धांव गे बाई धरिला कान्हा चोर ।।धृ।।
मारावे तरी खोडी सोडीना ।
जैसा वराडी भोर ।।१।।
किती सांगावे कांहीं ऐकेना ।
निशिदिन याचा घोर ।।२।।
माणिक म्हणे प्रभु दीन दिसे परी ।
जो सर्वांहूनि थोर ।।३।।

परमपूज्य सद्गुरु श्री माणिकप्रभु महाराजांनी वरील काव्यामधून ‘परम प्रेमरुपा’ अशा मधुराभक्तीचा गोडवा प्रदर्शित केला आहे. त्यांच्या कृपेची आकांक्षा मनी धरून, वरील काव्याचे विवरण करण्याचा प्रयत्न करते आहे.

‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’, सद्गुरु श्री माणिकप्रभु ह्यांच्या या काव्यातून त्यांनी, श्रीकृष्णावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या वत्सल गोपी आणि खट्याळ, हट्टी अशा बाळकृष्णाच्या जवळिकेचा सुंदर प्रसंग, ज्यात त्या गोपींच्या प्रेम भावनेच्या अनेक छटा रंगविल्या आहेत.

वाच्यार्थ – गोपींच्या खोड्या काढून, पळून जाणाऱ्या बाळकृष्णाला त्या गोपीने अतिखटपटी करुन पकडले आहे. पण कान्हा इतका चपळ आणि हुलकावे देणारा आहे हे माहित असल्याने, ती गोपी आपल्या इतर गोपींना मदतीसाठी धावत यायला सांगत आहे की ‘धांव गे बाई धरिला कान्हा चोर’. चोर एवढ्यासाठी म्हटले आहे की, हा गोपींच्या नकळत कधी घरात शिरुन दह्यादुधाची मडकी फोडायचा, फस्त करायचा आणि पळूनही जायचा. घरातल्या दुधाण्यांची गोष्ट सोडा पण त्यांची मनही चोरून‌ न्यायचा. ‘कर्षति इति कृष्णः’. गोपींची मनही कधी आकर्षून घ्यायचा हे त्यांचे त्यांनाच कळायचे नाही. म्हणूनच हवीहवीशी वाटणारी चोरी का होईना, पण चोरीच ना ती !

मग लटके का असेना, त्याच्यावर रागवायचं, चापटी मारायची, या त्यांच्या कृती त्यांचं कृष्णावरचं प्रेम, ममत्व, वात्सल्य हेच भाव दर्शवितात. पण एवढं करून कृष्णाच्या खोड्या काही संपतच नाहीत. जसा एखादा हेकट वराडी असावा, तो त्याला पाहिजे तेच करतो, तुमच्या सांगण्याला भीक घालत नाही, तसाच हा कान्हा करतो आहे. त्यामुळे रात्रंदिवस तो जीवाला घोर लावतो आणि दुसरा विषयच सुचू देत नाही.

आता मात्र गोपींनी त्याला धरले, पकडले. सद्गुरु श्री माणिक प्रभु म्हणतात, ‘आता गोपींना त्याचा कळवळा येतोय’. खट्याळ लेकराला बंदिस्त केल्यावर, गोपींच्या प्रेमळ नजरेला तो दीन दिसतो आहे, तरी ‘जो सर्वांहूनि थोर’ असा हा कान्हा! नारद भक्तिसूत्रात सांगितल्याप्रमाणे ‘तत्रापि न महात्मज्ञान विस्मृत्यपवाद:।’ म्हणजेच, कृष्ण हा बालवयात जरी असला, तरी त्याचे मोठेपण त्या कधी विसरल्या नाहीत.

असे हे, कृष्ण आणि गोपी यांच्या जवळिकेचा गोडवा अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण शब्दांत वर्णन केलेलं मधुर काव्य आहे.

लक्ष्यार्थ – परमार्थमार्गीचा जो साधक आहे, विशेषतः भक्तिमार्गातला, त्याला ईश्वरभेटीची तळमळ तर असतेच. त्याच्या वृत्तींना अंतर्मुख करून, ध्यानमार्गाने त्याचे दर्शन घेण्यासाठी तो अपार कष्ट घेतो. वरील काव्यातील ही गोपी ही त्या अंतर्मुखवृत्तीचे रूपक आहे, असे मला वाटते. संत दासगणू महाराज म्हणतात, ‘अंतर्मुख वृत्ती करी, जरी बघणे असेल हरी।’ एखाद्या वेळी त्या वृत्तीला सच्चिदानंदाचा अनुभव येतो ही, पण ती वृत्ती तो आनंद कायमच धरुन ठेवीलच अशी खात्री नसते. शिवाय इतर विषयांच्या वृत्ती तर सतत येतच असतात. म्हणून ही ‘गोपी’वृत्ती त्या बाहेर जाणाऱ्या वृत्तींनाही अंतर्मुख होण्यासाठी हाक देत आहे आणि हळूहळू नाही तर धावत या, नाही तर हा केव्हा सुटून जाईल, सांगता यायचं नाही. लडिवाळपणे त्या कृष्णाला (आत्मारामाला) ती ‘चोर’ म्हणतेय. शेवटी सर्व वृत्ती या आत्म्याच्या स्फुरणामुळेच आलेल्या असतात. त्यामुळे अत्यंतिक जवळिकेच्या संबंधामुळे वृत्तींना या आत्मारामाची सहज ओढ असतेच. केवळ अविद्येमुळे त्या बाहेरील विषयांकडे ओढल्या जातात. तेव्हा कधीतरी त्याची अनुभूती आली तर ती पुन्हा सुटू जाऊ नये, म्हणून ती ‘गोपी’वृत्ती इतर सर्व वृत्तींना अंतर्मुख होऊन ‘एकवृत्ती’ होण्यासाठी साद घालते आहे. कारण एकवृत्तीचे बळ अधिक असते.

‘मारावे तरी खोडी सोडीना, जैसा वराडी भोर।’ लहान मुलाला आई मारते, ती दुष्टावा म्हणून मारते का? आईने सांगितलेले त्याने ऐकावे म्हणूनच ना! आणि लेकराला मारल्याचं वाईट पुन्हा तिलाच वाटतं. तसंच त्या सच्चिदानंदाचा ‘सदा संग’ राहावा म्हणून साधक जीवाच्या आटापिटीने प्रयत्न करीत असतो. रात्रंदिवस त्या आत्मारामाचा ध्यास त्याला लागून राहिलेला असतो. म्हणूनच ‘निशिदिनी याचा घोर’. संत तुकोबा म्हणतात,

‘हरि तू निष्ठूर निर्गुण, नाही माया बहु कठिण ।
नव्हे ते करिसी आन, कवणे नाही केले ते ।’

प्रभुजींनी ‘घोर’ हा शब्द फार मार्मिकपणे घातला आहे. कृष्णसंग ‘सदा’चा हवा, हा साधकाच्या तळमळीचा उच्चांक आहे. दुसरा विषय त्याच्या वृत्तींना नाही.

आता कृष्ण तर हाती सापडलाय. त्या सच्चिदानंदाचा कोण आनंद आहे. त्यामुळे आतापर्यंत जे आरोप त्याच्यावर केले होते, तो आता आपल्या भावाच्या बंधनात पडल्याने, त्याच्यावरच्या उत्कट प्रेमाने तो दीन झाल्यासारखं वाटू लागलाय. पण असं होऊनसुद्धा कृष्णाची थोरवी त्या कधीच विसरत नाहीत. ‘जो सर्वांहुनी थोर।’

अशा ‘जाणोनि नेणता’ झालेल्या भक्ताच्या वृत्तींचं वर्णन प्रभुजींनी ‘कामक्रोधाधिकं सर्वं तस्मिन्नेव करणियं’ (नारद भक्तिसुत्र) म्हणजे जे जे भाव असतील, मग काम असो, क्रोध असो, ते सर्व ‘त्याच्याच’साठी असतील, हे या श्रीकृष्ण आणि गोपीच्या भावपूर्ण प्रसंगातून अतिशय मार्मिकपणे सांगितले आहेत. प्रभुजींच्या या संपूर्ण काव्यातून भक्तीचा गोडवा मनाला प्रसन्नता देऊन जातो.

 

[social_warfare]