ठाणे नगरीच्या पाचपाखाडी येथील श्री ज्ञानेश्र्वर मंदिर मध्ये निवृत्तिनाथ सभागृहात १७ ते २१ मे दर्म्यान श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांनी गीतेच्या सोळाव्या अध्यायावर केलेल्या प्रवचनावर सद्भक्तांकडून आलेली काही प्रतिक्रिया…

पाचपाखाडी येथील ज्ञानदेव सेवा मंडळाचे निवृत्तीनाथ सभागृहात तारीख १७ ते २१ हे ५ दिवस गीतेतील १६ व्या अध्यायावर परम पूज्य ज्ञानराज माणिकप्रभुंचे निरूपण झाले. महाराजांची, एखादा गहन विषय सोपा करून सांगण्याची हातोटी फारच उत्तम आहे. उदाहरणे देतांना अगदी रोजच्या व्यवहारातील देतात त्यामुळे विषयाचे आकलन पटकन होते. ‘ मला देव भेटेल का?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांनी तीन टप्प्यात दिले. म्हणजे हो,हो,नाही. म्हणजे कर्म व भक्ती मार्गाने गेले तर भेटेल परंतु ज्ञानमार्गाने त्याचे उत्तर नाही कारण ज्ञानमार्ग म्हणजे स्वरुपाचे ज्ञान होणे म्हणजेच देवाची भेट होणे. – श्री प्रकाश गाडगीळ, मुंबई

‘‘दुःख अभावात नाही, अभावाच्या अनुभवात असतं” आणि “आनंद कामना पूर्तीत नाही, कामनांचा क्षय होण्यात असतो” ही वाक्ये आणि त्यांच्या जोडीला दिलेली उदाहरणे मी कधीही विसरणार नाही. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. २ दिवसच येता आलं पण आल्यावर तिथून उठावसं वाटलं नाही. गुरुजींनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं म्हणून कळू शकलं. गुरुजींना भेटण्याचा आणि त्यांची अमृत वाणि ऐकण्याचा योग पुन्हा येईल अशी इच्छा.इ – श्री चिन्मय प्रभुघाटे, मुंबई

कार्यक्रम अतिशय छान व अप्रतिम झाला. सर्व नियोजन अगदी शिस्तबद्ध होते. महाराजांचं प्रवचन फारच सुंदर व कधीच संपू नये असे वाटत होते. – श्री गिरीश संझगिरी, मुंबई

‘मला देव भेटेल का’  या विषयावरील महाराजांचे प्रवचन ऐकताना दोन-अडीच तास कुठे गेले ते कळलंच नाही.अतिशय सोप्या शब्दात,हसत-खेळत, रोजच्या व्यवहारातील उदाहरण देत महाराजांनी श्रोत्यांच्या पदरात बरंच काही टाकलं. यातील दोन-चार गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही.परमात्मा बाहेर कुठेही नाही,तो आपल्या आतच आहे,त्यामुळे मला अमुक- तमुक जमत नाही असं म्हणणं म्हणजे त्या परमात्म्याला कमी लेखणं आहे. आत्म्याचे अधिष्ठान म्हणजे जणू सिनेमाचा पडदा! जसं पडद्यावर काही घडलं तरी तो त्यापासून निर्लेप असतो तसं आत्माही शरीराच्या व मनाच्या सुख दुःखा पासून अलिप्त आहे.. ती सुखदुःखं या देहापुरती आहेत याची सतत जाणीव हवी. जपाच्या माळेतील मणी म्हणजे संसारातील माया आणि त्या मायेपाठील न दिसणारा धागा म्हणजे परमात्मा. जप करताना त्या धाग्याला झालेला स्पर्श म्हणजे परमात्म्याच्या अस्तित्त्वाची जाणीव! माणूस नेहमी स्वतःवर प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी सांगितलेली  सासूच्या हिऱ्याच्या कुड्यांची गोष्ट. भगवंताचं एकदा जरी मनोभावे स्मरण केलं तरी तो वेळोवेळी आपल्यासाठी धावून येतो हे पटवून देण्यासाठी सांगितलेलं गुगल सर्च चं उदाहरण. म्हणजे एकदा एखाद्या गोष्टीचा सर्च घेतला की शोधकळ दाबताच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा कशी समोर येते याचा दिलेला दाखला. सहज लक्षात राहिलेल्या या काही गोष्टी. हसतखेळत ज्ञानामृत देणारा हा अनुभव दिल्याबद्दल ठाण्याच्या श्रीमाणिकप्रभु सेवा मंडळाला शतशः धन्यवाद. – श्रीमती संपदा वागळे, मुंबई

गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या प्रत्येक श्लोकाविषयी सविस्तरपणे समजावून सांगण्यात महाराजांचा हातखंडा होता याबद्दल माहिती होती. यापूर्वी दोन दिवसांत महाराजांनी सोळाव्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकांबद्दल भक्तांना सविस्तरपणे समजावून सांगितले होतेच; त्यामध्ये दैवी संपत्ती (गुण) विषयी विवेचन केलेले होते. आज पुढील चार ते सात श्लोकांविषयी महाराजांनी सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यामध्ये आसुरी संपत्तीचा उल्लेख होता. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, अज्ञान अशा सामान्य माणसांच्या अंगी असलेल्या आसुरी गुणांविषयी महाराजांनी साध्या सोप्या भाषेत विवेचन केले, इतकेच नव्हे तर दंभ, दर्प, अभिमान यांचा अर्थ अहंकार जरी असला तरी त्यामधला फरकही महाराजांनी खूप सुंदर रित्या समजावून सांगितला. शिवाय  जीवनातील छोट्या छोट्या घटना, प्रसंगांचा दाखला देत अधूनमधून हसतखेळत सुसंवाद साधत गीतेतील अध्यायांत गुंगवून टाकले. अर्थात मलासुद्धा महाराजांनी त्यांच्या या दोन तासांच्या प्रवचनात खिळवून ठेवले एव्हढे मात्र निश्चित! श्री विजयकुमार पवार, ठाणे

गुरुवारी माणिकनगरच्या महाराजाना पाहिले आणि गीतेच्या सोळाव्या अध्यायातील काही श्लोकांचे अर्थासहित विवेचन ऐकायचे भाग्य प्राप्त झाले. आध्यात्मिक ज्ञान किती सोप्या रीतीने त्यांनी प्रापंचिक समुदायाला रोजच्या उदाहरणावरून समजावून सांगितले. दोन तास रंगलेला हा कार्यक्रम प्रत्येकालाच अंतर्मुख करून गेला. असे गुरूंकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्याचे भाग्य प्रत्येकास प्राप्त होवो. – श्रीमती वेत्रवती देसाई – दहिसर, मुंबई

प.पू. श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांच्या दैवी ,प्रासादिक  वाणीतील दैवी व आसुरी संपत्तीचे सखोल  उदबोधन भाविकांच्या पारमार्थिक वाटेवरील अखंड ज्ञानदीप आहे. त्याचा प्रकाश आम्ही सदैव प्राप्त करून घ्यावा. कालचा ‘‘मला देव भेटेल का?’’ हा प्रवचनाचा विषय भाविकांचा खूप उत्सुकतेचा ! महाराजांनी आपल्या सिद्ध वाणीतुन आमचे पूर्ण समाधान केले व देव आहेच व प्रयत्नांती तो भटतोही हे ठामपणे सांगितले. – श्री वसंत कुलकर्णी, मुंबई

[social_warfare]