“आम्हाला धरता येतं, पण सोडता येत नाही” आपल्या अवतारकाळात प्रत्यक्ष श्री माणिकप्रभु नेहमी म्हणत असलेल्या या अभयवचनाचा यथार्थ प्रत्यय मला व माझ्या सर्व कुटुंबाला अलिकडेच आला. परिवारासहित आम्ही सर्वजण दत्तजयंती उत्सवासाठी नाशिकहून माणिकनगर येथे आलो होतो. माणिकनगरी श्रीदत्त जयंती महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटून, शेवटच्या दिवशी श्रीप्रभु दरबारात श्रीजींच्या पवित्र करकमलांनी खारकांचा महाप्रसाद घेतला. त्यावेळी श्रीजींनी जानेवारीतील ठाणे येथे होणाऱ्या श्री माणिक ज्ञानयज्ञास उपस्थित राहण्यासंबंधी वचनही घेतले. दिनांक २८ डिसेंबरच्या पहाटे जवळपास चार वाजण्याच्या सुमारास प्रभुदर्शन व प्रसाद घेऊन कुटुंबासहित नाशिकला प्रस्थान ठेवले. आम्ही माणिकविहार भक्तनिवासातून बाहेर पडत असतानाच, आमचे नाशिकचे गुरुबंधू श्री. रमेश राघूजी यांच्याशी आमची भेट झाली. थोडे बोलणे होऊन त्यांचा निरोप घेतानाच, त्यांनी आम्हाला श्रीप्रभु समाधीवरील फुलांचा हार दिला. ते म्हणाले की, श्रीप्रभु समाधीचे दर्शन घेतल्यानंतर, त्यांना गुरुजींनी मोठा फुलांचा हार दिला आहे. फुलांचा हा हार मोठा असल्याने व त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसल्याचे कारण सांगून, त्यांनी तो प्रसादरुपी हार आम्हाला देऊन ते निघून गेले. श्रीप्रभु समाधीवरील फुलांचा हा हार खूप मोठा असल्याने, तो गाडीला पुढच्या बाजूने बाहेरून बांधूयात, अशा विचाराने मी तसा प्रयत्नही केला. पण इतका सुंदर हार बाहेरून खराब होईल म्हणून, श्रीप्रभु समाधीचा हार बाहेरुन न लावता, गाडीच्या आतील बाजूने काचेलगत डॅशबोर्डवर ठेवला व भक्तकार्यकल्पद्रुम ब्रीदावलीचा गजर करुन प्रवास सुरु केला. श्रीप्रभु समाधीवरील हार मिळाल्याचा आनंदात मन हरखून गेले होते. गाडीच्या चाकांप्रमाणेच, आजवर आमच्या कुटुंबावर श्रीप्रभु कृपावर्षावाच्या अनेक अनेक आठवणीही मनामध्येही गतीमान होत होत्या.

माणिकनगरवरुन उस्मानाबादला साडूंकडे सकाळी सात वाजता पोहोचलो. दुपारपर्यंत आराम करून, भोजन उरकून, दुपारी दोनच्या सुमारास पुढील प्रवास सुरु केला. बीड जाऊन, गेवराई गावाजवळ आल्यावर, आमच्या गाडीच्या पुढे मालवाहू गाडी चालली होती. त्या गाडीत बऱ्याच म्हशी होत्या. त्या गाडीमध्ये व आमच्या गाडीमध्ये सुरक्षित अंतरही होते. म्हणायला वाहनांची गतीही फारशी नव्हती. पण त्या गाडीच्या चालकाने अचानक रस्त्याच्या मधोमध गाडी असतांना ब्रेक दाबला व गाडी तिथल्या तिथे थांबवली. क्षणार्धात घडलेले हे इतके अनपेक्षित होते की, काही कळायच्या आतच माझी गाडी त्या समोरील गाडीवर जाऊन धडकली होती आणि धडाऽऽम् असा आवाज झाला. आपल्या गाडीचा अपघात झाला आहे, याची मला एव्हाना जाणीव झाली होती आणि क्षणभर थोडी भीती वाटली. माझ्या शेजारी माझी पत्नी, मागच्या सीटवर मुलगी बसली होती. मी पटकन गाडीमधून बाहेर आलो आणि बघतो तर गाडीचा पुढील बाजूने अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीचे रेडीयेटर फुटले होते, बोनेटचा पत्रा पूर्णपणे गोळा झाला होता. तसेच गाडीच्या पुढील भागातील इंजिनच्या आजूबाजूचे बरेच भाग तुटलेले दिसत होते. एव्हाना पत्नी आणि मुलगीही बाहेर आली होती. मुलगी तर घडलेल्या पूर्ण प्रकाराबद्दल अनभिज्ञ होती. भेदरलेल्या आणि मनाच्या विषण्ण अवस्थेतही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, अपघातामुळे गाडीचे जे नुकसान झाले आहे, ते फक्त तेथपर्यंतच होते, जेथपर्यंत श्री प्रभु समाधीवरील हार ठेवला होता. हाराच्या पाठीमागे गाडीला काहीही झाले नाही. गाडीची त्यावेळची स्थिती पहाता गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना बराच मार लागला असावा, असे आजूबाजूला जमलेल्या लोकांना वाटत होते. पण प्रत्यक्षात श्रीप्रभुकृपेने आम्हाला कुणालाही अगदी खरचटलेसुद्धा नव्हते. मागील सीटवर बसलेल्या माझ्या मुलीला तर अपघात इतका मोठा झाला आहे, हे नीटसे कळलेही नव्हते.

सत्ता प्रभुची चाले मजवर, अघटित कैसे राहे पळभर…

वरील काव्यपंक्तीनुसार श्रीप्रभु महाराज सदैव आमच्या पाठीशी आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा आला होती. कदाचित हा प्रसंग आमच्या जीवावरही बेतला असता, पण श्रीप्रभुंचे आशीर्वाद आणि त्यांच्या कृपादृष्टीने आम्ही सर्व सुखरुप होतो. “श्रीप्रभु समाधीवरील मिळालेला तो हार म्हणजेच, श्रीप्रभुंनी काळासाठी आखलेली लक्ष्मणरेषाच होती,” असे अत्यंत कृतज्ञतेने येथे नमुद करावेसे वाटते.

अपघात झाल्यानंतर आजूबाजूला बरेच लोक जमा झाले होते, पोलीसही येऊन पुढील कार्यवाही करुन निघून गेले. मी, माझ्या पत्नी व मुलीबरोबर टोईंगच्या गाडीची वाट पाहत गाडीजवळच थांबलो होतो. त्याच वेळी एक वयस्कर बाबा तेथे आले आणि त्यांनी आम्हाला त्यावेळी अत्यंत आवश्यक असलेला, मानसिक धीर दिला. जणू काही कोणी वडीलधारी व्यक्तीच बोलत आहे असे वाटत होते. त्यांनी आपल्या झोपडीत येण्याचा आमच्याकडे आग्रह धरला. ते म्हणाले की, “मी मघापासून तुमच्याकडे बघत आहे. माझेकडे भाकरी आहे, ती तुम्ही सगळे जण मिळून खा. पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीत खाणेपिणे काही आठवतच नाही. आम्ही त्यांना विनम्रतेने नाही म्हणालो. परंतु बाबांचा आग्रह जास्त पडला म्हणून, आम्ही शेवटी त्यांना चहा करण्यासाठी सांगितले. ते पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होते की, ” मी धनगर आहे, शाकाहारी आहे, माझी झोपडी लक्षात ठेवा.”

आजही ते वाक्य कानाभोवती रूंजी घालत आहे. मनाच्या भेदरलेल्या अवस्थेत भेटलेल्या बाबांचा किंवा त्यांच्या धीरोदात्त वाक्यांचा अर्थ त्यावेळी लक्षात आला नाही, पण आज सगळे स्थिरस्थावर झाल्यावर जाणवते आहे की श्रीप्रभु आपल्या भक्तांच्या सदैव कशाप्रकारे बरोबर असतात. ह्या सर्व प्रसंगातून सुखरुप वाचवल्याबद्दल मनोमन श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतानाच, पत्नी देवघरात म्हणत असलेल्या श्रीसिद्धाराज प्रभुंच्या पंक्ती कानावर पडत होत्या…

“प्रभु जवळी असता असता,
मग चिंता मज का, मग भय मज का…”

[social_warfare]