आज माणिकनगरी आलो आणि श्रीप्रभुमंदिर परीसरात डोळे दिपवून टाकणारा अद्भुत नजारा पहायला मिळाला. प्रभु महाराजांच्या दिव्य लीलांनी झळाळणारा समग्र जीवनपटच श्रीप्रभुमंदिराच्या आवारातील भिंतींवर साकारलेला पहायला मिळाला. श्रीजींची ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आधी सुयोग्य चित्रकार (श्री. पराग घळसासी) यांना शोधलं गेलं व श्रीप्रभु लीलांचे समर्पक वर्णन लिहून परागजींना पाठवले. परागजींनी साकारलेल्या कलाकृतींमध्ये योग्य ते बदल करवून, त्या‌ त्या चित्रांमध्ये अपेक्षित भाव पुरेपूर उतरल्याची खातरजमा करुन‌ घेतली. त्यामुळेच की काय, चैतन्यरुप श्रीप्रभुच्या जीवनपटाची प्रत्येक कलाकृती आपल्याला अत्यंत सजीव वाटते. चित्रकार श्री परागजींवरही श्रीप्रभुची असलेली असीम कृपा, त्यांनी रेखाटलेल्या चित्रांवरुन सहज अनुभवता येते. अलीकडेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ह्या चित्रदालनाचे श्रीजींच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. सटक्याच्या कक्षाच्या उजव्या बाजूपासून, रामभक्त असणाऱ्या श्री माणिकप्रभुंच्या आईवडिलांना श्रीरामनवमीच्या दिवशी श्री दत्तप्रभुंचा झालेल्या दृष्टांतापासून ह्या अद्भुत, मन मोहून टाकणाऱ्या चित्रयात्रेला सुरुवात होते. श्रीप्रभुंच्या बाललीला, श्री प्रभुंनी मामाचे घर सोडणे, अंबिलकुंड परीसरातील एकांतातील साधना, श्रीदत्त महाराजांचा श्रीप्रभुंवरील अनुग्रह, श्रीप्रभुच्या लीला, त्यांचे भ्रमण, माणिकनगरची स्थापना, श्री स्वामी समर्थांची, साईबाबांची, श्री गोंदवलेकर महाराजांची भेट, श्री मनोहरप्रभुंवर केलेला अनुग्रह ह्या व अशा अनेक दिव्य लीलांची ही चाळीस चित्रांची विस्मयकारी चित्रयात्रा श्रीमाणिक प्रभुंच्या संजीवन समाधीच्या चित्रापाशी येऊन विसावते. ही श्रीमाणिक प्रभुंचा संपूर्ण जीवनपट उलगडवणारी, अभूतपूर्व अशी चित्रसफर, श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीला उजव्या बाजूला ठेवत, प्रदक्षिणा घालून पूर्ण होते. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण चित्रयात्रेला श्रीमाणिकप्रभु चरित्राची सचित्र परिक्रमा म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आजकाल इंस्टंटचा, T20चा जमाना आहे.‌ त्यामुळे ह्या सचित्र परिक्रमेमुळे अनायसेच श्रीप्रभुचरित्राचे झटपट पारायण केल्याची जाणीवही आपल्या मनाला सुखावून जाते. ह्या सचित्र परिक्रमेतील प्रत्येक चित्रात तो तो प्रसंग आपल्या मनात तंतोतंत उभा करण्याची प्रचंड ताकद आहे.‌

श्री. परागजींच्या उत्कटतेने प्रत्येक चित्र आपल्याला श्रीप्रभुच्या चैतन्याची अनुभूती करवून देणारे, अतिशय सजीव वाटणारे असे झाले आहे. ह्या चित्रांना केलेली चौकटही अतिशय भव्य आणि चित्ताकर्षक आहे. प्रभु जात्याच सुंदर आणि प्रभुची प्रत्येक कलाकृतीही सुंदर… ही उक्ती येथेही लागू होते. श्री प्रभुसंस्थानाने श्रीप्रभुंच्या समग्र जीवनपटाचा हा अमुल्य, चिरंतन ठेवा समस्त प्रभुभक्तांसाठी उपलब्ध करुन‌ दिल्याबद्दल श्री प्रभुसंस्थानाचे अभिनंदन, कौतुक आणि आभार… ज्यांच्या संकल्पनेतून ही सचित्र परिक्रमा साकारली, त्या श्रीजींप्रती कृतज्ञता‌ आणि त्यांच्या परममंगल चरणी कोटी कोटी वंदन… आणि श्रीजींच्या मनातील ही संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ज्यांनी श्रम केले, त्या सर्वांना अभिनंदन. ज्यांनी श्री माणिकचरितामृताचे वाचन केले आहे, त्यांना ह्या सचित्र परिक्रमेत विशेष आनंदाची अनुभूती येईल.‌ ह्या सचित्र परिक्रमेत मला आत्यंतिक सुखाची अनुभूती आली आणि माणिकनगरच्या पुढील भेटीत ती अनुभूती आपल्याही येवो, ह्या श्रीप्रभुचरणीच्या नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…

[social_warfare]