
श्रीजींच्या प्रवचनातून आपण एक गोष्ट अनेकदा ऐकली आहे ती म्हणजे, एका अंध भिकाऱ्याला भगवंत प्रसन्न होतो आणि त्याला एक वर मागण्यास सांगतो. त्यावर तो भिकारी म्हणतो, “भगवंता, माझ्या नातवाला मी राजा म्हणून सोन्याच्या सिंहासनावर बसलेला पाहू इच्छितो!” या एका वरामध्ये त्या अंध भिकाऱ्याने भगवंताकडून अनेक गोष्टी प्राप्त करून घेतल्या. एक तर स्वतःला दृष्टी, स्वतःचे दारिद्रहरण, नातू व्हावा म्हणजे स्वतःचे लग्न, मुलेबाळे, त्यांची लग्न होऊन त्यांना मुलेबाळे. त्यातला एक नातू राजा बनून सोन्याच्या सिंहासनावर बसलेला पाहणे, त्यासाठी लागणारे दीर्घायुष्य, इतक्या सगळ्या गोष्टी त्या भिकाऱ्याने भगवंताकडून एकाच वरात प्राप्त करून घेतल्या.
४७व्या अध्यायात रामचंद्रबुवा सोलापूरकर यांच्या पूर्वजांचा इतिहास ओवी क्रमांक १० ते २८ येथपर्यंत अत्यंत विस्ताराने वर्णन केला आहे. वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वर या मूळ गावचे यजुर्वेदी ब्राह्मण म्हणून रामचंद्रबुवांचा अगदी त्रोटक उल्लेख करता आला असता. परंतु, बुवांच्या कुळाचा मूळ पुरुष भीकदेवांना त्यावेळच्या परंपरेनुसार तीन आश्रमांनंतर संन्यास घेण्याची इच्छा झाली. परंतु संन्यास दीक्षा आपल्याला प्रत्यक्ष श्रीदत्त महाराजांनी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी माहुरगडी अत्यंत घोर तपश्चर्या आणि अनुष्ठान करून प्रत्यक्ष श्रीदत्तांनाच प्रसन्न करून घेतले. श्रीदत्तांनी वर माग, असे म्हणताच, भीकदेवांनी “माझ्या पुढच्या पिढीतील सर्वांना संन्यासदीक्षा घेऊनच चिरसमाधी मिळावी”, अशी याचना केली.
या एकाच वरामध्ये अनेक वरदाने भीकदेवांनी श्रीदत्त महाराजांकडून प्राप्त करून घेतली. ‘माझ्या पुढच्या पिढीतील सर्वांना’ – येथे त्यांनी आपला वंशविस्तार पिढ्यान् पिढ्या सुरू राहील, प्रत्येकाला मुलेबाळे होतील, असा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. त्याचबरोबर त्यांना संन्यासधर्म स्वीकारल्यावरच समाधी मिळावी, येथे भीकदेवांनी आपल्या वंशातील पुढच्या पिढीच्या दीर्घायुष्याची याचना केलेली दिसते, कारण शास्त्रानुसार ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास असे चार आश्रम वर्णिले आहेत आणि प्रत्येक आश्रम स्वीकारून संन्यास घेईपर्यंत जवळपास वृद्धापकाळ जवळ येतो. त्याचप्रमाणे येथे आपली पुढची पिढी ही शास्त्रसंमत धर्माचरण आचरण करेल, असे अभिवचनही भीकदेवाने श्री दत्तात्रेयांकडून मिळविले. आपल्या पुढच्या पिढीने ही धर्मरक्षण करावे, आपल्या परंपरा जपाव्या, धर्ममार्गावर चालावे, ही भीकदेवांची तळमळही आपल्याला येथे जाणवते.
श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वाद स्वरूप भीकदेवांच्या पुढच्या पिढीत रंगनाथ स्वामी, पूर्णानंद स्वामी, अच्युतानंद स्वामी असे अनेक सिद्ध पुरुष झाले आणि त्या सर्वांनी शेवटी संन्यास दीक्षा घेतली. यातील पूर्णानंदस्वामींनी तर अनेक चमत्कार केले आणि लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध झाले. रामेश्वरला जाताना सोलापूरच्या पुढे वाटेतच रामचंद्रबुवांच्या मृतप्राय पत्नीलाही श्री माणिकप्रभुंनी जीवदान दिले. पुढे रामचंद्रबुवांनी रामेश्वरला जाण्याचा बेत रहित करून काशीच्या गंगेने श्रीप्रभुंनाच अभिषेक घातला. बुवांची चारधामाची यात्रा रामेश्वर दर्शनाने पूर्ण होणार होती. आधीचे तीन धाम पूर्ण करून, आपली चारधामाची यात्रा रामेश्वरऐवजी माणिकनगरी श्रीप्रभुंचे दर्शन घेऊन पूर्ण केली. यावरून श्रीदत्तांनी दिलेला आशीर्वाद आपल्यला पिढ्यान् पिढ्या फळतो, हेही लक्षात येते.
त्यामुळे आज आपल्याला प्राप्त झालेले गुरुचरण आणि लाभलेली गुरुभक्ती यात आपापल्या पूर्वजांचाही अप्रत्यक्ष सहभाग असतो, हेही आपल्या लक्षात येते. कदाचित त्यांनीही अशीच प्रार्थना त्या वैश्विक शक्तीकडे केली असावी. त्यामुळे आपल्या पूर्वजांचे नित्यनेमे स्मरण करणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून श्राद्धादि कर्मे करणे, हेही आपले कर्तव्य आहे. धर्म रक्षणाच्या, परंपरा जपण्याच्या, छोट्या छोट्या बाबीही ग्रंथकार राघवदासांनी श्रीमाणिक चरितामृतात अगदी विचारपूर्वक गुंफल्या आहेत.
[social_warfare]
Recent Comments