परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानराज माणिक प्रभु महाराजांनी परमार्थ मार्गातील साधकांसाठी त्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपैकी एका मोठ्या अडथळ्याचे, रामायणातल्या सुवर्णमृगाच्या प्रसंगाचे उदाहरण देऊन, त्याचे स्वरूपही सांगितले आहे आणि त्याला पार करून जाण्याचा बोधही फार मार्मिकपणे केला आहे.

स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।
मुग्ध होकर बुद्धि की सुविचार क्षमता खो गयी ।।धृ।।

है असंभव हेममृग यह राम भी थे जानते ।
जानकर भी हाथ में ले चाप-शर वे भागते ।
भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।१।।

है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को ।
ताकि रावण हर सके सुख शांति औ’ विश्राम को ।
स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।२।।

है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू ।
बुद्धि-सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू ।
ध्यान इतना रख समझ ले पार सरिता हो गई ।
स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई ।।३।।

श्रीरामांची अर्धांगिनी, सीता, ही अत्यंत पवित्र, शुद्ध चरित्राची पतीव्रता, अशी स्त्री जिचा उल्लेख ‘पंचकन्यां स्मरे नित्यमं’ मध्ये प्रथम क्रमांकाने येतो, ती सीतासुद्धा सुवर्णमृगाच्या वैषयिक दर्शनाने, त्याच्या प्राप्तीसाठी कशी वेडीपीशी होते, हा प्रसंग आहे.

‘स्वर्णमृग पर लुब्ध होकर देख सीता खो गई’ वनांत इतस्ततः मजेत विहार करणाऱ्या सुवर्णमृगाला पाहून सीता हरखून गेली. श्रीजींनी ‘लुब्ध’ हा शब्द बरोब्बर परिस्थितीला साजेसा घातलेला आहे. लुब्ध शब्दात हावरेपण आहे (Greedyness). ‘मला ते पाहिजे म्हणजे पाहिजेच’ हा भाव आहे. त्याचाच परिणाम असा झाला की ‘मुग्ध होकर बुद्धी की सुविचार क्षमता खो गई।’ सीता वेडीपिशी झाली. चांगलं काय, धोक्याचं काय, यामध्ये निर्णय घेण्याची बुद्धीची क्षमता त्यामुळे पांगळी झाली.

सद्गुरु श्री ज्ञानराज महाराजांनी अत्यंत दयाळू होऊन साधकांना अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे की, जगातले बाह्य विषय संख्येने जरी पाचच (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध) असले, तरी त्यांची आकर्षणशक्ती सीतेसारख्या भल्याभल्यांनाही मोहित करते. त्यांचीही मती भ्रष्ट करू शकते. यासाठी श्री समर्थ ही उपदेशितात,

‘मना कल्पना ते नको विषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्वचीची ।’

म्हणून या प्रथम टप्प्यावरच साधकाने जागृत राहून मनाच्या संकल्पामागे न जातां, बुद्धीची निर्णय क्षमता जपली पाहिजे.
‘आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे।’

याचे कारणही महाराजांनी पुढच्या ओळीत दिले आहे. ‘है असंभव हेममृग ये रामभी थे जानते।’ श्रीराम परमात्मा आहेत, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असे आहेत. त्यामुळे सुवर्णमृग असंभव आहे किंबहुना हे मायाजाल आहे, हे श्रीरामांना माहीत होतेच. तरीही ‘जानकर भी हाथमे ले चाप शर वे भागते।’ अत्यंत विचक्षण बुद्धीने महाराजांनी त्या आत्मचैतन्याच्या स्वभावाकडे निर्देश केला आहे.

मूळ आत्मचैतन्य जरी रंगहीन असले, तरी त्या स्फुरणाला मनातील वासनेचा रंग चढला, की त्या विषयाची वृत्ती होते. मन इंद्रियांना जोडलेले असल्यामुळे, वासना जर उत्कट असेल तर त्या वृत्तीची उर्मी होऊन इंद्रियांकडे धाव घेते आणि इंद्रिय ते कर्म करतात. हा सर्व प्रकार घडण्यासाठी मूळ अधिष्ठान हे आत्मचैतन्याचेच असते. ते जर नसले, तर वरील प्रक्रियाच होत नाही.

म्हणूनच महाराज म्हणतात, सुवर्णमृग असंभव आहे हे जाणूनही श्रीराम धनुष्यबाण घेऊन धावले. भगवान श्रीराम हे एकबाणी, एकवचनी आहेत, हे माहीत असल्याने, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते स्वतः गेलेत म्हटल्यावर, आता इच्छापूर्ती नक्की होणार या कल्पनेनेच ‘भंग तृष्णासंग से आनंदघनता हो गई।’. सुवर्णमृग मला हवा ही उत्कट आशातृष्णा आता श्रीराम भागविणार, या जाणिवेने सीता अतिहर्षित झाली.

खरे तर विवेकाने हिताचीच गोष्ट मनात ठसते पण मन जर विकारांच्या हातचे खेळणे बनले तर मात्र ‘प्रमाणांतरे बुद्धि सांडोनि जाते.’ सीतेचे नेमके तेच झाले. ‘अव्यवस्थित चित्तानां प्रसादोऽपी भयंकरः।’ (अर्थ – ज्यांच्या मनाचे वागणे अव्यवस्थित म्हणजे जसे असायला हवे तसे नसते, ते प्रसन्न झाले तरी त्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो.)

‘है प्रलोभन दे रहा मारीच आत्माराम को।’ सुवर्ण मृगाचे रूप घेतलेला मारीच मामा, तो आपल्या मागे येत असलेल्या श्रीरामाला, थोडं माना वळवून, थोडं पुढे पुढे पळून, सीतेपासून दूर दूर नेऊ पाहतो. त्याचप्रमाणे मात्रास्पर्शाने वैषयिक बनलेली बुद्धिवृत्ती आपल्या मूळ विवेकी स्वरूपापासून दूर जाते. असं झालं तर त्याचा परिणाम काय होतो, हे श्री महाराज पुढच्या ओळीत सांगत आहेत. ‘ताकि रावण हर सके सुख शांती औ’ विश्राम को।’ मनाला वाटणारी आवड निवड प्रामाणिक नसते. इंद्रिय बाह्यांगाला भूलतात. त्यामुळे विषयाचा स्विकार किंवा धिक्कार हिताच्या दृष्टीने, नेमकेपणाने करता येत नाही. अशाप्रसंगी ग्राह्य-त्याज्य सार-असार अशा द्वंद्वांमध्ये नेमका हिताचा निर्णय घेण्याची विवेकशक्ती जर बावचळली तर भवसागराच्या महाभयंकर लाटा आपल्याला कधी गिळंकृत करतील, याचा नेम नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, ‘मना कल्पना ते नको विषयांची।’ पुढे समर्थ म्हणतात, ‘महाघोर संसार शत्रू जीणावा.’ श्री महाराजांनी रावणाचा जो उल्लेख केला आहे, तो या संसार शत्रूलाच उद्देशून केला आहे, असे मला वाटते. वरकरणी सुखाचा मुखवटा घातलेला संसार, हेच दुःखाचे मूळ आहे, असे अनेक संतांनी सांगितलेले आहे. संत सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘भूलू नको मना संसारा ।
ना येथ सुखाचा वारा ।।
दुःखाचे मूळ संसार ।
बा करिल बहुत बेजार ।।
लोभाचे करुनि मांजर ।
तुज फिरवील दारोदार ।।

श्री महाराजांनी या संसार शत्रूला रावणाचे रूप दिले आहे, जो सुख शांती आणि विश्राम हरण करतो. याचे कारणही श्री महाराजांनी पुढील पंक्तीत कथन केले आहे, ‘स्वर्णमृग के मोह में मति की सुसमता खो गई।’

लोभ, मोह या गोष्टी मनबुद्धीला क्षोभ देण्यास कारणीभूत होतात, त्यामुळे त्यांचे स्थैर्य ढळते, समत्व बुद्धीने विचार करण्याची क्षमता उणावते. गीतेमध्येही या समत्व बुद्धीचा संदर्भ साधकाला योग साधण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी आला आहे. जसे ‘सर्वत्र समबुद्धय:’, ‘समबुद्धिर्विशिष्यते’, ‘समं पश्यन्हि सर्वत्र’ इत्यादि.

मोहामुळे बुद्धीचा हा जो महत्त्वाचा आणि सर्वात उच्च प्रतीचा गुण आहे, तो नष्ट होतो आणि साधकाला साधनेमध्ये आडकाठी होऊ शकते. म्हणूनच श्री महाराजांनी रामायणातील सुवर्णमृगाच्या प्रसंगाच्या आधारे साधकांना सावध राहण्याचा बोध केला आहे. ‘है विषय सब स्वर्णमृग सम सर्वदा यह जान तू।’ जगातील बाह्य विषय हे त्या सुवर्णमृगाप्रमाणे भ्रांती निर्माण करतात. विवेकी बुद्धी भ्रष्ट होते. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अती विषयी सर्वदा दैन्यवाणा।’ असे होऊ नये म्हणून, श्रीमहाराज बोध करताहेत, ‘बुद्धी सीता हो न मोहित, ध्यान रख यह ‘ज्ञान’ तू।’ या काव्यात बुद्धीला सीतेचे रूपक दिले आहे, तिला झालेल्या मोहाचा परिणाम किती भयंकर झाला, हे जाणून श्री महाराज अत्यंत कृपाळूपणे साधकाला आश्वासन देत आहेत की, अशी बुद्धी जर बाह्य विषयांना मोहित होऊ दिली नाहीस म्हणजेच, तुझे हवे-नको उणावले, तर मग ही भवनदी तू पार केलीसच असे समज.

साधकाचे हवे-नको उणावले की मनाची चंचलता उणावते. बुद्धीची विवेकशक्ती सबळ होते. वृत्ती बाहेर न धावता अंतर्मुख होऊ शकतात आणि अशा अंतर्मुख वृत्तीलाच परमात्म्याच्या दर्शनाची योग्यता प्राप्त होते. परमपूज्य सद्गुरु दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी । जरी बघणे असेल हरी।’

परमपूज्य श्री सद्गुरु ज्ञानराज महाराजांच्या चरणी शरण राहून वरील विवरण केले आहे. काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करून मार्गदर्शन करावे, ही प्रार्थना चरणी करते.

[social_warfare]