ज्ञानाचे अंखड स्त्रोत

प. पू. श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार

संपूर्ण अधिक महिनाभर (पुरुषोत्तम मास) आपल्या मुखातून बाहेर पडणारी अमृतवाणी म्हणजे जसे काही दुग्धपान आम्ही प्राशन करीत होतो. आपल्यामुळे आम्हाला भरभरून गीता ज्ञान प्राप्त करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. या गीता ज्ञान यज्ञात भाग घेण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभले.

नारद भक्ति सूत्रात नारद मुनींनी म्हटले आहे की परमेश्वराच्या कृपेशिवाय महापुरुषांचा संग प्राप्त होत नाही. नक्कीच श्री माणिक प्रभूं ची आम्हा सर्वांवर कृपा आहे म्हणूनच आम्ही या गीता ज्ञान यज्ञात सहभागी होऊ शकलो.

आपण महिनाभर अतिशय मेहनत घेऊन १३,१४व१५ या भगवद्गीतेतील ३ अध्यायातील अनेक वचने आम्हाला समजतील अशा तऱ्हेने अनेक कथा सांगून सोप्या रीतीने वर्णन करून सांगितलेत.

आपली अनेक प्रवचने आम्हाला या भवसागरातून पार व्हायला मदतच करीत असतात. परंतु ह्या अधिक महिन्याची गोष्ट आणखीनच प्रेरणादायी होती.६ कधी वाजतात याची आम्ही वाट बघत असू. आपण आमच्यापासून दूर आहात असे कधी जाणवलेच नाही.

आम्ही आपल्या समोर बसून ज्ञान रसाचे दुग्धपान करीत आहोत असेच वाटत असे.मनात अनेक प्रश्न निर्माण होत असत परंतु आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवचनात त्याची उत्तरे मिळत असत.

जो आपला उद्देश होता आणि ज्यासाठी आपण एवढी मेहनत घेतली तो आम्ही वाया नाही जाऊ देणार. आम्ही यापुढेही श्रवण, मनन, निदिध्यासन चालूच ठेवू आपला आशीर्वाद मात्र आम्हावर कायम असावा हीच प्रभु चरणी प्रार्थना.

अशाच अनेक प्रसंगांनी आपल्या कडून मिळणारे हे ज्ञानाचे स्त्रोत अखंड चालू राहो हीच प्रार्थना.

कां रे मना अल्लड धावसि तू

कां रे मना अल्लड धावसि तू

टाळुनि गुरुच्या मार्गाला

विसरुनि श्रीगुरु भजनाला

वृथा रमसि भव नादी रे॥१ ॥

 

विषयांच्या नादात अडकुनी

व्यर्थ दवडिसी जीवन हे

गुरुचरणी तू लाग त्वरेंने

जाय समुळ भवव्याधी रे॥२॥

 

मूढ मना किति सांगू आता

धरि तू श्रीगुरु चरणा रे

सिद्धज्ञान गुरु माणिक प्रभु तू

पार करी या दीना रे॥३॥

मी मिथ्या जन बोली

श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांना माहित आहे कि महाराज बहुधा उघडपणे काही न बोलता संकेतानी आपला संदेश भक्तांना कळवायचे. सद्गुरूंनी उद्गारलेला प्रत्येक शब्द तर मोलाचा असतोच पण कधी-कधी न बोलता ते जे सांगतात त्यांनी आपला उद्धार होऊन जातो. आवश्यकता असते ते त्यांच्या प्रत्येक संकेताकडे लक्ष देण्याची. कित्येकदा शिष्याच्या हिताचा काही संदेश त्या संकेतांत दडलेला असतो. पुष्कळ शिष्यांना असे अनुभव आले असावेत. मला देखील अनेक वेळी असे अनुभव आले आहेत. महाराज प्रत्यक्षात बोललेले आठवत नाही पण निरोप स्पष्टपणे मिळाला. अशीच एक घटना लक्षात राहिली, ती आज आठवते.

शिक्षण संपल्यावर आमच्या वडिलोपार्जित दुकानाची जवाबदारी माझ्यावर पडली. तरीही मी होता होईल तो दत्तजयंती उत्सव चुकवीत नसे. माणिकनगरला निघताना मी मनातल्या मनात प्रभूंना प्रार्थना करीत असे की माझ्या गैरहाजरीत माझं दुकान त्यांनीच सांभाळावे.

असंच एकदा मी माणिकनगरला असताना दुकानात कांहीतरी अडचण आली व मी महाराजांना म्हणालो, ‘‘आता आपणच सांभाळा.’’ महाराजांनी माझ्याकडे फक्त बघितले आणि माझ्या कानात शब्द दुमदुमले, ‘‘एरवी तुझे दुकान कोण सांभाळतो?’’ मी दंग राहिलो. माझा विश्वासच बसेना, हे कसे शक्य आहे? काहीही न बोलता महाराजांनी मला उत्तर दिले. चमत्काराच्या गोष्टी ऐकण्यात आणि प्रत्यक्ष चमत्कार अनुभवण्यात खूप फरक असतो, हे मला तेव्हां कळाले. माझी गोंधळून गेलेली अवस्था महाराज पाहत होते पण महाराजांच्या डोळ्यात पाहाण्याची हिम्मत त्या वेळी मला झाली नाही. पटकन मी वाकलो आणि श्रीजींच्या पायांवर डोके टेकविले.

‘‘एरवी कोण सांभाळतो?’’ खरेंच आहे. आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान असतो आणि वाटत असते की मी सर्व करतोय. पण खरं पाहू गेल्यांस ‘‘कर्ता हर्ता तो करवीता। मी मिथ्या जन बोली। प्रभुविण कोण कुणाचा वाली।।’’.

त्या क्षणीं मला ह्या गोष्टीची जाणिव झाली की आपल्या आयुष्यात आपल्या कळत न कळत कित्येक वेळेला कित्येक प्रसंगात आपले सद्गुरूच आपला सांभाळ करीत असतात आणि आपल्याला ह्याची जाणीव देखील नसते. आपण फक्त मी-मी चा डंका वाजवीत असतो. म्हणून प्रत्येकानी सदैव आपल्या योगक्षेमाची काळजी वाहणार्‍या आपल्या सद्गुरूंचे सदैव आभार मानावेत.

देवा तुझ्या दारी आलो

देवा तुझ्या दारी आलो, तुझ्या दर्शनासी।
जीव झाला वेडा माझा तुला भेटण्यासी।।

रूप तुझे रहावे सदा माझ्या अंतरात।
जन्म माझा जावो सदा तुझ्या स्मरणांत।।

मागतो मी देवा तुला एक वरदान।
मुखी सदा राहो देवा तुझे गुणगान।।

माया मोहाची ही बेडी तोडी भवबंध।
तुझ्या चरणाची सेवा हाचि माझा छंद।।

ठेवी देवा माझ्यावरी कृपेचा तू हात।
तुझ्या दर्शनाने होई चित्त माझे शांत।।

राहो मन माझे तुझ्या भजनांत दंग।
ढोलकीच्या नादी गातो सिद्धाचा अभंग।।

राहो माझ्या ध्यानी मनी प्रभूंचे चरण।
देई मला थोडे तरी ज्ञानाचे ‘किरण’।।

अद्भुत अनुभव

सप्टेंबर २००९ मध्ये अनंत चतुर्दशी च्या २/३ दिवस आधी मी, सौ .स्वाती मोहिले , श्रीरंग चौबळ व सौ .स्मिता अचानक ठरवून माणिकनगरला गेलो. तसे प्रयोजन उत्सव वगैरे काहीच नव्हते. या आधी गणपती काळात कधीही माणिकनगरला गेल्याचे आठवत नाही. गुलबर्गा येथे पोहोचून तेथून return taxi करुन माणिकनगरला गेलो कारण त्याच दिवशी रात्रीच्या हुसैनसागर एक्सप्रेसनी परत निधणार होतो. तसे 3rd AC चे booking पण होते. कां कोणास ठाऊक पण माणिकनगर एकदम शांत भासत होते.

श्री सिद्धराज महाराजांची प्रकृती बरी नसल्याचे समजले. तरी मी व बाळा आल्याचे कळल्यावर श्रीजींनी आम्हाला आपल्या शयनकक्षातच बोलावून घेतले. झोपूनच आम्हाला चरण दर्शन दिले. आम्ही लगेच निघालो कारण प्रकृती खूपच बरी नव्हती.

आम्ही नेहमीप्रमाणे सर्व देवळात दर्शन घेऊन भंडारखान्यांत प्रसाद घेतला. रात्रीच्या ट्रेननी परतायचे होते म्हणून मंदिर परिसरातच रेंगाळत होतो. सहज संध्याकाळी भक्तकार्य कधी होईल याची चौकशी करता ६ च्या सुमारास होईल असे समजले. बाळा ने मला विचारले आपली ट्रेन कितीची आहे? मी टिकिट पाहून सांगीतले ‘‘18.45 म्हणजे 7.45 pm’’

आम्ही भक्तकार्य करुन जायचे ठरवले व ६ पासून वाट पाहू लागलो परंतु महाराजांना खूप त्रास होत असल्याचे व आत्ताच उलटी झाल्याचे समजले. भक्तकार्य कदाचित्‌ होणार नव्हते. आम्ही महाराजांना निघतो म्हणून निरोप पाठवला. परंतु अचानक श्रीजींनी ‘‘मी येतो, थांबा’’ असा उलट सांगावा पाठवला .

महाराज आले, खूप थकवा जाणवत होता पण फक्त आमच्यासाठी त्यानी भक्तकार्य केले प्रसाद दिला, आम्ही चौघे व १/२ ग्रामस्थ हजर होते.त्या नंतर जुजबी बोलणे झाले मी म्हणालो ‘‘आता मुंबई दौरा करा एकदा’’ तेंव्हा ते गूढ हसत म्हणाले -‘‘आता मुंबई?’’

कां कोणास ठाऊक पण आमचा पायच निघत नव्हता, पोट पिळवटून आले होते, मन विषण्ण झाले होते. शेवटी श्रीजी म्हणाले ‘‘अरे तुमची ट्रेन आहे निघा आता.’’ जड अंत:करणाने निघालो, महाराज बसूनच होते, संगमावरुनही ते आमच्या कडे एकटक पहात असल्याचे आम्हाला जाणवले, आम्हा चौघांतही एक भयाण शांतता होती. ही कसली चाहूल आहे हे कळत नव्हते. शेवटी बाळा ने कोंडी फोडली म्हणाला ‘‘आज महाराज काही वेगळेच भासले’’. आम्ही फक्त दुजोरा दिला. त्यातच गुलबर्गा येथे पोहोचलो व किती वाजले ते पाहीले व मी ओरडलोच ‘‘बाळा मी चुकलो 18.45 is 6.45 pm not 7.45 pm आपली ट्रेन गेली.’’ इतक्या वर्षात मी railway time मध्ये कधीही गफलत केली नव्हती कारण तोच माझा व्यवसाय आहे. मग आज हे असे कसे घडले? मी अचंबित झालो .

आता २ बायका मी व बाळा .. and no reservations. सहज main TT कडे गेलो त्यास परीस्थिती सांगीतली तो अचानक म्हणाला मागून chennai exp येते आहे मी ac iii मध्ये 2 berth देतो 2 बर्थ train मध्ये try करा. आम्ही तयार झालो पण चुकलेल्या train चा 50% refund? पैसे फुकट जाणार. तो TC म्हणाला एक काम करा तिकीट मला द्या मी नंतर काउंटर वरुन घेईन तुम्ही मला amount वळती करुन द्या व निघा.

आम्ही पळत 3 no platform वर आलो कारण train आली होती. आता 2 birth and 4 persons. आम्ही coach च्या दारात पोहोचलो तोच train चा tc आला व म्हणाला कीती जण आहात आम्ही सांगीतले 4 persons but only 2 berths we have. तो म्हणाला no problem आत तुमचे जे 2 berth आहेत त्या समोरच्या 2 berth अजून घ्या wadi quota आला नाही. हे सर्व अजब होते. आगाऊ बुकींग करूनही न मिळणारे reservations आयत्या वेळी? Train miss झाल्यावर?

स्वतः आजारी असतानाही श्री सिद्धराज महाराजांनी आमची परतीची सोय मात्र उत्तम केली होती. पण माणिकनगर मधील आजच्या दिवसातील घडामोडींचा व आमच्या मनातील घालमेली चा खरा अर्थ आम्हाला नंतर कळला. कारण….. ते आमचे श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांचे अखेर चे दर्शन होते.

आमचे कारणाशिवाय अचानक माणिकनगर ला जाणे (जणू महाराजांनीच भेटायला बोलावून घेतले). श्री सिद्धराज महाराजांचे अखेरचे दर्शन व महाराजांकडून शेवटचा प्रसाद मिळणे. train चुकून ही विनासायास reservations मिळणे हे सर्व आमच्या वरील श्री सिद्धराज महाराजांचे प्रेम व अखंड आशीर्वाद या शिवाय शक्यच नव्हते. महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठी सदैव आहेतच, पण ते आमच्यापाठी आहेत, याची जाणीव सतत होत रहावी, हीच त्यांच्या चरणीं प्रार्थना.

धरता येते पण सोडता येत नाही

मी प्रभुसंप्रदायात अगदीच नवीन होतो. मी फक्त श्री रत्नाकर चौबळ यांना ओळखत होतो. परमपूज्य सिद्धराज महाराजांशी माझी जास्त बोलण्याची हिम्मत सुद्धा व्हायची नाही. श्री ज्ञानराज महाराजांशी बऱ्याच वेळी संवाद होत असे. आमच्या अडीअडचणी आम्ही चौबळ काकांच्या थ्रू श्रीजींकडे सांगत होतो. ९ सप्टेंबर २००४ ला चौबळ परिवार दुबईला होता. मी कोल्हापूरला ७ सप्टेंबर ला गेलो आणि ९ तारखेला परत मुंबईला आलो. प्रवास जरा हेक्टिक झाल्यामुळे घरी येऊन झोपलो. तेव्हड्यात फॅक्टरी मधून फोन आला आणि बातमी ऐकून माझे धाबं दणाणलं. फॅक्टरी मध्ये चोरी झाली होति ७/८ लाखाच  स्टील चोरीला गेलं. मी घरी सांगितलं ५० हजाराच नुकसान झालं असं खोटं सांगितलं. घरचे सगळे शॉक घेतील असे वाटले. मी पोलीस कंप्लेंट केली आणि फॅक्टरी ची कंडिशन बघत होतो. नवीन बिझनेस चालू केला आणि मोठा फटका बसला. चौबळ काकांना फोन करायची सोय नव्हती की जेणेकरून ते श्रीजीना सांगतील. मी सरळ श्री ज्ञानराज महाराजांना  फोन केला आणि सर्व काही सांगितलं. त्यांनी सांगितलं ‘‘काळजी करू नको मी श्रीजीना सांगतो.’’ महाराज माझ्याशी बोलले आणि खूप धीर दिला. श्रीजींचा प्रसाद दुसऱ्या दिवशी आला. त्यांनी मला पुण्याच्या एका  मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा नंबर दिला व स्वतः पण त्यांच्याशी बोलले. मी त्या अधिकाऱ्याला माझे सर्व चोरीचे डिटेल्स दिले. दिवाळी झाल्यावर श्रीजींचा मोठा मुंबई दौरा होता. मी सर्व श्रीजींवर सोडून बिझनेस आणि दौऱ्याच्या कामाला लागलो. श्री ज्ञानराज महाराज रोज फोन करून चोरीच काय झालं म्हणून चौकशी करत होते. मी देखील पोलीस स्टेशनला जाऊन विचारत होतो. बरोबर एक महिन्यानी एके दिवशी जेवताना श्रीजींनी ज्ञानराज महाराजांकडे चौकशी केली की ‘‘त्या शिरीषच्या चोरीचं काय झालं.’’ त्यांना कळलं की अजून काही सापडलं नाही. यावर श्रीजी कांहीच न बोलता सरळ झोपायला गेले व पांघरूण घेऊन झोपले. त्याच रात्री पोलिसांनी चोरी पकडली मला सकाळी ६ वाजता पोलीस स्टेशन मधून फोन आला ‘‘तुमचा चोरीचा माल मिळाला तुम्ही या आणि घेऊन जा कोर्ट फॉर्मॅलिटी नंतर करा.’’ मी सरळ श्री ज्ञानराज महाराजांना फोन लावला त्यांना सर्व हकीकत सांगीतली. ते म्हणाले ‘‘थांब, श्रीजीशी बोल’’ असे म्हणून ते फोन घेऊन खाली श्रीजींच्या बेडरूम मध्ये गेले. त्याना पाहताच श्रीजी पांघरूण बाजूला करून स्वतः म्हणाले ‘‘शिरीषची चोरी मिळाली ना?’’ मी त्यांच्याशी बोललो अश्रू अनावर झाले होते माझे. त्यांनी फक्त एवढच सांगितलं ‘‘मी आहे घाबरू नकोस.’’ असे सद्गुरू मिळायला भाग्य लागतं. आज देखील तो प्रसंग आठवला की नकळत डोळे ओले होतात. श्री सिध्दराज महाराज काय किंवा श्री ज्ञानराजमहाराज काय त्यांना भक्तावरच अतिशय प्रेम! खऱ्या अर्थाने भक्ताच्या योगक्षेमाची अखंड काळजी घेत असतात.

श्री ज्ञानराज महाराजांनी २०१५ जानेवारी महिन्यात आम्हाला मृत्यू च्या दाढेतून बाहेर काढलं. मी, अतुल मोहिले, अनंत सकपाळ, बाळा चौबळ अशी मंडळी श्रीजींचं प्रवचन ऐकून बीदरहून परत येत होतो. मी ड्रायविंग करत होतो  रात्र झाली होती. घाटात बैलगाडी ऊस घेऊन रॉंग साईडला आली मी बैलगाडी वाचवायला गेलो आणि राईट साईडला गाडी घातली आणि समोरून येणारा भरधाव ट्रक माझी गाडीची राईट साईड चिरत गेला सगळ्यांना वाटले संपलं! आम्ही सगळे पाच मिनिट सुन्न होतो. बाहेर येऊन बघितलं, कोणीही जखमी नव्हतं, रक्ताचा एक थेंब सुद्धा नव्हता. गाडी तश्या परस्थितीत चालू होती. आम्ही माणिकनगरला आलो सर्व हकीकत महाराजांना सांगीतली. महाराज म्हणाले आता उद्या सकाळी प्रभूला अभिषेक करून जा. सकाळी अभिषेक करून श्रीजीं कडे नास्ता करून निघालो. ती चेचलेली गाडी मुंबई पर्यंत सुखरूप आली. असे प्रसंग बघितले म्हणजे प्रभूंच्या सत्तेची प्रचिती आल्यावाचुन राहत नाही त्या प्रभूला फक्त धरता येते सोडता येत नाही.