आज अगदी भल्या पहाटेच जाग आली. एखाद्या गोष्टीबद्दल मन आतुर असले की आपले अंतर्मन जागृत असते. सकाळी सहाचा गजर लावला होता पण सव्वा पाचलाच  जाग आली. किंबहुना बहुतेक यात्री निवास जागा झाला होता. सहाच्या ठोक्याला चहा आला. जय गुरु माणिकच्या गजरात एकमेकांशी सुप्रभात झाले. अनेक गोष्टींवर चर्चा सुरू झाल्या. गरम गरम चहाचे घुटके घेत ह्या चर्चा खमंग वाटत होत्या. एखाद्या विषयावर वेगवेगळ्या लोकांची अनेकविध मते ऐकतानासमाजातील अनेक कांगोरे अनुभवता येतात. प्रत्येकाच्या मताला एक विशिष्ट बाजू असते. शांतपणे एका कोपऱ्यात उभे राहून हे ऐकणं हा ही एक वेगळा अनुभव होता. प्रात:पान हा चहासाठीचा एक वेगळा शब्द माझ्या शब्दकोशात मिश्कील स्वभावाच्या श्री प्रमोद जोशींमुळे जोडला गेला. स्नानासाठी सगळ्यांची गडबड उडून गेली होती. गरम पाण्याची मुबलक व्यवस्था श्री संस्थानातर्फे करण्यात आली होती. स्नानानंतर काहीजण छतावर जाऊन संध्या करण्यात व्यस्त होते तर काहीजण योग, ध्यान ह्यात मग्न होते. एकंदरीत दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात होत होती. स्नानादि कार्यक्रम उरकून श्री माणिक विहारात नाश्त्यासाठी गेलो. सुशीला नामक कुरमुऱ्याचा पोह्यासारखा पदार्थ आणि चहा आज नाश्त्याला होता. येथे पारायण काळात सर्वांनी नाश्ता करूनच पारायणास बसावे असा श्रीजींचा आग्रह असतो. कारण पारायणानंतर श्रीजींचे वेदांतावर निरूपण असते ते कधीकधी दुपारी दीडदोन पर्यंत चालते. त्यामुळे इतका वेळ कुणाला उपवास घडू नये, भुकेमुळे त्रास होऊ नये ह्यासाठी श्री संस्थान अतिशय दक्ष असतं.

आजपासून (२०.०३.२०२२) वेदांत सप्ताह सुरू होत होता. श्रीप्रभुगादीचे चतुर्थ आचार्य श्रीशंकर माणिकप्रभुंची आज पुण्यतिथी. सकाळी श्रीप्रभुमंदिरात श्रीभागवताचे पारायण, औदुंबराखाली श्री गुरुचरित्र आणि श्री माणिकचरित्रामृताचे पारायण, दुपारी बारा वाजता श्रीजींचे वेदांतावर व्याख्यान, सायंकाळी चार वाजता  श्रीशंकर माणिकप्रभु आराधना, संध्याकाळी साडेसहा वाजता कोल, रात्री आठसाडेआठला श्रीजींचे पुन्हा प्रवचन आणि त्याच्यानंतर सप्ताह  भजनातील आजचे, रविवारचे भजन, असा भरगच्च कार्यक्रम होता.

श्रीप्रभु मंदिराच्या आवारात एकच लगबग चालली होती. ब्रह्मवृंद श्रीप्रभु समाधीस मंगल स्नान घालून सजवीत होता. श्रीप्रभुसमाधीच्या बाहेर उजव्या कोपर्‍यात भागवताचे वाचन सकाळीच प्रारंभ झालेले होते.

लेखमालेच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच श्रीप्रभु संप्रदायाच्या उपासनेचा रथ हा ज्ञान आणि भक्ती ह्या दोन चाकावर चालत असल्याचे जाणून श्री मार्तंडमाणिक प्रभुंनी भक्तीशास्त्रात अंतिम प्रमाण म्हणून स्वीकारल्या गेलेल्या श्रीभागवत या ग्रंथाचा सप्ताह यज्ञ श्री संस्थानात करण्याचे ठरवून सन १९०० च्या अधिक आषाढ महिन्यात प्रथम भागवत सप्ताह साजरा केला. पुढे १९३६ साली श्रीमार्तंड माणिकप्रभूंच्या महासमाधी नंतर श्रीशंकर माणिकप्रभु महाराज पीठारूढ झाले आणि त्यांनीच वेदांत सप्ताहाच्या विविध कार्यक्रमास शेवटच्या दिवशी निघणाऱ्या दिंडीच्या मिरवणुकीस एक विशिष्ट प्रकारची शिस्त घालून दिली ती अद्यापही चालू आहे. श्रीशंकर माणिकप्रभुंच्या कारकिर्दीतच वेदांत सप्ताह उत्सव फाल्गुन मासात ( श्रीमार्तड माणिकप्रभु महाराजांच्या आराधनेला जोडून) साजरा होऊ लागला जो आजतागायत चालू आहे. अशा ह्या वेदांत सप्ताहास शंभर ते सव्वाशे वर्षाची वैभवशाली परंपरा आहे.

सकाळी नऊच्या सुमारास सर्वांनी श्रीप्रभुमंदिराच्या लगत असलेल्या औदुंबराखाली पारायणासाठी जमावे, असे सर्वांना सूचित करण्यात आले होते. पारायणासाठी अत्यंत आकर्षक मंडप घातला होता. पारायणासाठी सिद्ध झालेल्या अनेक आस्तिक महाजनांनी आपापले आसन मांडले. साधारणतः दीडशैच्या आसपास स्त्रीपुरुष श्रीगुरुचरित्र किंवा श्रीमाणिकप्रभु चरितामृत पारायणासाठी सिद्ध झाले होते. श्रीप्रभु मंदिरातर्फे सर्व पारायण करणाऱ्यांसाठी एकत्रित संकल्प करण्यात आला. त्यानंतर साडे अकरा पर्यंत प्रत्येकाने आपापले पारायण संपवावे असे अपेक्षित होते. येथेही प्रत्येकाच्या वयाचा विचार करून, पारायणाची गती लक्षात घेऊन, अडीच तास एका दिवसाच्या वाचनासाठी दिले होते. पहिल्या दिवसाच्या पारायणानंतर सामुदायिक आरती झाली. हुमनाबादच्या श्री. राजू दुबे नामक एका सद्भक्ताने सर्व पारायणकर्त्यांसाठी अगदी आठवडाभर विनामुल्य पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली होती. तसेच वाचन करताना अगरबत्तीही उपलब्ध करून दिली होती. दुबेजींचा संपूर्ण परीवार ह्या सेवाकार्यात सहभागी होता. श्रीप्रभु सेवेसाठी कोणाला, कशी प्रेरणा करतो हे समजण्याच्या पलीकडले आहे. आपण साक्षीपणे केवळ अनुभवायचे असते.

तिकडे सकाळी मुक्तीमंटपातील श्रीशंकर माणिकप्रभुंच्या महापूजेनंतर श्रीजींसहीत भक्त श्रीचैतन्यलिंगासमोर येतात. श्रीचैतन्यलिंगासमोर सर्व वाद्ये, वीणा, मार्तंड प्रभूंची तसबीर . सजवून ठेवलेले असतात. श्रीजी प्रथम श्रीसरस्वती पूजन संपन्न करतात सप्ताह प्रारंभ निमित्त विशेष आरत्या म्हटल्यावर आरतीसोहळा पार पडतो. त्यानंतर  श्री माणिक जय माणिक हा गजर सुरू होतो श्रीजी श्रीसंस्थानच्या मुख्य भजनकर्त्याच्या (श्री. राजेश गिरी, जे वर्षभर प्रभुमंदिरात सातवार भजन करतात) कपाळी गुलाल लावून त्यांस वीणा देतात, तसेच मुंबईचे श्री. चौबळ यांना चांदीची छोटी वीणा देतात. श्रीजी स्वतः झांज घेऊन श्री माणिक जय माणिक भजन सुरू करतात वेदांत सप्ताहची सुरुवात होते. मुख्य भजनकर्त्याला सुपूर्द केलेली वीणा मुक्तिमंटपाला एक प्रदक्षिणा घालून, भजनघोषात प्रभुमंदिरात जाते तेथे अखंड वीणेला प्रारंभ होतो. संपूर्ण वेदांत सप्ताहात ही वीणा श्रीप्रभु नामसंकीर्तनात दिवसरात्र अखंड झंकारत राहते. श्री. चौबळांना  दिलेली चांदीची छोटी वीणा श्रीप्रभु मंदिरात जेथे श्रीभागवत सुरू असते, तेथे वर स्थापित केलेली राहते. सकाळचे श्रीभागवताचे वाचन, जोडीला श्रीगुरुचरित्र आणि श्रीप्रभु चरित्राचे पारायण आणि वीणेचे अखंड नामसंकीर्तन ह्याने प्रभू मंदिरातले वातावरण मंगलमय असते. चैतन्याचा दिव्य अनुभव येथल्या भारलेल्या वातावरणात आपण पदोपदी अनुभवू शकतो. श्रीप्रभुचरित्राचे पारायण श्रीप्रभुच्याच साक्षीने, श्रीप्रभुच्याच संजीवन समाधी समोर, ज्या औदुंबर वृक्षाखाली श्रीप्रभु त्यांच्या काळात बसायचे, त्याच वृक्षाखाली व्हावे, ह्यासारखा धन्यतेचा क्षण आपल्या जीवनात आणखी काय असू शकतो ? पारायण काळात आपली त्या त्या चरित्र नायकाशी एक विशिष्ट प्रकारची नाळ जुळत असते. पहिल्या दिवसाच्या पारायणात श्रीप्रभूंच्या बाललीला वाचून श्रीप्रभुशी नाळ जुळायला सुरुवात झाली. यथावकाश वाचन संपवून श्रीप्रभू समाधी समोर जाऊन कृतज्ञता व्यक्त केली. फुलापानांच्या आणि दागिन्यांच्या दिव्य साजात श्रीप्रभु अधिकच मोहक दिसत होता. श्री प्रभू समाधीस प्रदक्षिणा घालून स्वतःला ऊर्जावान (चार्ज) करून घेतले. कैलास मंटपात एका ज्येष्ठ सद्भक्ताकडे लक्ष गेले. नवी मुंबईच्या सौ. करमरकर काकू श्रीप्रभुचरित्र पारायण करीत होत्या. प्रत्येक दिवसाला दोन, अशाप्रकारे सलग १०८ पारायणांचा त्यांचा संकल्प होता. लगेचच मनात दिवसांची आकडेमोड झाली आणि त्या मातेच्या समोर नतमस्तक झालो. पारायणानंतर आता श्रीजींच्या प्रवचनाची उत्सुकता होती.

भंडारखान्याच्या बाजूला असलेल्या श्रीनृसिंह निलयमध्ये प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवचनाआधी सर्वांना एक ग्लास थंडगार मसाला ताक देण्यात आले. स्त्रियांना पुरुषांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, मधोमध श्रीजींचे व्यासपीठ, पाठीमागे श्रीमाणिकनगर संस्थानाचा श्रीप्रभु मंदिराच्या कळसाचे चित्र असलेला सुंदर फलक मन वेधून घेत होता. वातानुकूलित हॉल, बाहेरच्या दुपारच्या गरमीपासून शरीरास छान थंड करत होता. सर्वांना एकएक वही आणि पेन देण्यात आला. ध्वनी व्यवस्थाही अद्ययावत होती. गीतेच्या सतराव्या अध्यायाची एक एक प्रतही सर्वांना दिली गेली. सर्व आयोजनामध्ये एक विशिष्ट प्रकारची सुसूत्रता होती. येणाऱ्या सर्व आस्तिक महाजनांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी श्री संस्थानाने घेतली होती.

माध्यान्हीच्या सुमारास श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात, मंगल वाद्यांच्या कडकडाटात श्रीजींचे थाटात आगमन झाले. श्रीजींनी सर्वांस स्थानापन्न होण्यास सांगितले. सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये श्रीचैतन्यराज प्रभूंनी वेदांत सप्ताहाचा गौरवशाली इतिहास आणि उद्देश सांगितला. ह्या वेळच्या ज्ञानप्रबोध वेदांत सप्ताहात श्रीमद्भगवतगीतेतल्या १७व्या अध्यायाच्या अर्थात् श्रद्धात्रयविभागयोगाच्या अमृतपानाचा लाभ भक्तांना श्रीजींच्या दिव्य वाणीतून होणार होता. ह्या अध्यायात २८ श्लोक आहेत. दिवसाला साधारण चार श्लोक असा ठोकताळा मी मनाशी बांधला होता. पण इमारत जर मजबूत हवी तर तिचा पाया मजबूत असायलाच हवा. एखादा विषय समोरच्याला पूर्णपणे समजावा आणि तो कसा समजेल, ह्याकडे श्रीजींचा कटाक्ष असतो. त्यामुळे आज केवळ अर्जुनाने केलेल्या प्रश्नाला श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तराच्या पहिल्या श्लोकानेच आजच्या दिवसाची सांगता झाली. आज पहिल्या दोनच श्लोकांचा ऊहापोह सव्वादीड तासाच्या विवेचनात झाला. वेद या शब्दाची उत्पत्ती, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचा आढावा, गीता जेथे सांगितली गेली त्या कुरुक्षेत्राचे महत्व, गीतेतील प्रथम मध्यम आणि चरम षटकाची महती, सोळाव्या आणि सतराव्या अध्यायाची पूर्वपीठिका, ज्ञानप्राप्तीसाठीच्या योग्यतेसाठी आवश्यक असणाऱ्या जीवनशैलीची महती सतराव्या अध्यायात कशी सांगितली गेली आहे हे विस्तारपूर्वक साधारणतः तासाभराच्या आढाव्यात श्रीजींनी सांगितले. प्रसंगाच्या अनुषंगाने, वेदांतासारख्या क्लीष्ट आणि कधीकधी सामान्यजनांना नीरस वाटणाऱ्या विषयाला, आपल्या रोजच्या जीवनातील साधी सोपी उदाहरणे देऊन किंवा पुराण कथांमधील दाखले देऊन तो विषय सहज सोपा करण्याची श्रीजींची हातोटी विलक्षण आहे. आणि याचमुळे प्रवचनातला उपस्थित प्रत्येक जण श्रीजींशी एकरुपतेने जोडला जातो. प्रसंगी अनेक प्रश्न विचारून श्रोत्यांना विषयाला धरून ठेवण्याची श्रीजींची खूबीही एकमेवाद्वितीय आहे. हे विवेचन श्रीजींच्या समोर बसून, त्यांच्याच मुखातून पाझरणाऱ्या दिव्य वाणीतून ऐकणे सुखद, अविस्मरणीय आहे आणि म्हणूनच हा सोहळा आगळा आहे, वेगळा आहे.

जे लोक शास्त्र विधींचे उल्लंघन करतात, पण त्यांच्या अंतरात श्रद्धा आहे अशा लोकांची निष्ठा कशी असते ह्या अर्जुनाने विचारलेल्या सुरुवातीच्या प्रश्नाला देहात जी स्वभाव जात श्रद्धा असते ती सात्विक राजसिक आणि तामसिक प्रकारची असते ती तू माझ्याकडून ऐक ह्या श्रीकृष्णाने दिलेल्या उत्तरावर आजच्या दिवसाच्या निरुपणाचा डोलारा सांभाळला होता. प्रवचनानंतर ज्या भक्तांना जायचे होते त्यांना प्रसादाचे वाटप झाले. त्यानंतर महाप्रसाद घेऊन यात्रीनिवासात आलो. एव्हाना तीन वाजले होते.

सायंकाळी चार वाजता मुक्तीमंटपात श्रीशंकर माणिकप्रभु पुण्यतिथी निमित्त आराधनादि कार्यक्रम पार पडले. श्रीजींचा पूर्ण परिवार ह्या कार्यक्रमाला उपस्थित होता. ब्राह्मणभोजन, दक्षिणा, भजन पार पडल्यावर सर्व भाविकांना तीर्थप्रसाद वाटण्यात आला.संध्याकाळी सातच्या सुमारास श्रीप्रभुमंदिरासमोरील पटांगणात बालगोपाळांचा रासक्रीडा रंगला. आज आज पहिला दिवस असल्यामुळे बालगोपाळांची उपस्थिती थोडीशी कमी होती. बालगोपाळांची ही रासक्रीडा, ज्याला श्रीमार्तंड माणिकप्रभुंनी कोल असे नाव दिले आहे. हातामध्ये दांडिया सारख्या टिपऱ्या घेऊन श्रीप्रभुपदांच्या तालावर एका विशिष्ट पद्धतीने वर्तुळाकार फेर धरून नाचणे म्हणजे कोल खेळणे. हा कोल खेळण्याने शरीरातील मनातील कठीण ग्रंथीही आपोआप खोलल्या जातात, अशी मान्यता आहे. श्री भागवत सप्ताहात रासक्रीडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला अनुसरूनच कोलचा समावेश ह्या वेदांत सप्ताहात केला गेला आहे.

सायंकाळी आठच्या सुमारास महाप्रसाद घेऊन पुन्हा श्रीप्रभु मंदिरात आलो. आता उत्कंठा होती ती श्रीजींच्या प्रवचनाची. भजनासाठी आनंद मंडप सुंदर सजला होता. मध्यभागी श्रीजींसाठी छानशी गादी घातली होती. दोन्ही बाजूला वाद्यवृदांसाठी बसण्याची आणि माईकची व्यवस्था करण्यात आली होती. साडेआठच्या सुमारास श्रीजींचे येणे अपेक्षित होते. त्याआधी माणिक नगरातले तरुण भक्तीभावाने प्रभुपदे म्हणत होते. साधारणतः साडेआठच्या सुमारास दिवट्यांच्या प्रकाशात, संबळाच्या कडकडाटात, श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे दिमाखात श्रीप्रभुमंदिरात आगमन झाले. श्रीप्रभु समाधीसमोर नतमस्तक होऊन श्रीजी आनंद मंडपात श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात गादीपाशी आले. श्रीजींच्या बसण्याची व्यवस्था श्रीप्रभुसमाधीच्या अगदी समोर असते. डोक्यावर टोपी, हातामध्ये काठी अशी श्रीजींची अनिमिष नेत्रांनी साठवलेली रुबाबदार छबी आपल्या हृदयात कायम कोरलेली राहते.

सुरुवातीच्या संबोधनात श्रीजींनी संपूर्ण सप्ताहभर प्रवचनासाठी सप्ताह भजनातले, त्यात्या वाराचे गुरुभक्तीपर जे दुसरे पद आहे त्याचे निरूपण करण्याचा मानस व्यक्त केला. आज रविवार असल्यामुळे गुरुविण तूज गती नाही समज मुढाह्या श्रीमाणिक प्रभुंच्या, वरवर, अगदी सहज वाटणाऱ्या पदावर, अत्यंत सम्यक आणि प्रत्येक शब्दाची विस्तृत फोड करणारे विवेचन केले. अगदी छोट्याशा पदांमध्ये किती गहन अर्थ दडला आहे, हे समजून घेताना आपल्या डोळ्यात श्रीप्रभुप्रती कृतज्ञता दाटून येते. तीन कडवी असलेल्या ह्या पदावरचे विवेचन साधारण तासभर चालले ह्यावरुन श्रीजींची अध्यात्मावर असलेली पकड आणि ते इतरांस सहज समजेल, अशा पद्धतीने समजवून सांगण्याची पद्धत पाहून आपला श्रीजींप्रती असलेला आदर अधिकच दुणावतो. श्रीगणेशवंदनेनंतर सुरु झालेले भजन संपले तेव्हा घड्याळाचे काटे मध्यरात्रीच्या बाराकडे झुकले होते. भजनाच्या समाप्तीनंतर सर्वांना भंडार लावून खोबरंकुरमुऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला. सप्ताह भजनानंतर बाजूच्या गावातले रात्री भजन होते. भजनीमंडळ प्रमुखाला श्रीजींनी शाल पांघरून आशीर्वाद दिला. भजन समाप्तीनंतर श्रीजी आपल्या निवासस्थानी परतत असताना, सर्वजण उभे राहून जेव्हा कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा हे पद म्हणतात, तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. चैतन्याचा हा सुख सोहळा अनुभवून यात्रीनिवासात परतण्यासाठी महाद्वारापाशी आलो. श्रीसंस्थानाने ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांना निवास स्थानापर्यंत पोचवण्यासाठी रात्री बारा वाजताही बसची व्यवस्था केली होती. का कुणास ठाऊक श्रीप्रभुला परत पाहावेसे वाटले म्हणून पुन्हा श्रीप्रभु मंदिरात आलो. वेदांत सप्ताहात श्रीप्रभु अखंड जागा असतो. आम्ही झोपायला जात असताना गावकऱ्यांचे रात्री भजन ऐकावयास श्रीप्रभु आतुर झाला होता आणि अखंड वीणेची तार माणिक माणिक झंकारत होती

क्रमशः

[social_warfare]