ईश्वराबद्दल भीती (देवाचा कोप, Fear of God) – सामान्यजनांच्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून, ईश्वराप्रती प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन…

मानवी जीवनाला मानसिकदृष्ट्या अधिकाधिक बलवान बनवणे, मीच परमात्मास्वरूप आहे, ही धारणा अधिकाधिक व्यापक करणे, ही श्रीजींच्या प्रवचनांची काही ठळक वैशिष्ट्ये. आजच्या भाद्रपद पौर्णिमेच्या प्रवचन पर्वांतर्गत ईश्वराबद्दलची भीती किंवा देवाचा कोप (Fear of God) ह्या विषयावर अत्यंत उद्बोधक आणि समाजाला जागृत करणारं, त्याला यथायोग्य दिशा देणार असं प्रवचन श्रीजींच्या मुखकमलातून स्फुरले.

ईश्वर आपल्यावर नाराज होऊ शकतो का? त्याला आपल्या उपासनेची, प्रार्थनेची, भक्तीची आवश्यकता आहे का? आणि आपल्याला देवाची भीती वाटते का? अशा विविध प्रश्नांचा मार्मिक ऊहापोह वेदांतातील अनेक संदर्भासह श्रीजींनी आपल्या आजच्या प्रवचनात केला‌आहे. मुळातच हिंदू धर्मात ईश्वराच्या भीतीची संकल्पनाच नाही हे अधोरेखित करताना, अशा प्रकारच्या भीतीची संकल्पना आपल्या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या मुघलांकडून आणि इंग्रजांकडून आली हे श्रीजी नमूद करतात. आपला देश स्वतंत्र होऊन आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि अशा वेळेस आपल्या मनाच्या स्वातंत्र्यासाठी, त्या अनिष्ट संस्काराच्या जोखाड्यातून मुक्त होण्यासाठी श्रीजींचे आजचे हे प्रवचन सर्वांना नक्कीच उद्बोधक व्हावे.

भयाची व्याख्या करताना श्रीजी म्हणतात, परतो अनिष्ट संभावना इती भय: म्हणजेच दुसऱ्यांकडून संकटाची किंवा अनिष्टाची संभावना म्हणजेच भय… किंवा भविष्यात प्राप्त होणाऱ्या दुःखाच्या अनुसंधानजन्य उत्पन्न होणाऱ्या मनाचा उद्रेक म्हणजेच भय…‌ हे सांगताना श्रीजी श्रुतीमध्ये वर्णन केलेल्या मनाची व्याख्येचा संदर्भ देतात. भय हा मनाचा धर्म आहे. मन आणि परमात्मा यातील भेद स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात, की मन जड, अनात्मा आहे तर परमात्मा हा चेतन आहे आणि म्हणूनच भीतीचा ईश्वराशी काहीही संबंध नाही.

कोणताही मनुष्य सहेतुक उपासना करतो. भय, लाभ, कर्तव्य आणि प्रेम हे ईश्वराचे चार उपासनेचे मुख्य हेतू आहेत. कोणी भयापोटी, तर कोणी काहीतरी लाभ व्हावा म्हणून, कोणी कर्तव्य भावना म्हणून तर कोणी भगवंताप्रती असलेल्या प्रेमापोटी ईश्वराची उपासना करतो. ह्या चारही हेतूंपैकी प्रेम भावनेने केलेली उपासना ही श्रेष्ठतम आहे कारण जेथे प्रेम आहे तेथे कोणतीही भीती नाही.

देवांच्या भीतीसंबंधीत पुराणातील काही संदर्भ देताना श्रीजी तैतरीय उपनिषदाचा आधार घेतात. जो माणूस स्वतःला परमात्म्यापासून यत्किंचितही वेगळा समजतो, त्याला भय असते किंवा अज्ञानी माणसाला भय असते. ही संकल्पना स्पष्ट करतानाच श्रीजी म्हणतात की, भीती असण्यासाठी समोर भयावह काहीतरी गोष्ट असावी लागते. परंतु सर्वत्र परमात्माच भरलेला आहे आणि तो सर्व रूपात प्रकटतो अशी का एकदा मनाची धारणा झाली, की मग भीतीचे काही कारणच उरत नाही. श्री माणिकप्रभुंनी स्थापन केलेला सकलमत संप्रदाय आणि श्री प्रभुगादीच्या आचार्यांनी रचलेली अनेक पदे, सर्वरूपे श्रीप्रभु हा जाण ही धारणा आपल्या मनावर खोलवर रुजवतात आणि दृढ करतात.‌

परमात्म्याचा अनेकांशी असलेल्या संबंधांबाबत खुलासा करताना श्रीजी कृष्णाचे उदाहरण देतात. आकाशवाणी झाल्यामुळे कंसाला कृष्णाप्रती भीती होती, शिशुपालादि कृष्णाचा द्वेष करायचे, यादवांचे कृष्णाशी रक्ताचे नाते होते, पांडवांशी कृष्णाचे मित्रत्वाचे संबंध होते आणि आपले? आपले कृष्णाची भक्तीचे नाते आहे, त्यामुळे आपल्याला भीतीचे काहीही कारण नाही. जर आपल्याला परमेश्वराबद्दल भीती वाटायला हवी असेल तर आपल्याला कंस किंवा रावण बनायला लागेल, हे सांगतानाच श्रीजी आपल्याला परमात्म्याबरोबर असलेल्या प्रेम संबंधाची जाणीव करून देतात.

अमुक अमुक आचार केले नाहीत तर देव आपल्यावर रागावेल का? ह्या सहज मानवी स्वभावाच्या जाणीवेबद्दल विश्लेषण करताना श्रीजी म्हणतात की, परमात्मा का अलिप्त आहे, त्याच्यामध्ये विकार होऊ शकत नाहीत. आपल्या सुखदुःखाशी परमात्म्याला काहीही घेणे देणे नाही.‌ पण मग, जर तो सुखदुःखाचा दाता नाही तर मग आपल्या जीवनात सुखदुःख का बरे येतात? ह्याचे कारण स्पष्ट करताना श्रीजी म्हणतात की, हे सर्व आपल्या कर्माचे फळ असते. आपल्या कर्माच्या फळांमध्ये ईश्वर कधीच ढवळाढवळ करत नाही. कर्माच्या सिद्धांताची एक विशिष्ट अशी व्यवस्था आहे ज्यात परमात्मा अजिबात ढवळाढवळ करत नाही. हे समजवताना श्रीजी, न्याय व्यवस्था आणि राष्ट्रपतीचे उदाहरण देतात. जसे राष्ट्रपती हे सर्व शक्तिमान असले तरी एखाद्याला त्याच्या गुन्ह्याच्या, अपराधाच्या संबंधित सजा देताना न्यायव्यवस्थेच्या निर्णयात ते ढवळाढवळ करत नाही.‌ त्याचबरोबर श्रीजी असेही सांगतात की परमात्मा जरी अलिप्त असला तरी तो सर्व भूतांमध्ये समप्रमाणात व्यापून आहे. त्याला कोणी प्रिय नाही आणि कोणी अप्रियही नाही, परंतु जे सुजन त्याचं भक्तिपूर्वक भजन करतात, त्यांच्यात परमात्मा वास करतो आणि ते परमात्म्यात वास करतात. येथे श्रीजी मानवाची आणि परमात्म्याची एकरूपता अधोरेखित करतात.

प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यावर श्रीजींनी आपल्या प्रार्थनेची परमात्म्याला गरज आहे का? ह्या प्रश्नाची उकल सहजपणे करतात. बऱ्याचदा आपण देवाला नैवेद्य दिला नाही तर तो उपाशी राहील का बरे? आपण जर त्याला अभिषेक स्नान घातले नाही तर तो विनास्नान बसेल का? असे द्वंद्व उपस्थित करणारे अनेक प्रश्न सामान्य जनांच्या मनात उपस्थित होत असतात. ह्याची यथायोग्य सांगड घालताना श्रीजी म्हणतात की, परमेश्वराला आपल्या आराधनेची, सेवेची गरज नाहीये पण आपल्याला आहे. कारण ईश्वर हा निष्काम आहे, तो नित्यतृप्त आहे, तो परीपूर्ण आहे. जर आपल्या सेवेची त्याला गरज लागली तर तो अपूर्ण आहे, असे समजले जाईल. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्याच्या आराधनेची गरज काय हे सांगताना श्रीजी म्हणतात की, आपलं त्याच्यावर निरतिशय प्रेम असतं. प्रेमाचा स्थायीभाव सांगताना श्रीजी म्हणतात की, प्रेम हे व्यक्त झाल्यावाचून राहत नाही. आपलं भगवंताप्रती असलेलं प्रेम हे आपण आपल्या उपासनेतून, प्रार्थनेतून, सेवेतून व्यक्त करत असतो.‌

काही धर्मांमध्ये जर तुम्ही ईश्वराची सेवा केली नाही तर तो तुम्हाला सजा देईल, असे मनावर बिंबवले जाते, पण श्रीजी म्हणतात की, शिक्षा करणारा हा भगवंत असूच शकत नाही.‌ त्यामुळे तो मला शिक्षा करेल अशी भीती मनात बाळगण्याचे अजिबात कारण नाही. जो भगवंताला शरण जातो, मी तुझा आहे या भावनेने प्रार्थना करतो आणि जो भगवंतापासून स्वतःला कधीही अंतरत नाही, वेगळा समजत नाही, जेथे प्रेम भावनेला प्राधान्य आहे, तेथे निश्चितच भीती नाही. पण जेथे ही भावना नाही तेथे मात्र निश्चितच भीती आहे. आपल्या हिंदू धर्मामधले हे वेगळेपण श्रीजी परिणामकपणे आपल्यासमोर आणतात.

त्याचवेळी, जर मानवाला भीती नसली तर आचरणात स्वच्छंदता किंवा उच्छृंखलता येऊ शकते असाही अपवाद येतो. ह्याचे समाधान करताना श्रीजी म्हणतात की, ह्या स्वच्छंदतेला, ह्या उच्छृंखलतेला काबूत ठेवून, मनाला नित्य साधनेच्या मार्गात आणून परमात्म्याप्रती एकदा का प्रेम झाले की मग भीतीचा लवलेशही उरत नाही. जसे एखाद्या लहान मुल आपल्या आईस घाबरत नाही कारण तेथे निर्व्याज्य प्रेम असते…

जिथे प्रेम आहे, तिथे भीती नाही,
आणि जिथे भीती आहे, तिथे प्रेम नाही…

जर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशी भीती असेल, याचा अर्थ आपले भगवंतावर प्रेम नाही आणि जर आपले परमात्म्यावर प्रेम असेल तर त्याच्याबद्दलच्या भीतीचा, त्याच्या कोपाचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवाला भगवंताप्रती केवळ प्रेम आणि प्रेमच होऊ शकतं. ईश्वराप्रती असलेल्या भीतीच्या भावनेचा नाश होऊन, ते प्रेम प्रत्येक मानवात उत्पन्न होवो, असा मंगल आशीर्वाद देऊन श्रीजींच्या आजच्या प्रवचनाची सांगता झाली.

आपल्या मनातील अनेक प्रस्थापित धारणा तोडून ईश्वराप्रती असलेले भीतीची भावना दूर होऊन, त्याच्याबद्दल प्रेमाची, एकरुपतेची भावना वृद्धिंगत करणारे श्रीजींचे आजचे प्रवचन निश्चितच परिणामकारक होईल, असा विश्वास आजचे हे प्रवचन ऐकल्यावर मला वाटतो…

[social_warfare]