कोरोनासंसर्ग होऊनही, त्यावर प्रचंड ईच्छाशक्तीच्या जोरावर, मानवजातीच्या कल्याणास्तव सकलमताचा झेंडा अविरत, डौलाने फडकवत ठेवणा-या वचनबद्ध, तपस्वी योग्यास, श्री ज्ञानराज प्रभुमहाराजांस, सादर प्रणाम आणि सलाम. चमत्कार भले ह्या माघ पौर्णिमेच्या प्रवचनाचा विषय असो, पण डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला देऊनही धर्मकर्तव्यासाठी अतिशय उत्साहाने, त्याच आवेशात, जोशपूर्ण संपूर्ण प्रवचन श्रीजींनी खड्या आवाजात केले हा चमत्कारच नव्हे काय? श्रीजींच्या दृष्टीने ती सहज लीला असावी परंतु आम्हां सामान्यजनांसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. पौष महिन्यातील प्रवचनात ही पौर्णिमेची मालिका अखंड चालू रहावी म्हणून श्रीजींनी व्यासपीठावरून निवेदन दिले होते. मधल्या काळात संस्थानातर्फे श्रीजींच्या स्वास्थ्यसंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. त्यात श्रीजींना अजून पंधरा दिवस आरामाची गरज असून ११ मार्च पर्यंत शक्यतो भेटायचे टाळावे असे नमूद करण्यात आले होते. काल सकाळी नित्यसेवा करताना मनांत श्रीजींच्या प्रवचनाचा विषय डोकावला. श्रीप्रभुला त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करून ज्ञानदानाचा हा यज्ञ धडाडत रहाण्यासंदर्भात प्रार्थना केली होती. दुपारी प्रवचनाचा व्हिडीयो पाहून श्रीप्रभुंच्या उदारतेने मन भरून आले. अधाशासारखे प्रवचन ऐकले. श्रीप्रभुंची मायेची ऊब अनुभवल्यावर त्यांच्या चरणांवर डोके ठेऊन हमसून हमसून रडण्यांत अपार समाधान आहे. आज हे समाधान पुरेपूर अनुभवलं. स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता भक्तवत्सल श्रीजी पुनःश्च कार्यप्रवण झाले ही आमच्यासाठी परमोच्च आनंदाची बाब. श्रीजींच्या रसाळ वाणींतील ज्ञानगंगेच हे तिर्थोदक आम्हांस नित्य प्राशन करावयास मिळो व श्रीजींना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी श्रीप्रभुचरणांच्या ठायी सविनय प्रार्थनेसह, जय गुरू माणिक.