ज्ञानादान हा श्रीजींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा जेव्हा ते व्यासपीठावर ज्ञानदान करण्यासाठी विराजमान होतात, तेव्हा त्यांची मुद्रा विलक्षण तेजस्वी होते. ज्ञान देताना होणारा अंतरंगातील आनंद यांच्या मुखकमलावरही झळकतो. चैतन्याचा झरा त्यांच्या वाणीतून खळखळत वाहत राहतो. सद्गुरु हा सदैव भक्तांमध्ये रमणारा असतो. समोर खचाखच भरलेले सभागृह पाहून श्रीजींची कळी अधिकच खुलली होती. सत्पुरुषांच्या अंगी असणारी सर्व लक्षणे आपल्याला श्रीजींमध्ये ठासून भरलेली आढळतात आणि दौऱ्यामध्ये त्याचे प्रमाण जागोजागी मिळत होते. आपल्या प्रवचनातील मुख्य विषयाला हात घालण्याआधी प्रभुवंदना आणि गुरुपरंपरेला वंदन करून, सर्वप्रथम ज्या प्रेमाने, श्रद्धेने आणि आपुलकीने श्रीप्रभु पादुकांचे स्वागत केले त्याबद्दल श्रीजींनी समस्त सगरोळीकरांचे आभार मानले. तसेच तुम्ही अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तीभावाने केलेल्या आदरातिथ्यामुळे मला अत्यंत आनंद झाला, असेही प्रतिपादन केले. श्रीजींच्या या विनयशीलतेमुळे उपस्थितांत टाळ्यांचा कडकडाट झाला. येथे स्वागत माझे नसून श्रीप्रभु पादुकांचे आहे, हा श्रीजींचा अकर्ता भाव माझ्या मनास अत्यंत भावला.

श्रीजी पुढे म्हणाले की, सगरोळी गावचा आणि श्रीप्रभु संस्थानाचा अत्यंत प्राचीन, अत्यंत पुरातन असा संबंध आहे. गेल्या दीडशे पावणे दोनशे वर्षापासून सगरोळीकरांचे प्रभु संस्थानाशी अत्यंत प्रेमाचे, भक्तीचे आणि श्रद्धेचे नाते आहे, आणि ते उत्तरोत्तर दृढ होत आहे, हे पाहून मला खूप खूप आनंद होत आहे. श्रीजींच्या ह्या वाक्यावर टाळ्यांचा पुन्हा कडकडाट झाला. मुळात: गोरगरिबांचे दुःख निवारण करून, त्यांना भक्ती मार्गात आणणे हे श्रीमार्तंड माणिक प्रभुंनी सुरू केलेल्या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट होते, आणि इतक्या वर्षांनी ही हा हेतू सफल होत आहे, किंबहुना त्याची व्याप्ती वाढत आहे, हे पाहून श्रीजींना अत्यानंद होत होता. ह्यातून सद्गुरूंची दृष्टी कशी असते, याची आपल्याला जाणीव होते.

प्रवचनाच्या मुख्य विषयाला हात घालताना श्रीजी म्हणाले, भक्तकार्य कल्पद्रुम हे श्रीप्रभुचे ब्रीद आहे. श्रीप्रभु हा भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहे. हे सर्वसामान्य जनांना समजावून सांगताना, श्रीजींनी स्वर्गातल्या कल्पवृक्षाची कथा सांगितली. त्यामुळे श्रीप्रभु आपण जे जे इच्छिले, ते ते देणारा आहे. पण असे असले तरी प्रभुकडे काय मागावे, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. आपल्या इच्छांची यादी कधीही संपत नाही. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मनुष्यांच्या केवळ दोनच इच्छा आहेत. पहिली म्हणजे, मला सदासर्वदा सुख मिळावं आणि दुसरी इच्छा म्हणजे, मला कधीही दुःख होऊ नये. मग या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग किंवा उपाय काय? तर माणसाच्या ह्या इच्छा केवळ ज्ञानानेच पूर्ण होतात.‌ श्रीजींनी पुढे सांगितले की, ह्या पृथ्वीवर मिळून जेवढं धान्य, सोनं, पैसा, पशु, स्त्रिया आहेत, ते एका माणसालाही पुरे पडणारे नाहीयेय, त्याला तृप्त करणारे नाहीयेय. आणि म्हणून असा विचार करून माणसाने समाधानाने राहावं. आपण देवाकडे नेहमी प्रार्थना करतो की, देवा, मला सुख दे आणि शांती दे! श्रीजी म्हणतात, केवळ सुख काही कामाचे नाही. सुखामध्ये शांती हवी, समाधान हवं. आजच्या काळातील सर्व समस्या, ह्या शांतीच्या अभावामुळे आहेत.

मग आता हे सुख कुठे मिळेल? वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे, जो सर्व सृष्टीचे नियमन करतो, जो सर्वांचा पालन पोषण करणारा आहे, जो सर्वांवर स्वामित्व गाजवतो, असा तो, परमात्मा आहे. तो एक रूप असूनही अनेक रूपांमध्ये नटतो आणि अशा परमात्म्याला जो आपल्या अंतरात पाहतो, त्यालाच शाश्वत सुखाची प्राप्ती होते.

जसा दाहकता हा अग्नीचा स्वभाव आहे, त्याप्रमाणे तो आनंद, ते सुख सतत त्या वस्तूत असावं. जगातील कोणत्याही गोष्टीत सुख देण्याचं सामर्थ्य नाहीयेय. कारण सुख हा वस्तूचा स्वभावच नाहीयेय. आपल्याला ज्या ज्या गोष्टींमध्ये सुख आहे असं वाटतं, त्या त्या गोष्टींमध्ये शाश्वत सुख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वस्तू  सुखदायक वाटतात, त्यामध्येही मुख्यत्वे तीन दोष आहेत. पहिला दोष म्हणजे दुःख मिश्रित तत्व अर्थात् जगात जेवढी सुखे आहेत त्या दुःख मिसळलेले आहे. सुख संपताना ते नेहमी दुःख देऊन जातं. दुसरा दोष म्हणजे बंधतत्व म्हणजेच ते सुख तुम्हाला बंधनात टाकते. त्याची सवय लागते, त्याचं व्यसन लागते, त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाहीत. शेवटचा तिसरा दोष म्हणजे अतृप्तीकरत्वम् म्हणजेच सुख कितीही मिळालं तरी आता पुरे असे कोणीही म्हणत नाही. म्हणूनच अशा दोषयुक्त वस्तूंपेक्षा जो परमात्म्याला आपल्या हृदयात वारंवार पाहतो, त्यालाच शाश्वत सुखाची प्राप्ती होते. आणि अशा शाश्वत सुखाला शास्त्रामध्ये आणखीन एक नाव आहे. ते म्हणजे, मोक्ष. मोक्ष म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती.‌ म्हणजेच, जेव्हा आपण सुखाची अपेक्षा करतो, तेव्हा आपण खरेतर मोक्षाचीच अपेक्षा करतो.

सामान्य जणांना वाटते की, माझ्या नशिबात असेल तर मला मोक्ष मिळेल, दैवाने दिला तर मला मोक्ष मिळेल. पण श्रीजी म्हणतात, मोक्ष हा कोणाच्याच नशिबात नसतो. मोक्ष हा दैवाधीन नाही, मोक्ष हा प्रारब्धाधीन नाही. मोक्ष हा पुरुषार्थ आहे म्हणजेच मोक्ष ही मनुष्याने स्वप्रयत्नाने मिळवायची गोष्ट आहे. शास्त्र म्हणते, मानवाने जर आपले जीवन सार्थ करायचे असेल, तर, धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ करावेत. शास्त्राने जरी धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा क्रम घालून दिला असला, तरी व्यवहारात मात्र अर्थ, काम, धर्म, मोक्ष असा क्रम संयुक्तिक आहे. अर्थ, काम आणि धर्मावर आपले जे अवलंबून असणे आहे, विसंबून असणे आहे, ती निर्भरता सुटण्याचं नाव म्हणजे मोक्ष! शास्त्राने जो धर्म, अर्थ, काम, मोक्ष असा क्रम घालून दिला आहे त्याचा अर्थ असा की, अर्थ आणि काम हे धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असावेत. माणसाची प्रवृत्ती ही धर्म आणि मोक्षाच्या मर्यादेमध्ये असावी. मोक्ष मिळवण्याची अनेक साधने आहेत पण त्या सर्व साधनांपैकी भक्ती हे साधन सर्वश्रेष्ठ आहे.

श्रीजींचे प्रवचन उत्तरोत्तर रंगत होते. वेदांतातील अनेक कठीण संकल्पना स्पष्ट करताना, व्यवहारातील अनेक उदाहरणे देऊन शंकांचे समाधान झाल्यामुळे उपस्थितांमध्य टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि प्रसंगानुरूप श्रीजींच्या प्रवचनशैलीमुळे हास्याचे फवारे उडत होते. नदी आपल्या उगमापासून वाहताना, वाटेमध्ये अनेक उपनद्या जशा तिला येऊन मिळतात त्याचप्रमाणे, श्रीजींच्या प्रवचनामध्ये मुख्य संकल्पनेला जोडूनच, विषयाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी अनेक उपसंकल्पना येतात. मोक्ष मिळवण्याच्या अनेक साधनांपैकी भक्ती हे एक मुख्य साधन आहे असे म्हटल्यावर, श्रीजींनी आता भक्ती म्हणजे नेमकं काय, हे प्रकरण उपस्थितांना विशद करून सांगितले.

श्रीजी म्हणतात, भक्ती म्हणजे काय? त्याचा उहापोह करताना श्रीजी, नारद महर्षींची भक्तीची व्याख्या उद्धृत करतात. नारद महर्षी म्हणतात, भक्ती म्हणजे परमप्रेम! मग आता परमप्रेम म्हणजे काय? प्रेम तर आपण सगळेच करतो, कोणी गाडीवर, कोणी साडीवर, कोणी दाढीवर… पण हे प्रेम परमप्रेम आहे का? तर नाही, कारण ते चिरकाल टिकणारे नाही. आपल्यापेक्षा ज्येष्ठावर, आदरयुक्त आणि अपेक्षारहित प्रेम म्हणजेच परमप्रेम. आपले आपल्या मुलावर प्रेम असते, त्याला परमप्रेम म्हणता येईल का? आपण साधारणतः पितृभक्ती, मातृभक्ती, देशभक्ती असेच शब्द ऐकतो. परमेश्वराप्रती जे परमप्रेम आहे, त्याचच नाव भक्ती. श्रीजी पुढे म्हणतात, पण इथे एक समस्या आहे. ज्याला आपण कधी पाहिलं नाही, ज्याचं आपल्याला कुळ, गोत्र, नाव, गाव, ठावठिकाणा माहीत नाही, तो काळा आहे की गोरा आहे, हे माहीत नाही, मग त्याच्यावर परमप्रेम करा, असं नारद महर्षी का बरं म्हणत असावेत?

साधं लग्न करायचं तरी आपण अनेक चौकश्या करतो आणि मगच होकार देतो. अशावेळी आपल्याला परमेश्वराबद्दल काय माहित आहे? श्रीजी पुढे सांगतात, भक्ती ही तीन प्रकारची आहे. साधन भक्ती, साध्य भक्ती आणि आत्मस्वरूप भक्ती. मनुष्यप्राणी या तीनच गोष्टींवर प्रेम करू शकतो. ह्याशिवाय इतर गोष्टींवर प्रेम करायला त्याला जागाच शिल्लक नाही.

साधन भक्ती – जी वस्तू माझ्या सुखाचे साधन आहे, त्यावरील प्रेम म्हणजेच साधनावरील प्रेम.

साध्य भक्ती – जी वस्तू माझ्या सुखासाठी साध्य आहे, त्यावरील प्रेम म्हणजेच साध्यावरील प्रेम.

आत्मस्वरूप भक्ती – म्हणजे स्वतःवरील प्रेम.

ही संकल्पना स्पष्ट करताना श्रीजी म्हातारी सासूबाई, सुनबाई आणि हिऱ्यांचे कुडे ह्याचे उदाहरण देतात. सासूबाईंकडे असलेले हिऱ्यांचे पुढे मला कसे मिळतील, असा हेतू ठेवून सुनबाईने सासुबाईची (साधन) अहोरात्र सेवा आरंभली. तिच्या सेवेने संतुष्ट होऊन सासूबाईंनी दसऱ्याच्या दिवशी हिऱ्यांचे ते कुडे सुनबाईला देऊन टाकले. हिऱ्यांचे ते कुडे (साध्य) मिळताच, सुनबाईने सासूची सेवा बंद केली. म्हणजे साधनावरचे प्रेम समाप्त होऊन आता ते साध्यावर आले होते. हिऱ्यांचे कुडे घालून काढलेले फोटो वगैरे पाठवून झाल्यावर एके दिवशी रात्री  जिवापाड प्रेम असलेले ते हिऱ्यांचे कुडे घालून, सुनबाई रात्री प्रवासाला निघाली. वाटेत दरोडेखोरांनी रस्ता अडवताच अंगावरील सगळ्या दागिन्यांसह अत्यंत प्रिय असलेले ते कुडे तिने दरोडेखोरांना देऊन टाकले. तुम्हाला काय हवं ते घ्या, पण मला मारू नका. म्हणजे साध्यावरील प्रेम‌ आता स्वतःवर आले होते.‌

ईश्वर आपल्या सुखाचे साधन आहे असे समजून, जेव्हा आपण ईश्वराकडे जातो त्यास निकृष्ट भक्ती म्हणतात.‌ त्याचप्रमाणे ईश्वराला साध्य समजून, त्याला प्राप्त करून घ्यायच्या उद्दिष्टाने केलेल्या भक्तीला मध्यम भक्ती म्हणतात.‌ पण तो परमात्मा, तो प्रभु माझंच स्वरूप आहे, अशा तादात्म्य भावनेने, एकात्म भावनेने जे परमेश्वरालाच आत्मा समजून, प्रेम करतात ती सर्वोत्कृष्ट भक्ती आहे. अशा ह्या ईश्वराची भक्ती करायचे ज्ञानोबा तुकोबारायांपासून सर्वांनीच सांगितले आहे.‌ पण ह्या ईश्वराचे नेमके स्वरूप काय? ते वर्णन करण्यासाठी अनेक संतांनी, अनेक ऋषींनी नाना प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण कोणीही ईश्वराचे यथायोग्य स्वरूप वर्णन करू शकले नाहीत. जसे एका हत्तीला सहा आंधळ्यांनी सहा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून पाहिले. ज्याने हत्तीच्या पायाला हात लावला, तो म्हणाला, हत्ती खांबासारखा आहे. ज्याने हत्तीच्या कानाला हात लावला, तो म्हणाला, हत्ती सुपासारखा आहे. अशाप्रकारे प्रत्येकाने सोंड, शेपूट ह्या अनुरूप हत्तीचे वर्णन केले. वास्तविक हत्तीचे समग्र वर्णन कोणीही करू शकला नाही.

पण वेदांमध्ये ईश्वराचे स्वरूप तीन तत्त्वात केले आहे. पहिले म्हणजे ईश्वराने जग निर्माण केले. या जगाची निर्मिती ज्याने केली तो म्हणजे ईश्वर. सबंध जगामध्ये एक प्रकारची सुव्यवस्था असल्याचे आपल्याला दिसून येते. सर्वत्र जिथे तिथे सुव्यवस्था आहे, याचा अर्थ त्या व्यवस्थेचा कोणीतरी एखादा कर्ता किंवा नियामक असला पाहिजे, आणि तो म्हणजेच ईश्वर!  पण मग असा प्रश्न उठतो की, ईश्वराने हे जग निर्माण केले हे ठीक, पण ह्या जगाच्या निर्मितीसाठी सामग्री कुठून आली? ईश्वर हा जगद्कर्ता आहे मग जग निर्माण कसे झाले? मग दुसरे तत्व सांगितले गेले की, ईश्वराने जग निर्माण केले नाही तर, ईश्वर स्वयं जगद्रूप झाला. मग पुन्हा अपवाद उठतो की, ईश्वर जर स्वयं जगद्रूप झाला तर जगात जेवढे दोष आहेत, दुःख आहेत, जग जड आहे, जगात अनाचारी आहेत, पापी आहेत, मग हे सगळे इश्वर स्वरूप आहे काय? ह्याला ही उत्तर म्हणून वेदांत पुढे सांगितले आहे की, ईश्वर हे जगताचे अधिष्ठान आहे आणि हे जगत् त्या अधिष्ठानावर भासणारा केवळ एक भ्रम आहे. हे समजावून सांगताना, श्रीजी मग सिनेमाचा पडदा आणि त्यावर दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटाचे उदाहरण देतात. सिनेमाचा पडदा हे अधिष्ठान असून त्यावर दाखविली जाणारी कथा हा भ्रम आहे. चित्रपटगृहात जोपर्यंत अंधार असतो, तोपर्यंतच आपल्याला चित्रपट दिसतो. पण चित्रपटाची कथा संपल्यावर, चित्रपटगृहातले दिवे लागल्यावर, आपल्याला पांढरा पडदाच दिसतो. त्याचप्रमाणे अज्ञानाचा अंधकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत मायेमुळे भ्रांती होतच असते. पण एकदा का ज्ञानाचा प्रकाश पडला की, सत्तेचे अधिष्ठान दिसू लागते आणि आपल्याला अधिष्ठानाचे ज्ञान होते.

सुखापासून सुरू झालेला हा प्रवास हा अनेक नागमोडी वळणे घेऊन, ईश्वराच्या अधिष्ठानापर्यंत येऊन म्हणजेच अथांग ज्ञानसागरापर्यंत येऊन पोहोचला होता. सर्व प्रभुभक्तांना एकाच नावेमध्ये बसवून श्री ज्ञानराज प्रभुरुपी कुशल नावाड्याने, ज्ञानाच्या ह्या खळखळ वाहणाऱ्या नदीतून, वेदांतसागरापर्यंत सर्वांना सुखरूप आणून पोहोचवले होते. प्रवचनाच्या शेवटी अवधूत चिंतनाचा गजर होताच उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाटाने श्रीप्रभु मंदिराचे सभागृह भरून राहिले होते.

प्रवचननंतर श्रीजींनी श्रीप्रभुंची आरती केली आणि अतिथीगृहाकडे प्रस्थान आरंभले. श्रीप्रभु मंदिराच्या बाहेरच सगरोळी गावातील सावकार श्री.गंगाधर शक्करवार ह्यांनी श्रीजींच्या प्रवचनानंतर, भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. श्रीजींच्या प्रवचनासाठी गावातील आबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रवचनानंतर प्रत्येकजण प्रभुचा प्रसाद घेऊन जात होता. पण भक्तांची संख्या पाहता केलेला प्रसाद कमी पडेल की काय अशी काळजी यजमानांना वाटू लागली. पातेल्यात असलेला प्रसाद आणि भक्तांची संख्या याचे प्रमाण अगदीच व्यस्त होते. प्रसादासाठी भक्तांची खूपच मोठी रांग होती, त्यामुळे ऐन वेळी आता काय करावे, अशी चिंता प्रसादाचे वाटप करण्याऱ्यांना भेडसावू लागली. भाताचे मोठे पातेले रिकामे होत आले होते आणि नव्याने जास्तीचा भात शिजवायला वेळही नव्हता. त्यातच पावसाची रिपरिप चालूच होती. त्यामुळे श्रीप्रभुला शरण जाण्याशिवाय आता कोणताही पर्याय नव्हता. हे प्रभुराया, तूंच आता आमचे आता सत्व राख, असे म्हणून भक्तकार्याचा जयघोष झाला. आहे तेवढा प्रसाद वाढूयात, असा विचार करून कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रसाद वाटपाला सुरुवात केली. रांगेतून भक्त येतच होते, प्रत्येकाला भरपूर प्रसाद मिळत होता. पातेल्यात असलेल्या प्रसादाचे आणि भक्तांचे व्यस्त प्रमाण वाटत असतानाही, सर्वांनी मनसोक्त प्रभुचा प्रसाद घेतला. श्रीगुरु जेथे असतो, तेथे देवी अन्नपूर्णेचा निरंतर वास असतो आणि त्यांच्याच कृपेच्या कटाक्षाने पुढील गोष्टी विनासायास घडून येतात. ह्या प्रसंगाच्या निमित्ताने श्री माणिक चरितामृतातील भालकीच्या जंगलातील  माधुकरी मागून आणलेल्या अन्नाने हजारो लोक जेवल्याचा प्रसंग आठवला. श्रीगुरूंचा अवतार काळ, स्थळ जरी बदलले, तरी ते एकच गुरुतत्व त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष कार्यरत असते. श्री गंगाधर सावकारांच्या अन्नदानाच्या प्रसंगातून हीच व्यवस्था, श्रीगुरुंचा हाच निर्विवाद अधिकार अधोरेखित होतो.

अतिथीगृहावर परतल्यावर आमच्या सर्वांचे भोजन झाले. श्रीगुरुंच्या कृपावर्षावाची अनुभूती निरंतर घेत असतानाच, बाहेरही पावसाची जोरदार वर्षा सुरू होती. श्रीप्रभु चरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करून निद्रादेवीच्या अधीन झालो.

क्रमशः

[social_warfare]