एकमुखी दत्तगुरु
मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती. ब्रह्मा विष्णु महेश या तिन्ही देवतांचा अनोखा संगम असलेल्या त्रिमुर्ती देवतेचा जन्मोत्सव.”मासानां मार्गशीर्षोऽहम्”. “सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे” असे साक्षात भगवान श्रीकृष्ण सांगतात; त्या मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा म्हणजे भगवान श्री दत्तात्रेयांच्या जन्माचा आनंदोत्सव.
ब्रह्मा विष्णु महेश एकाठायी एकवटलेल्या भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती त्रिमुखी असणे स्वाभाविकच आहे. तुम्ही कधी एकमुखी भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहिली आहे का? नाही ना. मी पाहिली आहे. आजही पहातो… ती ही सगुण साकार रुपात. माझे सद्गुरू, भगवान श्री दत्तात्रेयांचे चतुर्थ अवतार, श्रीभक्तकार्यकल्पद्रुम सकलमताचार्य श्री माणिक प्रभू महाराज. एकमुखी दत्तगुरु.
प्रत्येक संतपीठाची एखादी तरी वेगळी छटा असते. ती तुम्हाला दुसऱ्या संतपीठाच्या ठिकाणी आढळणार नाही. कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील हुमणाबाद नजिक माणिकनगर येथे पीठासनाधिस्थ श्री माणिक प्रभू महाराज यांची गुरु परंपरा हे येथील एक अलौकिक वैशिष्ट्य आहे. गेली २०० वर्षे ही गुरु परंपरा अक्षुण्णपणे जोपासलेली आहे. “माझ्या गादीवर मीच बसणार” या पहिल्या श्री माणिक प्रभू महाराजांच्या वचनाप्रमाणे तेच प्रभू महाराज, आजच्या सहाव्या पीठासनाधिस्थ सद्गुरू श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या रूपाने, आपल्या भक्तांच्या लौकिक व पारलौकिक समुत्कर्षाचा कैवार घेत आहेत. २०० वर्षे अव्याहत. क्वचितच हे अलौकिक वैशिष्ट्य आपल्याला अन्य संतपीठाच्या ठिकाणी पाहायला मिळेल.
या संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे. प्रभू दरबार. सर्वच दत्तपीठांत दत्तजयंतीचा महोत्सव दणक्यात साजरा केला जातो. माणिक नगरला तर हा महोत्सव १० दिवस चालतो. पण “प्रभू दरबार” म्हणजे “जरा हटके” सोहळा. दत्तजयंतीचा महोत्सव आटोपला की दुसऱ्या दिवशी रात्री श्री माणिक प्रभू महाराजांचा दरबार भरतो. राजवस्त्रे ल्यालेले, नानालंकारमंडीत, छत्र चामरे भूषित, डोक्यावर माणिक प्रभूंची खास ओळख असलेली कलाकुसरीची भरजरी टोपी परिधान केलेले राजयोगी संतवर्य प्रभू महाराज; रात्री दरबारातील प्रभू गादीवर विराजमान झाले की प्रभू दरबार सुरू होतो. विशेष म्हणजे दरबारात आलेल्या प्रत्येक भक्ताला प्रभू महाराज स्वहस्ते प्रसाद देतात. शेवटच्या भक्ताला प्रसाद दिला की प्रभू महाराज गादीवरून उठतात. दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारा प्रभू दरबार हे माणिक प्रभू महाराजांच्या सकलमत संप्रदायाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
जर कोणाला एकमुखी दत्तात्रेयांचे दर्शन घेण्याची जिज्ञासा झाली तर त्यांनी प्रभू दरबाराला जरूर यावे आणि सगुण साकार रुपातील राजयोगी एकमुखी भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन धन्य व्हावे.
Recent Comments