भक्तांची माऊली हो

प्रसन्न होवोनि दत्तगुरु अवतरले या भुवरी हो
माणिकप्रभु हे नाम घेवुनी जडमुढ जन तारीले हो
भक्तकार्य कल्पद्रुम ब्रीद हे बसले भक्ता मनी हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

सवंगड्या सम खेळ खेळता लिला अनंत केल्या हो
घेवोनि कवड्या भीमाबाईच्या अष्टपुत्र फळ दिधले हो
व्यंकम्माचा भाव मनीचा पाहुनी प्रभु मनी द्रवले हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

प्रभु फिरतीवर असती जिकडे तिकडे उत्सव घडती हो
भक्तही येती दर्शन घेती नवसे ही फेडती हो
पंथ सकलमत करुनी स्थापन भक्तां पावन करी हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

प्रभु आज्ञेने यज्ञ जाहला वेद घोष बहु झाले हो
गुढ्या पताका रांगोळ्या अन दारी तोरणे सजली हो
आम्हीच आम्हा धन्य मानतो प्रभुचरणी मन जडलो हो
घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

घेऊन जवळी कृपा करी तु भक्तांची माऊली हो

 

क्षणभर बस रे गड्या

क्षणभर बस रे गड्या प्रभु चरणी
प्रपंच चिंता स्वयें विसरुनी
देह लोभ हा नको कराया
मी मी म्हणता जाईल काया
प्रभुच येईल तुज ताराया
अद्भुत आहे प्रभुची करणी
नको अपेक्षा करु धनाची
सारी माया असे क्षणाची
कास धरावी गुरु कृपेची
गुरुतत्वाला घाल गवसणी
धन्य मानवी जन्म मिळाला
ठेवा स्मरणी प्रभु नामाला
सुखे करावे नरदेहाला
दास मनोहर करी विनवणी
क्षणभर बस रे गड्या प्रभु चरणी
प्रपंच चिंता स्वयें विसरुनी.

घडो माझी वारी

घडो माझी वारी प्रभु तुझ्या दारी
माणिकनगरी विठ्ठल माझा

तुळसीचा हार तुझा अलंकार
शोभलासे फार प्रभु गळा

चंद्रभागा आली संगमी पावली
वारीचीच झाली दिंडी येथे

मुखी प्रभु नाम हेची नित्य काम
बाकी सारा भ्रम देखादेखी

शब्दांचीच सेवा गोड मानी देवा
चरणासी ठेवा मनुबाळा

 

एकची सुख मज

एकची सुख मज होई अंतरी
जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि खरे सुख ||

निज स्वार्थाचे नको मागणे
व्हावे समरस प्रभु दर्शने
व्यंकम्मा सम भाव मनी धरी
जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख ||

ज्ञान’ भक्तीचे वाजे चौघडे
सकलमताची ध्वजा फडफडे
भक्तांचे कल्याण करी हरी
जाता क्षणभर प्रभु मंदिरी || हेचि असे सुख ||

उठ प्रभुवरा 

उठ प्रभुवरा निशा ती सरली
तेजोमय ही प्रभा पसरली
भक्त राऊळी दाटी करती
दर्शन द्या मज हे कमलापती

नटला रे नटला प्रभु माझा
कृष्ण शोभला तो मथुरेचा
गोपगोपीका शोधी जयाला
माणिकनगरी तोची प्रगटला

नानाविध त्या सुमन माळा
बेल वाहिला गंगाधराला
धुप दिप पंचारती लावा
प्रभु चरणावर मस्तक ठेवा