… ह्या पदाच्या चैतन्यलहरी आसमंतात गुंजून राहिल्या. आज भजनानंतर रात्री, चिवडा, द्राक्षे आणि गुलाबजाम सर्वांना वाटली गेली. भजनानंतर कानाच्या तृप्तीनंतर ह्या फराळाने पोटही तृप्त झाले. मनाची आणि शरीराची संपूर्ण तृप्ती श्रीमाणिकनगरात अखंड होत असते.. आणि ह्या तृप्तीचा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी एकदा तरी श्रीमाणिकनगरी जायला हवे. नव्हे, नव्हे जायलाच हवे…

क्रमशः…

[social_warfare]