श्रीमाणिक प्रभु बाललीला -1

 

गोविंदा नामे गोपालक ।

बालसखा एक बालक ।

सवे घेऊनि माणिक ।

नित्य गुरे चारावया ॥१॥

 

परी नेमात खंड पडिला ।

तीन दिवस नाही आला ।

सखा माणिक शोधित त्याला ।

गोविंदागृही पातला ॥२॥

 

पाहो जाता गोविंदांगणी ।

सकल रडती आक्रंदोनी ।

माणिक मातेसी पुसोनि ।

व्यर्थ का विलापी ॥३॥

 

माता वदे स्फुंदोनी ।

काळ आला धावोनी ।

गोविंदासी नेले हिरावोनी ।

आज आपल्यातूनी ॥४॥

 

माणिक म्हणे विस्मय करोनि ।

जीवित परी, शोक वदनि ।

उठ गोविंदा, सप्रेमे वदोनि ।

जाऊ खेळावया ॥५॥

 

ऐकता प्रभुची मंजुळवाणी ।

गोविंदा उठे झडकरोनी ।

जागविला तया काळनिद्रेतुनी ।

अवघा आनंदसोहळा ॥६॥

 

गोविंदासी वनांत येण्या सांगून ।

प्रभुमाणिक सत्वर गेले निघून ।

तीन दिवस गुप्त राहून ।

नामानिराळे राहिले ॥७॥

 

गरजेपेक्षा अधिक स्वच्छंद ।

बाललीला जैसे मुकुंद ।

माणिक प्रभु आनंदकंद ।

सेविता परमानंद ॥८॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला -2

 

एकदा एक निःसंतान माळीण ।

आंबे विकावया करी मार्गक्रमण ।

आंबे घ्या आंबे मुखी उच्चारण ।

चालतसे झरझर ॥१॥

 

प्रभु खेळत होते त्या समयास ।

पाहता आंबेवाल्या माळिणीस ।

आंबे देशील का खावयास ॥

विचारती लिलाविनोदे ॥२॥

 

पैशाशिवाय सर्व दुस्तर ।

अवघा व्यापार व्यवहार ।

फुकटचे कोण देणार ।

माळिण म्हणतसे ॥३॥

 

परी प्रभुलीला पहा अपार ।

मित्रांसी सहज वदे साचार ।

जरी माळिण संतान आतूर ।

आंबे देईन खावया ॥४॥

 

ऐकता प्रभुच्या बोलावरी ।

माळिण फिरे माघारी ।

ठेऊनिया समोर टोकरी ।

हवे तितुके घे ॥५॥

 

प्रभुंनी अकरा आंबे घेतले ।

तितकेच पुत्र पदरी घातले ।

अहा काय भाग्य उदेले ।

निःसंतान माळिणीचे ॥६॥

 

यथावकाश होता अकरा नंदन ।

माळिण करी प्रभुसी वंदन ।

तृप्ती पावले मज अंतःकरण ।

अधिक पुत्र नको आता ॥७॥

 

प्रभु वदे मग तियेसी ।

जैसे तुझ्या असेल मनासी ।

आम्ही मुक्त झालो वचनासी ।

मायामुक्त अवधूत ॥८॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला -3

 

असेच एकदा वनांत हिंडता ।

पोपट एक मरून पडला होता ।

सवंगडी पोपटास पाहो जाता ।

शोकाकुल जाहले ॥१॥

 

सख्यांची म्लान वदने पाहता ।

बाल माणिक द्रवला चित्ता ।

मृत शुकास घेवोनि हाता ।

कुरवाळीत ममतेने ॥२॥

 

अरे राजा, काय झाले ?

पंखातील बळ कुठे गेले ।

प्रभु महाराज सहज वदले ।

करूणादृष्टी पाहता ॥३॥

 

दोन्ही हाती पकडोनी ।

दिले आकाशात उडवोनी ।

पंख फडफड करोनि ।

अवकाशी झेपावला ॥४॥

 

लीला इतकी सहज ।

नाही कोणास उमज ।

ज्याची जितकी गरज ।

प्रकटती तितकेच ॥५॥

 

सवंगड्यांसवे नित्य लीला ।

नाही त्याचा उदोउदो झाला ।

खेळून झालिया विसरती त्याला ।

निरागस बालके ॥६॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 4

 

अरबांची फौज निजाम दरबारी ।

अप्पाराव होते त्याचे अधिकारी ।

अरब आप्पाराव म्हणती सारी ।

उच्चपदस्थ ब्राह्मण ॥१॥

 

पत्नी त्यांची भीमाबाई रूपवान ।

जैसी का सौंदर्याची खाण ।

परी पोटी नव्हते संतान ।

दुःख होई अपार ॥२॥

 

नाना उपाय केले थोर ।

व्रत उपवास जप घनघोर ।

पाळण्याचा हालेना काही दोर ।

व्यर्थ झाले सर्वही ॥३॥

 

ऐकली होती प्रभुंची कीर्ती ।

सत्य होई मुखे जे वदती ।

मागुनी पतीची अनुमती ।

पालखीत बैसतसे ॥४॥

 

काफिला चालला कल्याण नगरी ।

राहिली एक मैलाची दूरी ।

गंमत पाहे पालखी बाहेरी ।

आतमधून भीमाबाई ॥५॥

 

रस्त्याला लागून एक मैदान ।

खेळती मुले त्यात समरसून ।

अचानक एकाच्या छातीवर बसून ।

मारीते झाले तयासी ॥६॥

 

भीमाबाई पाठवी सेवकांसी ।

सोडवावे असहाय बालकासी ।

बालक सांगे सेवकांसी ।

अंतर्गत मामला आमुचा ॥७॥

 

परी असे मजसी सोडवणे ।

तरी आठ कवड्या देणे ।

भीमाबाई ऐके ते बोलणे ।

कोडे कवड्यांचे ॥८॥

 

कवड्यांऐवजी रूपयांचे दान ।

भीमाबाई देई झडकरून ।

नको आठ कवड्यांवाचून ।

अन्य आम्हा ॥९॥

 

कुठे शोधाव्या आता कवड्या ।

भीमाबाई पाहती होऊनी बापुड्या ।

पाणक्याच्या बटव्यात आठ तेवढ्या ।

मिळाल्या कवड्या ॥१०॥

 

कवड्या देऊनी सोडविले ।

जा तुला आठ पुत्र दिले ।

बालक ते सहज वदले ।

कनवाळू माणिक ॥११॥

 

साधारण घटना समजून ।

प्रस्थान केले मैदानातून ।

संध्याकाळी कल्याणास येऊन ।

लवाजमा पोहोचला ॥१२॥

 

प्रभुदर्शन घेतल्या वाचून ।

न करावे तरी भोजन ।

ऐसे मनोमनी योजून ।

भीमाबाई शोधतसे ॥१३॥

 

तीन दिवस घडे उपवास ।

नाही माणिकाचा काही तपास ।

चौथे दिवशी प्रभु उदयास ।

आले स्वगृही ॥१४॥

 

लोटली सत्वर दर्शनास ।

पारावार नुरे आश्चर्यास ।

कवड्यांनी सोडविले जयास ।

वेडाभाऊ हाच तो ॥१५॥

 

आठ पुत्र तुला दिधले ।

अजून मनी काय योजिले ।

मातेने चार घास भरविले ।

पसार झाले तत्काळ ॥१६॥

 

भीमाबाई संतोषली अपार ।

दानधर्म लुटविले भंडार ।

देऊनी वस्त्र उपहार ।

माणिकमाता संतोषवीली ॥१८॥

 

भीमाबाईस आठ अपत्य ।

झाली पाठोपाठ सत्य ।

आठवणीने येई नित्य ।

माणिकदर्शना ॥१९॥

 

सहज शब्द ब्रह्मवाक्य ।

हरीहरांचे जेथे ऐक्य ।

अवतार सुकुमार माणिक्य ।

सुखदायक सर्वांसी ॥२०॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला -5

 

रंगबिरंगी दगडांची स्थापना ।

देवता म्हणूनि उपासना ।

नैवेद्य आरती आराधना ।

माणिकखेळ अनुपम ॥१॥

 

ग्रामस्थही वेगे धावती ।

करूनी पूजेची आयती ।

नवस आपले फेडीती ।

प्रसादाची रेलचेल ॥२॥

 

लपंडावाची पहा वेगळीच रीत ।

तिथल्या तिथे होती गुप्त ।

सखे हार मानोनी शरणागत ।

तेव्हाच प्रकटती ॥३॥

 

धोतर अथवा फेटा मागूनी ।

स्वतःस घेती वृक्षास बांधोनी ।

क्षणात जाती अलगद निसटोनी ।

धोतर फेटा तैसाची ॥४॥

 

धोतर सोडोनी कटीस बंधन ।

उरलेले दोन्ही बाजून देऊन ।

सख्यांस रस्सीखेच करण्या सांगून ।

जोर लावती सवंगडी ॥५॥

 

प्रभु क्षणार्धात मुक्त होती ।

धोतर राही मित्रांच्या हाती ।

फिरून तैसेच करून पाहती ।

बंधमुक्त वारंवार ॥६॥

 

सदा स्वच्छंदी जो आनंदकंद ।

कैसा राहील बंधनात बंद ।

जीवा लागता माणिकनामाचा छंद ।

बंधमुक्त होतसे ॥७॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 6

 

पशू पक्ष्यांना पहावे दयेने ।

मित्रांसी सांगे अतीव मायेने ।

प्राणीमात्र विहरता निर्भयतेने ।

संतोषे माणिक ॥१॥

 

एकदा एक खोडकर कुमार ।

गाभण म्हशीवर होऊनी स्वार ।

काठीने मारत असे वारंवार ।

पळवतसे म्हशीला ॥२॥

 

प्रभु पाहता त्या बालकास ।

समजावीती, नको देऊ त्रास ।

तयार नाही काही ऐकण्यास ।

उन्मत्त बालक ॥३॥

 

कळवळा येता माणिकास ।

वदती स्वमुखे जोरकस ।

हात लाऊन बघ म्हशीस ।

मग कळेल ॥४॥

 

उन्मत्त बालक ईरेला पेटून ।

हात दोन्ही पाठीस टेकवून ।

म्हशीस अजून जोरात पळवून ।

खदखदा हसतसे ॥५॥

 

प्रभु हसून म्हणती  त्यास ।

म्हैस ही वाईट हमखास ।

न सोडी आता तुझ्या हातास ।

बैस सांभाळूनी ॥६॥

 

माणिक वचन जणू ब्रह्मवाक्य ।

हाताचे पाठीचे झाले ऐक्य ।

हात मोकळे होणे अशक्य ।

लटकतसे अधांतरी ॥७॥

 

म्हैस धावतसे बेफाम होऊन ।

बालक रडे धाय मोकलून ।

चुकलो, वाचवा वदे कळवळून ।

असाहय दीनपणे ॥८॥

 

प्रभुमाणिक तो दीनदयाघन ।

पकडे म्हशीस धाऊन ।

प्रेमभरे हात फिरवून ।

शांतविले म्हशीला ॥९॥

 

हे माई, याला माफ कर ।

पुन्हा नाही ऐसे करणार ।

सोडवी आता ह्याचे कर ।

प्रेमभरे वदतसे ॥१०॥

 

झाला क्षणात बालक बंधमुक्त ।

सवंगडी करीती आनंद व्यक्त ।

मायामुक्त परी वर्ते मायायुक्त ।

सगुणरूपी माणिक ॥११॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 7

 

मेलगिरीभट नामक विप्र ।

प्रभुशेजारीच त्याचे घर ।

पुजीतसे नित्य सोमेश्वर ।

शिवभक्त विख्यात ॥१॥

 

मेलगिरी रूपाने काळा सावळा ।

समस्त म्हणती त्यास काळ्या ।

काळा परी शिवभक्त आगळा ।

शिवध्यानी सदोदित ॥२॥

 

एके दिवशी व्यग्र शिवपुजनी ।

अभिषेक आणि बिल्वार्चन करूनी ।

शिवपिंडीस एक ध्यान लावोनि ।

होतसे समाधिस्त ॥३॥

 

इतक्यात बाळंभट ब्राह्मण ।

प्रकटला शिवपुजे कारण ।

मेलगिरीस न पाहता ढुंकून ।

जलाभिषेक करीतसे ॥४॥

 

मेलगिरीची पूजा पावली भंग ।

बदलला आता भक्तीचा रंग ।

शिव्याशाप देण्यात होती दंग ।

कोलाहल माजला ॥५॥

 

ऐकोनी मंदिरातील कोलाहल ।

प्रभु धावले मंदिरासी तात्काळ ।

मेलगिरीस बोलावूनी जवळ ।

प्रेमभरे समजावीत ॥६॥

 

काळ्या, का रे व्यर्थ रागावतोस ।

पाषाणलिंगाचा भारीच तुज सोस ।

मेलगिरी वदे माणिक प्रभुस ।

पाषाणलिंगच मज सर्वस्व ॥७॥

 

माझ्यासारख्या परम अभाग्यास ।

ईश्वर न येई प्रत्यक्ष दर्शनास ।

प्रभु जाणूनी काळ्याच्या भावास ।

लीला दाविती ॥८॥

 

डोळे बंद करूनी काळयास ।

सांगितले लिंगासमोर बैसण्यास ।

होता काही क्षण समयास ।

डोळे उघडी बा ॥९॥

 

डोळे उघडताच दिव्य पाहीले ।

तेजस्वी सिद्ध पिंडीठायी बैसले ।

जटाधारी, अंगी भस्म चर्चिले ।

रूद्राक्षमाळा अंगभर ॥१०॥

 

कटी नेसले व्याघ्रांबर ।

वर्ण जैसा कर्पूरगौर ।

प्रत्यक्ष कैलासीचा शंकर ।

शिवपिंडीवर बैसला ॥११॥

 

पाहो जाता ऐसा चमत्कार ।

माणिक चैतन्य शक्तीचा आविष्कार ।

मस्तक ठेवता शिव चरणांवर ।

तात्काळ गुप्त जाहले ॥१२॥

 

शिवलिंग पुन्हा तैसेच असत ।

समोरी प्रभु महाराज हसत ।

माणिकासी घालोनि साष्टांग दंडवत ।

मेलगिरी पूजितसे ॥१३॥

 

लिलाविग्रही तो प्रभु माणिक ।

असे सर्व सुखासी कारणिक ।

काया वाचा आणि मानसिक ।

भजा श्रीगुरू माणिक ॥१४॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 8

 

काळंभट अत्यंत गरीब ब्राह्मण ।

भिक्षेतूनच करी उदर भरण ।

मावशीकडे रोज पत्रावळी बनवून ।

तेथेचि राहतसे ॥१॥

 

एक दिवस विचित्र आला ।

खराब पानांचा गठ्ठा आला ।

काळंभटाने ठाम नकार दिला ।

पत्रावळी बनविण्यास ॥२॥

 

मावशी कोपली भयंकर ।

जैसा जमदग्निचा अवतार ।

घालवोनि काळंभटास घराबाहेर ।

दिधले तात्काळ ॥३॥

 

प्रतिवर्षी श्रावणांत ब्राह्मण भोजन  ।

काळंभट सोहळा करी समरसून ।

ह्यावर्षीही त्याची तयारी पाहून ।

मावशी जळतसे ॥४॥

 

सर्व गावक-यांचे कान फुंकून ।

वळविले त्यांना आपल्या बाजूनं ।

पत्रावळी न मिळती ऐसे योजून ।

मावशी कोंडी करीतसे ॥५॥

 

घोर परिस्थीतीने विवश काळंभट ।

पत्रावळी मिळविणेस करी खटपट ।

इतक्यात झाली माणिकप्रभु भेट ।

वृत्तांत सर्व निवेदिला ॥६॥

 

श्रीमाणिकप्रभु तोच दत्त दयाघन ।

करिती काळंभटाचे पूर्ण समाधान ।

प्रभुच करील संकट निवारण ।

अभयकर देतसे ॥७॥

 

ज्या दिवशी ब्राह्मणभोजन ।

सुर्योदयापूर्वी आले दोघेजण ।

डोकीवरूनी ठेविती उतरवून ।

भार केळीच्या पानांचा ॥८॥

 

भाऊ कुलकर्ण्यांच्या गावाहून ।

आलो रात्रींत चालून ।

पंगतीस लागतील म्हणून ।

श्रमिक सांगती ॥९॥

 

हर्षभरित त्यांसी नाव पुसता ।

भाव्या, माणक्या वदती उभयतां ।

भोजन करूनच जावे आता ।

फिरोनी आपुल्या स्थाना ॥१०॥

 

काळंभट ऐसे तयांसी वदले ।

ब्राह्मण गावांतील अपार जेवले ।

श्रमिक दोघेजण नाही दिसले ।

विफल सारे प्रयत्न ॥११॥

 

दुसरे दिवशी कुलकर्ण्यांच्या घरी ।

पोहोचली काळंभटाची स्वारी ।

धन्यवाद करीतसे वारंवारी ।

केळीच्या पानांसाठी ॥१२॥

 

कुलकर्णी होऊनि आश्चर्यचकित ।

नाही माझी केळीची बागाईत ।

भाव्या, माणक्यासी नाही जाणत ।

काळंभटासी सांगत ॥१३॥

 

काळंभट मनी करी विचार ।

म्हणे झाला काय प्रकार ।

मन आणि बुद्धीचा सारासार ।

ताळमेळ बसेना ॥१४॥

 

योगायोगे पुढे श्रीप्रभु भेटले ।

त्यांसी सर्व प्रकरण सांगीतले ।

गडगडाट करूनी प्रभु हासले ।

काळंभटासमोरी ॥१५॥

 

तुझ्यासाठी प्रभुस कष्ट जाहले ।

श्रमिक बनून भारे वाहीले ।

सत्व तुझे ऐसे राखिले ।

माझ्या दत्तप्रभुने ॥१६॥

 

काळंभट मनी उमजला ।

ही सर्व त्या प्रभुचीच लीला ।

माथा टेकवूनी माणिक चरणाला ।

धन्य धन्य जाहला ॥१७॥

 

जाणूनि श्रीमाणिक कृपेला ।

काळंभट माणिकाचाच झाला ।

प्रभुसमाधी पश्चातही सेवेला ।

खंड नाही पडला ॥१८॥

 

श्रावणांत रूद्राभिषेक, बिल्वार्चन ।

तैसेच होई ब्राह्मणभोजन ।

काळंभटाचे जे आचरण ।

अद्यापही चालतसे ॥१९॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 9

 

हळीखेड नावाच्या एका गावात ।

अग्निहोत्री ब्राह्मण भालचंद्र दीक्षित ।

आचार संपन्न वेदशास्त्र पारंगत ।

ख्याती असे पंचक्रोशीत ॥१॥

 

मनोहर नाईक माणिकप्रभु पिता ।

भालचंद्र दीक्षितांशी होती मित्रता ।

मनोहर नाईक स्वर्गलोकी पावता ।

दीक्षित येती कल्याणास ॥२॥

 

बयादेवी माणिकप्रभुंची माता ।

दीक्षित येती सांत्वनाकरीता ।

तिन्ही मुलांसी अवलोकीता ।

माणिक तेजस्वी सर्वांत ॥३॥

 

मातेच्या जीवास लागला घोर ।

सांगे दीक्षिता माणिकाचा आचार ।

अभ्यास सोडून वनांत विहार ।

नित्य हा करीतसे ॥४॥

 

घराकडे नाही अजीबात ध्यान ।

सर्व वस्तू करीतसे दान ।

कधी भरजरी वस्त्रे परीधान ।

सर्वांगी भस्मलेपन कधी ॥५॥

 

मुलाच्या भविष्याने चिंतीत माता ।

शिक्षणाने सन्मार्गी लावावे आता ।

परतोनी हळीखेडी आपण जाता ।

न्यावे माणिकासी ॥६॥

 

माणिकासी घेऊनी हळीखेडी आले ।

दीक्षितांनी कुटूंबासह गावात सांगितले ।

करू द्यावे जैसे माणिकमना आले ।

अडवू नका कोणी ॥७॥

 

प्रभु जरी हळीखेडास आले ।

स्वच्छंदीपणात नाही अंतर पडले ।

माणिक लीलांसी सहर्ष स्वीकारले ।

दीक्षित पतीपत्नीने ॥८॥

 

एक दिवस नवलच घडले ।

प्रभुंनी यज्ञकुंडातच शौच उरकले ।

दीक्षित पत्नीचे अवसान गळाले ।

तक्रार केली पतीकडे ॥९॥

 

पत्नीच्या बोलावर दाखवूनी अविश्वास ।

दीक्षित सत्वर धावले यज्ञशाळेस ।

जाणूनि मनोमन प्रभुच्या बाललीलेस ।

साफसफाईस लागले ॥१०॥

 

दीक्षित हात घालीता यज्ञकुंडात ।

सुवर्णाचा गोळा आला हातात ।

तेजस्वी सूर्य जसा चकचकित ।

प्रभुकृपे तळपतसे ॥११॥

 

आपली गरीब परिस्थीती पाहून ।

ही प्रभुकृपा दीक्षित होते जाणून ।

प्रभुही दीक्षितांसी विद्यागुरू मानून ।

आदर करती जीवनभर ॥१२॥

 

प्रभुस्नेहाचा ऐसा धागा जुळला ।

दीक्षित परीवार प्रभुंचाच झाला ।

जो जो माणिका शरण गेला ।

तोही त्यांचाच जाहला ॥१३॥

 

श्रीमाणिकप्रभु बाललीला – 10

 

भाच्याच्या भविष्याचा करूनी विचार ।

नोकरीस लाविले जकात नाक्यावर ।

प्रभु केवळ मामांच्या ईच्छेखातर ।

जकात वसुलती ॥१॥

 

येथेही प्रभु स्वच्छंदीपणे रहाटती ।

जकात वसूली वाटून टाकती ।

गरीब भिक्षुक फकिरांसी खैरातप्राप्ती ।

अनायसेच घडतसे ॥२॥

 

दिडकीची नाही जकात वसूली ।

मामांच्या कपाळी आठी आली ।

राजीनामा करूनी मामाच्या हवाली ।

नोकरी सोडली ॥३॥

 

नृसिंहतात्या लहान भाऊ प्रभुंचे ।

सहा वर्ष वय होता त्यांचे ।

माता करीतसे विचार मुंजीचे ।

धर्मशास्त्रानुसार ॥४॥

 

घरची परीस्थिती अत्यंत बेताची ।

होईल व्यवस्था कशी पैशाची ।

मुंज तर होणे गरजेची ।

चिंताक्रांत समस्तजन ॥५॥

 

पाहूनी बयम्मा मातेस चिंतीत ।

गणपतीसमोर बसती ध्यानस्त ।

सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत ।

प्रभु समाधीस्त ॥६॥

 

सायंकाळी कोणी एक वैश्यवाणी ।

व्यंकप्पा नामे आला कल्याणी ।

सत्य झाली माणिकप्रभुंची वाणी ।

पुत्रप्राप्ती म्हणोनि ॥७॥

 

आला आपला नवस फेडावया ।

धनधान्य वस्त्रालंकार चरणी अर्पाया ।

त्यानेच साधिले मूंजीचे कार्या ।

अती हर्षोल्हासाने ॥८॥

 

कर्ता करविता तो गजानन ।

तात्याचे करीतसे उपनयन ।

त्यासी वारंवार शरण ।

माणिकप्रभु जातसे ॥९॥

 

श्रीप्रभु बाललीला अत्यंत रसाळ ।

जैसे ऊसाच्या रसाचे गु-हाळ ।

श्रवण करीता माणिक वेल्हाळ ।

हृदयी विराजे ॥१०॥

॥श्रीमाणिकप्रभु चरणार्पणमस्तु ॥